मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

अंबागड (Ambagad) किल्ल्याची ऊंची :  1500
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: अंबागड
जिल्हा : भंडारा श्रेणी : मध्यम
नागपूर पासून १०० किलोमीटर अंतरावर भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात अंबागड नावाचा सुंदर पण अल्पपरिचित किल्ला आहे . किल्ल्याचे बांधकाम त्यावरील वास्तू यांचे पुरातत्त्व खात्याने मजबूतीकरण केल्यामुळे किल्ला उत्तम अवस्थेत आजही उभा आहे . किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्यामुळे किल्ल्यावर जाणेही सोपे झालेले आहे .
28 Photos available for this fort
Ambagad
Ambagad
Ambagad
इतिहास :
गौंड राजा बख्त बुलंद याचा सरदार राजखान पठाण याने हा किल्ला इसवीसन १७०० च्या सुमारास उभारला . पुढे हा किल्ला नागपूरकर भोसल्यांच्या ताब्यात गेल्यावर त्याचा उपयोग तुरुंग म्हणून करण्यात आला .
पहाण्याची ठिकाणे :
पायऱ्याच्या मार्गाने साधारणपणे आपण अर्ध्या तासात किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो . किल्ल्याचे उत्तराभिमुख प्रवेशद्वार दोन भव्य बुरुजांच्या मध्ये लपवलेले आहे . बुरुजामध्ये जंग्या आणि वरच्या बाजूला चर्या आहेत . प्रवेशद्वारावर पिंपळपान आणि कमलपुष्प कोरलेली आहेत . प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोरच आहेत देवड्यामधून बुरुजावर जाण्यासाठी जीना आहे . बुरुजावरून किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर आणि किल्ल्याच्या आतील भागावर नजर ठेवता येते . बुरुज पाहून खाली उतरून पायवाटेने पुढे गेल्यावर उजव्या बाजूला एक छोटेसे मंदिर दिसते . त्यात शेंदूर लावलेला एक दगड आहे . हे मंदिर हल्लीच्या काळात बांधलेले असावे . या मंदिराजवळ एक चुन्याच्या घाण्याचे तुटलेले चाक पडलेले आहे . येथून उजव्या बाजूला असलेल्या तटबंदीकडे जावे . फांजी वरुन पुढे जातांना २ अर्धवर्तुळाकार बुरूज आहेत . पुढील वाट बंद झाल्याने पुन्हा देवड्यांपाशी येउन किल्ल्यात जाणाऱ्या पायवाटेने पुढे जातांना डाव्या बाजूला एक विहीर आहे . उजव्या बाजूला साचपाण्याचा बांधीव तलाव आहे . त्यावर एक पडकी वास्तू आहे . पुढे डाव्या बाजूच्या फांजीवर चढून पुढे जातांना ठरावीक तीन बुरुज लागतात. पुढे थोड्या पायऱ्या चढल्यावर चौथा बुरुज लागतो या बुरुजाच्या उजव्या बाजूला मोठा आयताकृती बांधीव तलाव आहे . या तलावात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत . या तलावाच्या बाजूला वास्तूचे प्रवेशद्वार आहे. काटकोनात वळणार्या पायऱ्या चढून गेल्यावर आपण उध्वस्त वास्तूत प्रवेश करतो . ही वास्तू दुमजली असावी. दुसऱ्या मजल्यावर चढून गेल्यावर डाव्या कोपऱ्यात कमानदार छत असलेली उध्वस्त इमारत आहे . या इमारतीला एकही खिडकी नाही . इमारतीच्या रचनेवरून येथे दारु कोठार असावे . दारु कोठार पाहून उजव्या बाजूला आल्यावर एक चौकोनी बांधीव विहीर आहे . विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. विहिरीच्या पायऱ्याच्या वरच्या बाजूला एक मेघडंबरी आहे . बाजूलाच किल्ल्याची प्रवेशद्वारापासून आलेली तटबंदी आहे . किल्ल्याचा हा भाग पाहून आल्या मार्गाने खाली उतरावे . मुख्य वाटेवर येउन बालेकिल्ल्यावर जातांना डाव्या बाजूला दोन अर्धवर्तुळाकार बुरुज लागतात . बालेकिल्ल्यातील चारही बुरुज चौकोनी आहे . किल्ल्याच्या टोकाला असलेल्या चौकोनी बुरुजात एक खोली आहे . या खोलीतून बुरुजाच्या / किल्ल्याच्या बाहेर पडता येते . हा बुरुज पाहून पुन्हा किल्ल्यात येउन मधला मोकळा भाग ओलांडून पलीकडे पडक्या भिंतीतून वर चढून जावे . याठिकाणी दुमजली महाल होता आता त्यापैकी वरचा मजला नष्ट झालेला आहे . भिंतीतले कमानदार कोनाड्यावरुन आपण आज त्याचा अंदाज लावू शकतो . खालच्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत . पण त्यात मलबा पडल्यामुळे आणि पाणी साठल्यामुळे खाली जाता येत नाही . या महालातून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला नक्षीकाम केलेले कोनाडे असलेली एक भिंत आहे . ही भिंत संपते तेथे एक चौकोनी बुरुज आहे . या बुरुजात चोर दरवाजा आहे . बुरुजात असलेल्या पायऱ्यानी खाली उतरल्यावर आपण किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला येतो . येथून किल्ल्याखाली जाणारी वाट आहे . या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते .
पोहोचण्याच्या वाटा :
१) नागपूर - जांब गाव - रामपूर - अंबागड हे अंतर ९२ किलोमीटर आहे. जांब गावातून रामपूर गाठावे रामपूर गावातून उजवीकडे एक रस्ता जातो या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एक कच्चा रस्ता आंबा गडाकडे जातो . या रस्त्याने अंबागडच्या पायथ्याच्या हनुमान मंदिरापर्यंत अंतर ३ किमी आहे. या रस्त्याने मोटार सायकल किंवा चालत अंबागडाच्या पायथ्याशी जाता येते, या कच्च्या रस्त्याने न जाता डांबरी सडकेने पुढे गेल्यावर २ किलोमीटरवर अंबागड गाव आहे . या गावातल्या चौकातून डावीकडे जाणाऱ्या रस्त्याने अर्धा किलोमीटर अंतर गेल्यावर एक कालवा लागतो . या कालव्याच्या उजव्या काठाने एक कच्चा रस्ता अंबागड कडे जातो. या रस्त्याने गाडीने (जीप/ मोटारसायकल) थेट अंबागडच्या (३ किलोमीटर ) पायथ्याशी जाता येते . हा पूर्ण रस्ता कच्चा असल्याने पावसाळ्यात या रस्त्याने गाडी जा्णे शक्य नाही . अंबागड गावातून चालत जावे लागते . किल्ल्याच्या पायथ्याशी हनुमान मंदिर आहे . तेथूनच किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत .
२) नागपूर -उसर्रा - बपेरा - रामपूर - अंबागड असाही रस्ता आहे. या रस्त्याने नागपूर ते अंबागड अंतर ९४ किलोमीटर आहे.
राहाण्याची सोय :
किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिरात राहाण्याची सोय होवू शकेल.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही .
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही .
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पायथ्याच्या हनुमान मंदिरापासून गडावर जाण्यासाठी अर्धा तास लागतो .
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: A
 आड (Aad)  अचला (Achala)  अग्वाडा (Aguada)  अहिवंत (Ahivant)
 अजिंक्यतारा (Ajinkyatara)  अजमेरा (Ajmera)  आजोबा (आजा पर्वत) (Ajoba)  अकलूजचा किल्ला (Akluj Fort)
 अलंग (Alang)  अंमळनेर (Amalner)  अंबागड (Ambagad)  आंबोळगड (Ambolgad)
 अणघई (Anghai)  अंजनेरी (Anjaneri)  अंकाई(अणकाई) (Ankai)  अंतुर (Antoor)
 अर्जूनगड (Arjungad)  अर्नाळा (Arnala)  आसावा (Asawa)  अशेरीगड (Asherigad)
 औंढा (अवंध) (Aundha)  औसा (Ausa)  अवचितगड (Avchitgad)