मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

भैरवगड (मोरोशी) (Bhairavgad(Moroshi)) किल्ल्याची ऊंची :  4000
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: माळशेज
जिल्हा : ठाणे श्रेणी : अत्यंत कठीण
सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लाव्हारसामुळे झालेली आहे. लाव्हरसाचे थर थंड झाल्यावर पुन्हा पुन्हा झालेल्या उद्रेकांमुळे लाव्हारसाचे थर एका वर एक थर जमत गेले. त्यानंतर उन, वारा, पावसाने या थरांची झीज होऊन वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार झाल्या. त्यापैकी एक रचना म्हणजे "प्रस्तर भिंती"; ही रचना आपल्याला भैरवगडा वरती पहायला मिळते. लाव्हारसाच्या विशिष्ट प्रकारे साठण्यामुळे व थंड होण्यामुळे बेसॉल्ट खडकाची तयार झालेली भिंत. भैरवगडाचा बालेकिल्ला अशाच मुख्य डोंगररांगे पासून अलग झालेल्या बेसॉल्ट खडकाच्या ४०० फूट उंच, सरळसोट भिंतीवर वसवलेला आहे. त्याची रचना व त्यामागची आपल्या पूर्वजांची कल्पकता पहातांना आपण थक्क होऊन जातो.

माळशेज घाटाच्या अलिकडे मुख्य डोंगररांगे पासून बाहेर आलेल्या डोंगरावर भैरवगड किल्ला आहे. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यात माळशेज घाटाच्या पायथ्याशी मोरोशी गाव आहे. या गावाच्या मागे भैरवगड किल्ला आहे. किल्ल्याची रचना पहाता या किल्ल्याचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा.

या गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे सामान व गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे.
19 Photos available for this fort
Bhairavgad(Moroshi)
Bhairavgad(Moroshi)
Bhairavgad(Moroshi)
पहाण्याची ठिकाणे :
गडाच्या माचीवर कुठलेही अवशेष नाहीत. माचीवरून बालेकिल्ल्याकडे जातांना आपण डाईकच्या(बालेकिल्ल्याच्या) पायथ्यापाशी पोहोचतो. तिथेच पाऊल वाटेच्या वरच्या बाजूला पाण्याच टाक आहे. पाण्याच्या टाक्याच्या उजव्या बाजूला कातळात कोरलेली एक आयताकृती गुहा आहे, परंतू या गुहेत जाण्यासाठी गिर्यारोहण तंत्राचा वापर करावा लागतो. पुढे त्याच पाऊल वाटेने आपण बालेकिल्ल्याच्या पूर्व टोकापाशी पोहोचतो. येथे साधारण ५० फूट उंचीवर कातळात खोदलेली आयताकृती गुहा आहे. या गुहेत जाण्यासाठी सुध्दा गिर्यारोहण तंत्राचा वापर करावा लागतो.

बालेकिल्ल्याच्या पूर्व टोकाला वळसा घातल्यावर आपण भैरवगड व बाजूचा डोंगर यामधील खिंडीत पोहोचतो. येथून बालेकिल्ल्याच्या कातळ कड्यावर खोदलेल्या पायर्‍या दिसतात. अंदाजे ५० पायर्‍या चढल्यावर आपण एका कातळात खोदलेल्या गुहेपाशी पोहोचतो. या गुहेत शिरण्यासाठी गुहेच्या पायथ्याला एक भोक पाडलेले आहे. त्यातून सरपटतच गुहेत प्रवेश करावा लागतो. ४ फुट लांब, २ फूट रुंद व ८ फूट उंच असलेली ही गुहा चारही बाजूने बंद आहे. फक्त गुहेच्या दर्शनी बाजूच्या ५ फूट उंचीवरील कातळ आयताकृती कापलेला आहे. गुहेच्या मागच्या भिंतीवर लाकडी वासे अडकवण्यासाठी खोबण्या खोदलेल्या आहेत. या वाशांवर गवताचे छप्पर तयार केल्यावर गुहेत बसलेल्या पहारेकर्‍याचे ऊन - पाऊस यापासून संरक्षण होत असे.

गुहेच्या पुढील पायर्‍या उध्वस्त केलेल्या आहेत. या ठिकाणी दोर लाऊनच वर चढावे लागते.हा साधारणत: १५० फूटाचा भाग (पॅच) पार केल्यावर पुढे कातळात कोरलेल्या पायर्‍या आहेत. या पायर्‍यांच्या एका बाजूला कातळकडा व दुसर्‍या बाजूला खोल दरी आहे तसेच पायर्‍यांवर मुरूमाची माती साठलेली असल्यामुळे जपूनच जावे लागते.पायर्‍या संपल्यावर आपण एका छोट्या उंचवट्यावर पोहोचतो. येथे उजव्या बाजूला कड्याला लागून एक सुकलेल टाक आहे. ते पाहून डाव्या बाजूच्या वाटेने वर चढायला लागावे ,वाटेत अजून एक कोरडे पडलेले पाण्याचं टाकं लागत. या टाक्याच्या पुढे वाट निवडूंगाच्या जाळीतून गडाच्या सर्वोच्च टोकावर पोहोचते. गडमाथा अरूंद असून पूर्व - पश्चिम पसरलेला आहे. गडमाथ्यावर कोणतेही अवशेष नाहीत. गडमाथ्यावरून पश्चिमेला नाणेघाटाचे टोक ते पूर्वेला हरीश्चंद्रगड असा विस्तृत प्रदेश दिसतो.
पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई - कल्याण - मुरबाड मार्गे माळशेज घाटाच्या पायथ्याचे मोरोशी गाव गाठावे. (नाणेघाटला जाण्यासाठी आपण वैशाखरे या गावात उतरतो, या गावा पुढेच मोरोशी गाव आहे.) मोरोशी गावातून गडावर जाण्यासाठी २ वाटा आहेत.

१) मोरोशी गावाहून माळशेजच्या दिशेने जातांना पोलिस चेकपोस्ट व जय मल्हार धाबा आहे. येथे उजव्या बाजूस ( जय मल्हार धाब्याच्या विरुध्द बाजूस) एक पायवाट जंगलात शिरते. या पायवाटेने १० मिनीटात आपण सुकलेल्या ओढ्यापाशी पोहोचतो. येथून डाव्या बाजूची वाट पकडून समोरची टेकडी चढायला सुरुवात करावी. दोन टेकड्या पार केल्या की आपण एका छोट्या पठारावर पोहोचतो. येथे दुसरी वाट येऊन मिळते. अजून एक टप्पा चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या माचीवर पोहोचतो. पायथा ते माची साधारणत: १.५ ते २ तास लागतात. माची वरुन डाईकच्या (बालेकिल्ल्याच्या) पायथ्याशी पोहोचण्यास १५ मिनीटे लागतात. डाईकच्या पूर्व टोकाला वळसा घालून खिंडीत पोहोचण्यासाठी १५ मिनीटे व बालेकिल्ला दोरांच्या सहाय्याने सर करण्यास १ तास लागतो.

२) मोरोशी गावाहून माळशेजच्या दिशेने जातांना पोलिस चेकपोस्टच्या पुढे उजव्या हाताला वनखात्याने " किल्ले भैरमगड गुंफा मार्ग , वनविभाग ,ठाणे " अशी पाटी रंगवलेली कमान उभारलेली आहे. त्या कमानीच्या बाजूने जाणारी वाट डोंगर उतारावरील शेतां मधून गडावर जाते. हि वाट पहिल्या वाटेला पठारावर मिळते. पुढील मार्ग वर दिल्या प्रमाणेच आहे. एक
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही, पण मोरोशी गावात किंवा धाब्यांवर रात्री पुरती रहाण्याची सोय होते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही, मोरोशी गावातील धाब्यांवर ऑर्डर देऊन गड चढण्यासाठी जावे.
पाण्याची सोय :
बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी (बारमाही) पाण्याचे टाक आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
मोरोशी गावातून पायथा ते माची साधारणत: १.५ ते २ तास लागतात. माची वरुन डाईकच्या ( बाले किल्ल्याच्या) पायथ्याशी पोहोचण्यास १५ मिनीटे लागतात. डाईकच्या
सूचना :
जून ते ऑक्टोबर गडावर जाणे टाळावे.
१) भैरावगड (मोरोशी) किल्ला सर करण्यासाठी गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे व साहित्य बरोबर असणे असणे आवश्यक आहे.

२) सोबत ३०० फूटी दोर घेतल्यास कातळटप्पे चढता उतरताना खोळंबा होत नाही.

३) किल्ला उतरतांना रॅपलिंग तंत्राचा वापर करावा.

४) सुळके व भिंती चढणारे गिर्यारोहक हा कातळटप्पा फ्रि क्लाईंबींगने चढू शकतात.
डोंगररांग: Malshej
 भैरवगड (मोरोशी) (Bhairavgad(Moroshi))  हरिश्चंद्रगड (Harishchandragad)  सिंदोळा (Sindola)