मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

चंद्रगड(ढवळगड) (Chandragad(Dhavalgad)) किल्ल्याची ऊंची :  2337
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: महाबळेश्वर
जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम
सह्याद्रीतल्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधले गेले. त्यापैकी "चंद्रगड उर्फ ढवळगड उर्फ गहनगड" जावळीच्या खोर्‍यातील एका उंच पहाडावर बांधण्यात आला. महाबळेश्वर, मकरंदगड, मंगळगड, चंद्रगड, प्रतापगड, कावळा किल्ला व पारघाटाचे प्रचंड पहाड यांच्या दाटीत जावळीच खोर वसलेल आहे. हा भाग उंच पहाड, घनदाट जंगल व खोल दर्‍यांनी नटलेला आहे. या जावळीच्या खोर्‍यावर मोरे घराण्याने पिढ्यान पिढ्या राज्य केल त्यांना ‘‘चंद्रराव’’ हा किताब मिळाला होता. त्यावरूनच या किल्ल्याचे नाव चंद्रगड ठेवले असावे.

महाबळेश्वरी ऊगम पावणारी सावित्री नदी अरबी समुद्राला बाणकोट जवळ मिळते. प्राचीन काळा पासून महाड गावातून वाहाणार्‍या सावत्री नदीतून व्यापार चालत असे. घाटावर जाणारा माल विविध (वरंधा, आंबेनळी, पार घाट, मढ्या घाट, ढवळ्या घाट इत्यादी) घाटमार्गंनी घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जात असे. त्यापैकी वरंधा घाट (महाड ते भोर) व आंबेनळी घाट (पोलादपूर ते महाबळेश्वर) यामार्गांवर रस्ते बनवल्यामुळे आजही वापरात आहेत. या व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदर, घाटमार्ग व घाटमाथा अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. सावित्री नदीच्या (खाडीच्या) मुखावर असलेला बाणकोटचा किल्ला, घाटमार्गाचे रक्षण करणारा कावळा, चंद्रगड, मंगळगड, प्रतापगड इत्यादी किल्ले आणि घाटमाथ्यावर असणारे कमळ, केंजळ इत्यादी किल्ले अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. या घाटवाटांपैकी पोलादपूरहून महाबळेश्वरच्या आर्थरसीटला (मढीमहाल) जाणार्‍या "ढवळ्या घाटावर" नजर ठेवण्यासाठी चंद्रगडाची निर्मिती करण्यात आली होती.


चंद्रगड ते आर्थरसीट पॉईंट (मढी महल) हा सुध्दा प्राचीन ढवळे घाटमार्ग होता. चंद्रगड किल्ला, बहिरीची घुमटी, जोरचे पाणी हे प्राचीन अवशेष याची साक्ष देत आजही उभे आहेत. चंद्रगड ते आर्थरसीट पॉईंट (मढी महल) हा सह्याद्रीतील अतिकठीण ट्रेकपैकी एक आहे. या ट्रेक मध्ये कुठेही रोप लावून चढावे लागत नाही, तरीही आपण समुद्रसपाटी पासून (४७२१ फूट उंच) महाबळेश्वर पर्यंत एका दिवसात चढून जातो. त्यामुळे हा ट्रेक शरीराची व मनाची कसोटी पाहाणारा आहे.

चंद्रगड ते आर्थरसीट पॉईंट (मढी महल) ट्रेकची माहिती साईटवर दिलेली आहे.
38 Photos available for this fort
Chandragad(Dhavalgad)
इतिहास :
कांगोरी गड चंद्रराव मोर्‍यांनी जावळीच्या खोर्‍यात बांधला. त्याचा उपयोग घाटमार्गाच्या संरक्षणासाठी व टेहाळणीसाठी केला गेला. १५ जानेवारी १६५६ रोजी शिवाजी महाराजांनी जय्यत तयारीनीशी जावळीवर हल्ला केला व जावळी ताब्यात घेतली. त्याबरोबर कांगोरी गड, ढवळगड, रायरी इत्यादी किल्लेही महाराजांच्या ताब्यात आले. मुरारबाजी सारखा कसलेला योध्दा मिळाला. चंद्रगडाची डागडूजी करुन त्याचे नाव बदलून ‘‘गहनगड’’ ठेवले. संभाजी महाराजांचा वध केल्यावर औरंगजेबाने इतकादरखान उर्फ जुल्फीकारखानास रायगड घेण्यास सांगितले. रायगडची नाकेबंदी करण्यासाठी मार्च १६८९ मध्ये खानाने आजूबाजूचे किल्ले व प्रदेश ताब्यात घेतला. त्यावेळी मंगळगड मोघलांच्या ताब्यात गेला. इ.स १६९० मध्ये छ. राजाराम महाराजांचे अमात्य रामचंद्रपंत यांनी ‘मंगळगड’ जिंकून घेतला. इ.स १८१७ मध्ये सरदार बापू गोखल्यांनी मद्रास रेजीमेंट मधील कर्नल हंटर व मॉरीसन या इंग्रज अधिकार्‍यांना अटक करुन मंगळगडावर तुरुंगवासात ठेवले होते. इ.स १८१८ मध्ये कनेल पॉथर या इंग्रजाने हा किल्ला जिंकला.
पहाण्याची ठिकाणे :
ढवळे गावाच्या पूर्वेकडे चंद्रगड हा मध्यम श्रेणीतील किल्ला दक्षिणोत्तर पसरलेला आहे. ढवळे गावातील मंदिर डावीकडे ठेवून चालायला सुरुवात करावी. शेतामधून जाणारी ही वाट पुढे शेलारवाडीला मिळते. या वाडीमधून दिसणार्‍या डोंगराच्या दिशेने चालत जाऊन त्याला वळसा घालणार्‍या वाटेने पुढे जावे. या डोंगराला वळसा घातल्यावर सुरुवातीला दरी डावीकडे आणि नंतर उजवीकडे ठेवत आपण चंद्रगडच्या पायथ्याशी पोहोचतो. येथे "चंद्रगड दर्शन" असा मोठा फलक (बोर्ड) लावला आहे. चंद्रगडाच्या चढावर थोडा घसारा (स्क्री) असून गडमाथ्यावर पोहोचण्यासाठी मळलेली वाट आहे. चढाईच्या शेवटच्या टप्प्यात एक छोटा रॉक पॅच पार करून साधारण दिड तासांत आपण गडमाथ्यावर पोहोचतो.

गडमाथ्यावर बर्‍यापैकी सपाटी असून, चढ चढून गेल्यावर समोर दिसणार्‍या पायवाटेने पुढे चालत राहावे. या पायवाटेच्या उजवीकडे वरच्या बाजूस एका चौकोनी खड्डयात दगडामध्ये कोरलेली, शिवलिंग आणि नंदीची अतिशय रेखीव मुर्ती आहे. गावकर्‍यांच्या ठायी हे श्रद्धेचे स्थान असून महाशिवरात्रीला येथे पूजा-अर्चा देखील करण्यात येते. पुढे याच पायवाटेने थोडा चढ चढून गेल्यावर आयताकृती पाण्याचे टाकं लागते. ज्यामधील पाणी पिण्यायोग्य नाही. या टाक्याच्या वरच्या अंगाला असलेल्या चौथर्‍यामध्ये अजून एक शिवलिंग आढळून येते.

पायवाटेवरून चालत असताना दोन्ही बाजूने बरीचशी ढासळलेली पण तरी बर्‍यापैकी दर्शवणारी तटबंदी दिसून येते. डाव्याबाजूकडील तटबंदीवरून खाली बघितल्यास ५ पाण्याची टाकी दिसतात, पण तिथे पोचण्याची वाट अत्यंत कठीण आहे.(तेथे जाता येत नाही) त्यातील काही टाकी भरलेली तर काही सुकलेली आहेत. गडमाथ्यावर उत्तरेकडे पुढे चालत असताना उजव्या बाजूस काही चौथर्‍यांचे अवशेष देखील पाहावयास मिळतात. त्यातील एका चौथर्‍यावर पाटा-वरवंटा दिसतो. या चौथर्‍यांना उजवीकडे ठेवत पुढे गडाच्या उत्तर कड्याच्या दिशेने चालत जाऊन काही पायर्‍या उतरल्यावर उजवीकडे थंडगार पिण्यायोग्य पाण्याचे टाके आणि त्याच्या बाजूस असलेली तटबंदी बघायला मिळते. या टाक्याच्या पुढे अजून एक टाके असून त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. ही टाकी बघून झाल्यावर पायर्‍या चढण्याच्या आधी आपल्या उजवीकडे (म्हणजे पायर्‍या उतरल्यावर डावीकडे) थोड पुढे चालत गेल्यावर ५ टाकी आहेत. त्यातील ३ टाकीच नजरेस पडतात. या ३ मधील २ टाकं सुकलेली आहेत, तर एकामध्ये खराब पाणी आहे. ही टाकी बघून पायर्‍यांच्या वाटेवर परत येउन आलेल्या पायवाटेवरूनच परत जावे. गावकर्‍यांच्या सांगण्यानुसार किल्ल्यावर एकूण १४ टाकी आहेत,परंतु आपल्याला ११ टाकीच नजरेस पडतात. चंद्रगडावरून मंगळगडाचे दर्शन होते.
पोहोचण्याच्या वाटा :
खाजगी वाहन किंवा एस. टी हे दोन पर्याय वापरून ढवळे या चंद्रगडाच्या पायथ्याच्या गावात जाता येते.
१) ढवळे गावात पोहोचण्यासाठी प्रथम मुंबई / पुणे येथून पोलादपूर गाठावे. पोलादपूरवरून ढवळेला किंवा उमरठला येणारी एस.टी पकडावी. उमरठवरून ढवळे हे गाव साधारण ७ किमी आहे. (उमरठ हे तानाजी मालुसरे याचं जन्मस्थान. इथे तानाजी मालुसारेंचे स्मारक उभारण्यात आले आहे.येथील एका दुकनदाराकडे मराठा तलवारी व पट्टा पाहायला मिळतात.) पोलादपूर/महाड बस स्थानकातून संध्याकाळी ढवळे गावासाठी थेट बस सुटते. ती बस रात्री ढवळे गावात थांबून सकाळी परत जाते.
२) खाजगी वहानाने चंद्रगड पायथ्याशी असणार्‍या ढवळेच्या गावात जाण्यासाठी प्रथम पोलादपूर गाठावे.
मुंबई- गोवा महामार्गावर मुंबई पासून १८३ किमी अंतरावर पोलादपूर आहे. पोलादपूरहून महाबळेश्वरला जाणार्‍या रस्त्यावर पोलादपूरहून ८ किमीवर कापडे फाटा आहे. या फाट्यावरून १८ किमीवर चंद्रगडच्या पायथ्याचे ढवळे गाव आहे. पोलादपूरहून उमरठ आणि उमरठमार्गे ढवळेच्या दिशेने जावे. पोलादपूरपासून १६ किमी आणि महाडपासून ३४ किमी अंतरावर असलेल्या उमरठ गावातून उजव्या बाजूचा फाटा ढवळे गावाकडे जातो. येथून ढवळेकडे जाणारा रस्ता पकडावा. या खडबडीत डांबरी रस्त्याने ७ किमी अंतरावर ढवळे गाव लागते.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही. पण ढवळे गावात किंवा गावात असलेल्या मंदिरामध्ये रात्री पुरती रहाण्याची सोय होते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
गडावर असलेल्या टाक्यांपैकी,एकाच टाक्याचे पाणी पिण्यायोग्य आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
ढवळे गावातून चंद्रगडावर जाण्यासाठी २ तास लागतात.
जिल्हा Raigad
 अवचितगड (Avchitgad)  भीमाशंकर (Bhimashankar)  भिवगड / भिमगड (Bhivgad(Bhimgad))  बिरवाडी (Birwadi)
 चांभारगड (Chambhargad)  चंद्रगड ते आर्थरसीट रेंज ट्रेक (Chandragad to Arthur seat)  चंद्रगड(ढवळगड) (Chandragad(Dhavalgad))  कुलाबा किल्ला (Colaba)
 दासगावचा किल्ला (Dasgaon Fort)  ढाक बहिरी (Dhak-Bahiri)  द्रोणागिरी (Dronagiri)  घारापुरी (Gharapuri)
 घोसाळगड (Ghosalgad)  हिराकोट (Hirakot)  ईरशाळ (Irshalgad)  जंजिरा (Janjira)
 कर्नाळा (Karnala)  खांदेरी (Khanderi)  खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) (Khubladha Fort (Thal Fort))  कोकणदिवा (Kokandiva)
 कोंढवी (Kondhavi)  कोर्लई (Korlai)  कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad)  लिंगाणा (Lingana)
 मानगड (Mangad)  मंगळगड (Mangalgad)  माणिकगड (Manikgad)  मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir))
 मृगगड (Mrugagad)  पाचाड कोट (Pachad Fort)  पदरगड (Padargad)  पद्‌मदूर्ग (कासा किल्ला) (Padmadurg ( Kasa Killa))
 पालगड (Palgad)  पन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला) (Panhaledurg)  पेब (विकटगड) (Peb)  पेठ / कोथळीगड (Peth (Kothaligad))
 प्रबळगड (Prabalgad)  रायगड (Raigad)  रामदरणे (Ramdarne)  रतनगड(रत्नदुर्ग) (Ratangad(Ratnadurg))
 रेवदंडा (Revdanda)  सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad)  सामराजगड (Samrajgad)  सांकशीचा किल्ला (Sankshi)
 सरसगड (Sarasgad)  सर्जेकोट (रायगड) (Sarjekot (Alibaug))  शिवथरघळ (Shivtharghal)  सोंडाई (Sondai)
 सोनगिरी (कर्जत जवळ) (Songir (Karjat))  सुधागड (Sudhagad)  सुरगड (Surgad)  तळगड (Talgad)
 तुंगी (कर्जत) (Tungi (Karjat))  उंदेरी (Underi)