मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

धोडप (Dhodap) किल्ल्याची ऊंची :  4751
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: सातमाळ
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम
सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जमिनीतून बाहेर आलेल्या लाव्हा रसामुळे झालेली आहे. या लाव्हरसाचे थर थंड होतांना अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना/ आकार तयार होतात. त्यापैकी एक रचना म्हणजे "डाईक "; डाईक म्हणजे लाव्हारसाच्या विशिष्ट प्रकारे साठण्यामुळे व थंड होण्यामुळे बेसॉल्ट खडकाची तयार झालेली भिंत. ही रचना आपल्याला धोडप किल्ल्यावर पहायला मिळते. धोडपगडाचा बालेकिल्ल्याच्या वरील एका बाजूला पिंडीसारखा कातळाचा आकार तयार झालेला आहे. त्याला लागून तयार झालेल्या डाईकच्या (बेसॉल्ट खडकाच्या ४०० फूट उंच, सरळसोट भिंत) मध्ये मोठी वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक खाच तयार झालेली आहे. अशा वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे या परीसरात फिरतांना हा किल्ला आपले लक्ष सहज वेधून घेतो. किल्ल्यावरील बारमाही पाण्याचे टाक, राहाण्यासाठी प्रचंड मोठी गुहा व भरपूर अवशेष यामुळे धोडप किल्ला एक दिवस मुक्काम करून पहाण्यासारखा आहे.

70 Photos available for this fort
Dhodap
Dhodap
Dhodap
इतिहास :
धोडप उर्फ धारपवणिक हा किल्ला त्यावरील टकी व खोदीव गुहा पाहाता पूरातन किल्ला आहे. याचा उल्लेख मात्र प्रथम १६ व्या शतकात धरब या नावाने येतो, तेंव्हा हा किल्ला नगरच्या निजामशहाकडे होता. निजामशाही नष्ट करण्यासाठी आलेल्या मुघलांच्या सरदार अलावर्दीखानाने निजामच्या किल्लेदाराला १ लाख रुपयाच्या मनसबीची लालूच दाखवून १९ जून १६२६ मध्ये किल्ला ताब्यात घेतला. इ.स. १६७०-७१ मध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्याने धोडप किल्ल्याला वेढा घातला, पण त्यांना किल्ला घेता आला नाही.

नानासाहेब पेशवे व हैद्राबादचा निजाम यांच्यात झालेल्या भालकीच्या तहाप्रमाणे धोडप किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर त्याचा वापर मुख्यत: तुरुंग म्हणून झाला. इ.स. १६७८ मध्ये माधवराव पेशव्यां विरुध्द बंड केलेल्या राघोबांनी (रघुनाथराव पेशवे) धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी आश्रय घेतल्याचे कळल्यावर माधवराव पेशव्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, त्यावेळी राघोबांच्या सैन्याने किल्ल्यावर पळ काढला व मोठी लुट माधवराव पेशव्यांना मिळाली. इ.स. १८१८ मध्ये धोडप किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
पहाण्याची ठिकाणे :
हट्टी गावातून चांगली मळलेली पायवाट गडावर जाते. या वाटेने साधारणपणे १५ मिनिटे चालल्यानंतर थोडी सपाटी लागते. इथून पुढे सुमारे एक ते दीड तास चढून गेल्यावर, २ बुरुज आणि त्याला लागुन असलेली तटबंदी आपल्या नजरेस पडते. या बुरुजांवर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. वरच्या बाजूस गोलाकार बांधकामामध्ये छोट्या छोट्या खिडक्या आहेत. बुरुज आणि तटबंदीच्या डाव्या बाजूस उत्तराभिमुख दरवाजा आहे, परंतु झाडाझुडूपांच्या अतिक्रमणामुळे हा दरवाजा पायर्‍या थोड्या वर चढून गेल्यावरच दिसतो. दरवाजाच्या डाव्या बाजूच्या तटबंदीत शेंदुर लावलेली छोटी गणेश मूर्ती बसवलेली आहे. या बुरुजांमधून जाणार्‍या पायर्‍यांच्या थोडे आधी उजवीकडे वर चढून जाणारी वाट ही "इखारा" सुळक्याकडे जाते. या वाटेने सुळक्याच्या पायथ्याशी असलेल्या आश्रमापर्यंत जाण्यासाठी २ तास लागतात. हिच वाट पुढे कांचना किल्ल्याकडे जाते, तिथे पोहोचण्यासाठी इखार्‍यावरून २ तास लागतात.

बुरुजांमधून जाणार्‍या पायर्‍या चढून पुढे गेल्यावर मोठा तलाव लागतो. तलावावरून पुढे चालत जातांना वाटेच्या दोन्ही बाजूस अनाम वीरांच्या समाध्या आणि कबरींचे अवशेष दिसतात. थोड्या अंतरावर उजव्या बाजूस मारुतीचे मंदिर व वास्तूंचे अवशेष दिसतात. मंदिरावरून पुढे चालत गेल्यावर दोन वाटा फूटतात, उजव्या बाजूची वाट पूर्वीच्या काळी ओतूर मार्गे कळवण गावात जाते. याच वाटेने साधारणपणे २५ मिनिटे चालत गेल्यावर "कळवण दरवाजा" आहे. डाव्या बाजूची वाट आपल्याला किल्ल्यावर घेऊन जाते. या ठिकाणी २ बुरुजांमधील प्रवेशद्वार आणि पसरलेली तटबंदी दृष्टीस पडते. हे प्रवेशद्वार उत्तराभिमुख असून त्यावर मराठीत शिलालेख कोरलेला आहे.

प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर आपला किल्ल्याच्या माचीवर प्रवेश होतो. किल्ल्याची माची पूर्व- पश्चिम पसरलेली असून 'सोनारवाडी' ही गवळी लोकांची छोटीशी वस्ती याच माचीवर आहे. येथे दुधाचा उत्कृष्ट मावा मिळतो. माचीवरील फरसबंदी वाटेने जातांना डाव्या बाजूला २ बुजलेल्या विहीरी आढळतात. पुढे काही अंतरावर डाव्या बाजूस एक छोट हनुमान मंदिर आहे. त्याच्या अवतीभवती दुरावस्थेतील २ - ४ शिवलिंग व नंदी दिसून येतात. पुढे गेल्यावर उजव्या बाजूला विहीर व त्यापुढे ’सोनारवाडी’ ही छोटी वस्ती लागते. सोनारवाडी वरून २ वाटा फुटतात, त्यातील उजव्या बाजूची वाट आपल्याला गडावर घेऊन जाते, पण गडावर न जाता प्रथम संपूर्ण माची पाहून घ्यावी.

सोनारवाडी वरून सरळ जाणार्‍या वाटेवर डाव्या बाजूस, खालच्या अंगाला सुस्तिथितील तटबंदी दिसते. थोडेसे खाली उतरून ही तटबंदी जवळून पहाता येते. पुन्हा वाटेवर येऊन थोड अंतर चालून गेल्यावर डाव्या बाजूस शंकराच जिर्णोध्दार केलेल मंदिर आणि त्या समोर छोट्या घुमटीत नंदीची मूर्ती पहायला मिळते. मंदिराजवळच सुकलेलं पिण्याच्या पाण्याच चौकोनी टाक आहे. येथून पुढे उजव्या बाजूला गणपतीचे मंदिर असून त्यात बाजूला शिवलिंग देखील आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस पिण्याच्या पाण्याच टाकं आहे, त्यातील पाणी पिण्याजोग आहे. या टाक्याची रचना २ टप्यात करण्यात आली आहे, जेणेकरून गाळ खालच्या थरात राहून वरच्या थरात स्वच्छ पाणी राहते.

गणपतीचे मंदिर पाहून पुन्हा फरसबंदी वाटेवर येऊन पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजूस आश्रम आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस शिवलिंगाच्या आकारची विहीर आहे. त्यात उतण्यासाठी पायर्‍या आहेत. या मंदिरावरून साधारणपणे २० ते २५ मिनिट चालत गेल्यावर आपण पूर्वाभिमुख दरवाजाकडे येऊन पोहोचतो. या दरवाज्याच्या बाजूला उध्वस्त तटबंदी व बुरुज आहेत. आतील बाजूस पहारेकार्‍यांसाठी देवड्या आहेत. दरवाज्यातून पुढे जाणारी वाट " रावळ्या - जावळ्या" या जोड दुर्गांवर जाते.

प्रवेशव्दार पाहून आल्या वाटेने परत सोनारवाडी पर्यंत यावे व गडावर जाणार्‍या वाटेने चढाईला सुरुवात करावी. सुरुवातीलाच वाटेच्या उजव्या बाजूला एक दुमजली विहीर आहे. त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही , पण जिने उतरून विहिरीचे घुमटाकार छत आणि कमानी असलेल्या उंच व मोठ्या खिडक्या बघण्यासारख्या आहेत. या वाटेवरून साधारण २० मिनिटांचा चढ चढून गेल्यावर एक उभा कातळ लागतो. कातळात खोदलेल्या पायर्‍या चढून गेल्यावर साधारण १० मिनिटाच्या चालीनंतर आपण उत्तराभिमुख दरवाजाकडे येऊन पोहोचतो. हा दरवाजा आता उध्वस्त अवस्थेत असला तरी त्यामध्ये असलेल्या देवड्या सुस्थितीत आहेत. या दरवाज्याच्या डाव्या बाजूस असलेला बुरुज अजून तग धरून उभा आहे. या बुरुजाच्यावर दिसणार्‍या चर्या आवर्जून पहाण्यासारख्या आहेत.

दरवाजावरून १० मिनिटावर अंदाजे १५ ते २० पायर्‍या आहेत. त्या चढून गेल्यावर समोरच फारसी भाषेतील २ शिलालेख एका खाली एक असे कोरलेले दिसतात. शिलालेख पाहून ६ - ७ पायर्‍या चढल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापाशी येतो. हा दरवाजा कातळात कोरलेला असून त्याची रचना पहाण्यासारखी आहे. दरवाजाच्या डाव्या बाजूस एक फारसी भाषेतील शिलालेख कोरलेला आढळतो. यात "सातमाळ रांगेतील धोडप किल्ला अलावर्दीखानाने जिंकून घेतल्याचा उल्लेख आहे". दरवाजा बंद केल्यावर त्यामागे लावण्यासाठी अडसर वापरात. त्या अडसरांसाठी बनवलेल्या खोबण्या येथे पहाता येतात. या दरवाज्याचे विशेष म्हणजे हा "L" आकारातला असून सुरवातीचा दरवाजा हा उत्तराभिमुख असून नंतरचा २ रा दरवाजा पूर्वाभिमुख आहे. दरवाज्याच्या आत पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत, तसेच दरवाजाच्या वर जाण्यासाठी पायर्‍या आहेत.

दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर १५ ते २० मिनिटांनी आपण गडमाथ्यावर पोहोचतो. इथे सुरवातीलाच २ पाण्याची टाकी लागतात. त्यातील एका टाक्यात पाणी असून ते पिण्यायोग्य नाही, तर दुसर टाक सुकलेल आहे. पुढे वाटेच्या दोन्ही बाजूस वाड्यांचे अवशेष दिसतात. त्यातील उजव्या बाजूच्या वाड्यात एकच खोली सुस्थितीत आहे, तर डाव्या बाजूच्या वाड्यात काही सरदल आणि नक्षीकाम असलेले कोनाडे दिसून येतात. वाड्याच्या बाजूला एक बुजलेलं टाक आहे.

वाड्याच्या उजव्या बाजूस एक मोठा पावसाळी तलाव व डोंगराच्याकडेला तटबंदी आढळून येते. या तलावाच्या वाटेवर पाणी साठवण्याचा एक हौद आहे. तलाव पाहून परत मुख्य वाटेवर येऊन उजव्या बाजूस वळून वरच्या अंगाला चढून गेल्यावर सुमारे ५ मिनिटात आपण २ खांब असलेल्या कोरीव गुहेपाशी (लेणं) पोहोचतो.

गुहा बघून परत मुख्य वाटेला लागून ५ ते १० मिनिट चालल्यानंतर उजव्या बाजूस आपल्याला काही सुकलेली टाकी आणि गुहा बघायला मिळतात. या सर्व गुहा पिंडीच्या आकाराच्या कातळाच्या पायथ्याशी आहेत. (कातळकडा चढून जाण्यासाठी प्रस्तरारोहण साहित्य व अनुभव असणे आवश्यक आहे.) त्यामधील सर्वात शेवटची गुहा राहाण्यायोग्य आहे. त्याच्या बाजूला पिण्याच्या पाण्याच टाकं देखील आहे. त्यातील पाणी पिण्यायोग्य असून थंडगार असते. गुहेत देवीची मुर्ती बसवलेली आहे. या गुहेपासून सरळ चालत पुढे गेल्यावर आपण धोडप किल्ल्याच्या सुप्रसिध्द कातळात असलेल्या नैसर्गिक खाचेच्या वरच्या बाजूला पोहोचतो. येथे आपली गडफेरी पूर्ण होते.

धोडप किल्ल्यावरून पश्चिमेला रवळ्या - जावळ्या, मार्कंड्या, सप्तशृंगी हे गड दिसतात. पूर्वेला हंड्या, इखारा हे सुळके आणि कांचना गड दिसतो. उत्तरेला कण्हेरगड व साल्हेर पाहायला मिळतो.


पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकच्या पुढे ५५ किमी अंतरावर वडाळीभोई फाटा आहे. या फाट्यावरून धोडांबे गाव ९ कि .मी अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी वडाळीभोई फाट्यावरून जीप / ६ आसनी रिक्षा मिळतात. (धोडांबे गावात प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे.) धोडांबे पासून ५ कि. मी अंतरावर हट्टी गाव लागते. (येथे जाण्यासाठी वहान मिळणे कठीण आहे. संपूर्ण भाडे (सर्व सिट्सचे) दिल्यास वहान मिळते.) हट्टी गाव हे धोडप किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावात शिरतानाच प्रचंड विस्तारलेला धोडप किल्ला आणि इखारा सुळका आपले लक्ष वेधून घेतो.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्यासाठी २ गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय :
बारमाही पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
हट्टी गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी २.५ ते ३ तास लागतात.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: D
 दांडा किल्ला (Danda Fort)  दार्‍या घाट (Darya Ghat)  दासगावचा किल्ला (Dasgaon Fort)  दातेगड (Dategad)
 दौलतमंगळ (Daulatmangal)  देहेरगड (भोरगड) (Dehergad (Bhorgad))  डेरमाळ (Dermal)  देवगडचा किल्ला (Devgad Fort)
 देवगिरी (दौलताबाद) (Devgiri (Daulatabad))  ढाक बहिरी (Dhak-Bahiri)  धाकोबा (Dhakoba)  धारावी किल्ला (Dharavi Fort)
 धर्मापूरी (Dharmapuri)  धारूर (Dharur)  धोडप (Dhodap)  धोत्रीचा किल्ला (गढी) (Dhotri Fort (Gadhi))
 द्रोणागिरी (Dronagiri)  डुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera))  दुंधा किल्ला (Dundha)  दुर्ग (Durg)
 दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort)  डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort))