मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

बिरवाडी (Birwadi) किल्ल्याची ऊंची :  1200
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रोहा
जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम
रोह्याच्या अवचितगडा पासून सुरू झालेल्या डोंगररांगेत घोसाळगड, तळगड, मानगड, कुर्डुगड, बिरवाडी असे अनेक छोटे किल्ले आहेत. इतिहासात कुठेही फारसा उल्लेख नसलेला बिरवाडीचा किल्ला रोह्यापासून १८ किमी अंतरावर आहे.
3 Photos available for this fort
Birwadi
इतिहास :
इ.स. १६६१ मध्ये सिद्दी कडून दंडाराजापुरी जिंकून घेतल्यावर बिरवाडीचा किल्ला बांधला.
पहाण्याची ठिकाणे :
गावातून किल्ल्यावर जातांना वाटेतच भवानी मातेचे प्रशस्त मंदिर लागते. मंदिरापर्यंत जाण्यास सुमारे १०० पायर्‍या बांधलेल्या आहेत .देवळाच्या प्रांगणात तोफ ठेवलेली आहे. मंदिराच्या मागील बाजूस शिवरायांचा ६ फुटी पुतळा उभा आहे. येथून थोडे वर चढल्यावर आपण एका सुटावलेला बुरूजापाशी येऊन पोहचतो. बुरुजापासून एक वाट उजवीकडे वळते ,ही वाट संपूर्ण किल्ल्याला वळसा घालुन गडावर पोहचते. वाटेत एका ठिकणी खडकात खोदलेले पाण्याचे टाके आहे. त्याला ‘घोड्याचे टाके’ म्हणतात. किल्ल्याचे वैशिष्ट्य असे की, किल्ल्याच्या चहुबाजूस तटबंदी विरहीत ७ बुरुज आहेत. गडाच्या या मागील बाजूस गडाचे सुबक असे पश्चिमाभिमुख प्रवेशद्वार आहे.आजही हे बर्‍यापैकी शाबूत आहे. प्रवेशद्वारातुन आत गेल्यावर डावीकडे पाण्याची ३ टाकी आहेत. येथुन पुढे गेल्यावर एक दगडी भांड दिसते.त्याच्या पुढे अजून एक टाक आहे.या ठिकाणाहून परत ३ टाक्यांपाशी येऊन, येथून थोडे वरच्या बाजुस गेल्यावर आपण थेट बालेकिल्ल्यातच प्रवेश करतो. गडमाथ्यावर पडक्या वाड्याचे अवशेष आहेत. गड छोटा असल्याने तो फिरण्यास अर्धातास पुरतो.
पोहोचण्याच्या वाटा :
किल्ल्यावर जाण्याचा एकच मार्ग आहे ,तो बिरवाडी गावातून जातो.
रोहा - मुरुड मार्गावर चणेरा नावाचे गाव आहे. रोह्यापासून १८ किमी वर, तर मुरुड पासून २० किमी वर चणेरा गाव आहे. चणेरा गावापासून बिरवाडी गाव १.५ कि.मी अंतरावर आहे. बिरवाडी हे गडाच्या पायथ्याचे गाव आहे. गावातून किल्ल्यावर जाण्यास पायवाट आहे. बिरवाडी गावातून किल्ला गाठण्यास अर्धा तास लागतो.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. मात्र बिरवाडी गावात असणार्‍या मंदिरात २० लोकांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची व्यवस्था नाही.आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
बिरवाडी गावातून अर्धातास लागतो.
सूचना :
१) रोहा परिसरात ४ किल्ले येतात. नीट नियोजन केल्यास, स्वत:च्या वहानाने २ दिवसात तळागड, ,घोसाळगड, बिरवाडी व अवचितगड हे किल्ले व कुडाची लेणी व्यवस्थित पाहून होतात.
२)घोसाळगड, तळागड व अवचितगड या किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे.
डोंगररांग: Roha
 अवचितगड (Avchitgad)  बिरवाडी (Birwadi)  घोसाळगड (Ghosalgad)  तळगड (Talgad)