मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

औसा (Ausa) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: बालाघाट रांग
जिल्हा : लातूर श्रेणी : सोपी
लातूर जिल्ह्यातील उदगीर व औसा हे दोन सुंदर भूईकोट किल्ले आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हे किल्ले निजामाच्या संस्थानात असल्यामुळे नांदते होते. संस्थानाची सरकारी कार्यालये या किल्ल्यात असल्याने या किल्ल्यांवरील बहुतेक इमारतींचा वापर बदलला तरी त्या शाबूत आहेत. तसेच हे किल्ले पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून त्यांनी डगडूजी केल्याने किल्ल्यांची शान अजूनही टिकून आहे. भूईकोट किल्ल्यांची सर्व वैशिष्ट्ये या किल्ल्यांमध्ये पहायला मिळतात. औसा किल्ल्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आढळणारे मोर. किल्ल्यावरील झाडी, आजूबाजूची शेती व कमी माणसांचा वावर यामुळे या किल्ल्यात अनेक मोर पहायला मिळतात. स्वत:चे वहान असल्यास औसा किल्ल्याबरोबर खरोसा येथील लेणी, निलंग्याचे निलकंठेश्वर मंदिर व उदगीरचा किल्ला ही ठिकाणे एका दिवसात पहाता येतात.

36 Photos available for this fort
Ausa
Ausa
Ausa
इतिहास :
प्रतिष्ठाण (पैठण) ही सातवाहनांची राजधानी होती. राज्यातील सर्व रस्ते राजधानीकडे जातात. त्यामुळे या रस्त्यावर असलेल्या औसा गावाची बाजारपेठ भरभराटीस आली. पुढील काळात या भागावर वर्चस्व असणार्या चालुक्यांची राजधानी बदामी येथे होती, त्यांच्या काळात हा किल्ला बांधला असावा. त्यानंतर राष्टकुट, चालुक्य (कल्याणी), देवगिरीचे यादव यांची सत्ता या भागावर होती. विक्रमादित्य यांच्या शके ११५० च्या बोरगाव येथील ताम्रपटात औसा किल्ल्यात उल्लेख आहे.


यादवांचा शेवट झाल्यावर बहमनी काळात औसा किल्ल्याला महत्व आले. बहामनी घराण्याचा ९ वा राजा महमदशहा बहामनी याने २२ सप्टेंबर १४२२ मध्ये गुलबर्ग्याची राजधानी बिदरला हलविली. बिदर हे राजधानीचे ठिकाण असल्यामुळे त्या काळात उदगीरचे महत्व वाढले. महमुदशहा बहामनीने इ.स.१४९२ मध्ये कासीम बरीदला उदगीर, औसा, कंधार हे किल्ले जहागिर म्हणून दिले. इ.स.१५२६ मध्ये बहमनी राज्याचे विघटन होऊन ५ शाह्या उदयास आल्या. त्यापैकी औसा येथील सुभेदार कासीम बरीद याने बरीदशाहीची स्थापना केली. बिदर हि राजधानी असलेल्या बरीदशाहीच्या राज्यातील उदगीर, औसा, कंधार हे प्रमुख किल्ले होते. त्यामुळेच त्यानंतरच्या काळात या किल्ल्यांच्या परीघात आदिलशाही विरुध्द अनेक लढाया झाल्या. मोगल बादशहा शहाजहानने सप्टेंबर १६३६ मध्ये औसा किल्ला जिंकून घेतला व त्याने मुबारक खानाची किल्लेदार म्हणून नियुक्ती केली.

बरीदशाहीच्या अस्तानंतर या किल्ल्यावर आदिलशाही, मुघल, मराठे व शेवटी निजामाची सत्ता होती. या तीन शतकांच्या काळात उदगीर येथे एकमेव महत्वाची लढाई इ.स. ३ फेब्रुवारी १७६० रोजी मराठे व निजाम यांच्यात झाली. या लढाईचे नेतृत्व सदाशिवराव (भाऊ) पेशव्यांनी केले. या लढाईत त्यांनी केलेल्या निजामाच्या सपशेल पराभव केला. त्यामूळे पानिपतच्या युध्दाच्या नेतृत्व त्यांच्यावर सोपवण्यात आले. त्यावेळी औसा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात गेला. मराठ्यांच्या पानिपतच्या युध्दात झालेल्या परभवा नंतर निजामाने हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. त्यानंतर स्वातंत्र्य प्राप्ती नंतर हैद्राबाद संस्थान भारतात विलिन होईपर्यंत हा किल्ला निजामाच्या ताब्यात होता.
पहाण्याची ठिकाणे :
औसा गावातून गाडीने आपण थेट किल्ल्याच्या लोहबंदी दरवाजा पर्यंत जाऊ शकतो. औसा गाव व किल्ला एकाच पातळीवर असल्यामूळे किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी ४० फूट खोल व २० फूट रूंद खंदक खोदलेला आहे. हा खंदक दोनही बाजूनी बांधून काढलेला आहे. पूर्वीच्या काळी खंदकात पाणी सोडलेले असे व प्रवेशव्दारासमोर खंदकावर उचलता येणारा पूल ठेवलेला असे. हा पूल सूर्यास्तानंतर व युध्द प्रसंगी उचलून (काढून) घेतला जात असे. आज गावाच्या बाजूला असलेला खंदक बुजलेला असल्यामुळे थेट किल्ल्यात प्रवेश करता येतो. लोहबंदी दरवाजातून आत शिरल्यावर खंदकात काही घर (वस्ती) आहेत व इतर बाजूच्या खंदकात सध्या शेती केली जाते.

औसा किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे. बाहेरील तटबंदीची उंची ७० फूट असून त्यात १२ बुरुज आहेत. बाहेरील तटबंदीवर २ फूट रुंद व ३ फूट उंच चर्या आहेत. आतील तटबंदी १०० फूट उंच असून त्यात १२ बुरुज आहेत. चर्या, तटबंदी व बुरूज यावरून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बनवलेल्या आहेत. खंदक ओलांडून जातांना खंदकात पायर्या असलेल्या दोन विहिरी आहेत. किल्ल्याला एकामागोमाग एक असे ४ दरवाजे आहेत. किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीत असलेल्या पूर्वाभिमूख मुख्य प्रवेशव्दाराला "नौबत दरवाजा" म्हणून ओळखतात. हा दरवाजा लाकडाचा असून त्यावर अणकुचीदार खिळे बसवलेले आहेत. प्रवेशव्दाराच्या दोनही बाजूंना दोन भव्य बुरूज आहेत. दुसरा दरवाजाही पूर्वाभिमूख असून या प्रवेशव्दाराला "अरीतखान दरवाजा" म्हणून ओळखतात. या दरवाजावर रांगेत जाणार्या हत्तींची शिल्पपट्टी बसवलेली आहे. या प्रवेशव्दाराच्यावर दोन छोटे मिनार आहेत. दुसर्या व तिसर्या दरवाजांमधे देवड्या व कचेरी आहे. या ठिकाणी उजव्या हाताला असलेल्या देवड्यांच्या कमानीवर ३ ओळींचा मराठीतील शिलालेख आहे. तिसरा दरवाजा हा बाहेरील तटबंदीतील (पडकोटातील) शेवटचा दरवाजा आहे. या दरवाजाला "चिनी दरवाजा" म्हणून ओळखतात. या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला पडकोटाच्या तटबंदी लगत व मुख्य किल्ल्याच्या तटबंदी लगत प्रत्येकी ४ तोफा ठेवलेल्या आहेत.

तिसरा दरवाजा ओलांडून किल्ल्याच्या दोन (पडकोट व मुख्य किल्ला) तटबंदींच्या मधील जागेत आल्यावर किल्ल्यात न जाता डाव्या बाजूस जावे. येथे तटबंदीला लागूनच किल्लेदाराचा वाडा आहे. हा वाडा ओलांडून गेल्यावर पुढे पडकोटाच्या मोठ्या बुरुजात अर्धचंद्राकृती चांद विहिर आहे. तसेच आणखी पुढे गेल्यावर पडकोटच्या टोकाच्या बुरुजात गोलाकार तवा विहीर आहे. ह्या विहिरी पाहून किल्ल्याच्या चौथ्या दरवाजाकडे आल्यावर दरवाजाच्या उजव्या बाजूस पीराचे थडगे पहायला मिळते. दरवाजातून आत प्रवेश केल्यावर तीन बाजूंनी ओवर्या आहेत. या भागाला तहसिल कार्यालय म्हणतात. यात उजव्या बाजूच्या ओवरीत अनेक तोफगोळे रचून ठेवलेले आहेत. या ओवर्यांच्या मागे मशीद व त्यासमोर हौद आहे. ओवर्यांचा आकार पूर्वीच्या काळी चौकनी होता व त्यात दक्षिणेला बाहेर पडण्यासाठी दरवाजा होता, तो घड्याळ दरवाजा या नावाने ओळखला जातो. या दरवाजाची आता फक्त तुटकी कमान उरलेली आहे. या दरवाजातून बाहेर पडल्यावर समोर सिमेंटची पक्की पायवाट दिसते, पण तिथे न जाता डाव्या बाजूला असलेल्या जिन्याने तटबंदीवर चढून जावे. येथे एक ७ फूट ४ इंच लांब व २ फूट ४ इंच व्यासाची पंचधातूची तोफ आहे.या तोफेवर फारसीतील शिलालेख आहे व मागच्या बाजूला सूर्यमुख कोरलेल आहे. अशा बनावटीची तोफ उदगीर किल्ल्यावर पहायला मिळते.

तोफ पाहून सिमेंटच्या पायवाटेने पुढे गेल्यावर डाव्या बाजूला दारू कोठाराची इमारत दिसते. उजव्या बाजूला दगडात बांधून काढलेला मोठा चौकोनी तलाव दिसतो. याला "जलमहाल" या नावाने ओळखतात. या तलावाच्या एका बाजूला आत उतरण्यासाठी जीना आहे. विजेरी घेऊन यात उतरावे लागते. खाली उतरल्यावर आतमध्ये अनेक कमानी असलेला महाल पहायला मिळतो. हा महाल बरोबर तलावाच्या खाली येतो. या महालात हवा आणि प्रकाश आत येण्यासाठी छ्तामध्ये झरोके अशाप्रकारे बांधलेले आहेत की त्यांचे तोंड तलावाच्या पाण्याच्या पातळीच्या वर उघडेल. यामुळे तलावात पाणी भरले तरी महालाच्या छ्तामध्ये असलेल्या झरोक्यातून पाणी खाली येत नसे. या महालाचा उपयोग उन्हाळ्याच्या दिवसात रहाण्यासाठी केला जात असे. जमिनी खाली बांधलेला महाल व वर असलेले तलावातील पाणी यामुळे महालात गारवा असे. या महालाचा उपयोग खलबतखाना म्हणूनही होत असावा.

जलमहाल पाहून पुढे गेल्यावर एक मोठी पायर्यांची विहिर लागते. या विहिरीला कटोरी विहिर या नावाने ओळखले जाते. या विहिरी समोरील बुरुजावर एक मोठी तोफ आहे. येथून पुढे तटबंदीवर चढून गडफेरी करावी. तटबंदीवर चढल्यावर पहिल्याच बुरुजावर २ मोठ्या तोफा पहायला मिळतात. त्यानंतर येणार्या मोठ्या बुरुजा खालील तटबंदीत प्यारी बिबी की कबर आहे. दरवर्षी येथे उरुस भरतो. पुढे एका मोठ्या बुरुजावर २ तोफा आहेत. त्यातील पोर्तुगिज बनावटीची पंचधातूची तोफ १० फूट २ इंच लांब असून त्यावर पोर्तुगिज राजाचा मुकूट कोरलेला आहे. बुरुजावर तोफा फिरवण्यासाठी दगडी आरी बांधलेली आहे. बाजूला तोफा थंड करण्यासाठी पाण्याचा हौद आहे. त्याच्या पुढच्याच बुरुजावर अजून एक ११ फूट ८ इंच लांब व १ फूट ६ इंच व्यासाची लांबलचक तोफ आहे. पुढे गेल्यावर आपण झेंडा बुरुजापाशी येतो. या बुरुजावर एक तोफ आहे. झेंडा बुरुजावरून जिन्याने खाली उतरल्यावर आपण तिसर्या व चौथ्या प्रवेशव्दाराच्या मध्ये येतो. येथे आपली गडफेरी पूर्ण होते.
महत्वाची सूचना :- मराठवाड्यातील उदगीर, औसा, सोलापूर, नळदुर्ग हे किल्ले पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून तेथे किल्ला सांभाळण्यासाठी कर्मचारी नियुक्त केलेले आहेत.
किल्ल्याच्या प्रवेशव्दारा जवळ पुरातत्व खात्याने लावलेला पूरातन सूचना फलक आहे. त्यावर खालील सूचना लिहिलेल्या आहेत.
१) किल्ल्याचे दरवाजे सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत उघडे राहातील.
२) किल्ला पहाण्यासाठी पुरातत्व खात्याची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.
३) किल्ल्यात छायाचित्रण करण्यास मनाई आहे.
या ठिकाणी दोन गोष्टी नमुद कराव्याश्या वाटतात. १) मराठवाड्यातील पुरातत्व खात्याचे कार्यालय औरंगाबाद येथे आहे. मुंबई , पुणे किंवा इतर कुठल्याही ठिकाणाहून आलेला पर्यटक औरंगाबाद येथून लेखी परवानगी घेऊन येणे शक्य नाही. कारण महाराष्ट्रात किल्ला पहाण्यासाठी अश्या प्रकारे परवानगी घ्यावी लागते हे त्याला किल्ल्यात येई पर्यंत माहित नसते आणि असले तरी वरील किल्ले पहाण्यासाठी कोणीही औरंगाबादला जाऊन मग इथे येण्याचा द्राविडी प्राणायाम करून आपला वेळ आणि पैसा वाया घालवणार नाही. गावातील स्थानिक लोक मात्र आपली गाई ,गुर, बकर्या चरण्यासाठी बिनदिक्कत किल्ल्यात घेऊन येतात.
२) आजच्या काळात गुगलवरून किल्ल्याच्या स्पष्ट प्रतिमा मिळतात, किल्ल्याचा कानाकोपरा, वास्तू पहाता येतात, असे असतांना छायाचित्र काढण्यास बंदी का आहे हे एक कोडच आहे ?
वरील नियमांमुळे येथील कर्मचार्यांच मात्र फावत. किल्ला पहाण्यासाठी व कॅमेर्यासाठी (छायाचित्रणासाठी) अव्वाच्या सव्वा पैसे मागितले जातात. मग घासाघिस केल्यावर पैसे कमी करतात. किल्ला पहाण्यासाठी पुरातत्व खात्याने पैसे घेण गैर नाही, कारण किल्ल्याची साफसफाई , डागडुजी, कर्मचार्यांचा पगार या गोष्टीला पैसे लागतात. मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, व दक्षिणेतील अनेक राज्यात किल्ला पहाण्यासाठी तिकीट काढून जावे लागते. काही ठिकाणी छायाचित्रणासाठीही वेगळे तिकीट काढावे लागते. अशाप्रकारे हे किल्ले पहाण्यासाठी तिकीट ठेवल्यास या गोष्टीचा पर्यटक व पुरातत्व खाते या दोघांनाही फायदा होईल. कारण पर्यटकाला अव्वाच्या सव्वा पैसे मागणार्या कर्मचार्यांशी घासाघीस करावी लागणार नाही व खात्यालाही पैसे मिळतील. तरी किल्ल्यावर जाणार्या पर्यटकांनी वर सांगितलेल्या गोष्टींची नोंद घ्यावी.
पोहोचण्याच्या वाटा :
१) मुंबई, पुण्याहून औसाला जाण्यासाठी थेट बस सेवा आहे. किल्ला औसा गावातच आहे. तेथ पर्यंत चालत जाता येते किंवा वहानानेही थेट किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत जाता येते.
२) मुंबई, पुण्याहून लातूर एक्सप्रेसने लातूरला जावे. लातूरहून खाजगी वहानाने किंवा बसने लातूरहून २३ किमी वरील औसा गाठावे.
राहाण्याची सोय :
लातूर गावात काही लॉज आहेत.
जेवणाची सोय :
औसा गावात जेवणाची सोय आहे.
पाण्याची सोय :
किल्ल्यात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, सोबत पाणी बाळगावे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
किल्ला पहाण्यासाठी १ तास लागतो.
जिल्हा Latur
 औसा (Ausa)  उदगीर (Udgir)