चित्रकला ही चौसष्ट कलांमधील एक श्रेष्ठ कला आहे. प्राचीन काळी राजवाडे, सरदार धनिकांचे वाडे, गणिकांचे महाल इत्यादिंच्या भिंतीवर चित्रे रंगवण्याची पध्दत होती. त्यांना चित्रशाला, लेण्य किंवा भित्तीचित्रे म्हणून ओळखले जाई. ही चित्रे प्रामुख्याने पुराणातील कथा, रामायण, महाभारत यांच्यावर आधारीत असत किंवा पाने, फुले, वेलबुट्टी यांनी सजलेली असत.
लेण्यांमधून भित्तीचित्र काढण्यापूर्वी बुध्दाच्या जीवनातील प्रसंग दगडात कोरले जात असत पण या प्रकाराला अनेक मर्यादा होत्या. जागेच्या मर्यादेमुळे अनेक प्रसंग पुर्ण न दाखवता प्रतिकात्मक दाखवावे लागत. प्रसंगातील सर्व तपशिल दाखवता येत नसत. तसेच कोरीव काम जिकरीचे व भरपूर वेळ घेणारे होते. याउलट भित्तीचित्रात चित्रकार आपल्या कल्पकत्तेनुसार एखादा पुर्ण प्रसंग एकाच चित्रात किंवा लहान लहान चित्रांच्या मालिकेद्वारे उपलब्ध जागेत मांडू शकत असे. तसेच पात्रयोजना, पात्रांचे आकार, रंग इत्यादींचा वापर करुन चित्र परीपूर्ण बनवत असे.
भित्तीचित्र रंगविण्यासाठी लेण्यातील भिंतीवर प्रथम गिलावा देत असत. त्यासाठी चांगली कमावलेली माती, भाताचा तूस, वनस्पतींचे तंतू, दगडाची वस्त्रगाळ पुड, बारीक रेती यांचे मिश्रण एकत्र मळून त्याचा गिलावा गिंतीवर देण्यात येई. या गिलाव्यावर चुन्याचा पातळ थर देण्यात येत असे. जे चित्र भिंतीवर काढायचे असे त्याची लहान प्रतिकृती बनवून, त्यातील बारकाव्यांचा व तपशिलाचा अभ्यास केला जात असे. चित्राच्या प्रतिकृती प्रमाणे प्रथम भिंतीवर बिंदूंनी चित्र काढले जाई, नंतर ते बिंदू चित्रातील गरजेप्रमाणे बारीक किंवा जाड रेषांनी जोडले जात अशाप्रकारे पूर्ण चित्राचा बाह्याकार तयार झाल्यावर त्यात रंग भरले जात.
लाल, पिवळा, काळा, पांढरा, निळा हे मुळ रंग व त्यांचे मिश्रण करुन तयार होणारे रंग चित्रात वापरले जात असत. लाल, निळा, पिवळा रंग खनिजांमधून मिळत असत, पांढरा रंग चुन्यापासून, काळा रंग काजळी पासून मिळत असे. याशिवाय हिरवा, जांभळा, तपकिरी रंग व त्यांच्या रंगछाया वापरुन चित्र रंगवली जात असत. हे रंग पाणी व गोंदासारख्या पदार्थाचे मिश्रण यात कालवून चित्रात भरण्यात येत असत.
अजिंठ्यातील लेणे क्रमांक ९ व १० ही भित्तीचित्रांसाठी प्रसिध्द आहेत या लेण्यांमध्ये बुध्दाच्या जीवनातील प्रसंग, जातककथा यांचे चित्रीकरण करण्यात आले आहे त्या अनुषंगाने चित्रात राजा पासून ते भिकार्या पर्यंत माणसे, देशीविदेशी व्यापारी इत्यादी आपापल्या पेहेरावात, शिरोभुषण व अलंकारात दाखवले आहेत. त्याबरोबरच कथांच्या अनुषंगांनी त्यांच्या चेहर्यावरील आनंदी, दु:खी, स्वार्थी, घमेंडखोर इ. भाव दाखवल्यामुळे ती चित्रे जिवंत झाली आहेत. याशिवाय राजवाडे, उद्याने, घरे, दैनंदिन वापराच्या वस्तू, वाद्य यांचे चित्रीकरण यात असल्यामुळे आपल्याला तात्कालीन समाजाच्या राहाणीमानाची, समृध्दीची, संस्कृतीची कल्पना येते.
|