भाला हे अश्मयुगापासून वापरले जाणारे शस्त्र आहे. आदिमानवाला
शिकार करताना आपला हात लांब करण्याची आवश्यकता भासली, जेणे करुन शिकार जवळ येण्यापूर्वीच
तिच्यावर हल्ला करता येईल. त्यावेळी माणसाने काठीला गारगोटीचे टोक बांधून भाला बनविला
व स्वत:चा हात लांब केला हिंस्त्र प्राणी दिसताच पळून जाणारा माणूस, भाल्यामुळे धैर्यवान
बनून त्याच्यावर चालून जाऊ लागला. शिकारीप्रमाणेच युध्दातही प्रभावी शस्त्र म्हणुन
वापर वाढल्यावर भाल्याच्या प्रगतीला वेग आला.
भाला म्हणजे
सामान्यत: लाकडाच्या दांड्यावर धारदार पाते असलेले शस्त्र. काही भाल्यांना वेगळे पाते
नसून धातूच्या दांड्यालाच धारदार टोक काढलेले असते. भाला साधारणपणे स्वत:च्या उंची
इतका किंवा ६ फूटी असतो. पोलादापासुन बनविलेले टोकदार, रुंद, धारदार पाते त्रिकोणी
किंवा पानाच्या आकाराचे असते. पात्याची लांबी ६ ते १० इंच असते. हे पाते एका भरीव काठीवर
घट्ट बसविलेले असते.
भाला वापरायला
सोपा असून प्रभावी शस्त्र आहे. भाल्याचा उपयोग युध्दाच्या सुरुवातीला व हातघाईच्या
लढाईतही होत असे. युध्दाच्या सुरुवातीला भाले शत्रुवर फेकून मारले जात. तसेच घोडदळाला
रोखण्यासाठी शत्रूच्या दिशेने फेकून भाले जमिनीत रोवले जात. भाला चालवण्यात पटाईत असणार्याला
‘‘भालाईत’’ म्हणतात.
भाल्याचे त्याच्या वापरावरुन
अनेक प्रकार पडतात
१) पदांती भाला: पायदळातील
सैनिकाचा भाला.
२) अश्वकुंत: घोडदळातील सैनिकाचा
भाला.
३) गजकुंत: गजदळातील सैनिकाचा
भाला.
४) मानाचा भाला: राजाच्या सिंहासनाजवळ,
मिरवणुकीत, धार्मिक विधीत वापरला जाणारा नक्षीदार भाला.
५) वल्लभ: राजाचा स्वत:चा भाला.
६) सांग: अखंड पोलादाचा भाला.
७) बर्ची: संपूर्ण लोखंडाचा
कमी उंचीचा हा भाला चालविण्यात पटाईत सैनिकाला ‘बर्ची बहादूर’ म्हणतात.
८) विटं: ५ फूट लांबीच्या भाल्याच्या
दांड्यास १५ फुट दोरी बांधून, दोरीचे टोक उजव्या हातात ठेवून, शत्रुवर विटंची फेक करून
दोरीने पुन्हा खेचून घेतले जात असे. विंट फिरवणार्यास २० तलवारबाज किंवा १२ पट्टेकरी
हरवू शकत नाहीत.
९) करबल: हे विट्या सारखेच
असते, पण त्याला दोरी नसते.
भाला चालविताना भालाईत विविध
पवित्रे घेऊन भाला चपळाईने फिरवून, शत्रूच्या वारापासून स्वत:चे संरक्षण करुन शत्रूवर
हल्ला करीत. मुष्टावर्त, कंकणवर्त, परिघवर्त असे भाल्याचे काही पवित्रे आहेत.
भाल्याचे वार शत्रुच्या शरीराच्या
निरनिराळ्या भागावर लक्ष ठेवून केले जातात १) डोक्यावर :- शीर वार,
२) डाव्या कानावर :- तमाचा
वार, ३) उजव्या कानावर:- बहिरावार ४) पायावर:- नडगीवार.
|