हिंदू ब्राम्हणी लेणी खोदण्याची सुरुवात इ. सनाच्या ५ व्या शतकापासून झाली. मध्यप्रदेशातील भोपाळ जवळ (विदीशा जवळ) असलेल्या उदयगिरीची लेणी सर्वात प्राचीन हिंदू (ब्राम्हणी) लेणी असावीत. त्यानंतरच्या काळात कर्नाटकातील बदामी, ऐहोळे येथील लेणी खोदण्यात आली.महाराष्ट्रातही चालुक्यांच्या काळात हिंदू (ब्राम्हणी) लेणी खोदण्याची सुरुवात झाली. वेरुळ, घारापुरी, मंडपेश्वर, आंबेजोगाई, खरोसा, ढोकेश्वर येथे हिंदू लेणी खोदण्यात आली. हिंदू शिल्पींनी प्रथम बौध्दांचे अनुकरण केले; परंतु पुढील काळात खोदलेली लेणी पाषाण मंदिरांप्रमाणे होती. त्यात गोपुरे, चौकटी, कपाटे, देवळ्या यांची योजना करण्यात आली. लेण्यांमध्ये पुराणातल्या कथांवर रामायण, महाभारतावर आधारीत शिल्पपट कोरण्यात आले. या शिल्पांमध्ये आवेश, वेग दिसून येत असल्यामुळे ही शिल्पे अधिक आकर्षक व परिणामकारक दिसू लागली. विषयाच्या व आशयाच्या वैविध्यतेमुळे शिल्पकारांना अनेक नविन प्रयोग करता आले. हे करताना मूर्तीच्या सौंदर्य व आध्यात्मिक वलयाला धक्का न लावता एकाच मूर्तीतून अनेक रुपके व आख्यायिका सामान्य प्रेक्षकाला समजतील अशा मांडण्यात आल्या. देवतांच्या मूर्तीबरोबर त्यांची वाहाने, प्राणी, पक्षी, झाडे, फळे, वेली, फुले यांनी लेणी सजविण्यात आली. हिंदू धर्मात शैव व वैष्णव हे प्रमुख पंथ होते. लेण्यांवरही यांचा प्रभाव दिसून येतो. सुरुवातीच्या काळातील लेणी एकतर पूर्णपणे शैव किंवा वैष्णव असत. उत्तरकाळात हा भेद मिटून एकाच लेण्यात दोन्ही पंथांची शिल्पे दिसू लागली.
लेण्यांमधून शिवाचे दर्शन रावणानुग्रह, शिवपार्वती विवाह, अंधकासुर वध, त्रिपुरांतक, अर्धनारीनटेश्वर, नटराज, लकुलीश, लिंगोभ्दव, गंगावतरण, शिव - पार्वती सारीपाट खेळताना शंकराबरोबर त्याचे गण, नंदी, गणपती, कार्तिकेय हा शिवपरिवार शिल्पांकीत केलेला असतो.
ब्राम्हणी लेण्यात विष्णुचे अवतार शिल्पांकीत केलेले असतात. त्यात वराह, नरसिंह, त्रिविक्रम, कृष्णवतार यांची शिल्पे बर्याच ठिकाणी दिसतात. याशिवाय गरुडावर बसलेला विष्णू, शेषशायी विष्णू, कालियामर्दन, गोवर्धनधारी कृष्ण, लक्ष्मी व सरस्वती बरोबरचा विष्णू ही विष्णूची रुपे लेण्यांतून दिसतात. विश्वाचा निर्माता ब्रम्हा, आदीशक्ती महिषासुरमर्दिनी, आठ दिशांचे पालक अष्टदिक्पाल, सप्तमातृका, गजलक्ष्मी यांची शिल्पे हिंदू (ब्राम्हणी) लेण्यांतून दिसतात.