मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

बाळापूर किल्ला (Balapur Fort) किल्ल्याची ऊंची :  200
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : अकोला श्रेणी : सोपी
गजानन महाराजांमुळे प्रसिद्ध झालेल्या शेगाव पासून १९ किलोमीटर अंतरा वर बाळापूर गाव आहे . गावातील टेकडीवर असलेल्या बाळादेवीमुळे गावाचे नाव बाळापूर पडले. या गावात मन आणि म्हैस नदींचा संगम आहे . या दोन नद्यांच्या मध्ये असलेल्या टेकडीवर बाळापूरचा किल्ला आहे. मुगलांनी दगड आणि वीटांमध्ये बांधलेल्या या किल्ल्याचे बांधकाम अजूनही शाबूत आहे. शेगावहून अर्ध्या दिवसात हा किल्ला आणि जसवंतसिंहाने बांधलेली छत्री पाहाता येतो. हा किल्ला सुस्थितीत असल्याने आवर्जून पाहावा.

इतिहास :
इतिहास :- औरंगजेबाचा मुलगा मिर्झा आझम शहा याने १७१७ मध्ये हा किल्ला बांधायला सुरुवात केली. १७५७ मध्ये अचलपूर (एलिचपूरच्या) नवाब इस्माईल खानने हा किल्ला बांधून पूर्ण केला. पुरंदरच्या तहाप्रमाणे युवराज संभाजी राजांना मुघलांचे पंचहजारी सरदार म्हणुन बाळापूर परगणा देण्यात आला होता.
पहाण्याची ठिकाणे :
एस टी स्टॅंडपासून चालत १० मिनिटात आपण किल्ल्याच्या टेकडीपाशी पोहोचतो. येथून समोर किल्ल्याची दुहेरी तटबंदी दिसते . किल्ला डावीकडे आणि मन नदी उजवीकडे ठेवत ५ मिनिटे चालल्यावर एक रस्ता डावीकडे किल्ल्यावर जातो . तिथे जाण्यापूर्वी थोडसे पुढे गेल्यावर मन नदीच्या काठावर एक दरवाजा दिसतो. हा किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे. मन आणि म्हैस या बारमाही वाहाणार्‍या नद्या नाहीत . त्यामुळे नदीकडून होणाऱ्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी नदीच्या काठावर पहिला दरवाजा बांधला होता . किल्ला बांधला होता त्याकाळी दरवाजापासून चालू होणारी तटबंदी आणि बुरूज दुसऱ्या दरवाजा पर्यंत नेलेले होते . पहिला दरवाजा पाहून दुसऱ्या दरवाजाकडे जातांना तटबंदी बुरुजांचे अवशेष रस्त्याच्या डाव्या बाजूस पाहायला मिळतात. थोडासा चढ चढून आपण दुसऱ्या भव्य उत्तराभिमुख दरवाजापाशी येतो. रायगडच्या दरवाजाची आठवण करुन देणारा हा दरवाजा आहे. दरवाजाच्या कमानीवर दोन ओळींचा फारसी शिलालेख आहे . या दरवाजातून आत गेल्यावर दोन्ही बाजूला देवड्या आहेत. दरवाजाच्या वर जाण्यासाठी जीना आहे . पण हा मार्ग दगड लाऊन बंद केलेला आहे . दरवाजाच्या वरच्या बाजूस नगारखाना किंवा पाहारेकर्‍याना गस्त घालण्याची सोय असावी .

दरवाजातून आत आल्यावर आपण किल्ल्याच्या पहिल्या तटबंदीच्या आत प्रवेश करतो. येथे समोरच एक कोरडी चौकोनी विहीर आहे ती तळापासून वीटानी बांधून काढलेली आहे . विहीरीच्या डाव्या बाजूला तहसीलदाराची काही कार्यालय आहेत. ती कार्यालय पार करुन आपण डाव्या कोपऱ्यातल्या भव्य बुरुजापाशी पोहोचावे . किल्ल्याच्या आतल्या तटबंदीचा हा बुरुज अंदाजे ५ मजली उंच आहे . त्यातले खालचे दोन मजली उंच बांधकाम दगडात केलेले असून वरचे बांधकाम वीटांमध्ये केलेले आहे . या बुरुजाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या बांधकामासाठी जो दगड वापरला आहे, त्यात येथील पूरातन मंदिराचे दगडही वापरलेले आहेत. त्यामुळे या बुरुजाच्या भिंतीत दगडावर कोरलेले व्याल, फुले तोरणे पाहायला मिळतात. हा बुरुज पाहून उजव्या बाजूला मुख्य किल्ल्याची तटबंदी, डाव्या बाजूला नदीच्या बाजूची दुसरी तटबंदी आणि त्याखाली मन नदीचे पात्र ठेउन पुढे चालत जावे . वाटेत बाहेरच्या तटबंदीचे बुरुज लागतात . तुटलेले आणि नष्ट झालेले बुरूज पकडून अंदाजे १५ बुरूज बाहेरच्या तटबंदीत आहेत. किल्ल्याच्या आतल्या तटबंदीतला फेरा घालून आपण म्हैस नदीच्या बाजूला येतो. वाटेत काही ठिकाणी पाण्याचे कोरडे हौद पाहायला मिळतात. मुख्य किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला पाहारे करणार्‍यांना पाणी साठवण्यासाठी या हौदाचा उपयोग होतो. पुढे मुख्य किल्ल्याची तटबंदी उजव्या बाजूस आणि नदीच्या काठाची दुसरी तटबंदी आणि म्हैस नदीचे पात्र डाव्या बाजूस ठेवत किल्ल्याला प्रदक्षिणा घालत आपण किल्ल्याच्या तिसऱ्या पूर्वाभिमुख प्रवेशव्दाराजवळ पोहोचतो. हे मुख्य किल्ल्याचे (बालेकिल्ल्याचे) पहिले प्रवेशद्वार आहे . या प्रवेशद्वाराचा लाकडी दरवाजा, त्यावरील खिळे आणि दिंडी दरवाजा आजही शाबूत आहे. या दरवाजातून आत गेल्यावर उजव्या बाजूला पहिल्या दरवाजाच्या काटकोनात मुख्य किल्ल्याचा दुसरा उत्तराभिमुख दरवाजा आहे . अशाप्रकारे किल्ल्याला बाहेरच्या तटबंदीत दोन आणि आतल्या तटबंदीत एक असे एकूण चार दरवाजे आहेत. या दरवाजाच्या चर्यांवर चुन्यामध्ये मोगल शैलीतील नक्षीकाम केलेले पाहायला मिळते. प्रवेशद्वारावर डाव्या बाजूला घोडा आणि हत्ती अशी दोन वेगवेगळी व्दारशिल्प कोरलेली आहेत. या प्रवेशव्दाराचा लाकडी दरवाजा, त्यातील दिंडी दरवाजा शाबूत आहे .

किल्ल्याच्या आतल्या तटबंदीच्या पहिल्या दरवाजावर जाण्यासाठी जीना आहे. त्यावर चढून गेल्यास दुसऱ्या दरवाजावरची नक्षी व्यवस्थित पाहाता येते. दोन्ही दरवाजे पाहून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच तहसीलदार कार्यालयाची ब्रिटीश बांधणीची बैठी इमारत दिसते . या इमारतीकडे न जाता डाव्या बाजूला तटबंदीच्या टोकाकडे चालू लागल्यावर एक मोठी खोल विहिर दिसते. विहीर तळापासून वीटानी बांधून काढलेली आहे . ती नुसतीच न बांधता वीटा वेगवेगळ्या कोनात सरळ, आडव्या, तिरप्या लाउन सुंदर पोत तयार केलेला आहे . विहिरीच्या वर १५ फुटापर्यंत वीटांची भिंत बांधलेली आहे . विहिरीच्या बाजूला असलेल्या चढावरुन चढून गेल्यावर आपण पडक्या वाड्याच्या उरलेल्या अवशेषांपाशी पोहोचतो. याठिकाणी आपल्याला दोन खोल्या पाहायला मिळतात . वाड्याच्या गच्चीवर पाण्यासाठी हौद बांधलेले आहेत. विहिरीच्या भिंतीला लागून असलेल्या या वाड्याच्या गच्चीवरचे हौद विहिरीच्या पाण्याने भरले जात असावे . हे पाणी खापरी नळांच्या सहाय्याने वाड्यात खेळवले गेले असेल . त्या पाण्यावर वाड्याच्या चौकात कदाचित एखाद सुंदर कारंजही उडत असेल. गच्चीवर असलेल्या पाण्याच्या हौदामुळे विदर्भाच्या उन्हाळ्यात नक्कीच थंडावा मिळत असेल . गडाची मीटरभर लांब फांजी, पुरुषभर उंच तटबंदी, त्यावरील पाकळ्यांप्रमाणे असलेल्या चर्या हे सर्व वीटांमध्ये बांधून काढलेल आहे . तटबंदी आणि चर्यांमध्ये जागोजागी जंग्या ठेवलेल्या आहेत. या तटबंदीला पाच भव्य बुरुज असून बालेकिल्ल्याचा आकार पंचकोनी आहे . फांजीवरुन चालत दक्षिणेकडील बुरुजावर आल्यावर आपल्याला उजव्या बाजुला म्हैस नदी आणि डाव्या बाजूला मन नदीच पात्र दिसत . या बुरुजावर चर्यांच्या मध्ये तोफा ठेवण्यासाठी रिकामी जागा ठेवलेली पाहायला मिळते . या बुरुजावरून खाली उतरण्यासाठी जीना आहे . या जीन्याने उतरुन समोर उघड्यावर असलेल्या मारुतीच्या मुर्तीकडे जावे. ही शेंदुर लावलेली मुर्ती एका चौथऱ्यावर आहे. मारुतीचे दर्शन घेऊन परत फांजी गाठावी आणि आणि पुढे आगेकूच करावी . म्हैसा नदीच्या दिशेला असणाऱ्या बुरुजावर नविन ध्वजस्तंभ उभारलेला आहे . तो पाहून पुढच्या बुरुजावर गेल्यावर त्यावर एक पिराच थडग पाहायला मिळते. या बुरुजाच्या आतल्या बाजूला अर्धगोलाकार बांधकाम पाहायला मिळते . याठिकाणी एखादे कोठार असण्याची शक्यता आहे . या बुरुजावरुन पुढे गेल्यावर दरवाजाच्या बाजूचा बुरुज लागतो. किल्ल्याच्या दरवाजापाशी आल्यावर आपली गड फेरी पूर्ण होते .
पोहोचण्याच्या वाटा :
बाळापूर किल्ला बाळापूर शहरात आहे . बाळापूरला जाण्यासाठी शेगाव हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. शेगावहून दर अर्ध्या तासाला बाळापूर मार्गे अकोल्याला जाणाऱ्या बस सुटतात . १९ किमीवरील बाळापूरला जाण्यासाठी अर्धा तास लागतो. शेगावहुन ६ आसनी रिक्षानेही बाळापूरला जाता येते . बाळापूर शहरात शिरतानाच किल्ला दिसायला लागतो. बस स्थानकात उतरल्यावर किल्ल्याच्या दिशेने चालत गेल्यास मन नदीच्या काठाने जाणाऱ्या रस्त्याने १० मिनिटात किल्ल्याच्या नदीकडील प्रवेशद्वारापाशी पोहोचतो.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही
जेवणाची सोय :
जेवणाची सोय किल्ल्यात नाही .
पाण्याची सोय :
किल्ल्यात पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
एस टी स्थानकापासून चालत १० मिनिटे
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
जिल्हा Akola
 बाळापूर किल्ला (Balapur Fort)