मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

चाकणचा किल्ला (Chakan Fort) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : पुणे श्रेणी : सोपी

पूणे - नाशिक मार्गावर असलेला चाकणचा भूइकोट किल्ला उर्फ संग्रामगड हा फिरंगोजी नरसाळा या किल्लेदाराने बलाढ्य मोगली सेनेसमोर सलग ५५ दिवस लढवल्यामुळे शिवचरीत्रात प्रसिध्द आहे. प्राचिनकाळी चाकण हे घाटमाथ्यावरील व्यापारी केंद्र होते. त्याच्या रक्षणासाठी चाकणचा भूइकोट बांधण्यात आला. या किल्ल्यावरुन घोटण, पौड या मावळांवर आणि घोडनेर, भीमनेर या नेरांवर नजर ठेवता येत असे. प्राचिन व दैदिप्यमान इतिहास लाभलेल्या या किल्ल्याची सध्याची अवस्था अतिशय वाईट आहे.

17 Photos available for this fort
Chakan Fort
इतिहास :
चाकणचा भूईकोट किल्ला हा प्राचिन किल्ला आहे. अनेक ऐतिहासिक प्रसंगांना साक्षी असलेल्या या किल्ल्यांचा ताबा देवगिरीच्या यादवांचा पाडाव झाल्यावर अल्लाउद्दीन खिलजीकडे गेला. त्यानंतर अल्लाउद्दीनशहा बहामनीने घाटमाथा व कोकणपट्टीवर कब्जा करण्याचे निश्चित केले. ही कामगिरी मलिक उत्तुजारवर सोपवण्यात आली. त्याने चाकण येथे आपले प्रमुख ठाणे केले(१४५३). या मोहीमेत विशालगडावर स्वारी करण्यासाठी निघालेल्या मलिक उत्तुजारच्या सेनेला शिर्के व मोरे यांनी फसवून निबीड अरण्यात आणले व या मोक्याच्या जागी त्यांच्यावर अचानक हल्ला करुन मलिक उत्तुजार सह २५०० जणांची कत्तल केली. (गनीमी काव्याने लढल्यागेलेल्या या पहिल्या लढाइचा समग्र वृत्तांत वाचण्यासारखा आहे ).

या मोहीमेत दक्षिणी मुसलमान व परकीय मुसलमान यांच्यात बेबनाव झाल्यामुळे दक्षिणेकडील मुसलमान मोहीम अर्धवट सोडून चाकणला परत आले. त्यांच्या भ्याड व फितूर वर्तनामुळे विशाळगड मोहीम अपयशी ठरली, असे परकिय मुसलमान बोलू लागले. हा आरोप शहाला कळला तर आपली धडगत नाही हे दक्षिणी मुसलमानांना कळल्यावर त्यांनी शहाला खबर दिली की, परकीय मुसलमानांनी चाकणच्या किल्ल्यावर कब्जा केला असून त्यांना कोकणच्या राजाची साथ आहे. शहा दारु पिऊन तर्र झाला आहे हे पाहून त्याला ही बातमी देण्यात आली. त्याने हुकूम दिला चाकणच्या किल्ल्यावर हल्ला करुन सर्व परकीय मुसलमानांना ठार मारावे. या आज्ञेनुसार दक्षिणी फौजेने चाकणच्या किल्ल्याला वेढा घातला किल्ल्यातील परकीय मुसलमानांनी किल्ल्यातील सामग्री संपेपर्यंत वेढ्याला दाद दिली नाही. अखेरीस दक्षिणी मुसलमानांनी परकीय मुसलमानांना शहाने माफी केले आहे, असा बनावट हुकूम दाखवून त्यांना किल्ल्याच्या बाहेर काढले व त्यांना मेजवानीस बोलवले. जेवण चालू असतांना त्यांची कत्तल केली.

शिवाजी राजांचे पणजोबांचे(बाबाजी), वडील मालोजी व खेळोजी यांना दौलताबादचा सुभेदार अमिरशा याने चाकण चौर्‍यांशी परगण्याची जहागिरी दिली होती. पुढे चाकण प्रांत शहाजीराजांच्या जहागिरीत होता. शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला, त्यावेळी फिरंगोजी नरसाळा किल्लेदार होता. त्याने राजांशी निष्ठा व्यक्त केली व राजांनी त्याचीच किल्लेदार म्हणून नेमणून केली.

२१ जून १६६० रोजी शाहिस्तेखानाच्या २० हजार फौजेने चाकणच्या भूइकोटला वेढा घातला. त्यावेळी किल्ल्यात ६०० ते ७०० मराठे होते, धनधान्य व दारुसाठा पुष्कळ होता. मराठ्यांनी तोफा, बंदूकी व रात्रीचे मोगल सैन्यावर छापे घालून किल्ला भांडता ठेवला. दिवसामागून दिवस उलटले तरी किल्ला पडत नाही हे पाहून शाहिस्तेखानाने इशान्येकडील बुरुजापर्यंत भुयार खोदले. वेढ्याचा ५५ वा दिवस १४ ऑगस्ट १६६०, या दिवशी भुयारात दारु भरुन बत्ती देण्यात आली. त्यावेळी झालेल्या प्रचंड स्फोटाने बुरुजाला खिंडार पडले, बुरुजावरील मराठे मारले गेले. मोगली सेना खिंडारातून किल्ल्यात शिरण्याचा प्रयत्न करु लागली पण मराठ्यांनी त्यांना किल्ल्यात शिरकाव करु दिला नाही. १५ ऑगस्ट १६६० रोजी मोगलांनी निकराचा हल्ला केला. मराठे बालेकिल्ल्याच्या आश्रयाने लढले, पण मराठ्यांचे बळ व सामग्री संपत आली होती. त्यामुळे त्यांनी किल्ला मोगलांच्या ताब्यात दिला.

पहाण्याची ठिकाणे :
चाकणचा किल्ला भुईकोट प्रकारात येत असून कालौघात किल्ल्याची पडझड झाली असून फारसे अवशेष बघायला मिळत नाहीत. चाकणचा किल्ला पुर्व पश्चिम असा असून पूर्वेकडून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. प्रवेश करतांना खंदक आणि तटबंदी पाहायला मिळते त्यावरून किल्ल्याची सुरक्षा चोख असावी असे कळते. किल्ल्याची तटबंदी उंच असून दगड आणि विटांचे बांधकाम आढळून येतं. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला देवडी आहे. प्रवेशव्दार पाहून सरळ किल्ल्यात गेल्यास श्री दामोदर विष्णू मंदिर बांधलेले दिसते आणि मंदिराच्या दोन्ही बाजूला तोफा ठेवलेल्या असून बाजूला कातळात कोरलेली ३ शिल्प पाहायला मिळतात आणि मंदिराच्या विरुद्ध दिशेला एक तोफ ठेवलेली दिसते त्याच्याच बाजूला मशिद आहे. मंदिर आणि मशि अलीकडच्या काळातील बांधणीचे असावे. तिथूनच किल्ल्याच्या बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत किल्ल्याच्या तटबंदीवरून किल्ल्याचा संपूर्ण परिसर न्ह्याहाळता येतो.किल्ल्याची दुरुस्ती सिमेंट वापरून करण्याचा प्रयत्न केला असावा असा तटबंदीवरिल कामावरून अंदाज लावता येतो. तटबंदीवर बंदुका डागण्यासाठी आजूबाजूला सलग ५ ते ६ खोबण्या केलेल्या दिसतात. तटबंदीवरून३ बुरुज स्पष्टपणे पाहता येतात. अतिक्रमणामुळे आणि अनधिकृत बांधकामामुळे किल्ल्यातून जाण्या येण्याचा सिमेंट चा रस्ता बांधण्यात आला आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई - तळेगाव - चाकण या मार्गाने चाकणला जाता येते. चाकण बस स्थानकापासून उजव्या हाताला गेल्यास मराठी प्रशाले समोरून प्रवेशव्दारातून प्रवेश केल्यास किल्ल्याच्या मागच्या बाजूने आपला प्रवेश होतो. इंदुरीचा किल्ल्यापासून चाकणचा किल्ला १५ किलोमीटर अंतरावर आहे.

राहाण्याची सोय :
राहाण्याची सोय चाकण आणि तळेगाव येथील हॉटेलात होते.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय चाकण आणि तळेगाव येथील हॉटेलात होते.
पाण्याची सोय :
पिण्याच्या पाण्याची सोय स्वत: करावी.
सूचना :
चाकणचा किल्ला, इंदुरी किल्ला, भंडारा डोंगर आणि भामगिरी एका दिवसात पाहाता येतात.
प्रकार: Land Forts
 अचलपूरचा किल्ला (Achalpur Fort)  अजिंठा (Ajintha Fort)  अजिंठा सराई (Ajintha Sarai)  अकलूजचा किल्ला (Akluj Fort)
 अंमळनेर (Amalner)  अमरावतीचा किल्ला (Amravati Fort)  बहादरपूर (Bahadarpur Fort)  बहादूरगड (पेडगावचा किल्ला) (Bahadurgad (Pedgaon Fort))
 बहादूरवाडी गड (Bahadurwadi gad)  बेलापूरचा किल्ला (Belapur Fort)  बेळगावचा किल्ला (Belgaum Fort)  चाकणचा किल्ला (Chakan Fort)
 धामणगाव गढी (Dhamangaon Gadhi)  दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort)  डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort))  फर्दापूर सराई (Fardapur Sarai)
 हिराकोट (Hirakot)  इंदुरीचा किल्ला (गढी) (Induri Fort (Gadhi))  जामगावचा किल्ला (Jamgaon Fort)  काळाकिल्ला (Kala Killa)
 कंधार (Kandhar)  करमाळा (Karmala Fort)  खर्डा (Kharda)  कोटकामते (Kotkamate)
 माचणूर (Machnur)  माढा गढी/किल्ला (Madha Fort)  मालेगावचा किल्ला (Malegaon Fort)  मंगळवेढा (Mangalwedha)
 मोहोळ गढी/किल्ला (Mohol Fort)  नगरचा किल्ला (Nagar Fort)  नगरधन (Nagardhan)  नळदुर्ग (Naldurg)
 नांदेडचा किल्ला (नंदगिरी किल्ला) (Nanded Fort (Nadgiri))  नस्तनपूरची गढी (Nastanpur)  पाचाड कोट (Pachad Fort)  पळशीचा किल्ला (Palashi Fort)
 परांडा (Paranda)  पारोळा (Parola)  रसलपूरचा किल्ला (सराई) (Rasalpur Sarai (Fort))  शिरगावचा किल्ला (Shirgaon)
 सिंदखेडराजा (Sindkhed Raja)  सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort)  सुभानमंगळ (Subhan Mangal)  सुलतान गढी (Sulatan Gadhi)
 यावल (निंबाळकर किल्ला) (Yawal Fort (Nimbalkar Fort))