मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

अंकाई(अणकाई) (Ankai) किल्ल्याची ऊंची :  3170
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: सातमाळ
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम
अंकाई आणि टंकाई हे जोड किल्ले आहेत. एकाच खिंडीने वेगळ्या झालेल्या दोन डोंगरांवर हे किल्ले बांधलेले आहेत. या डोंगररांगेजवळुन जाणार्‍या सुरत - औरंगाबाद व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि संरक्षणाच्या दृष्टीने या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती. या किल्ल्यांवरील अगस्ती मुनींचा आश्रम, ब्राम्हणी, जैन लेणी या किल्ल्याच प्राचीनत्व सिध्द करतात.मनमाड पासून केवळ १० किमीवर आणि धार्मिक स्थान असल्यामुळे किल्ल्यावर सुट्टीच्या दिवसात भाविकांचा वावर असतो. त्यामुळे सकाळी लवकर अंकाई किल्ला पाहुन मग टंकाई किल्ला पाहावा. कारण टंकाई किल्ल्यावर भाविक/पर्यटक फ़ारसे येत नाहीत.

अंकाई टंकाई हे दोन किल्ले नीट पाहाण्यास पाच ते सहा तास लागतात. जर आदल्या दिवशी मुंबई किंवा पुण्याहुन निघुन पहाटे मनमाडला पोहोचल्यास दुपार पर्यंत अंकाई आणि टंकाई किल्ले पाहुन होतात. त्यानंतर त्याच्या पासुन ६ किमीवर असलेला गोरखगड पाहुन पायथ्याच्या मंदिरात मुक्काम करता येतो किंवा ७ किमीवरील कात्रा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कातरवाडीतील हनुमान मंदिरात मुक्कामाला जाता येते. दुसर्‍या दिवशी कात्रा किल्ला पाहाता येतो. काटेकोरपणे कार्यक्रम आखल्यास ४ किल्ले दोन दिवसात पाहुन होतात. अर्थात त्यासाठी बरोबर खाजगी वाहान असणे आवश्यक आहे. कारण या आतल्या भागात एसटी आणि रिक्षांची सोय नाही. टंकाई, गोरखगड, कात्रा या किल्ल्यांची माहिती साईटवर लिहिलेली आहे.
24 Photos available for this fort
Ankai
Ankai
Ankai
इतिहास :
अनकाई डोंगरावर अगस्ती ऋषींचा आश्रम होता. किल्लावर असलेली ब्राम्हणी (हिंदु) लेणी आणि किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली दहाव्या ते बाराव्या शतकातील जैन लेणी किल्ल्याच प्राचीनत्व सिध्द करतात. या किल्ल्याची निर्मिती बाराव्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या कारकीर्दीत झाली अस मानल जात. इ.स. १६३५ मधे मुघलांनी हा किल्ला लाच देऊन जिंकून घेतला. सुरत - औरंगाबाद या व्यापारी मार्गावरचा हा महत्वाचा किल्ला असल्यामुळे मुघलांच्या दृष्टीने हा महत्वाचा किल्ला होता. मुघलांकडुन हा किल्ला निजामाकडे गेला. इ.स. १७५२ मधे भालकीच्या तहा नुसार हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला.इ.स. १८१८ मधे इंग्रजांनी हा किल्ला जिंकुन घेतला.
पहाण्याची ठिकाणे :
अंकाई गावातून किल्ल्याच्या पायथ्याच्या पर्यंत रस्ता आहे. हा रस्ता शाळे जवळुन जातो. तेथे रस्त्याच्या बाजुला उघड्यावर गणेश मुर्ती व काही वीरगळी ठेवलेल्या आहेत. अशीच एक मोठी वीरगळ शाळेच्या विरुध्द बाजूस आहे. या चार फूट उंच चौकोनी वीरगळीवर खालच्या पट्टीवर चारही बाजूंना शिल्प कोरलेली आहेत. त्यात रानडुकराची शिकार करतानाच शिल्प आहे. वरच्या बाजूस सतीचा हात कोरलेला आहे. ही वीरगळ पाहून परत शाळेपाशी येउन किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत जावे. रस्ता संपतो तिथुन किल्ल्याच्या पहील्या टप्प्यावरील जैन लेण्यांपर्यंत पुरातत्व खात्याने पायर्‍या बांधलेल्या आहे. पायर्‍यांनी आपण १० मिनिटात लेण्यांपाशी पोहोचतो. लेणी दोन स्तरांवर बांधलेली आहेत. पहिल्या स्तरावर दोन लेणी आहेत. त्यातील दुसर्‍या लेण्याच्या समोर पाण्याच टाकं आहे. या लेण्यामधे मुर्ती किंवा कोरीवकाम पाहायला मिळत नाही. ही २ लेणी पाहुन १० ते १५ पायर्‍या चढुन गेल्यावर ५ लेणी खोदलेली पाहायला मिळतात. हि लेणी दहाव्या ते बाराव्या शतकात कोरलेली असावीत. यातील पहिली दोन लेणी दोन मजली आहेत. त्यांचे ओसरी, सभामंडप आणि गाभारा असे तीन भाग आहेत. ओसरी दोन खांबांवर तोललेली आहे. सभा मंडपाच्या व्दारशाखेवर सुंदर कोरीवकाम आहे. सभामंडप चार खांबांवर तोललेला आहे. खांबांच्या टोकाला छताला आधार देणारे यक्ष कोरलेले आहेत. छतावर पाकळ्या असलेले सुंदर कमळ कोरलेले आहे. सभामंडपातून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी जिना आहे. पहिल्या मजल्यावरचे दालन दोन स्तंभांवर तोललेले आहे. दुसर्‍या लेण्याच्या ओसरीत डाव्या बाजुला यक्षाची मुर्ती आणि उजव्या बाजुला इंद्राणीची मूर्ती आहे. इंद्राणीच्या मूर्तीला भवानी मातेचे रुप देण्यात आलेले आहे. सभामंडप चार खांबांवर तोललेला आहे. पहिल्या मजल्यावर जाणारा जिना सभामंडपात आहे. पहिल्या मजल्या वरच्या दालनाला चौकोनी नक्षी असलेली जाळी कोरलेली आहे. जाळीच्या बाहेरच्या बाजूला दोन मोठे व्याल कोरलेले आहेत. तिसर्‍या लेण्यात ओसरीत दोन मुर्ती आहेत. डाव्या बाजुची मुर्ती किचकाची आणि उजव्या बाजुची मुर्ती अंबिकेची आहे. पाचव्या लेण्यात तीर्थंकरांच्या मुर्ती आहेत.

लेणी पाहुन डोंगर चढायला सुरुवात केल्यावर आपल्याला दोनही किल्ल्यांच्या मधिल खिंड तटबंदी बांधुन सुरक्षित केल्याच पाहायला मिळत. या तटबंदीवर चर्या बांधलेल्या आहेत. ओबडढोबड पायर्‍यांच्या वाटेने १० मिनिटात आपण अंकाई आणि टंकाईच्या पहिल्या दक्षिणाभिमुख प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दाराच्या बाजुला दोन भव्य बुरुज आहेत. या बुरुजां पासुन सुरु झालेली तटबंदी अंकाई आणि टंकाई या दोनही किल्ल्यांपर्यंत जाते. दरवाजाचे लाकडी अवशेष अजुनही काही प्रमाणात टिकुन आहेत.दरवाजा ओलांडुन आत गेल्यावर पाहारेकर्‍यांसाठी असलेल्या देवड्या दिसतात. पुढे थोड्या पायर्‍या चढुन गेल्यावर उजव्या बाजुला टंकाई किल्ला , डाव्या बाजुला अंकाई किल्ला आणि समोर वायव्य दरवाजा (मनमाड दरवाजा) दिसतात. या मनमाड दरवाजातून खाली उतरुन त्याची भव्यता अनुभवता येते. अशा प्रकारे दोन डोंगरामधिल खिंडीचे संरक्षण करण्यासाठी दोन प्रवेशव्दारांची आणि तटबंदीची रचना केलेली येथे पाहायला मिळते.

डाव्या बाजुला अंकाई किल्ल्याच्या दिशेने वळल्यावर एक वास्तु दिसते. पूर्वीच्या काळी या वास्तूचा वापर कचेरी म्हणुन होत असावा. किल्ल्यावर जाण्याचा परवाना इथे दिला जात असावा. इतर कामांसाठी आलेल्यांना किल्ल्यावर न जाउ देता इथुनच परत पाठवले जात असावे. या वास्तु जवळुन एक वाट लेण्यांकडे जाते. इथे एक ब्राम्हणी (हिंदु) लेण आहे. लेण्याच्या आत गर्भगृह कोरलेल आहे. या लेण्याची प्रचंड झीज झाल्यामुळे गाभार्‍याच्या बाहेरच्या भिंतीवर कोरलेल्या जय आणि विजय यांच्या मुर्ती सोडल्यास कुठल्याही मुर्ती ओळखता येत नाहीत. लेण्याच्या बाजुला एक टाक आहे. या लेण्याच्यावर चढुन गेल्यावर एक मोठ पाण्याच खांब टाक आहे. त्याच्या पुढे पाण्याची दोन टाकी आहेत, पण त्यात झाड झाडोरा वाढल्यामुळे ती पटकन दिसत नाहीत. लेणी पाहुन पायर्‍यांच्या मार्गावर आल्यावर आपण किल्ल्याच्या दुसर्‍या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. या प्रवेशव्दाराच्या बाजूला दोन भव्य अष्टकोनी बुरुज आहेत. या प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर कातळात खोदलेल्या (८० अंशाच्या कोनात) पायर्‍यांनी आपल्याला उभा चढ चढावा लागतो. काही पायर्‍या चढुन गेल्यावर तिसरे प्रवेशव्दार येते. त्यापुढे चौथे प्रवेशव्दार येते. ही तीनही प्रवेशव्दारे एका पुढे एक सरळ रेषेत आहेत. या तीन प्रवेशव्दारांमधे दरीच्या बाजुला उंच तटबंदी आणि दुसर्‍या बाजुला उंच कातळकडा आहे. हा कातळ कोरुनच पायर्‍या बनवलेल्या आहेत. चौथ्या प्रवेशव्दारा पर्यंत येइ पर्यंत आपली दमछाक झालेली असते. या प्रवेशव्दारा नंतर जीना काटकोनात वळतो.याठिकाणी थोडा उघडा भाग आहे. तिथुन समोरचा टंकाई किल्ला पूर्ण दिसतो. त्याच्या अर्ध्या उंचीवर असणार्‍या गुहा आणि टाक इथुन स्पष्ट दिसतात. टंकाई चढताना या टाक्यांचा अंदाज येत नाही.

पाचवा आणि झीज झालेले दगड असलेला सहावा दरवाजा ओलांडल्यावर आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. येथे डाव्या बाजुला एक इमारत आहे. त्याच्या पुढे थोड्या पायर्‍या चढुन गेल्यावर डाव्या बाजुस एक व उजव्या बाजुस एक अशी दोन पाण्याची टाकी लागतात. त्या मधिल पायवाटेने थोडे चढुन गेल्यावर आपण सीता गुंफेपाशी पोहोचतो. गुहे बाहेर आणि गुहेच्या आत अशी दोन पाण्याची टाक आहेत. स्थानिक लोक या गुहेत गुर बांधतात, त्यामुळे ही गुहा राहाण्या योग्य नाही. गुहे पासुन थोडे पुढे गेल्यावर अगस्ती मुनींची गुहा आहे. त्याच्या आधी गुहेच्या वरच्या बाजुला एक पाण्याच टाक आहे. ते खालुन दिसत नाही. त्यासाठी ४ फुट चढुन जाव लागत. अगस्ती गुहेत काही साधु राहातात. गुहा आणि त्याच्या आजुबाजूचा भाग लाद्या बसवुन आधुनिक केलेला आहे. येथे पेढे, हार आणि पाण्याच्या बाटल्याही विकत मिळतात.

गुहा पाहुन पुढे चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या पठारावर पोहोचतो. इथे एक कातळ कोरीव तलाव आहे त्यास "काशी तळे" म्हणतात. स्थानिक लोक या तलावात आंघोळ करुन अगस्तींच्या आश्रमात जातात. काशी तलावाच्या मध्यभागी असलेली समाधी अगस्ती ऋषींची आहे अस मानतात. याशिवाय तलावाच्या काठी अजुनही काही समाध्या आहेत. तलावाच्या समोर दुरवर आपल्याला एक मोठी वास्तू दिसते. त्या वास्तुकडे जाताना आपल्याला दोन तलाव दिसतात. वास्तू भव्य असुन तिच्या मधोमध एक बांधीव पण कोरडा तलाव आहे. या वाड्याचे छत कोसळले असुन फक्त कमानी उरल्या आहेत. वाड्याच्या रचनेत एक चौकोनी बुरुजा सारखा भाग आहे. (वाड्यात शिरल्यावर डावीकडे) त्यात एकमेव खोली पाहायला मिळते. वाड्याच्या एका टोकाला पांढरा रंग देउन पीराची स्थापना करण्यात आली आहे. वाडा पाहुन अगस्ती गुहेच्या वर असलेल्या टेकडीवर चढायला सुरुवात करावी. टेकडी चढताना उजव्या बाजुला खाली प्रचंड मोठा बांधीव पण कोरडा तलाव दिसतो. टेकडीवर ध्वज स्तंभ सोडल्यास कुठलाही अवशेष नाही. या सर्वोच्च स्थानावरुन पूर्वेला टंकाई, दक्षिणेला गोरखगड, हडबीची शेंडी आणि कात्रा किल्ले दिसतात. सर्वोच्च माथ्यावरुन सीता गुहेकडे उतरता येते. इथे आपली गडफेरी पूर्ण होते. अंकाईच्या गडफेरीला १ तास लागतो.

अंकाई गावातून अंकाई किल्ल्यावर जाण्यास पाऊण तास लागतो.
पोहोचण्याच्या वाटा :
मनमाड जंक्शन रस्त्याने आणि रेल्वेने सर्व शहरांशी जोडलेल आहे. मनमाड औरंगाबाद रस्त्यावर मनमाड पासुन १० किमीवर अंकाई गाव आहे. गावातील शाळेजवळुन किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत खाजगी वाहानाने जाता येते. मनमाडहुन येवला, औरंगाबाद दिशेकडे जाणार्‍या एसटीने अंकाई गावाच्या फाट्यावर उतरुन १ किमी चालत किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाता येते.
अंकाई किल्ला हे रेल्वे स्टेशन आहे. पण इथे केवळ पॅसेंजर थांबतात. हे स्टेशन किल्ल्यापासुन २ किमीवर असल्याने गैरसोइच आहे.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
मनमाड औरंगाबाद हायवे वर जेवणाची सोय होते.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पाण्याची सोय नाही.
डोंगररांग: Satmaal
 अचला (Achala)  अहिवंत (Ahivant)  अंकाई(अणकाई) (Ankai)  चांदवड (Chandwad)
 धोडप (Dhodap)  गोरखगड(मनमाड) (Gorakhgad(Manmad))  जवळ्या (Jawlya)  मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka))
 रवळ्या (Rawlya)  टंकाई (टणकाई) (Tankai)