रसाळगड एक दुर्ग
अभ्यास!
- दीपाली लंके
सह्याद्री आणि सह्याद्रीचे
खोर विपुल श्रीमंत आहे. सह्याद्री महाराष्ट्राची आणि सगळ्याच भटक्यांची पंढरी असून
सह्याद्रीच्या दर्या खोर्यात आपणास असे अनेक दुर्ग पहायला मिळतील कि त्यांचा इतिहास
आणि त्याबद्दल ची संपूर्ण माहिती घेण्यासाठी थेट आपल्याला इतिहासाच्या गाभार्यातच शिरावे
लागते, त्यातलाच एक रसाळगड आहे. रसाळगड हा रत्नागिरी जिल्ह्यात असून खेड हून जैतापूर
मार्गे आपल्यला घेरा रसाळवाडीत पोहचता येते तिथूनच पुढे रसाळगड आहे.रसाळगड हा एक स्वतंत्र
दुर्ग अभ्यासाचा विषय होऊ शकेल असे मला तरी वाटले नव्हते. रसाळगड आणि त्याचा इतिहास
मला उमगला तो श्री प्रवीण कदम सर यांसकडून. ते गेली १० वर्ष रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड
या उपेक्षित आणि दुर्लक्षित अशा दुर्गांवर संशोधन आणि अविरत पणे अभ्यास करत आहेत.
ट्रेक ला जाण्यासाठी
रसाळगड नाव ऐकलं आणि त्याचा थोडा परिचय घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा वाटलं हा छोटेखानी
टुमदार किल्ला कोणत्या ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार असावा? मनात विचारचक्र चालूच
होते.ट्रेक दरम्यान श्री प्रवीण कदम सर यांची भेट झाली आणि रसाळगडचा रसाळ इतिहास आमच्या
मनात असणाऱ्या कुतूहलाला अजूनच वाढवत होता. रसाळगड हा गिरिदुर्ग साधारणपणे १७०० फूट
उंच आहे. रसाळवाडीतून किल्ल्यावर दन दरवाज्यातून आपला प्रवेश किल्ल्यात प्रवेश होतो.
रसाळगड हेच नाव का दिले असावे याचे पुरावे मात्र कुठेच सापडत नाहीत.जावळीच खोर म्हणजे
इतिहासात प्रसिद्ध असा याच खोर्यातील हा एक किल्ला आहे.शिलाहार,बहामनी, अंग्रे,मराठे,पेशवे
या सगळ्याच राजवटींचा रसाळगड हा मूर्तिमंत साक्षीदार आहे. गडाचा वैशिष्ट्य म्हणजे तोफा
आणि पाण्याचे टाके.साधारणपणे १९ तोफा आपल्याला किल्ल्याच्या माथ्यावर विविध बुरुजांवर
पाहायला मिळतात.तोफांवर विशिष्ट्य पद्धतीचे अंक कोरलेले असतात त्याचा आशय अस आहे कि,
कोणत्या आकाराचा दारुगोळा यात भरवायचा असून त्या तोफेचा मारा किती अंतरापर्यंत आहे.लहान
मोठ्या अशा बर्याच तोफा गडावर आहेत. सतीगळ, विरगळ सुद्धा आपल्याला या गडावर पहावयास मिळतात.झोळी आणि वाघाजी
देवीचं मंदिर गड माथ्य्वर आहे. त्रिवार्षिक जत्रा रसाळगडावर भरत असून लाट वाहणारे मानकरी
आणि त्यांचा मान हा पूर्वापार चालत आलेली एक परंपरा आहे.एका विशिष्ट पद्धतीचं पाण्याचं
भुयार टाक आपल्याला गडाच्या प्रवेशद्वारापासून खालच्या दिशेला ( उजवीकडे )गेल्यास नजरेस
पडता तसेच पुढे गेल्यास २ तशीच टाकी आहेत. तसेच डाव्या बाजूला थोडी चढण चढल्यास पाण्यचे
२ टाके आहेत.त्यातील दोन्ही टाक्यात पायऱ्या असून टाके हे प्रशस्त आहेत.गडाचा संपूर्ण
परिसर ३० एकर असून बऱ्याच समाध्या, वाड्यांचे चौथरे आहेत. साधारणपणे २ ते ३ तासात हा किल्ला प्रत्येक वस्तू
अवशेष पाहून फिरून होतो.धन्य कोठार देखील पाहायला मिळते. झोळी देवीच्या मंदिरात बऱ्याच
मुर्त्या कोनाड्यात ठेवलेल्या आहेत. मंदिराच्या बाजूला गणेश मंदिर असून त्याचं घुमत
आपले लक्ष वेधतो.मंदिरा समोरच दीपमाल आणि तुळशी वृंदावन आपल्याला पाहायला मिळते.किल्ल्यावर
पूर्वेस नंदी, महादेव मंदिर असून तिथेच आपल्यला कातळात कोरलेली गजलक्ष्मी पाहायला मिळते.तिथूनच
पुढे चढण चढून गेल्यास खालच्या उतरणीला खांब टाक पहायला मिळत याचा वैशिष्ट्या असा कि
सुंदर अशी रेखीव गणपती मूर्ती टाक्या मध्ये कोरलेली आहे. बराच काळ कान्होजी अंग्रे
यांच्या ताब्यात असलेल्या या किल्ल्यावर मोठा राबता असावा असे पाण्याच्या टाक्यांवरून
आणि एकंदरीत वस्तू अवशेषांवरून दिसते.
महाराष्ट्रात असणारी
एकमेव स्वीवेल गन ( बंदूक) येथे पाह्यला मिळाली. लांबसडक हि गन एकमेव असून ती रसाळगडावर
जतन करून ठेवली आहे.बरेच बंदुकीचे छर्रे, गोळ्या, तोफगोळे पुरातावा खात्याने रातानागिरी
येतील संग्रहालय संग्रही ठेवले आहेत. या गडावर लढाया अशा झाल्या नसल्या तरी टेहळनिसाठी
आणि व्यापार मार्गावर लक्ष देण्यासाठी किल्ल्याचा वापर हा होत असे. तसेच परकीय जहाजे आणि त्यावरील अवैध माल येथे
जप्त करून ठेवण्यात येत असे.त्यतच स्वीवेल गन रसाळगडावर आली अशी इतिहासात नोंद आहे.
प्रत्यक्ष शिवाजी महाराज या किल्ल्यावर आले असल्याची नोंद नसली तरीही जावळीच्या खोर्यात
जेव्हा शिवाजी महाराज ३-४ महिन्यांच्या कालावधी साठी होते त्यासुमारास त्यांचे रसाळगडावर
पदस्पर्श असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रसाळगड पुरातत्व खात्याच्या अख्यारीत येत असून गडाच्या संवर्धनाचे
काम चालू आहे.श्री. प्रवीण सर आणि गावकर्यांनी मिळून दिलेल्या लढ्यानंतर सिमेंट ऐवजी
चुना जरी वापरात येत असला तरी गडाच पावित्र्य आणि एकंदरीत जुन स्वरूप ढासळण्याची दाट
शक्यता आहे हे आपल्यला नवीन बांधलेल्या झोलाई देवीच्या मंदिरावरून स्पष्ट होते, तसेच
दीपमाळ हि ५ थरांपर्यंत जुनी असून वरचे २ थर आधुनिक आहेत. दुर्गभ्यास, त्यामागची तळमळ
आणि आणि दुर्गसंवर्धन हे फक्त नावरूपी करायचे नसून आपला इतिहास जपला पाहिजे. संवर्धन
हे बांधकाम नसून आहे तेच कसं चांगल्या पद्धतीने जतन करता येईल याची ती गुरुकिल्ली आहे
हे पुरातत्व खात्याला कधी उमजेल कुणास ठाऊक?
रसाळगडावरून कोकणाचे
विहंगम दृश्य पाहायला मिळते. गडाच्या पूर्वेस आपल्यला चकदेव आणि मकरंदगड दिसतात तर
उत्तरेस आपल्याला सुमारगड आणि महीपतगड दिसतात.
एकंदरीत रसाळगड नावाप्रमाणेच
रसाळ असून त्याचा इतिहास आणि माहिती अनाकलनीय आहे.माहिती संकलन आणि संशोधन हे काम अविरतपणे
चालू असून श्री प्रवीण सरांनी जो इतिहास आमच्या पुढे ठेवला त्याबद्दल आभारी. प्रत्येक
किल्ल्याला असेच एका-एका भटक्याने अभ्यासाच्या दृष्टीने वाहून जरी घेतले तरी सह्याद्रीची अफाट अशी श्रीमंती टिकण्यास
हातभार नक्कीच लागेल असे मनात चमकून गेले.
|