मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

दासगावचा किल्ला (Dasgaon Fort) किल्ल्याची ऊंची :  450
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रायगड
जिल्हा : रायगड श्रेणी : सोपी
प्राचीन काळापासून महाड हे बंदर म्हणून प्रसिध्द आहे. दासगाव जवळ असलेली गंधारपाले लेणी आजही या गोष्टीची साक्ष देत उभी आहेत. याच दासगाव गावात सावित्री नदी आणि दासगावची खिंड यांच्या मध्ये असलेल्या डोंगरावर भोपाळगड नावाचा किल्ला होता आज तो दासगावचा किल्ला म्हणून ओळखला जातो. महाड बंदरातून जल आणि जमिनी मार्गे चालणार्‍या व्यापारावर नजर ठेवण्यासाठी दासगावचा किल्ला ही मोक्याची जागा होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रायगड राजधानी झाल्यावर या किल्ल्याचेही संरक्षणाच्या दृष्टीने महत्व वाढले असेल. इंग्रजांची सत्ता आल्यावर त्यांनी भोपाळगड किल्ल्याची डगडूजी करुन त्याचे नाव दासगाव फ़ोर्ट केले.

दासगाव किल्ल्यावर फ़ारसे अवशेष नाहीत किल्ला पाहाण्यासाठी १ तास पुरेसा होतो. त्यामुळे तो किल्ला वेगळा न पाहाता रायगड किल्ला पाहून येताना सहज पाहाता येण्या सारखा आहे. किंवा दासगावचा किल्ला, गंधारपाले लेणी आणि सवची गरम पाण्याची कुंडे ही ठिकाणे एका दिवसात पाहाता येतात.
11 Photos available for this fort
Dasgaon Fort
पहाण्याची ठिकाणे :
मुंबईहून महाडला जाताना मुंबई गोवा महामार्गावर दासगावची खिंड लागते . त्या खिंडीतल्या उजव्या बाजूच्या (सावित्री नदी आणि कोकण रेल्वेचा ट्रॅक असलेली बाजू) डोंगरावर दासगावचा किल्ला आहे . दासगावच्या खिंडीच्या पुढे एक छोटा रस्ता उजव्या बाजूला दासगाव गावात जातो . या रस्त्याने खिंडीपर्यंत परत चालत जायला ५ मिनिटे लागतात . खिंडीच्या जवळ एक सिमेंटने बांधलेली पक्की वाट किल्ल्याच्या डोंगराच्या अर्ध्या उंचीवर असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेकडे जाते. या पक्क्या वाटेने शाळेपर्यंत पोहोचायला ५ मिनिटे लागतात . शाळेच्या मुख्य दरवाजाच्या समोर आल्यावर एक पायवाट डोंगरावर गेलेली दिसते. या पायवाटेने डोंगर चढायला सुरुवात करावी. ही पायवाट शाळेच्या वरच्या बाजूने (डोंगर उजव्या बाजूला आणि शाळा डाव्या बाजूला खाली ) पुढे जाते . ५ मिनिटात आपण एका सपाटीवर येतो. तेथून पठारावर न जाता त्याच पायवाटेने दरी डाव्या बाजूला ठेवत पुढे चालत गेल्यावर ५ मिनिटांनी आपण दगडात कोरलेल्या पाण्याच्या टाक्यापाशी पोहोचतो. टाके पाहून आल्या वाटेन थोडेसे मागे आल्यावर दोन वाटा फुटलेल्या दिसतात . एक वाट किल्ल्याच्या माथ्यावर तर दुसरी वाट किल्ल्याच्या मागच्या बाजूस (दासगाव गावाच्या विरुध्द बाजूस ) जाते . प्रथम किल्ल्याच्या माथ्यावर जाणाऱ्या वाटेने चढाई करायला सुरुवात करावी. वाट फारशी वापरात नसल्याने झाडी माजलेली आहे. त्यातून वाट काढत आपण ५ मिनिटात गडमाथ्यावर पोहोचतो . माथ्यावर काही उध्वस्त चौथऱ्याचे अवशेष आहेत. झाडी खुप असल्याने तटबंदी त्यात लपून गेली आहे. त्याचे तुरळक अवशेष दिसतात. गडमाथ्यावरुन खाली उतरून पुन्हा तीन वाटा जिथे मिळतात त्याठिकाणी येउन डाव्या बाजूला (टाके आणि दासगावच्या विरुध्द बाजूस) जावे . इथे एक ठळक पायवाट किल्ल्याच्या डोंगराला वळसा घालून जाते. या ठिकाणी किल्ल्याचे कोणतेही अवशेष नाहीत पण येथे आल्यावर किल्ला ज्यासाठी बांधला त्याचे कारण कळते. या ठिकाणाहून सवित्री आणि काळू नदीचा संगम आणि नदीचे पात्र दुरपर्यंत दिसते. त्यामुळे नदीमार्गे आणि जमिनीच्या मार्गे होणार्‍या वाहातूकीवर / व्यापारावर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला म्हणजे मोक्याची जागा आहे.

पोहोचण्याच्या वाटा :
रस्त्याने :- मुंबई गोवा महामार्गावर मुंबईहून १६२ किलोमीटरवर दासगाव आहे. (महाडच्या अलिकडे ११ किलोमीटर). क्प्कणात जाणार्‍या सर्व एसटी बसेस दासगावला थांबतात. याच गावात दासगावचा किल्ला आहे.

रेल्वेने :- कोकण रेल्वेने वीर स्थानकावर उतरावे. वीरहून रेल्वे स्टेशन ते दासगाव अंतर ५ किलोमीटर आहे. सहा आसनी रिक्षा आणि एसटीने दासगावला पोहोचता येते.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय महाड येथे आहे.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्यायोग्य पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पायथ्यापासून १५ मिनिटे
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: D
 दांडा किल्ला (Danda Fort)  दार्‍या घाट (Darya Ghat)  दासगावचा किल्ला (Dasgaon Fort)  दातेगड (Dategad)
 दौलतमंगळ (Daulatmangal)  देहेरगड (भोरगड) (Dehergad (Bhorgad))  डेरमाळ (Dermal)  देवगडचा किल्ला (Devgad Fort)
 देवगिरी (दौलताबाद) (Devgiri (Daulatabad))  ढाक बहिरी (Dhak-Bahiri)  धाकोबा (Dhakoba)  धारावी किल्ला (Dharavi Fort)
 धर्मापूरी (Dharmapuri)  धारूर (Dharur)  धोडप (Dhodap)  धोत्रीचा किल्ला (गढी) (Dhotri Fort (Gadhi))
 द्रोणागिरी (Dronagiri)  डुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera))  दुंधा किल्ला (Dundha)  दुर्ग (Durg)
 दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort)  डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort))