मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

धाकोबा (Dhakoba) किल्ल्याची ऊंची :  4100
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: दुर्ग - धाकोबा
जिल्हा : पुणे श्रेणी : मध्यम
नाणेघाट आणि जीवधनच्या दक्षिणेकडे एक उत्तुंग पर्वत रांग दिसून येते. उत्तुंग खड्या कातळ भिंती आणि कोकणात कोसळणारे एकाहून एक बेलाग कडे, अप्रतिम जंगल यांनी ही रांग सजलेली आहे. या डोंगर रांगेत कळसूबाई (५२०० फूट) , कुलंग (४८०० फूट), रतनगड (४२०० फूट), आजोबा पर्वत (४६०० फूट) ,हरिश्चंद्रगड (४७००फूट) , जीवधन (३८०० फूट ), दुर्गा किल्ला (३९०० फूट), सिध्दगड (३२०० फूट), नानाचा अंगठा अशी एकाहून एक ऊंच शिखर / किल्ले आहेत. नाणेघाट, दर्‍या घाट, साकुर्डी घाट, सादडे घाट, अहुपे घाट, माळशेज घाट इत्यादी घाट वाटा या डोंगररांगेत आहेत. याच रांगेतील एका डोंगरावर धाकोबा किल्ला आहे. . धाकोबा या घाटमाथ्यावर असणार्‍या किल्ल्या जवळून खाली कोकणात असलेल्या सोनावळे गावात जाणारा दार्‍या घाट आजही वापरात आहे. या घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी ‘धाकोबा’ किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती .
आंबोली - धाकोबा - दुर्ग हा पूर्ण दिवसाचा ट्रेक आहे.
27 Photos available for this fort
Dhakoba
इतिहास :
कल्याण बंदरात उतरणारा माल मुरबाड , वैशाखरे मार्गे विविध घाट मार्गांनी सह्याद्रीची रांग ओलांडून घाट माथ्यावरील बाजारपेठेत जात असे. या घाट मार्गांवर नजर ठेवण्यासाठी प्राचिन काळापासून अनेक किल्ले बांधण्यात आले. या किल्ल्यांचा मुख्य उद्देश म्हणजे या व्यापारी मार्गांचे रक्षण करणे , त्यावर नजर ठेवणे. धाकोबा किल्ल्याचा उपयोग ही टेहळ्णीसाठी होत असावा.

पहाण्याची ठिकाणे :
धाकोबा गडावर गड किंवा किल्ला असण्याचे कोणतेही अवशेष नाहीत. धाकोबा किल्ल्यावरून नाणेघाट, जीवधनची मागची बाजू ,दार्‍याघाट आणि कोकणचे विहंगम दृश्य दिसते. धाकोबा किल्ला उतरुन समोरचा डोंगर पार करुन गेल्यावर एका मोठ्या पठारावर ढाकेश्वराचे मंदिर आहे. या मंदिरासमोर काही समाध्या आहेत. मंदिरात शेंदुर लावलेला दगड आहे. बाजूला लाकडात कोरलेल्या काही मुर्ती शेंदूर लावून ठेवलेल्या आहेत. मंदिराच्या आवारात पाणी साठवण्यासाठी एक दगडात कोरलेले भांडे आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला मोठी विहिर आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
दुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक दुर्गवाडीतून दुर्ग - धाकोबा - आंबोली आणि दुसरा मार्ग आंबोली ते धाकोबा हा चढाईचा ट्रेक आहे.

१) जुन्नर - आपटाळे मार्गे आंबोली गावात जाण्यासाठी जुन्नरहून एसटीची बस दर तासाला आहे. आंबोली गावा़च्या अलिकडे उच्छिल गाव आहे तेथपर्यंत जाण्यासाठी जीप्स आहेत. आंबोली गावात रस्ता संपतो तेथून एक वाट दार्‍या घाटाकडे जाते. या वाटेने थोडे चालल्यावर डावीकडे जाणारा फाटा फुटतो. या वाटेने दार्‍या घाट उजवीकडे ठेवून चढत राहील्यास थोड्याच वेळात एक गुहा दिसते. या वाटेने काही डोंगर चढत उतरत आपण २ तासात ढाकेश्वराच्या मंदिरापाशी पोहोचतो . मंदिरापासून धाकोबा किल्ल्यावर जाण्यासाठी अर्धातास लागतो.
धाकोबा किल्ल्यापासून दुर्ग किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी २ ते ३ तास लागतात. आंबोली ते धाकोबा ते दुर्ग हा ट्रेक पूर्ण दिवसाचा आहे. या मार्गाने चढाई मोठ्या प्रमाणावर करावी लागते.

२) जुन्नर - हातवीज एसटीची बस दिवसातून २ वेळा सकाळी १०.३० आणि दुपारी ४.०० वाजता आहे. याने हातवीज फ़ाट्यावर उतरुन चालत दुर्गवाडी आणि पुढे दुर्ग किल्ला हे ३ किलोमीटरचे अंतर गाठायला पाऊण तास लागतो. खाजगी वहानाने थेट दुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी जाता येते. येथे वनखात्याने उद्यान बनवलेले आहे. येथून सिमेंटमध्ये बांधलेल्या पायर्‍या चढून ५ मिनिटात दुर्गादेवीच्या मंदिरात पोहोचतो. मंदिराच्या पुढे कोकणकडा आहे . या कड्या जवळून पायवाट अनेक डोंगर दर्‍या पार करत धाकोबाला जाते. या वाटेने धाकोबाला जाण्यासाठी २ ते ३ तास लागतात.

दुर्ग - धाकोबा - आंबोली हा पूर्ण दिवसाचा ट्रेक आहे. पण यात आपण धाकोबा किल्ल्या नंतर आंबोली गावापर्यंत उतरत असल्याने . आंबोली - धाकोबा - दुर्ग या ट्रेक पेक्षा कमी श्रम लागतात.

वरील दोन्ही मार्गाने दुर्ग धाकोबा हे किल्ले पाहायचे असल्यास गावातून वाटाड्या घेऊन जाणे आवश्यक आहे.
राहाण्याची सोय :
धाकोबाच्या पायथ्याशी असणार्‍या मंदिरात १५ जणांची राहण्याची सोय होते
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही, आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
मंदिरा जवळील विहिरीतील पाणी पिण्यायोग्य नाही.
सूचना :
धाकोबा आणि दुर्ग हे किल्ले एकत्रच पाहीले जातात.
डोंगररांग: Durg Dhakoba
 दार्‍या घाट (Darya Ghat)  धाकोबा (Dhakoba)  दुर्ग (Durg)