Print Page | Close Window

अफझलखान वध पोवाडा

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: कविता संग्रह
Forum Description: पोवाडे, कविता आणि स्फूर्ती गीते
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=263
Printed Date: 18 Apr 2024 at 11:56pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: अफझलखान वध पोवाडा
Posted By: AARTI
Subject: अफझलखान वध पोवाडा
Date Posted: 24 Sep 2014 at 11:14am


 अफझलखान वध पोवाडा



चौक १
माझें नमन आधी गणा । सकळिक ऐका चित्त देऊन ॥
नमियेली सारज्या । ल्याली जडिताचें भूषण ॥
अज्ञानदासाचें वचन । नमिला सद्‌गुरु नारायण ॥
सद् गुरुच्या प्रसादें । संपूर्ण अंबेचें वरदान ॥
गाइन वजिराचें भांडण । भोसल्या सरजा दलभंजन ॥
फौजेवर लोटतां । यशवंत खंडेश्वरी प्रसन्न ॥
अज्ञानदास बोले वचन । गाइन राजाचें भांडण ॥
देश इलाइत । काबिज केलें तळकोंकण ॥१॥

चौक २
गड मी राजाचे गाईन । कोहज माहुली भर्जन ॥
पारगड कर्नाळा । प्रबळगड आहे संगिन ॥
मस्त तळा आणि घोसाळा । रोहरी आनसवाडी दोन ॥
कारला कासागड मंडन । दर्यांत दिसताती दोन ॥
गड बिरवाडी पांचकोन । सुरगड अवचितगड भूषण ॥
कुबल गड भीरिका कुर्डुगडाचें चांगुलपण ॥
धोडप तळकोंकणचे किल्ले, घाटावरले गड गाइन ॥२॥

चौक ३
गड आहे रोहिडा । जामली प्रतापगड मंडन ॥
मकरंदगड वांसोट । सिंहगड वृंदावन ॥
पुरंधराचें चांगुलपण । उंची झुलवा देत गगन ॥
सोन्याची सुवेळा आहे राजगड संगिन ॥
कोंडाण्यापासून तोरणा वर्ता । कोर रेखिली घाटमाथा ॥
तुंग आणि तुकोना । विसापुर लोहगड झुलता ॥
गड राहेरीची अवस्था । तीन पायर्‍या सोन्याच्या तक्ता ॥
दुसरा प्रतापगड पाहतां । अवघड दिसे घाटमाथा ॥३॥

चौक ४ 
मस्त हुडे दुर्गाचे खण । माहाल राजाचे गाइन ॥
पुणे भिस्तका दरगा । शेकसल्ला पीर, पाटण ॥
शिरवळ सुपे देस । घेतला ज्यानें इंदापुरा पासुन ॥
महाड गोरेगांवापासून । घेतले शिणगारपूर पाटण ॥
असे तुळजेचे परिपूर्ण । सोडविलें चवदा ताल कोंकण ।
घेतली बारा बंदरें । भाग्य राजाचें संगिन ॥४॥

चौक ५
देश दुनिया काबिज केली । बारा माउळें घेतलीं ॥
चंद्रराव कैद केला । त्याची गड जाउली घेतली ॥
चेतपाउली काबिज केली । ठाणी राजाचीं बैसलीं ॥
घेतली जाउली न् माहुली । कल्याण भिवंडी काबिज केली ॥
सोडविलें तळकोंकण । चेउलीं ठाणीं बैसविलीं ॥
कुबल, बांकी घरें । शिवराजाच्या हाता आलीं ॥
मुलाना हामाद । फिर्याद बाच्छायाप गेली ॥
बाच्छायजादी क्रोधा आली । जैशी अग्न परजळली ॥
जित धरावा राजाला । कुलवजिरांला खबर दिली ॥५॥

चौक ६
बाच्छाय(ये) पाठविले प्रमाण । वजीर बोलावा तमाम ॥
अबदुलखान, रस्तुम जुमा ॥ सिद्दी हिलाल, मुशेखान ॥
मेळविलें वजिरांला । बाच्छाय बोलावी कवणाला ? ॥
बोलावी बाजी घोरपडयाला । घाटग्या जुंझाररायाला ॥
बोलावी खर्‍या कोबाजीला । त्या नाइकजी पांढर्‍याला ॥
देवकांत्या जीवाजीला । मंबाजी भोसल्याला ॥
बावीस उंबराव मिळुनी । आले बाच्छाय सभेला ॥६॥

चौक ७
बाच्छायजादा पुसे वजीरांला । धरीसा आहे कोण शिवराजाला ॥
बावीस उंबराव आले सभेला । विडा पैजेचा मांडिला ॥
सवाई अबदुल्या बोलला । ’जिता पकडूं मैं राजाला’ ।
निरोप दिला कुल्‌वजिराला । अबदुल सदरे नवाजिला ॥
विडा पैजेचा घेतला (म्हणून) । तुरा मोत्याचा लाविला ॥
गळांअ घातलीं पदकें । खान विजापुरीं बोलला ॥
फिरंग घोडा सदरे दिला । बाच्छायानें नवाजीला ॥
तीवरसांची मोहीम । घेऊन अबदुल्या चालला ॥७॥

चौक ८ 
खान कटकबंद केला । कोटाबाहेर डेरा दिला ॥
मोठा अपशकुन जाहला । फत्यालसकरा हत्ती मेला ॥
खबर गेली बाच्छायाला । बिनीचा हत्ती पाठविला ॥
बारा हजार घोडा । अबदुलखानालागीं दिला ॥८॥

चौक ९ 
संगात कुंजर मस्त हत्ती । घेतली झगडयाची मस्तुती ॥
आरोब्याच्या गाडया । कोतवालतेजी धांवा घेती ।
सातशें उंट आहे बाणांचा । करडा लष्करी खानाचा ।
वजीर अबदुलखान । त्याच्या दळाची गणती ।
बारा हजार घोडा । उंबराव ताबिन चालती ॥९॥

चौक १०
तेथुनि कुच केलें कटकाला । अबदुल फौजेनें चालिला ॥
मजलीवर मजल । अबदुल तुळजापुरा आला ॥
फोडिली तुळजा । वरती मसुदच बांधिली ॥
मसुद बांधुनी । पुढें गाय जब केली ॥
अबदुलखान फोडी देवीला । ’कांहीं एक अजमत दाव मला’ ॥
कोपली भद्रकाली । बांधुनी शिवराजाप दिला ।
अंबा गेली सपनांत (ला) । कांहीं एक बोल शिवराजाला ॥
’बत्तीस दातांचा बोकड । आला वधायाला’ ॥१०॥

चौक ११
तेथून कुच केलें कटकाला । अबदुल दरमजली चालिला ॥
मजलीवर मजल । अबदुल माणकेश्वरा आला ॥
तेव्हां त्या अबदुलखानानें । हाल मांडिले देवाला ॥
तेथुनि कुच केलें कटकाला । अबदुल फौजेनें चालिला ॥
मजलीवर मजल । अबदुल करकंभोशा आला ॥
तेथुनि कुच केलें कटकाला । अबदुल दरमजली चालिला ॥
मजलीवर मजल । वेगीं पंढरपुरा आला ॥
फोडिला विठोबा । पुंडलिक पाण्यात टाकिला ॥११॥

चौक १२
खान (नें) कुच केलें कटकाला । अबदुल फौजेनें चालिला ॥
मजलीवर मजल । वेगीं महादेवासी आला ॥
तेव्हां त्या अबदुलखानानें । दंड बांधिला शंभुला ॥
हाल हिंदुच्या देवाला । अबदुलखान (नें) धाक लाविला ॥
तेथुनि कुच केलें कटकाला । अबदुल दरमजली चालिला ।
मजलीवर मजल । अबदुल रहिमतपुरा आला ॥१२॥

चौक १३
अबदुल आलासे बोलती । धाकें गड किल्ले कांपती ॥
वजीर उंबराव बोलती । ’शिवाजीस गडे कोंडू’, म्हणती ।
अबदुल सारा आहे किती । त्याच्या दळाची गणती ॥
बारा हजार घोडा । उंबराव ताबिन चालती ॥
सौंदळीं भांडतां । मग कणकीला मीठ किती ? ॥१३॥

चौक १४
तेथुनि कुच केलें कटकाला । अबदुल वांईलागी आला ॥
आपुल्या मुलखांत राहिला । कोट बांधुन पिंजरा केला ॥
बरेपणाचा कागद (देउन) । हेजिब महाराजाप गेला ॥
राजा पुण्यात मस्त झाला । देश पाठीशीं घेतला ॥
सोडून दिले किल्ले । डेरा जाउलींत दिला ॥
राजा जाउलींत राहिला । हेजिब अबदुल्याचा आला ॥१४॥

चौक १५
हेजिब बोले महाराजाला । ’खान बर्‍यापणाशीं आला ॥
खानाला भेटतां । थोर बाच्छाये सल्ला झाला’ ॥
राजा बोले हेजिबाला । ’कशाला बोलवितां वांईला ? ॥
किल्ले गड कोट । दवलत खानाच्या हवाला ॥
जाउली खानाच्या हवाला । लिहून देतों हेजिबाला ॥
बैसूं दोघेजण । खान बुध सांगेल आम्हांला’ ।
लुगडीं दिलीं हेजिबाला । हेजीब ’बेगीं’ रवाना झाला’ ॥१५॥

चौक १६
हेजिबाची खबर ऐकुनी । अबदुल महाभुजंग झाला ॥
अबदुलखान (नें) कउल दिला । रोटीपीर पाठविला ॥
’भिउ नको शिवाजी भाई । आहे तेरा मेरा सल्ला ॥
तुझे गड तुझ्या हवाला । आणिक दवलत देतों तुला ॥
तुझी थोडीशी गोष्ट । क्रिया शहाजीची आम्हाला’ ॥
इकडे कउल पाठविला । (पण) शीलचा राउत निवडिला ॥
हत्तीचे पायीं तोरड । लाविला गजढाळा ॥
नदरे पडतां । दस्त करा शिवराजाला ॥१६॥

चौक १७
राजा हेजीबासि बोलतो । "खंड काय मला मागतो ॥
चउआगळे चाळीस गड । मी अबदुलखानालागीं देतों ।
मजवर कृपा आहे खानाची । जावलींत सदरा सवारितो ॥
तेथें यावें भेटायाला । मी खानाची वाट पाहतों "॥
हेजिब तेथुनि निघाला । अबदुलखानाजवळ आला ॥
अबदुलखानामोहरें । हेजिब (बें) टाकिला प्रमाण ॥
अबदुल पाहतो वाचुन । "खुंटले गनिमाचें मरण" ॥
हाती आले गड किल्ले । खुशी जहाला अबदुलखान ॥१७॥

चौक १८
हिगडे सल्ला कउल दिला । खासा राउत निवडिला ॥
चार हजार घोडा । हालका धराया चालला ॥
हत्तींचे पायिं तोरड ज्याला । वरी सोडिल्या गजढाला ॥
फौजामागें फौजा । भार कडक्यानें चालला ॥
रडतोंडीच्या घाटाखालीं । अबदुल सारा उतरुं दिला ॥
इसारत सरज्याच्या लोकांला । ज्यांणीं घाट बळकाविला ॥
मागल्याची खबर नाहीं पुढिल्याला । कटकाची खबर, कैची त्याला ॥
जाऊं जाणें येऊं नेणें । ही गत झाली अबदुल्याला ॥
जावलींत उतरुनि । अबदुल दिशीभुला जाहला ॥१८॥

चौक १९
राजानी सदरा सवारिल्या । गाद्या पडगाद्या घातल्या ॥
तिवाशा जमखान टाकिले । सदर पिकदाण्या ठेविल्या ॥
सुरंग चारी खांब सदरेचे । वरी घोंस मोतीयांचें ॥
माणिकाच्या भरणी । हारी मोत्यांच्या बसविल्या ॥
दुसरे सदरेची मांडणी । सूर्य लखलखितो गगनीं ।
मणिकाचे ढाळ । सदरे सुवर्णाचें पाणी ॥
काचबंदी पटांगणाचा ढाळ । कापुर कस्तुरी परिमळ ॥१९॥

चौक २०
तिसरे सदरेची मांडणी । हिरे जोडिले खणोखणीं ॥
खासियाचे पलंग । ते ठेवोनी मध्यस्थानीं ॥
वाळियाच्या झांजी । दबण्याचे कुंड घालोनी ॥
बराणपुरी चिटाचे । आडोआड पडदे बांधुनी ॥
चाहुंकोनी चारी समया । चांदवा जडिताचा बांधोनी ॥
घोंस मोतियांचे । वर ठिकडी नानापरिची ॥
अवघी जडिताची लावणी । हिरे जोडिले खणोखणीं ॥
बहुत सवारिल्या सदरा ॥ ऐशी नाहीं देखिल्या कोणी ॥२०॥

चौक २१
राजानीं सदरा सवारिल्या । हेजिब अबदुल्यास धाडिला ॥
मोरो ब्राह्मण पाठविला । अबदुलखानासी बोलाविला ॥
"चार हजार घोडा । कोण्या कामास्तव आणिला ?" (म्हणून) त्यानें बाहेर निराळा ठेविला ।
दहा पांचांनिशीं चालिला ॥ "एकांतीच्या गोष्टी । 
तेथें दहा पांच कशाला ॥ पालखी दुर करा भोईयाला ।"
खासा अबदुल चालला ॥ "हात चालावा व्हा । दुर करा" म्हणे खानाला ॥
वस्त्रें केली हेजीबाला । शामराज नवाजीला ॥२१॥

चौक २२
भवानीशंकर प्रसन्न ज्याला । तुळजा मदत शिवराजाला ॥
भोग पुरला खानाचा । अबदुल जावळींत आला ॥
बिनहत्याराविण मोकळा । अबदुल सदरेलागीं आला ।
अबदुल पहिले सदरे गेला । सदर देखुनी सुखी झाला ॥
’ऐशी सदर नव्हती । आमच्या आली इदलशाला ॥"
खान दुसरे सदरे गेला । सदर देखुनि सुखी झाला ॥
’ऐशी सदर नव्हती । नवरंगशा बाच्छायाला" ॥
अबदुल तिसरे सदरे गेला । सदर देखुनि सुखी झाला ॥
"ऐसी सदर नाहीं अवरंगशा बाच्छायाला" ॥ अबदुलखान बोलिला ।
"शिवाजीस आणा भेटायाला" ॥२२॥

चौक २३
राजा नवगजींत बैसला । मोरो, शाम बोलविला ॥
रघुनाथ पेशवे । नारो शंकर पाचारिला ॥
दहातोंडया माणकोजीला । त्या इंगळ्या सुभानजीला ॥
देवकांत्या जीवाजीला । राजानें बोलाविले तुम्हांला ॥
करनखर्‍या सुभानजीला । बेलदारा पिलाजीला ॥
त्या बोबडया बहिरजीला । सरदार आले भेटायाला ॥२३॥

चौक २४
राजा विचारी भल्या लोकांला । "कैसें जावें भेटायाला" ॥
बंककर कृष्णाजी बोलला । "शिवबा सील करा अंगाला" ॥
भगवंताची सील ज्याला----। आंतून, (तो) बारिक झगा ल्याला ॥
मुसेजरीच्या सुरवारा । सरजा (जें) बंद सोडुन दिला ॥
डावे हातीं बिचवा त्याला (ल्याला) । वाघनख सरज्याच्या पंजाला ।
पटा जिव म्हाल्याप दिला । सरजा बंद सोडुन चालिला ॥२४॥

चौक २५
"माझा रामराम दादानु" ॥ गडच्या गडकर्‍या बोलिला ॥
जतन भाईनु करा । आमच्या संभाजीराजाला ॥
सराईत उमाजी राज्य (राजा) होईल तुम्हांला ॥ 
गड निरवितो गडकर्‍याला राज्य निरवितो नेतोजीला ॥
निरवानिरव दादानु । विनंती केली सकलीकाला ॥
"येथुनि सलाम सांगा । माझा शहाजी महाराजाला" ॥
खबर गेली जिजाऊला । शिवबा जातो भेटायला ॥
पालखींत बैसुनी । माता आली भेटायाला ॥२५॥

चौक २६
शिवबा बोले जिजाऊ सवें । "बये वचन ऐकावें ॥
माझी आसोशी खानाला । "बये जातों भेटायाला" ॥
जिजाऊ बोले महाराजाला । "शिवबा न जावें भेटायाला ॥
मुसलमान बेइमान । खान राखिना तुम्हांला" ॥
राजा बोले जिजाऊला । "येवढी उंबर झाली भेट दिली नाहीं कोणाला ॥
येवढी गोष्ट माते । आज द्यावी मला ॥ 
आई अबदुलखान आला ॥ यानें धाक लाविला देवाला" ॥
जिजाऊ बोले महाराजाला । "शिवबा बुद्धिनें काम करावें ।
उसनें संभाजीचें घ्यावे" ॥२६॥

चौक २७
जिजाऊ घेती अलाबला । "शिवबा चढती दवलत तुला ॥
घे यशाचा विडा" । शिवबा स्मरे महादेवाला ।
गळां घातली मिठी । मातेच्या चरणासी लागला ॥
ध्यानीं आठवुनी भगवंताला । शिवाजी राजा सदरे गेला ॥२७॥

चौक २८
"पहिला सलाम । माझा भवानीशंकराला ॥
दुसरा सलाम । माझा शहाजी महाराजाला ।
तिसरा सलाम । अमचे अबदुलखानाला " ।
शिवाजी सरजे सलाम केला । अबदुलखान (नानें) गुमान केला ॥
मनीं धरलें कपट । पुरतें कळलें महाराजाला ॥
मग तो शिवाजी सरज्याला । खान दापुनी बोलला ॥
"तूं तो कुणाबीका छोकरा । सवरत बाच्छाई सदरा" ॥२८॥

चौक २९
इतक्या उपरी राजा बोले । त्या अबदुलखानाला ॥
"खाना ज्याची करणी त्याला । कांहीएक भ्यावें रघुनाथाला ॥
तुम्ही जातीचे कोण । आम्ही जाणतों तुम्हाला ॥
तूं तरी भटारनीका छोरा । शिवाजी सरज्यापर लाया तोरा" ॥
यावर अबदुल बोलला ॥ "शिवा तुम चलो विजापुराला" ॥
"शिवाजी सरजे नेतां । बहुत दिन लागतील खानाला ॥
कळला पुरुषार्थ । तुमचा बसल्या जाग्याला" ॥२९॥

चौक ३०
"अबदुल जातका भटारी । तुमने करना दुकानदारी" ॥
इतकिया उपरी । अबदुल मनीं खवळिला पुरा ॥
कव मारिलि अबदुल्यानें । सरजा गवसून धरला सारा ॥
चालविली कटयार । सीलवर मारा न चाले जरा ॥
सराईत शिवाजी । त्यानें बिचव्याचा मारा केला ।
उजवे हातीं बिचवा त्याला । वाघनख सरजाच्या पंजाला ॥
उदरच फाडुनी । खानाची चरबी आणिली द्वारा ॥३०॥

चौक ३१
खान "लव्हा लव्हा" बोलिला । खानाचा लव्हा बेगिन आला ॥
राजानें पट्टा पडताळिला । अबदुलखानानें हात मारिला ।
शिरींचा जिरेटोप तोडला । सरजा(ला) जरासा लागला । 
भला सराईत शिवाजी । पटयाचा गुंडाळा मारिला ॥
मान खांदा गवसुनी । जानव्याचा दोरा केला ॥
अबदुलखान शिवाजी दोनी । भांडती दोनी धुरा ॥
बारा हजार घोडा । सरदार नाहीं कोणी तिसरा ॥३१॥

चौक ३२
अबदुलखान झाला पुरा । कृष्णाजी ब्राह्मण उठावला ॥
शिवाजी राजा बोलला । "ब्राह्मणा मारुं नये तुला ।
तुजशीं मारतां शंकर हांसेल आम्हांला" ॥ नाइकतां ब्राह्मणें ।
हात दुसरा मारिला । "ब्राह्मणा मारुं नये तुला ।
क्रिया शहाजीची आम्हांला" ॥ कृष्णाजी ब्राह्मण(णें) ।
हात तिसरा टाकिला ॥ (तरी) होईल ब्रह्महत्या भोंसल्यासी ।
( म्हणून ) शिवांजीनें राखिला ॥ कृष्णाजी ब्राह्मण मागें सरला ।
सैद बंडु मोहरे आला ॥ जवळ होता जिउ म्हाल्या ।
त्यानें सैद पुरा केला ॥३२॥

चौक ३३
संशय खानाचा फिटला । खान (नें) पळतां पाय काढिला ॥
मेळविला भोयांनीं । पालखींत घालून चालविला ॥
कावजीचा संभाजी भोंसला । मोठे उडीनें आला ॥
जखमा केल्या भोग्यांच्या पाया(ला) । खटारां धरणीवर पाडिला ।
शिवाजीराजा बेगिन आला । शिर कापुनी गडावर गेला ॥
जराचाच मंदिल । शिरीं त्या संभाजीचे घातला ॥
फाजिलखाना क्रोध आला । बाण आणि बंदुखा थोर वर्षाव एकच केला ॥
शिवाजीराजाचा चपाटा । फाजिलखान बारा वाटा ॥
हाल महाराजाचे झाले । अबदूलच्या लोकांला ॥३३॥

चौक ३४
प्रतापगडाहुनि केला हल्ला । मारिती खुण सरज्याच्या लोकांला ॥
धरल्या चारी वाटा । ज्यांनीं घाट बळकाविला ॥
दळ त्या समई । पायदळाचा कडका आला ॥
सिलीमकर, खोपडया, । काकडया, सुरव्या, लोटला ॥
अंगद हनुमंत रघुनाथाला । पायचे पायदळ शिवाजीराजाला ॥
"फिरंग ठेवी जाउद्या, त्याला । राखु नका तुम्ही उगारल्या पाइकाला" ॥
फत्ते महाराजाची झाली । वाट दिली कुलवजीराला ॥३४॥

चौक ३५
पळतां फाजिलखान । त्याचा दुमाळा घेतला ॥
माघारा फिरोनि । जान(नें) हातीचा आरोबा दिला ॥
शिवाजीचे हाल । फाजिलखान घाय (यें) पुरा केलाअ ।
घोडा आणि राऊत । ज्यांणीं पाडाव केला ॥
वळल्या हातीवरल्या ढाला । चार हजार घोडा अबदुल्या जावळींत बुडविला ॥
भवानी शंकर प्रसन्न ज्याला । यश राज्याला खंडयाला ।
सरज्या तोरड महीमोर्तब शिवाजीला । फत्ते झाली महाराजाची ते वेळ पन्हाळा घेतला ॥३५॥

चौक ३६
अज्ञानदास विनवी श्रोत्याला । राजा अवतारी जन्मला ॥
नळनीळ सुग्रीव जांबूवंत । अंगद हनुमंत रघुनाथाला ॥
एकांती भांडन । जैसें राम रावणाला ॥
तैसा शिवाजी सरजा । एकांती नाटोपे कवणाला ॥
दृष्टी पर्यस शिवाजीला । कलीमधीं अवतार जन्मला ॥
विश्वाची जननी । अंबा बोले शिवाजीला ॥
मोठें भक्तीचें फळ । महादेव भाकेला गोंविला ॥
जिकडे जाती, तिकडे यश राज्याच्या खंडाला ॥३६॥

चौक ३७
माता जिजाऊ बोलली । पोटीं अवतार जन्मला ॥
शंकपाळ शिवाजी महाराजानें केला । आतां मी गाईन । 
भोंसले शिवरायाच्या ख्याति ॥ दावा हेवा जाण ।
अखेर संग्रामाच्या गति ॥ राजगड राजाला ।
प्रतापगड जिजाऊला ॥ धन्य जिजाऊचे कुशी ।
राजा अवतार जन्मला ॥ आपल्या मतें अज्ञानदासानें ।
बीरमाल राज्याचा गाइला ॥ शिवाजी सरज्यानें ।
इनाम घोडा बक्षीस दिला ॥ शेरभर सोन्याचा ।
तोडा हातांत घातला ॥ यश जगदंबेचें । 
तुळजा प्रसन्न शिवराजाला ॥३७॥

                  
                                      शाहीर अज्ञानदास

                          



Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk