मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

कुलाबा किल्ला (Colaba) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : रायगड श्रेणी : सोपी
अलिबागच्या समुद्रात असलेल्या खडकावर कुलाबा किल्ला व सर्जेकोट ही दूर्गद्वयी उभी आहे. हे दोनही किल्ले मिश्रदुर्ग ह्या प्रकारातील आहेत. भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूने पाण्याने वेढला जातो व जलदुर्ग बनतो; तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते व किल्ला भूइकोट बनतो. हा दुर्ग ज्या खडकावर उभा आहे, त्याची दक्षिणोत्तर लांबी २६७ मीटर असून पूर्व पश्चिम रुंदी १०९ मीटर आहे.
7 Photos available for this fort
Colaba
Colaba
Colaba
इतिहास :
अलिबागच्या समुद्रात अर्धा किलोमीटरवर असलेल्या खडकावर मराठी सैन्याची चौकी होती. ‘‘ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र‘‘ हे शिवाजी महाराजांना माहीत असल्यामुळे मोक्याच्या बेटांवर त्यांनी किल्ले बांधले व जुने बळकट केले. १९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले. सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिध्दीस आला. त्यावेळी आरमारी हालचालींचा डावपेचांचा हा किल्ला केंद्र होता. ४ जुलै १७२९ रोजी कान्होजी आंग्रे ह्यांचे कुलाबा किल्ल्यावर निधन झाले. १७७० मध्ये पिंजरा बुरुजापाशी लागलेल्या भयंकर आगीत किल्ल्यावरील अनेक बांधकामे जळून नष्ट झाली. १७८७ मध्ये लागलेल्या दुसर्‍या आगीत आंग्य्राचा वाडा नष्ट झाला. २९ नोव्हेंबर १७२१ रोजी ब्रिटीश व पोर्तुगिजांच्या संयुक्त सैन्याने अलिबागवर ६००० सैनिक व ६ युध्दनौका घेऊन हल्ला केला, पण त्यांचा त्यात सपशेल पराभव झाला.
पहाण्याची ठिकाणे :
ओहोटीच्या वेळी किनार्‍यावरुन किल्ल्यापर्यंत चालत जाता येते. किल्ल्याचे प्रवेशद्वार किनार्‍याच्या बाजूस आहे. शिवाजी महाराजांनी दुर्ग स्थापत्यात अनेक प्रयोग केलेले आहेत. त्यापैकी एक येथे पहावयास मिळतो. हा दुर्ग बांधतांना दगडाचे मोठे मोठे चिरे नुसते एकमेकांवर रचलेले आहेत. दोन दगडांमधील फटीत चुना भरलेला नाही. त्यामुळे समुद्राची लाट किल्ल्याच्या तटाच्या भिंतींवर आपटल्यावर पाणी दगडांमधील फटीत घुसते व लाटेच्या तडाख्याचा जोर कमी होतो.

किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर मोर, हत्ती, हरण, कमळ, शरभ अशी शिल्पे कोरलेली आहेत. या प्रवेशव्दाराच्या आत संरक्षणासाठी दुसरे प्रवेशव्दार होते पण आता त्याचे अवशेष उरलेले आहेत. प्रव्शेव्दाराच्या डाव्या बाजूच्या बुरुजावर तोफ़ा आणि ध्वज स्तंभ आहे. किल्ल्याला एकुण १७ बुरुज आहेत. चार टोकांना चार, पश्चिमेला ५, पूर्वेला ४, उत्तरेला ३ व दक्षिणेला १ बुरुज आहेत. या बुरुजांना पिंजरा, नगारखानी, गणेश, सूर्य, हनुमंत, तोफखानी, दारुखानी अशी नावे आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर, डाव्या बाजूने गेल्यास भवानी मातेचे मंदिर लागते त्याच्या समोरच पद्मावती देवीचे छोटे व गुलवती देवीचे (महिषासूर मर्दिनीची मुर्ती) मंदिर आहे. पुढे गेल्यावर डाव्या हाताला वाडे, पागा, कोठी यांचे अवशेष दिसतात. उजवीकडे असलेल्या वाड्याच्या अवशेषामध्ये एक घुमटी पाहायला मिळते.

डावीकडे असलेल्या वाड्याच्या अवशेषातून तटबंदीकडे चालत गेल्यावर तटबंदी जवळ एक समाधी आहे . त्यावर पावल कोरलेली आहे. पुढे दोन तुळशी वॄंदावन (समाध्या) आहेत. पुढे तटबंदीत एक शौचकूप आहे. तेथे असलेल्या जीन्याने तटबंदीवर चढून गेल्यावर पीराच थडग आहे. तिथेच बुरुजावर वास्तूचे अवशेष व पाहायला फ़ांजीवरुन तसेच पुढे चालत गेल्यावर एक शौचकूप व तटबंदीतील खोली पाहायला मिळते. पुढे आपण किल्ल्याच्या दुसर्‍या बाजूच्या प्रवेश्व्दाराशी पोहोचतो. या दुर्गाच्या दक्षिण टोकाला असणार्‍या दरवाजाला धाकटा दरवाजा / यशवंत दरवाजा / दर्या दरवाजा म्हणतात. प्रवेशव्दाराच्या बाजूला असलेल्या बुरुजावरुन खाली उतरल्यावर कान्होजींची घुमटी पाहायला मिळते. प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर प्रवेशव्दारावर बाहेरच्या बाजूला कोरलेली गणपती, मोर, हत्ती, मगर, कमळ, शरभ, किर्तीमुख, हनुमान ही शिल्पे पाहायला मिळतात. प्रवेशव्दारापासून पुढे चालत गेल्यावर हनुमंताचे मंदिर आणि त्यापुढे गोदी पाहायला मिळते. तेथे नवीन जहाजे बांधली जात व जूनी दुरुस्त केली जात असत.

गोदी पाहून पुन्हा दर्या प्रवेशव्दाराने किल्ल्यात शिरल्यावर आंग्य्रांच्या वाड्याचे अवशेष दिसतात. पुढे किल्ल्यावर अजुनही लोकांचा राबता असलेले सिध्दीविनायकाचे मंदीर आहे. गणेशमूर्ती संगमरवरी असून तिची उंची दीडफूट आहे.१७५९ साली राघोजी आंग्रे ह्यांनी सिध्दीविनायकाचे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. मंदिराच्या प्राकारातच उंचवट्यावर उत्तरेस मारुतीचे व दक्षिणेस शंकराचे मंदिर आहे. येथे देवतांची शिल्पे कोरलेले अनोखे तुळशी वृंदावन आहे, मंदिरासमोर चिरेबंदी बांधणीची गोड्या पाण्याची पुष्कर्णी आहे. पुष्कर्णीच्या पुढे तटा पलिकडच्या दरवाजातून बाहेर गेल्यावर स्वच्छ पाण्याची विहीर आहे. या विहिरीला आत उतरायला पायर्‍या आहेत. पुष्कर्णी पाहून किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दाराकडे येतांना डाव्या बाजूला चुन्याच्या घाण्याचे दगडी चाक पाहायला मिळते. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ आल्यावर फ़ांजीवर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. त्या पायर्‍या चढून गेल्यावर बुरुजावरील वास्तूचे अवशेष पाहायला मिळतात पुढे गेल्यावर ध्वजस्तंभ आहे येथे खाल्च्या बाजूच तटबंदीत खोल्या आहेत. पुढे गेल्यावर बुरुजावर लाकडी गाड्यावर २ तोफा आहेत. तोफांच्या चाकांजवळ तोफा बनवणार्‍या कंपनीच नाव कोरलेल आहे ‘‘ डाऊसन हार्डी फिल्ड, डाऊ मूट आर्यन वर्क्स, यॉर्कशायर, इंग्लंड ", व वर्ष आहे १८४९. फ़ांजीवरुन पुढे चालत गेल्यावर बुरुजावरील वास्तूचे अवशेष पाहायला मिळतात . हे सर्व पाहून पुन्हा प्रवेशव्दारपाशी आल्यावर दरवाजातून सर्जेकोटला जाता येते.
पोहोचण्याच्या वाटा :
१) मुंबईहून - पनवेल - वडखळ मार्गे अलिबागला जावे, अलिबागच्या समुद्र किनार्‍यावरुन ओहोटीच्या वेळेस किल्ल्यात चालत जाता येते.

२) मुंबईहून बोटीने मांडव्याला जाता येते. त्याच बोटीच्या तिकिटात अलिबाग एसटी स्टॅंड पर्यंत सोडतात. एस टी स्थानकातून किनार्‍यावर जाण्यासाठी रिक्षा मिळतात.
राहाण्याची सोय :
गडावर राहण्याची सोय नाही ,राहण्याची सोय अलिबाग मध्ये आहे.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही ,जेवणाची सोय अलिबाग मध्ये आहे.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय नाही , पाण्याची सोय अलिबाग मध्ये आहे.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
पावसाळा सोडून वर्षभर
सूचना :
किल्ल्यात जाण्यासाठी सोयीस्कर ओहोटीच्या वेळा खालीलप्रमाणे आहेत.

तिथी वेळ तिथी वेळ
प्रतिपदा ४:०० ते ६:०० अष्टमी ९:०० ते १२:००
द्वितीया ५:०० ते ७:०० नवमी १०:०० ते १२:३०
तृतीया ५:३० ते ८:०० दशमी ११:०० ते १३:००
चतुर्थी ६:०० ते ९:०० एकादशी११:३० ते १४:००
पंचमी ७:०० ते ९:३० द्वादशी १२:०० ते १५:००
षष्टी ८: ०० ते १०:०० त्रयोदशी१३:०० ते १६:००
सप्तमी ८:३० ते ११:०० चर्तुदशी १३:०० ते १६:००
पौर्णिमा / अमावस्या १४:३० ते १७:००
जिल्हा Raigad
 अवचितगड (Avchitgad)  भीमाशंकर (Bhimashankar)  भिवगड / भिमगड (Bhivgad(Bhimgad))  बिरवाडी (Birwadi)
 चांभारगड (Chambhargad)  चंद्रगड ते आर्थरसीट रेंज ट्रेक (Chandragad to Arthur seat)  चंद्रगड(ढवळगड) (Chandragad(Dhavalgad))  कुलाबा किल्ला (Colaba)
 दासगावचा किल्ला (Dasgaon Fort)  ढाक बहिरी (Dhak-Bahiri)  द्रोणागिरी (Dronagiri)  घारापुरी (Gharapuri)
 घोसाळगड (Ghosalgad)  हिराकोट (Hirakot)  ईरशाळ (Irshalgad)  जंजिरा (Janjira)
 कर्नाळा (Karnala)  खांदेरी (Khanderi)  खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) (Khubladha Fort (Thal Fort))  कोकणदिवा (Kokandiva)
 कोंढवी (Kondhavi)  कोर्लई (Korlai)  कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad)  लिंगाणा (Lingana)
 मानगड (Mangad)  मंगळगड (Mangalgad)  माणिकगड (Manikgad)  मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir))
 मृगगड (Mrugagad)  पाचाड कोट (Pachad Fort)  पदरगड (Padargad)  पद्‌मदूर्ग (कासा किल्ला) (Padmadurg ( Kasa Killa))
 पालगड (Palgad)  पन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला) (Panhaledurg)  पेब (विकटगड) (Peb)  पेठ / कोथळीगड (Peth (Kothaligad))
 प्रबळगड (Prabalgad)  रायगड (Raigad)  रामदरणे (Ramdarne)  रतनगड(रत्नदुर्ग) (Ratangad(Ratnadurg))
 रेवदंडा (Revdanda)  सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad)  सामराजगड (Samrajgad)  सांकशीचा किल्ला (Sankshi)
 सरसगड (Sarasgad)  सर्जेकोट (रायगड) (Sarjekot (Alibaug))  शिवथरघळ (Shivtharghal)  सोंडाई (Sondai)
 सोनगिरी (कर्जत जवळ) (Songir (Karjat))  सुधागड (Sudhagad)  सुरगड (Surgad)  तळगड (Talgad)
 तुंगी (कर्जत) (Tungi (Karjat))  उंदेरी (Underi)