श्री बाजी देशपांडे यांचा पोवाडा जयोस्तु ते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवति ! त्वामहं यशो-युतां वन्दे ॥ स्वतंत्रते भगवति ! या तुम्हि प्रथम सभेमाजी । अम्ही गातसो श्रीबाजीचा पोवाडा आजी ॥ चितोडगडिच्या बुरुजांनो त्या जोहारासह या प्रतापसिंहा प्रथित – विक्रमा, या हो, या समया ॥ तानाजीच्या पराक्रमासह सिंहगडा येई निगा रखो महाराज रायगडकी दौलत ही आई ॥ जरिपटका तोलीत धनाजी संताजी या या दिल्लीच्या तक्ताची छकले उधळित भाऊ या ॥ स्वतंत्रतेच्या रणात मरुनी चिरंजीव झाले या ते तुम्ही राष्ट्रवीरवर, या हो या सारे ॥ घनदाट सभा थाटली । गर्जना उठली । घोर त्या काली जय स्वतंत्रतेचा बोला जय राष्ट्रदेविचा बोला जय भवानिकी जय बोला तुम्ही मावळे बोला हरहर महादेव बोला चला घालू स्वातंत्र्य – संगरी रिपूवरी घाला ॥1॥ हरहर गर्जनी सर्व मावळे वीर सज्ज असती परंतु कोठे चुकले बाजी यांत न का दिसती ? ॥ हाय हाय म्लेच्छांसंगे घडित बैसलाची स्वदेश-भूच्या पायासाठी बेडी दास्याची ॥ अैकुनिया शिवहृदय तळमळे ‘दूत हो, जा बोधुनि वळवा वीर बाजि तो तुम्ही राष्ट्रकाजा’ ॥ शिवदूत तेधवा जाती । बाजिला वदती । सोड रे कुमती का जिणे तुच्छ हे नेशी ? का म्लेंच्छ कसाअी भजसी ? का दास्य-नरकि तू पचसी ? स्वराज्य नाही स्वदेश नाही धिक् त्या देहाला चला घालू स्वातंत्र्यसंगरी रिपूवरी घाला ॥2॥ बाजीराया, म्लेंच्छ सबळ हा दोष न काळाचा ना देवाचा, ना धर्माचा, किंवा नशिबाचा ॥ देशद्रोही चांडाळांचा भरला बाजार गुलामगिरि जे देती त्यांना निष्ठा विकणार ॥ तुम्हीच ना स्वातंत्र्य चिरियले या पोटासाठी तुम्हीच ना रे भूमातेच्या नख दिधले कंठी ? हो सावध बाजीराया । दास्यि का राया । झिजविसी वाया ? तुज भगवान् श्रीशिवराजा स्वातंत्र्यप्राप्तिच्या काजा बोलावी तिकडे जा जा देशभक्तिची सुधा पुअुनि घे प्रायश्चित्ताला चला घालू स्वातंत्र्यसंगरी रिपूवरी घाला ॥3॥ शिवदूताचे बोल अैकुनि बाजी मनी वदला काळसर्प मी कसा अुराशी मित्र म्हणुनि धरला ॥ घरात शिरला चोर तया मी मानियला राजा
बंड म्हणालो शिवरायाच्या परमपूज्य काजा ॥ माता माझी भ्रष्टविली मी राजनिष्ठ त्यांशी या पाप्याने युद्ध मांडिले देशरक्षकाशी जा सांगा शिवभूपाला । अशा अधमाला । राजनिष्ठाला त्वां आधी शतदा चिरणे तुजकरवी घडता मरणे पावेन शुद्धि मग माने तुझ्या करीच्या तरवारीच्या घेअिन जन्माला चला घालू स्वातंत्र्यसंगरी रिपूवरी घाला ॥4॥ देशभूमिच्या कसायास का अिमान मि दावू भाकरि देतो म्हणुनि तयाच्या चाकरीस राहू ॥ कवणाची भाकरी बंधु हो ? चाकरि कवणाची भाकरि दे भूमाता, चाकरि तिच्या घातकांची ॥ राज्य हिसकिले, देश जिंकिला त्या पर अधमासी राजनिष्ठ तू राहुनि कवण्या साधिसि नरकासी ॥ ही गुलामगिरीची गीता । राजनिष्ठता । यापुढे आता मद्देशचि माझा राजा तो प्राण देव तो माझा मी शरण शिवा सांगा जा राख अुडाली प्रदीप्त बाजी वैश्वानर ठेला चला घालू स्वातंत्र्यसंगरी रिपूवरी घाला ॥5॥
लोट धुळीचा सुटला अवचित दीन शब्द अुठला लगट करुनि सिद्दिने पन्हाळगड वेढुनि धरिला ॥ लक्ष्मीचे मृदु कमल, शारदासुंदरिचा वीणा स्वतंत्रतेचा कलिजा अडके गडात शिवराणा ॥ अफझुल्ल्याच्या वधा स्मरोनी फाजल सुत त्याचा करितो पण तो शिवभूपाला जिवंत धरण्याचा ॥ बापासि तुझ्या जो खडे । चारि रोकडे । जाशि त्याकडे जीवंत धरू तरि साचा जीवंत पवन धरण्याचा अभ्यास आधि कर ह्याचा खुशाल हरणा मग तू धावे धरण्या वणव्याला चला घालू स्वातंत्र्यसंगरी रिपूवरी घाला ॥6॥ बाजि लागला शिवभूपाच्या थोडा कानाला हाती भाला एक मावळा गडाखालि आला ॥ सिद्दि पाहता चुकुनि हात समशेरीला गेला दावुनि त्याला मुजरा केला धीट नीट वदला ॥ शिवाजी राजा जिवंत येतो तुमच्या गोटाला अुद्या सकाळी करु गड खाली कळवी तुम्हाला ॥ अैकुनी सिद्दि बहु फुगला । रिपूजन भुलला । परस्पर वदला अजि खान खान खानाजी हुए शिकस्त मराठे आजी फिर लढते क्यौंकर आजी चलो शराब अुडाये ताजी आप लेओ आप लेओ जी आप गाजि । आप तो रणगाजी झिंगविला अरि-सर्प फुंकुनी पुंगी गुंगविला चला घालू स्वातंत्र्यसंगरी रिपूवरी घाला ॥7॥
गुंगवुनी अरि-सर्प ! शिवा गारोडि गडावरि तो प्रहर रात्र अुलटता मराठी जादू मग करितो ॥ कृष्णपक्षिच्या काळ्या काळ्या त्या रात्री दडल्या गर्द झाडिला भिअुनि चांदण्या बाहेर न पडल्या ॥ अशा तमी किलकिले दार का तटावरी झाले ? बाजि निघाले श्रीशिव आले आले शत भाले ॥ भाला खाद्यावरी मराठा घोड्यावरि स्वारी भारिता, घोडा थै थै नाचे-तोच शीळ आली ॥
वीर हो टाच घोड्याला । बाण हा सुटला । अडविणे त्याला रिपु तुडवित व्हा व्हा पार चौक्यांसि तुम्हा दावील काजवा चोर – कंदील गेला गडतळ गेला सत्तर मैल भूप आला चला घालू स्वातंत्र्यसंगरी रिपूवरी घाला ॥8॥
तुरी सिद्दिच्या हाती देअुनि सुटता शिव नृपती ‘अब्रह्मण्यम’ कितिक भाबडी भोळी भटें वदती ॥ ‘अब्रह्मण्यम’ यात काय रे दोष कोणता तो आला ठक ठकवाया अुलटा भला ठकवितो तो ॥ साप विखारी देशजननिचा ये घ्याया चावा अवचित गाठुनि ठकवुनि भुलवुनि कसाही ठेचावा ॥ ये यथा प्रपद्यन्ते माम् । भज्यामहं तान् । तथैव श्रीमान् भारती कृष्ण वदला हे अधमासि अधम या न्याये रक्षिले राष्ट्र शिवराये राष्ट्ररक्षका सावध रे रिपु हुडकित तुज आला
चला घालू स्वातंत्र्यसंगरी रिपूवरी घाला ॥9॥
‘पाया पडतो हात जोडतो बाजि तुला राया गड अवघड रांगणा तिथे तुम्ही जाणे या समया राष्ट्र-देविचा हस्त कुशल तू तरी लाखो भाले अम्हांसारिखे मिळति चिरतिल चरचर रिपु सारे ’ ॥ ‘जाऊ काय मी बाजि, मृत्युमुखि ढकलुनि तुम्हाला ? कधी शिवा जातिचा माराठा मृत्यूला भ्याला ? ‘ ॥ ‘चढा गड तुम्ही यशोदायिनी तोफा पांच करा तोवरि लढवू, गनीम अडवू, खिंड करू निकरा ॥ वसुदेव तूच शिवराया । कंसकपटा या । करूनिया वाया स्वातंत्र्य-कृष्ण-चिन्मूर्ती जा घेउनी अपुल्या हाती गडगोकुळात नांदो ती ‘ गडी चालला शिव तो खिंडित ‘दीन’ शब्द उठला चला घालू स्वातंत्र्यसंगरी रिपूवरी घाला ॥10॥
आले आले गनीम खिंडित चवताळुनि आले झाले झाले सज्ज मराठे सरसावुनी भाले ॥ संख्या दुप्पट रिपुची परि ते निकराने भिडती हरहर गर्जुनि समररंगणी तुटोनिया पडती ॥ खड्गांचे खणखणाट त्यांमधि शर सणसण येती मारण-मरणावीण नेणती रणी वीर रंगती ॥ तो हरहर एकची झाला । वदति जय झाला । म्लेंच्छ हो हटला चला चढवा नेटाचा हल्ला वीरश्रीचा करा रे हल्ला निकराचा चालु द्या हल्ला मारित हाणित हटवित म्लेंच्छा खिंडपार केला चला घालू स्वातंत्र्यसंगरी रिपूवरी घाला ॥11॥
म्लेंच्छ हटविता बाजी वळुनी गडाकडे पाहे श्रीशिव चाले मार्ग बघुनिया वीर गर्जताहे ॥ गडात जाइल राष्ट्रदेविचा जिवलग शिवराणा तोवरी लढवू खिंड शूर हो हा अपुला बाणा ॥ ह्या बाण्याच्या आधि संगरी जरि घडता मरणे पुनर्जन्म तत्क्षणी घेउनी पुन:पुन्हा लढणे ॥ रघुराया रावणहरणा । कंस-मर्दना । भो जनार्दना ! लाडक्या देशजननीचे स्वातंत्र्यरक्षणी साचे हे प्राणदान जरि अमुचे पवित्र हे जरि त्वत्प्रिय हे जरि, दे तरि सुयशाला चला घालू स्वातंत्र्यसंगरी रिपूवरी घाला ॥12॥
आले आले गनीम चालुनि पुनरपि तो आले झाले झाले सज्ज पुनरपि उठावले भाले ॥ ‘दीन दीन’ रणशब्दा ‘हरहर महादेव’ भिडला भिडला ओष्ठी दंत मस्तकी रंग वक्षि भाला ॥ हल्ला चढवित परस्परांवरि पुन:पुन्हा तुटती नटुनी योद्धे समरभोजनी वीररसा लुटती ॥ कचरला मराठी भाला । बाजि तो आला । तोलुनी धरिला रणि रंग पुन्हा ये साचा गर्जती मराठे रिपुचा घ्या सूड म्लेंच्छ मत्ताचा त्यांचा मस्तक चेंडू साचा समररंगणी चेंडुफळीचा डाव भरा आला चला घालू स्वातंत्र्यसंगरी रिपूवरी घाला ॥13॥
डाव उलटला म्लेंच्छांवरि तो पुन्हा परत हटला जय झाला परि वीर मराठा बहुतांशी पडला ॥ तिकडे गडिच्या तोफा अजुनी पाच का न सुटती वीर मराठे सचिंत आशाबंध सर्व तुटती ॥ तशात घेउनि ताजी टोळी फाजलखां येतो धन्य बाजिची ! पुन्हा उसळुनी रपूवरी पडतो ॥ खिंड-तोफ तिजमधुनी गोळा सुटला श्रीबाजी रणी तळपतो वीरश्रीचा रणनवरा आजी ॥ तो गोळी सू सू आली । अहा त्या काली । मर्मि ती शिरली श्रीबाजी विव्हळ पडला मागुती तत्क्षणी उठला बेहोष वीरवर वदला तोफआधी मरे न बाजी सांगा मृत्यूला चला घालू स्वातंत्र्यसंगरी रिपूवरी घाला ॥14॥
थांबा बाजी जखम तरि पुरी बांधू द्या थांबा हरहर रणिचा ऐकुनि वीरा उसळू नका थांबा ॥ जखम कुठे रे फक्त असे मी तृषाक्रांत थोडा रिपुरक्ताला पितो घटाघटा सोडा मज सोडा ॥ खरी जखम भू-आइस माझ्या फोडी हंबरडा ओढुनि अरिची आतडी बांधु द्या पट्टि तिला सोडा ॥ भले मराठे लढा तसेची आलो मी सोडा लढा लढा हो सोडा मजला म्लेंच्छ पुरा झोडा ॥ होईल तोफ शिवबाची । क्षणी दो क्षणिंची । खिंड लढवाची फेडाया ऋण या भूचे अजि उष्ण बिंदु रक्ताचे द्या मोजुनि मुद्दल साचे तिला व्याज स्वातंत्र्य देउनी फेडा कर्जाला चला घालू स्वातंत्र्यसंगरी रिपूवरी घाला ॥15॥
काय वाजले बाजीराया बार न घडि झाला शिळा कोसळे पान सळसळे पक्षी ओरडला ॥ लढा तरी मग चला वीर हो रणात घुसलो मी रक्ते मढवू लढवु खिंडिची तसू तसू भूमी ॥ शपथ तुम्हांला वृक्ष-पक्षि-जल-शिला-तेज-वारे ! आम्ही पडता तोफेपूर्वी लढा तुम्ही सारे ॥ बार धडाधड झाले । प्राण परतले । हास्यमुख केले हा पहिला बार शिवाचा हा दुसरा निजधर्माचा हा तिसरा निजदेशाचा हा चवथा कर्तव्याचा बार पाचवा धडाडला हर बोला जय झाला चला घालू स्वातंत्र्यसंगरी रिपूवरी घाला ॥16॥
खबरदार यमदूता ! पहुडे श्रीबाजी प्रभु हा स्पर्शु नको ! तद्विद्युत्तेज:पुंज दिव्य देहा ॥ स्वतंत्रतेच्या पूर्वी हा रणतीर्थाला गेला देशशत्रुरक्तात न्हाउनि लालभडक झाला ॥ त्याच्या वक्ष:स्थळी रुळे रिपु-रुंडांची माला तीवर हरहर महादेव हा घोर मंत्र जपला ॥ बघ देवदूतही आले । सूर्य हे आले । इंद्र हे आले सुरगुरू सुरतरू सारे आणि देव वर्षती तारे मधु मृदुल वाहती वारे ओवाळी सत्कीर्तिसुंदरी श्रीमत् बाजीला चला घालू स्वातंत्र्यसंगरी रिपूवरी घाला ॥17॥
दिव्य धुनीचा चकचका़ट का विश्वोदरि भरला रथ श्रीमंती स्वतंत्रताभगवतिचा अवतरला ॥ ऊठ चितोरा ऊठ देविला उत्थापन द्याया प्रतापसिंहा प्रथितविक्रमा उठि मंगल समया ॥ भूमातेच्या तान्ह्या उठि का वीत-चिंत व्हा ना ? स्वतंत्रतेचा हा पोवाडा ऐकाया आला उठा सर्व स्वातंत्र्यवीरवर जय मंगल बोला ॥ असे कुशल रांगण्यात तुमचा जिवलग शिवराणा ॥ श्रीस्वतंत्रता भगवती । आपुल्या रथी बाजिला घेती गंधर्व तनन तो करिती दुंदुभी नभी दुमदुमती श्रीबाजी स्वर्गा जाती करी चराचरा विश्व बाजिच्या जयजयकाराला चला घालू स्वातंत्र्यसंगरी रिपूवरी घाला ॥18॥
तदा मराठे रणी पहुडले जे आणिक सुर ते पावनखिंडित बसुनी तिजसह जाति नभ:पथे ॥ श्रीबाजीचे रक्त पेरले खिंडित त्या काला म्हणुनि रायगडि स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला ॥ अहो बंधुनो ! पूर्वज ऐसे स्वतंत्र रणगाजी स्वतंत्र त्या पूर्वजा शोभता वंशज का आजी ? ॥ विनवि विनायक ह्यांतिल घ्यावे समजुनि अर्थाला चला घालू स्वातंत्र्यसंगरी रिपूवरी घाला स्वराज्य नाही स्वदेश नाही धिक् त्या देहाला चला घालू स्वातंत्र्यसंगरी रिपूवरी घाला ॥19॥ - स्वातंत्र्यवीर सावरकर
|