मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

अचला (Achala) किल्ल्याची ऊंची :  4040
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: सातमाळ
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम
नाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्चिम जाणार्‍या सातमाळ डोंगररांगेत १८ किल्ले आहेत. त्यापैकी दगड पिंप्रि गावामागे असलेला अचला गड हा छोटेखानी किल्ला अहिवंत गडाचा साथिदार आहे. अचला गडाचे स्वरुप पाहाता हा टेहळणीचा किल्ला असावा. या किल्ल्याच्या डाव्या बाजूला असलेल्या डोंगराला टवल्या नावाने ओळखतात, तर उजव्या बाजूच्या डोंगराला भैरवाचा डोंगर म्हणतात.

खाजगी वाहानाने अचला, अहिवंत आणि मोहनदर हे तीन किल्ले दोन दिवसात व्यवस्थित पाहून होतात. पहिल्या दिवशी अचला,अहीवंत पाहून दरेगावातील मारुती मंदिरात किंवा मोहनदरी गावातील आश्रमशाळेच्या व्हरांड्यात मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी मोहनदर किल्ला पाहाता येईल.
12 Photos available for this fort
Achala
Achala
Achala
पहाण्याची ठिकाणे :
दगड पिंप्री हे अचला किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या गावात ५ फ़ूट उंचीच्या ६ वीरगळी पाहायला मिळतात. गड चढायला सुरुवात केल्यावर अचला गडाची सोंड खाली उतरते. त्या खिंडीत एक पत्र्याचे देऊळ आहे. त्या देवळाला सतीचे देऊळ म्हणतात. तेथून एक टप्पा चढून गेल्यावर भगव्या झेंड्याच्या खाली शेंदुर फ़ासलेली हनुमानाची मुर्ती पाहायला मिळते. गडाच्या कातळ टोपी खाली गडावर जाणार्‍या कातळ कोरीव पायर्‍या पाहायला मिळतात. अर्ध्या पायर्‍या चढल्यावर कातळात वरच्या बाजूला एक ३ फ़ूट लांब आणि ३ फ़ूट रुंद आकाराची चौरस प्रवेशव्दार असलेली गुहा पाहायला मिळते. गुहेत जाण्यासाठी पायर्‍या सोडून थोड चढुन जाव लागत. गुहा १० फ़ुट लांब आहे. या गुहेतून दूरवरचा परीसर चांगला दिसतो. याची योजना टेहळणीसाठी केलेली असावी. गुहा पाहून परत पायर्‍या चढायला सुरुवात करावी. पायर्‍या संपतात तेथे पाण्याचे बुजलेले एक टाक आहे. पुढे एक छोटा टप्पा चढुन गेल्यावर उजव्या बाजूला पाण्याचे बुजलेले एक टाक आहे.

गड माथ्यावर प्रवेश केल्यावर एक टाक दिसत. त्या टाक्या भोवतीच्या झुडूपांवर कपडे पडलेले दिसतात. कुठल्याही मोठ्या आजारातून बरे झाल्यावर गावकरी या ठिकाणी येऊन स्नान करतात. त्यावेळी ते गावातून घालून आलेले कपडे या ठिकाणी सोडून, नविन कपडे घालून जातात. आज मात्र हे टाक सुकलेल आहे. टाक्याच्या वरच्या बाजूला एका झाडाखाली काही मुर्ती ठेवलेल्या आहेत. पण त्या ओळखता येण्याच्या पलिकडे झिजलेल्या आहेत. त्यामागे घरांची जोती आहेत. तिथून उजव्या बाजूला वळून किल्ला आणि बाजूचा डोंगराच्या घळीत उतरायला सुरुवात केली की दोन टाकी दिसतात त्याच्या खालच्या बाजूस दोन टाकी आहेत. त्याच्या खाली एका पुढे एक पाच टाकी आहेत. अशी ८ टाक्यांची अनोखी रचना पाहायला मिळते. हि टाकी पाहून परत किल्ल्यात प्रवेश केला तेथे येऊन विरुध्द दिशेला (प्रवेश केला तेथून डावीकडे) डाव्या बाजूला गेल्यावर एक मोठ पाण्याच कोरड टाक पाहायला मिळते. त्यात दगड पडून ते बर्‍याच प्रमाणात बुजलेल आहे. टाक पाहून परत प्रवेशव्दाराशी आल्यावर गडफ़ेरी पूर्ण होते. गडमाथा छोटा असल्यामुळे गडफ़ेरीस अर्धा तास पुरतो. अहिवंतगड, सप्तशृंगी, मार्कंड्या, रावळ्या-जावळ्या, धोडप ही रांग अचला वरुन पाहायला मिळते.
पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई किंवा पुणे मार्गे नाशिक गाठाव. नाशिकहुन वणी गाठावे. वणीहून एस.टी.ने पिंपरी अचलाकडे जावे. हे अंतर साधारण १२ किमी आहे. अचला गावात उतरून दगड पिंपरी गावाकडे सरळ चालत निघावे. हे अंतर अर्ध्या तासाचे आहे. दगड पिंपरी हे अचला किल्ल्याच्या पायथ्याचे गावं आहे. खाजगी वाहानाने थेट दगड पिंपरी गावात जाता येते. गावातून समोरच्या डोंगरसोंडेवरील खिंडीत छोटेसे सतीचे देऊळ दिसते. त्याच्या दिशेने वर चढत जावे. पाऊलवाट प्रथम शेतातून आणि नंतर वनखात्याने लावलेल्या जंगलातून वर चढत जाते. साधारणपणे अर्ध्या तासात आपण सोंडेवरील सतीच्या देवळापाशी पोहोचतो. देवळापासून डाव्या बाजूला दिसणारा किल्ला "अचला", तर उजवीकडे धावत जाणारी सोंड थेट "अहिंवत" गडाला जाऊन मिळते. डाव्या बाजूने किल्ल्याच्या नाकाडावरून अंगावर येणारी वाट पकडावी. पहिल्या टप्प्यावर मारूतीचे मंदिर आहे. पुढे ही वाट कातळ कड्यापर्य़ंत उभी चढत जाते. कड्याच्या नाकाडा खाली आल्यावर उजवीकडे वळून , कडा डावीकडे आणि दरी उजवीकडे ठेवून आडवे चालत गेल्यावर कातळात खोदलेल्या पायर्‍या लागतात. पायर्‍या चढुन गेल्यावर आपला गडावर प्रवेश होतो. दगड पिंपरी गावातून गडमाथा गाठण्यास दीड तास लागतो.

दगड पिंपरी ते बेलवाडी असा कच्चा रस्ता झालेला आहे. काही वर्षात गाडीने थेट सतीचे देऊळ असलेल्या सोंडेपर्य़ंत पोहोचता येईल. तेथून गडमाथा १ तासात गाठता येईल.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची व्यवस्था आपण स्वत…: करावी.
पाण्याची सोय :
गडावर पिण्या योग्य पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
दगड पिंप्री मार्गे दिड तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
जुलै ते फेब्रुवारी
डोंगररांग: Satmaal
 अचला (Achala)  अहिवंत (Ahivant)  अंकाई(अणकाई) (Ankai)  चांदवड (Chandwad)
 धोडप (Dhodap)  गोरखगड(मनमाड) (Gorakhgad(Manmad))  जवळ्या (Jawlya)  मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka))
 रवळ्या (Rawlya)  टंकाई (टणकाई) (Tankai)