मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

धारावी किल्ला (Dharavi Fort) किल्ल्याची ऊंची :  190
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : ठाणे श्रेणी : सोपी
वसईच्या किल्ल्याचे नाक म्हणून ओळखला जाणारा धारावी किल्ला, भाइंदर जवळ आहे. अनेकजण धारावी किल्ला व धारावी झोपडपट्टीत असलेला "काळा किल्ला" ह्यात गफलत करतात. चिमाजी आप्पांच्या वसई मोहीमेत ह्या किल्ल्याने महत्वाची भूमिका वठवली होती. इ.स. १७३७ मध्ये मराठे व पोर्तुगिज यांच्यात पेटलेल्या वसईच्या युध्दामुळे धारावी बेटाला महत्व आले. धारावी किल्ला वसईच्या किल्ल्यासमोर आहे. एका बाजूला वसईची खाडी, दुसर्‍या बाजूला अरबी समुद्र यामुळे धारावी किल्ल्याचे स्थान वसई मोहीमेत अतिशय महत्वाचे होते. या किल्ल्यावरुन वसईच्या पोर्तुगिजांना समुद्रा व खाडीमार्गे मिळणारी रसद तोडणे शक्य होते. तसेच वसई किल्ल्यावर लक्ष ठेवणे व मारा करणे धारावी किल्ल्याच्या उंचीमुळे सहज शक्य होते.


Dharavi Fort
4 Photos available for this fort
Dharavi Fort
इतिहास :
१२ एप्रिल १७३७ मध्ये मराठ्यांनी धारावी बेटावर हल्ला केला आणि घाइघाइत धारावी किल्ला बांधायला घेतला. त्यासाठी २२०० माणसांना रोज ५/- रुपये याप्रमाणे ११०००/- रुपये किल्ला बांधण्यसाठी मागणी करणारे शंकरजी केशव यांनी चिमाजी अप्पांना लिहलेले पत्र उपलब्ध आहे. पोर्तुगिजांना मराठ्यांच्या किल्ला बांधण्याची बातमी लगेच कळली व पुढील धोका ओळखून त्यांनी हल्ला करुन धारावी बेट व अर्धवट बांधकाम झालेला किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ला बांधून पुर्ण केला.

वसई किल्ल्याच्या दृष्टीने मराठ्यांना धारावी किल्ला जिंकून घेणे आवश्यक होते. ३० नोव्हेंबर १७३७ रोजी मराठ्यांनी ४००० हशम व १०० घोडेस्वारांच्या मदतीने धारावी किल्ला जिंकला. पोर्तूगिजांनी २८ फेब्रुवारी १७३८च्या निकराच्या युद्धात धारावी किल्ला परत एकदा जिंकून घेतला. चिमाजी आप्पांनी ९ मार्च १७३८ ला जातीने किल्ला घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. हा पराभव जिव्हारी लागल्यामुळे मराठे व पोर्तुगिज यांच्यातील संघर्ष वर्षभर चालू होता. शेवटी ६ मार्च १७३९ रोजी मराठ्यांनी परत धारावीचा किल्ला जिंकून घेतला. इ.स १८१८ मध्ये या किल्ल्याचा ताबा इंग्रजांकडे गेला.
पहाण्याची ठिकाणे :

जन्मापासून अनेक रोमहर्षक लढाया पाहिलेला हा किल्ला आज र्दुदैवाने अस्तित्वात नाही. ह्या किल्ल्याच्या उरलेल्या काही खुणा पहाण्यासाठी भाईंदर - उत्तन बसने ‘‘धारावी देवी मार्ग‘‘ ह्या फाट्यावर उतरावे. इथून जवळच पोर्तुगिजांनी बांधलेले ‘‘बेलन माऊली चर्च‘‘ आहे. ते पाहून पुढे गेल्यावर आपण जिर्णोध्दार केलेल्या धारावी देवीच्या मंदिरापाशी पोहचतो. मंदिराच्या पुढे १० मिनीटे चालल्यावर उजव्या हाताला दर्गा व डाव्या हाताला तासलेला, अनेक स्तंभासारखा आकार असलेला डोंगर दिसतो. पोर्तुगिजांनी १५३६ ते १६०० पर्यंत हा डोंगर तासून दगडाचे अखंड चिरे काढले व त्याच चिर्‍यांनी वसईचा किल्ला, गोव्याचे चर्च ह्या वास्तु बांधल्या होत्या. हा डोंगर पाहून पूढे गेल्यावर, रस्ता जिथे डोंगराच्या माथ्यावर जातो तिथे उजव्याबाजूला घडीव दगडात बांधलेला एकमेव बुरुज दिसतो. या बुरुजावर पोर्तुगिजांच्या कार्यालयाचे अवशेष आहेत. हा बुरुज पाहून गडमाथ्यावर आल्यावर बाग लागते. या बागेत तटबंदीचे काही अवशेष दिसतात. किल्ल्याच्या माथ्यावरुन पश्चिमेला अरबी समुद्र, उत्तरेला वसईचा किल्ला व मध्ये असलेली वसईची खाडी दिसते. या ठिकाणावरुन किल्ल्याचे भौगोलिक स्थान व वसईच्या मोहिमेतील महत्व लक्षात येते. यासाठी तरी या भागाला एकदा भेट द्यावी.

पोहोचण्याच्या वाटा :

पश्चिम रेल्वेच्या भाईंदर स्थानकावर उतरुन उत्तनला जाणार्‍या बस क्र १ व ४ ने धारावी गडावर जाता येते. ह्यातील १ क्रमांकाची बस गडाच्या माथ्यावर बागेजवळ आणून सोडते. तिथून किल्ल्याचे अवशेष पहात डोंगर उतरत येता येते. परत जातांना चर्च पाहून धारावी फाट्यावरुन ह्याच बसेसनी भाइंदर गाठावे. धारावी माथा ते धारावी फाटा २.५ कि.मी अंतर आहे. भाईंदर स्थानकावरुन बस दर १० मिनीटाला आहे.
राहाण्याची सोय :
किल्ल्यात राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
जिल्हा Thane
 आजोबा (आजा पर्वत) (Ajoba)  बळवंतगड (Balwantgad)  बेलापूरचा किल्ला (Belapur Fort)  भैरवगड (मोरोशी) (Bhairavgad(Moroshi))
 भंडारदुर्ग/भांडारदुर्ग (Bhandardurg)  भवानगड (Bhavangad)  भूपतगड (Bhupatgad)  चंदेरी (Chanderi)
 दांडा किल्ला (Danda Fort)  दार्‍या घाट (Darya Ghat)  धारावी किल्ला (Dharavi Fort)  दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort)
 गंभीरगड (Gambhirgad)  घोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort)  घोटवडा किल्ला (गोतारा किल्ला) (Ghotawada Fort (Gotara))  गोरखगड (Gorakhgad)
 कामणदुर्ग (Kamandurg)  केळवे किल्ला (Kelve Fort)  केळवे पाणकोट (Kelve Pankot)  माहीम किल्ला (केळवेमाहीम) (Mahim Fort ( Kelve - Mahim))
 माहुली (Mahuli)  मलंगगड (Malanggad)  नागलाबंदर किल्ला (Nagla bunder Fort)  पिंपळास कोट (Pimplas Kot)
 शिरगावचा किल्ला (Shirgaon)  सिध्दगड (Sidhhagad)  ताहुली (Tahuli)  टकमक गड (Takmak)
 तांदुळवाडी (Tandulwadi)  वज्रगड(वसई) (Vajragad (Vasai))  वसई (Vasai)