गावाचे नाव :- कोटकामते (जिल्हा :- सिंधुदुर्ग) जिल्हा :- सिंधुदुर्ग जवळचे मोठे गाव :- मालवण, देवगड.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात प्राचीन भगवती देवी मंदिर आहे. एका आख्यायिके नुसार कामते गावातील भगवती देवीस कान्होजी आंग्रे यांनी नवस केला होता, ‘‘जर मी लढाईत विजयी झालो तर, तुझे भव्य देऊळ बांधीन व देवस्थानाला गाव इनाम म्हणून देईन’’ त्याप्रमाणे युध्द जिंकल्यावर कांन्होजींनी भगवती देवीचे भव्य मंदिर बांधले. या घटनेची साक्ष देणारा शिलालेख आजही मंदिरात पाहता येतो. शिलालेखातील मजकूर पुढील प्रमाणे:- ‘‘श्री भगवती ।।श्री।। मछक षोडश शत: सत्पचत्वारिंशत माधिक संबंछर विश्वात सुनामा ।। सुभे तं स्थिच छरे आंगरे कान्होजी सरखेल श्रीमत्कामश देवा देवालय मकरोदिती जाना तु जनो भविष्य माण: ।।१।। याशिवाय कान्होजींनी साळशी, आचरा, कामते, किंजवडे ही गावे मंदिराला इनाम म्हणून दिली होती.
देवगड - मालवण रस्त्यावरील नारिंग्रे गावाकडून कोटकामते गावात जाताना रस्त्याशेजारी डाव्या बाजूस कोटकामते किल्ल्याच्या बुरुजाचे अवशेष दिसतात. बुरुजाजवळील तटबंदी व खंदकाचे अवशेष आज नष्ट झालेले आहेत. भगवती मंदिराबाहेर ३ तोफा उलट्या पुरुन ठेवलेल्या आढळतात. मंदिरातील सभामंडपात कान्होजी आंग्रे यांचे नाव असलेला शिलालेख पाहता येतो. भगवती देवीची पुरातन मुर्ती काळ्या पाषाणात बनवलेली आहे. देवीच्या मूर्तीच्या वरच्या बाजूस २ हत्ती देवीवर पुष्पवृष्टी करताना कोरलेले आहेत. देवीच्या उजव्या हातात खडग आहे. देवीच्या सभा मंडपाचे खांब लाकडी असून त्यावर कोरीव काम केलेले आहे. त्यापैकी एक खांब तुळशीचा असल्याची वदंता आहे. मंदिराच्या परिसरात दोन पुरातन मुर्ती ठेवलेल्या आहेत. त्यास स्थानिक लोक रामेश्वर व पावणाई म्हणतात. भगवती मंदिरामागे रामेश्वर मंदिर आहे. त्यात एक पुरातन मूर्ती आहे. याशिवाय पुरातन दुमजली वाड्याचे अवशेषही पाहायला मिळतात.
जाण्यासाठी :- १) मालवण - देवगड रस्त्यावर मालवण पासून ३० किमी अंतरावर नारिंग्रे गाव आहे. या गावातून उजव्या बाजूस जाणारा रस्ता ५ किमी वरील कोटकामते गावात जातो. २) देवगड - जामसांडे - तळेबाजार - तिठा यामार्गे (अंतर अंदाजे २० किमी) कोटकामते गावात जाता येते.
आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) सिंधुदुर्ग किल्ला, मालवण २) देवगड किल्ला, देवगड ३) विजयदुर्ग किल्ला, विजयदुर्ग ४) कुणकेश्वर मंदिर सर्व किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे.
Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra Bhagawati Mandir , Village :- kotkamate, Dist :- Sindhudurg, Nearest city :- Malvan, Devgad, Vijaydurg.
|