मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

भवानीगड (Bhavanigad) किल्ल्याची ऊंची :  1350
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रत्नागिरी ,कोकण
जिल्हा : रत्नागिरी श्रेणी : मध्यम
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात ‘‘भवानीगड‘‘ हा छोटासा डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्यावर भवानीमातेचे प्रशस्त कौलारु मंदिर आहे. या मंदिरात आजही गावकर्‍यांची वर्दळ असते दरवर्षी दसर्‍याला गावकरी देवीला बकर्‍याचा बळी देतात.


Bhavanigad (Sangameshwar)
3 Photos available for this fort
Bhavanigad
Bhavanigad
Bhavanigad
इतिहास :
भवानीगड किल्ल्याची उभारणी केंव्हा झाली हे ज्ञात नाही. पण किल्ल्यावरील टाक्यांची बांधणी पाहाता हा किल्ला १३१४ व्या शतकातील असावा. इ.स १६६१ मध्ये छ. शिवाजी महाराजांनी किल्ल्याची डागडूजी करुन भवानी मातेचे मंदिर बांधले. इ.स १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटीशांनी जिंकून घेतला.
पहाण्याची ठिकाणे :
कडवई या किल्ल्याच्या पायथ्याच्या गावातील म्हादगेवाडीतून कच्चा रस्ता किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जातो. किल्ला चढायला सुरुवात केल्यानंतर थोड्याच वेळात गोसावीवाडी लागते. त्याच्या पुढच्या टप्प्यावर शिर्केवाडी लागते. शिर्केवाडीच्या पुढे थोड्याच अंतरावर पाऊलवाटेला दोन फाटे फुटतात. एक वाट सरळ जाते तर दुसरी वाट उजव्या बाजूस किल्ल्यावर जाते. या वाटेने खडा चढ चढून ५ मिनिटात आपण बालेकिल्ल्याखालील दगडात खोदलेल्या टाक्यांपाशी येतो या टाक्यांच्या खालच्या बाजूस अजून एक छोटे टाकं व भूयार आहे. हे पाहून थोडेसे मागे येऊन डाव्या बाजूने वर जाणार्‍या वाटेने गेल्यास आपण पूर्वाभिमुख उध्वस्त प्रवेशद्वारातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करतो. बालेकिल्ल्यावर भवानीमातेचे प्रशस्त कौलारु मंदिर आहे. मंदिरात समोरच शिवाजी महाराजांची मूर्ती, उजव्या हाताला भवानी मातेची दगडात कोरलेली पूरातन मूर्ती याशिवाय दोन शिवलींग व दोन समाध्या आहेत. मंदिरात एक छोटी तोफ आहे. बालेकिल्ल्याची तटबंदी दगड एकमेकांवर रचून करण्यात आलेली आहे. भवानी मंदिराच्या मागच्या बाजूस बालेकिल्ल्याचा उत्तराभिमुख उध्वस्त दरवाजा आहे. या दरवाजातून बाहेर पडून समोर चालत गेल्यास किल्ल्याच्या दक्षिण टोकावर जाता येते. तर उजव्या बाजूच्या पायवाटेने खाली उतरल्यास दगडात खोदलेली पाण्याची तीन टाकं पाहाता येतात. या टाक्य़ांसमोर एक दगडी नंदी आहे. हे पाहून झाल्यावर गडफेरी पूर्ण होते.

पोहोचण्याच्या वाटा :
‘‘भवानीगड‘‘ च्या पायथ्याशी कडवई हे गाव आहे. मुंबई - गोवा महामार्गाने चिपळूणहून संगमेश्वरला जाताना, चिपळूण पासून ३५ कि.मीवर (व संगमेश्वर पासून ११ किमीवर) तुरळ गाव आहे. तुरळ फाट्यावरुन गावात जाण्यासाठी रिक्षाची सोय आहे.कडवई गावाच्या बाजारपेठेत आल्यावर दोन रस्ते फुटतात. त्यातील उजव्या बाजूच्या रस्त्याने (अर्धा किमी) म्हादगेवाडी पर्यंत जावे. म्हादगेवाडीत आल्यावर डांबरी रस्ता सोडून डाव्या हाताच्या कच्च्या रस्त्याने दिड कि.मी अंतर कापल्यावर रस्त्याला २ फाटे फुटतात. त्यापैकी उजव्या हाताच्या रस्त्याने किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचता येते. चिपळूण संगमेश्वर मार्गावर मोठ्या प्रमाणावर एस टी ची सोय आहे. कोकण रेल्वेने आल्यास संगमेश्वर स्थानकातून उतरुन (८ कि.मी) रिक्षा किंवा एस टीने कडवई गावात येता येइल.

राहाण्याची सोय :
गडावरील भवानी मंदिरात १० जणांची रहाण्याची सोय आहे.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही. पण मुंबई - गोवा महामार्गावर अनेक हॉटेल्स आहेत.
पाण्याची सोय :
गडावरील टाक्यात फेब्रुवारी - मार्चपर्यंत पिण्याचे पाणी असते.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
कडवई गावातून अर्धा तास लागतो.
सूचना :
१) संगमेश्वर तालुक्यातील महिमतगड , मार्लेश्वर , भवानीगड, गोविंदगड ही ठिकाणे दोन दिवसात पाहाता येतात. त्यासाठी पहिल्या दिवशी सकाळी महिमतगड पाहून दुपारी (१६ किमी) वरील मार्लेश्वर गाठावे. मार्लेश्वर पाहून झाल्यावर १९ कि.मी वरील ‘‘संगमेश्वर कसबा‘‘ ( मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वरहून ३ कि.मी वर हे गाव आहे.) गावातील संभाजी महाराजांचे स्मारक व कर्णेश्वराचे प्राचिन मंदिर पाहून भवानीगडावर वस्तीस जावे. दुसर्‍या दिवशी भवानीगड पाहून ४५ कि.मी वरील चिपळूणचा गोविंदगड हा किल्ला पाहून मुंबई / पुण्याला परतता येते.

२) महिमतगड, गोविंदगड या किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे.
डोंगररांग: Ratnagiri, Kokan
 बारवाई (Barvai)  भवानीगड (Bhavanigad)  गोपाळगड (Gopalgad)  गोवळकोट (Gowalkot)
 कोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi)  महिमतगड (Mahimatgad)  मंडणगड (Mandangad)  माणिकदूर्ग (Manikdurg)
 रत्नदुर्ग ( भगवतीचा किल्ला ) (Ratnadurg)