मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

बांदा किल्ला (Banda Fort) किल्ल्याची ऊंची :  50
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सिंधुदुर्ग श्रेणी : सोपी
तेरेखोल नदीच्या काठावर वसलेले बांदा गाव प्राचीन काळापासून बंदर आणि बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध होते . समुद्रमार्गे येणारा माल छोट्या होड्या मधून बांदा बंदरा पर्यंत येत असे. तेथून तो माल विविध घाट मार्गानी (आंबोली, xx्झ ) घाटावर जात असे . या बंदराचे रक्षण करण्यासाठी तेरेखोल नदीच्या काठी असलेल्या छोट्याशा टेकडीवर किल्ला बांधलेला होता. बांदा बंदर मराठे, मुघल, आदिलशहा, पोर्तुगीज अशा अनेक सत्तांच्या ताब्यात वेगवेगळ्या कालखंडात होते. त्यांनी बांदा किल्ल्यात त्यांच्या सोईप्रमाणे अनेक फेरफार केले असतील . त्यामुळे किल्ल्याची बांधणी मिश्र स्वरुपाची झालेली पाहायला मिळते. सध्या अस्तित्वात असलेल्या किल्ल्याच्या अवशेषांवर पोर्तुगीजांची छाप दिसते.

बांदा किल्ला , बांदा गावातील रोझे घुमट (रेडे बुरुज ) आणि त्याच्या बाजूचा बांधीव तलाव या गोष्टी पाहाण्यासारख्या आहेत .

26 Photos available for this fort
Banda Fort
पहाण्याची ठिकाणे :
बांदा गावात शिरल्यावर बाजारपेठेतून थेट पोलिस स्टेशनचा पत्ता विचारत जावे . सध्या किल्ल्यात पोलिस स्टेशन आहे . त्यांनी किल्ल्याचा परिसर चांगला ठेवलेला आहे .
पोलिस स्टेशन समोर आल्यावर बांदा किल्ल्याचा बुरुज आपल्याला दिसतो. त्यावर कौलारु छप्पर टाकून त्याचा उपयोग कार्यालयासाठी केलेला आहे . बुरुजात असलेल्या जंग्या आणि टेहळणी साठी तसेच तोफा ठेवण्यासाठी असलेले झरोके पाहायला मिळतात. किल्ल्याचे प्रवेशद्वार या बुरुजाच्या आड लपलेले आहे . दरवाजाच्या बाजूला २० फुट लांब तटबंदी आणि त्याला लागूनच दुसरा बुरुज आहे . या दोन बुरुजान्मुळे दरवाजावर थेट मारा करता येत नाही . प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूला बुरुजावर जाणारा जीना आणि देवडी आहे . उजव्या बाजूची पायऱ्यांची वाट किल्ल्यावर जाते . किल्ल्यावर गेल्यावर समोरच महापुरुषाचे मंदिर आहे . त्यामागे किल्ल्याची तटबंदी आणि दुरवर दिसणारे नदीचे पात्र आहे . ही नदी किल्ल्याच्या टेकडीला वळसा घालून पुढे जाते . महापुरुषाचे दर्शन घेउन पुढे गेल्यावर दोन पोलिस स्टेशनच्या इमारती आणि पाटेश्वर मंदिर आहे . पाटेश्वर हे येथील जागृत देवस्थान आहे . गावच्या पालख्या पाटेश्वराच्या दर्शनाला येतात. दरवर्षी १७ जुलैला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. पाटेश्वर मंदिराच्या समोर किल्ल्याची तटबंदी आणि जंग्या पाहायला मिळतात. या बाजूला तेरेखोल नदी किल्ल्याच्या टेकडीला खेटून वाहाते. पाटेश्वर मंदिर पाहून परत पोलिस स्टेशन पाशी येउन उजव्या बाजूला तटबंदीत असलेल्या छोट्या दरवाजाने खाली उतरावे . खालच्या बाजूला पोलिस क्वार्टर्स आहेत . याठिकाणी किल्ल्याची तटबंदी आणि त्यातील जंग्या पाहायला मिळतात. यावाटेने २ मिनिटात आपण पुन्हा किल्ल्याच्या बुरुजापाशी येतो. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. किल्ल्याचा आकार फारच लहान असल्याने १० मिनिटात किल्ला पाहून होतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे तोंड करुन उभे राहील्यावर उजव्या बाजूस एक रस्ता टेकडीवरुन खाली उतरतो. याठिकाणी एक उद्यान बनवलेले आहे . उद्यानातून नदीपात्रापर्यंत जाता येते . या उद्यानातून किल्ल्याची टेकडी आणि झाडीत लपलेली तटबंदी पाहाता येते.

रोझे (रेडे) घुमट आणि बैल घुमट :- किल्ला पाहून झाल्यावर आल्या रस्त्याने बाजारपेठेतील विठ्ठल मंदिरापाशी यावे . मंदिरासमोरुन जाणारा रस्ता मुस्लिम वस्तीत जातो. या रस्त्याच्या टोकाला एक नविन बांधलेली मशीद आहे. या मशीदीच्या मागे बांधीव तलाव आणि त्यामागे रोझे घुमट (स्थानिक भाषेत रेडे बुरूज) आहे. आदिलशाही सरदार पिरखानने सोळाव्या शतकात हा घुमट व त्याबाजूचा तलाव बांधला होतो. या ठिकाणी एक कलमी गुलाबांची बाग होती तिला चमन या नावाने ओळखले जात असे . या बागेतील फुले खास घोडेस्वार विजापूरला घेउन जात असत.

ऱोझे घुमटला यादगीर खिजर या नावानेही ओळखले जात असे. रोझे घुमट भोवती तटबंदी आहे . या तटबंदीत कमानयुक्त प्रवेशव्दार आहे . प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर समोरच जीना आहे . हा जीना चढून गेल्यावर आपला वास्तूत प्रवेश होतो. ही वास्तू ३ मजली अंदाजे ३० फुट उंच असून खालच्या बाजूला साधारण ५ फुट उंचीच्या कमानी असलेल्या ओवऱ्या आहेत . वास्तूच्या चारही बाजूला या कमानदार ओवऱ्या आहेत. जीना चढून वर गेल्यावर १० फुट उंच तीन कमानी आहेत . त्यावरील मजल्यावर तीन कमानी असून त्याच्यावर घुमट आहे . सद्यस्थितीत (इसवीसन २०१७ ) या वास्तूत जाण्याचा मार्ग झाडी प्रचंड वाढल्याने बंद झाला आहे. या वास्तूवरही ठिकठिकाणी झाडे वाढल्याने त्यात जाणे धोक्याचे झालेले आहे. हा बुरुज स्वच्छ केला तर मध्ययुगीन मुस्लिम स्थापत्याचा एक सुंदर नमुना पाहायला मिळेल. बैल घुमट कालौघात नष्ट झालेला आहे.

पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई गोवा मार्गावर बांदा हे महत्वाचे गाव आहे . गोव्याला जाणाऱ्या सर्व एसटी आणि प्रायव्हेट गाड्या बांद्याला थांबतात.
कोकण रेल्वेने आल्यास जवळचे स्थानक सावंतवाडी आहे . सावंतवाडी ते बांदा अंतर १५ किमी आहे . सावंतवाडीहून बांद्याला जाण्यासाठी एसटीच्या बसेस आहेत .
बांदा एसटी स्थानकातून बांदा बाजारपेठे मार्गे बांदा पोलिस स्टेशनला म्हणजेच बांदा किल्ल्यावर चालत जाण्यासाठी १५ मिनिटे लागतात.

किल्ल्यापासून रेडे घुमटला चालत जाण्यासाठी १५ मिनिटे लागतात.
राहाण्याची सोय :
बांदा गावात राहाण्यासाठी हॉटेल्सची सोय आहे.
जेवणाची सोय :
बांदा गावात जेवणासाठी हॉटेल्स आहेत .
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही .
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
जिल्हा Sindhudurg
 बांदा किल्ला (Banda Fort)  भगवंतगड (Bhagwantgad)  भरतगड (Bharatgad)  देवगडचा किल्ला (Devgad Fort)
 डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort))  हनुमंतगड (Hanumantgad)  खारेपाटण (Kharepatan fort)  कोटकामते (Kotkamate)
 महादेवगड (Mahadevgad)  मनोहर-मनसंतोष गड (Manohar-Mansantoshgad)  नारायणगड (आंबोली) (Narayangad(Amboli))  निवतीचा किल्ला (Nivati Fort)
 पद्मगड (मालवण) (Padmagad (Malvan))  राजकोट (Rajkot)  रामगड (Ramgad)  सर्जेकोट (मालवण) (Sarjekot(Malvan))
 शिवगड (Shivgad)  सिध्दगड ( मालवण ) (Siddhagad (Malvan))  सिंधुदुर्ग (Sindhudurg)  वेताळगड (Vetalgad)
 विजयदुर्ग (Vijaydurg)  यशवंतगड (रेडीचा किल्ला) (Yashawantgad (Redi Fort))