भामगिरीची लेणी (भामचंद्र डोंगर) लेण्यांचा प्रकार :- हिंदु (ब्राम्हणी) लेणी जिल्हा : पुणे श्रेणी : मध्यम
पुणे जिल्ह्यात तळेगाव व चाकणच्या मधे भामगिरी डोंगररांग पूर्व पश्चिम पसरलेली आहे. या डोंगर रांगेच्या पश्चिमेला गेलेल्या फाट्याला त्याच्या तळाला असलेल्या नवलाख उंबरे नावाच्या गावामुळे नवलाख्या डोंगर असे नाव मिळालेले आहे. भामगिरी डोंगर दोन भागात विभागलेला आहे. पायथ्यापासून अर्ध्या उंची पर्यंत गच्च झाडी आहे. त्यावरील भागात डोंगराने अंदाजे ८०० फूटी कातळ टोपी घातलेली आहे. या कातळात नैसर्गिक आणि कोरीव गुहा आहेत.
भामगिरीच्या पायथ्यापासून मळलेल्या वाटेने दाट झाडीतून अर्ध्या तासात आपण सपाटीवर येतो. येथे एक काळ्या दगडात बांधलेला समाधीचा चौथरा आहे. येथून १० मिनिटात आपण कातळ कड्यापाशी पोहोचतो. येथे थोड्याश्या उंचीवर कातळात खोदलेल टाक आहे. टाक्याच्या पुढे गुहा मंदिर आहे. कातळात कोरून काढलेल्या या मंदिराचे सभामंडप व गाभारा असे दोन भाग आहेत. सभामंडप चार दगडी खांबांवर तोललेला आहे. सभामंडपात नंदीची मूर्ती आहे. सभामंडपाला लागूनच पाण्याच टाक खोदलेल आहे. गाभार्याच्या व्दारपट्टीवर गणपती कोरलेला आहे. गाभार्या शिवलींग व पार्वतीची मुर्ती आहे. छतावर नक्षीकाम केलेल आहे. मंदिर पाहून पुढे गेल्यावर कातळात कोरलेल अजून एक टाक पहायला मिळत, टाक्याच्या वरच्या बाजूला गुहा आहे. या गुहेत वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणारी काही मुले रहातात. गुहेच्या पुढे एका झाडाखाली काही मुर्ती ठेवलेल्या आहेत. या झाडाजवळून एक पायवाट खालच्या बाजूला जाते. येथे एक पाण्याच टाक व गुहा आहे. ती पाहून परत झाडाजवळ येऊन कातळ भिंतीत कोरलेल्या पायर्यांनी तुकाराम महाराजांच्या ध्यान गुंफेकडे जावे.
तुकाराम महाराजांच्या ध्यान गुंफेपाशी भामगिरी डोंगराचा कातळकडा काटकोनात वळलेला आहे. गुहेच्या पायथ्याशी शिलालेख कोरलेला दगड पडलेला आहे. त्याच्या बाजूला दगडात कोरलेली गणपतीची मुर्ती आहे. गुहेची अंदाजे उंची ६ फूट असून ती आतल्या बाजूस उतरती आहे. गुहेची लांबी अंदाजे १० फूट व रूंदी ६ फूट आहे. गुहेत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूच्या भिंतीवर तुकाराम महाराजांची मुर्ती कोरलेली आहे. त्यांच्या हातावर विंचू व पाठीमागे साप व वाघ कोरलेले आहेत. गुहेच्या टोकाशी विठ्ठल रखुमाईची मुर्ती आहे. या गुहेच्या बाजूला ३ फूट उंच व ६ फूट लांब गुहा आहे. या गुहेत एक माणूस आरामात झोपू शकेल अशी जागा आहे.
भामगिरीवर जाण्याचा मार्ग :- पुणे - नगर रस्त्यावर तळेगाव पासून ११ किमी अंतरावर खालुंब्रे गाव आहे. या गावातून डाव्या बाजूचा रस्ता चाकण एम. आय. डी. सी. फेज - २ ला जातो. या रस्त्याने हुंडाईचा प्लांट - सावरदरी गाव यामार्गे ५ किमीवरील वसुली नाक्यावर पोहोचतो (वसुली हे गावाचे नाव आहे.). येथे डाव्या बाजूला शिंद, भांबुर्ले गावाकडे जाणारा रस्ता पकडावा. नाक्यापासून भांबुर्ले १.५ किमीवर आहे. भांबुर्ले गावातून उजव्या बाजूचा रस्त्याने १ किमीवरील भामचंद्र माध्यमिक विद्यालया पर्यंत जावे. येथे मुख्य रस्ता सोडून डाव्या बाजूच्या (विद्यालयाच्या बाजूने) कच्च्या रस्त्याने डोंगराच्या पायथ्यापर्यंत जाता येते. डोंगराच्या पायथ्यापासून मळलेली वाट भामगिरीवर गेलेली आहे.
आजुबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- मुंबई आणि पुण्यापासून भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर व इंदुरीचा किल्ला ही तिनही ठिकाण एका दिवसात पाहाता येतात.
तुकाराम महाराज, देहू, तळेगाव जवळची पाहाण्याची ठिकाणे, पुण्या जवळची पाहाण्याची ठिकाणे
|