गावाचे नाव :- वालावल जिल्हा :- सिंधुदुर्ग जवळचे मोठे गाव :- मालवण, कुडाळ, परूळे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात वालावल नावेचे पुरातन निसर्गरम्य गाव आहे. या गावात नारायणाचे पुरातन कौलारू मंदिर आहे. वालावल गावाचे ६ व्या शतकातील नाव बल्लावल्ली होते. गावाला लागून असलेले दाट जंगलांनी वेढलेले डोंगर, दर्या, गावाच्या उत्तरेकडून वहाणारी कर्ली नदी यामुळे प्राचीन काळापासून हे गाव एखाद्या वनदुर्गाप्रमाणे दुर्गम होते. त्यामुळे प्राचीन काळापासून राजेरजवाडे, या भागातील अधिकारी यांनी या गावाचा आसरा घेतलेला आहे. इ.सनाच्या ११ व्या शतकात शिलाहार राजांचे या ठिकाणी वास्तव्य होते. नंतर विजयनगरच्या काळापासून बहामनी व नंतर विजापूरच्या राजवटी पर्यंत प्रभूदेसाई घराण्याकडे कुडाळ महालाची जहागिरदारी होती. त्यांचे वास्तव्यही वालावल गावात होते.
इ.सनाच्या ११ व्या शतकात मुसलमानांनी गोवा काबीज केला. त्यावेळी गोव्यातील पेडणे महालातील हरमळ गावातून श्री देव नारोबाची मुर्ती ब्राम्हणांनी वालावल गावात आणली. त्यावेळी चंद्रभान व सूर्यभान हे वीर पुरुष याठिकाणी अधिकारी होते. त्यांनी नारायणाचे मंदिर बांधून वालावली गावाचे उत्पन्न मंदिराला दिले. मंदिरा समोरील दिपमाळांच्या मध्ये मंदिराची स्थापना करणार्या कल्याण पुरुषाची देवळी बांधण्यात आली आहे. लक्ष्मी नारायण मंदिराच्या स्थापनेचा काळ साधारण इ.स.१३५० ते १४०० च्या दरम्यान असावा. मंदिराची बांधणी चालुक्य पध्दतीची असून कालौघात मुळ मंदिराच्या बांधकामात भर पडत गेली.
दंतकथेनुसार श्री नारोबा व माऊली हे भाऊबहीण तिर्थयात्रेला चालले होते. वाटेत वालावल गावी कुपीच्या डोंगर पठारावर (सड्यावर) माऊलीला तहान लागली म्हणुन श्री नारोबा पाणी आणण्यासाठी दरीत (गावात) उतरला. तेथील घरातून वड्याचा स्वयंपाक चालू होता. त्या वासाने नारोबाची भूक उफाळून आली. माऊलीला विसरून तो तिथेच जेवला. पोट भरल्यावर त्याला माऊलीची आठवण झाली. पाणी घेऊन भीत भीतच तो डोंगरावर गेला. नारोबा वेळेवर पाणी घेऊन आला नाही म्हणून माऊलीला खुप राग आला होता. रागाच्या भरात तिने नारोबाच्या श्रीमुखात दिली. (श्री नारोबाच्या मुर्तीच्या गालावरील खडडा याची खुण म्हणून दाखवतात.) या भांडणामुळे पुढे न जाता माऊली तिथेच राहीली.माऊलीचे देवालय पर्वती म्हणून सड्यावर बांधलेले आहे. (या ठिकाणी नवरात्रोत्सव होतो.) श्रीनारायणाचे मंदिर गावात आहे. दरवर्षी वैकुंठ चतुर्दशीस नारोबा, माऊलीस पाणी घेऊन जातो (श्रीनारायणाची पालखी पाणी घेऊन माऊली मंदिरात जाते.)
नारायणाची मुर्ती उभी असून अंदाजे ४ फूट उंच आहे. काळ्या पाषाणात घडवलेल्या या मुर्तीच्या उजव्या पायाजवळ लक्ष्मी व डाव्या पायाजवळ गरूड कोरलेला आहे. मंदिराच्या गाभार्याच्या दारावर शेषशाही विष्णु कोरलेला आहे. मंदिराच्या सभामंडपात कोरीव काम केलेले लाकडी खांब व तुळया आहेत. काळाच्या ओघात त्यावरील कोरीवकाम पुसट झालेल आहे. त्यातील एक खांब तुळशीचा आहे अशी वदंता आहे. मंदिराच्या सभामंडपातील अंतराळाच्या (छताच्या) लाकडी पट्ट्य़ांवर पुराण कथांमधील प्रसंग कोरलेले आहेत. याशिल्पाच्या बाजूच्या पट्टीवर "गंडभेरुंड" कोरलेला आहे. (गंडभेरुंड म्हणजे एक धड, २ पाय,२ पंख व २ डोकी असलेला पक्षी, हे विजयनगर साम्राज्याचे चिन्ह होते.) हा "गंडभेरुंड" पटकन दिसण्यासाठी नारायणाच्या मुर्तीच्या नजरेच्या सरळ रेषेत पाहावे. या कौलारू मंदिराच्या बाहेर ५ दिपमाळा आहेत. त्यापैकी ४ बाजूला ४ एकाच उंचीच्या ४ दिपमाळा आहेत. त्यांच्या वरच्या टोकावर कलश बनवलेले आहेत. मध्यभागी असलेली ५ वी दिपमाळ इतर दिपमाळांपेक्षा उंच आहे. या दिपमाळेच्या एका बाजूला तुळशी वृंदावन आहे. त्यावर देवळाच्या बाजूला हनुमान कोरलेला आहे. दिपमाळेच्या दुसर्या बाजूला " कल्याण पुरुषाची" घुमटी आहे. या घुमटीतील मोठी मुर्ती वीरासनात बसलेली आहे. त्याच्या शेजारी छोटी मुर्ती आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस तळे आहे.
जाण्यासाठी :- वालावलला जाण्यासाठी मुंबई - गोवा महामार्गावरील कुडाळ गाठावे. कुडाळ - वालावल हे अंतर १० किमी आहे. या मार्गावर एसटीची सेवा व रिक्षा उपलब्ध आहेत. मालवण - वालावल हे अंतर ३० किमी आहे. मालवणहून परुळे गावापर्यंत एसटीने जाऊन पुढे रिक्षाने वालावलला जाता येते. आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) सिंधुदुर्ग किल्ला, मालवण २) निवती किल्ला, निवती ३) वेतोबा मंदिर, परुळे ४) भोगवे बीच, भोगवे सर्व किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे.
Ancient Temples of Maharashtra Narayan Mandir , Village :- Walawal , Dist :- Sindhudurg, Nearest city :- Kudal, Malvan, Vengurla.
|