मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

द्रोणागिरी (Dronagiri) किल्ल्याची ऊंची :  910
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम
प्राचीन काळापासून उरण बंदर म्हणून प्रसिध्द आहे. त्याकाळी बंदराच्या संरक्षणासाठी उरण गावाभोवती तटबंदी बांधण्यात आली होती. तसेच उरण बंदराचे रक्षण करण्यासाठी करंजा बेटावरील द्रोणागिरी डोंगरावर किल्ला बांधला होता. आजही हा किल्ला द्रोणागिरी अस्तित्वात आहे. मुंबईहून कोणत्याही ऋतूत एका दिवसात करता येण्यासारखा हा छोटा आणि सुंदर ट्रेक आहे.
22 Photos available for this fort
Dronagiri
Dronagiri
Dronagiri
इतिहास :
सातवहानांच्या एका शिलालेखात उरण जवळील मोर गावाचा उल्लेख आहे. सातव्या शतकाच्या प्रारंभी पुलकेशी चालुक्याने मौर्यांची घारापूरी ही राजधानी काबीज केल्याचा उल्लेख ऎहोळे येथील शिलालेखात आहे. घारापूरी या राजधानी पासून जवळ असणार्‍या उरण बंदराचे रक्षण करण्यासाठी करंजा बेटावरील द्रोणागिरी डोंगरावर किल्ला बांधला असण्याची शक्यता आहे.

द्रोणागिरी किल्ला देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात होता. इ.स.१५३० मध्येपोर्तुगीजांनी किल्ल्याची डागडुजी केली. १५३५ मध्ये अंतोनो- दो- पोर्तो या पाद्रीने नोसा-सेन्होरे, एन.एस. द पेन्हा व सॅम फ्रान्सिस्को ही चर्चेस बांधली. १६ व्या शतकात काही काळ हा किल्ला आदिलशहाकडे होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांकडे गेला.मुंबई बेटाच्या संरक्षणाच्या दृष्टीने घारापूरी किल्ला, उरण गाव व उरण जवळील करंजा बेटावर असलेला द्रोणागिरी किल्ला महत्वाचा होता. १० मार्च १७३९ ला मानाजी आंग्रे यांनी उरणचा कोट व द्रोणागिरी किल्ला इंग्रजांकडून जिंकून घेतला.
पहाण्याची ठिकाणे :
उरण एसटी स्थानकाच्या समोर दाट झाडीत लपलेला द्रोणागिरी डोंगर पसरलेला आहे. एसटी स्थानकाच्या समोर असणार्‍या रस्त्याने डाऊर नगरकडे चालत जावे. ५ ते १० मिनिटात आपण डोंगराच्या पायथ्याशी असणार्‍या झोपड्यांपाशी पोहोचतो. येथे उजव्या बाजूला ट्रान्सफॉंर्मर आहे, तर डाव्या बाजूची वाट झोपड्यां मधून प्रथम उजवीकडे व नंतर डावीकडे वळून डोंगरावर जाते. या ठळक पायवाटेने डोंगर चढायला सुरुवात केल्यावर ५ मिनिटात आपण कुंपणापाशी पोहोचतो. येथे ONGC ने "चेतावनी" देणारा फलक लावलेला आहे. कुंपण ओलांडल्यावर २ वाटा फूटतात, आपण उजव्या बाजूची वाट पकडावी. एकाच प्रकारच्या दाट झाडीतून हळूहळू चढत जाणार्‍या या वाटेने १० मिनिटात आपण डोंगराच्या उजव्या टोकाकडील धारेवर पोहोचतो. येथे डावीकडे वळून डोंगराच्या धारेवर चढायला सुरुवात करावी साधारणपणे १० मिनिटात आपण एका बुरुजापाशी पोहोचतो. पूर्वी गडाच्या खालच्या अंगालाही तटबंदी असावी, त्यातील हा एकमेव बुरुज आज पहायला मिळतो. येथून खाली ONGC चा प्लाण्ट व त्याच्या पुढे लांबवर पसरलेला समुद्र दिसतो. बुरुजापासून १० - १५ मिनिटे चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो.

गड माथ्यावर प्रवेश करताना उजवीकडे एका घराचे जोते पहायला मिळते. पुढे CRP ची पोलिस चौकी आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ONGC च्या प्लाण्टवर लक्ष ठेवण्यासाठी येथे २४ तास पोलिस असतात. पोलिस चौकीत आपल्या नावाची नोंद करावी. पोलिस चौकीच्या बाहेरच्या कट्ट्यावरून विहंगम दृश्य दिसते. उजव्या बाजूला बॅक बे , नरीमन पॉईंट, गेट वे ऑफ इंडीया, घारापूरी तर, डाव्या बाजूला रेवस, मांडवा, व त्यामागिल खांदेरी व उंदेरी हे किल्ले दिसतात.

पोलिस चौकीच्या मागिल बाजूस बालेकिल्ल्याची तटबंदी आहे. त्या तटबंदीत एक छोटे कमान असलेले पूर्वाभिमुख प्रवेशव्दार आहे. बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस उत्तराभिमुख एन.एस. द पेन्हा हे पोर्तुगिजांनी बांधलेले चर्च आहे. अशी अजून २ चर्च किल्ल्यावर होती पण आज ती आढळत नाहीत. चर्चचे प्रवेशव्दार १२ फूट उंच आहे. त्याला ३ खिड्क्या व ३ झरोके आहेत. या झरोक्यांना एकेकाळी रंगीत काचेच्या खिडक्या असतील. चर्चच्या बाजूला वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेली " गागौणी व गिजोणी " नावाची दोन पाण्याची बांधीव टाकी आहेत. या टाक्यांवर विटांनी बांधलेल्या ६ कमानी आहेत. दोन कमानींच्या मधे वरच्या बाजूस आडव्या लाद्या बसवलेल्या आहेत. यामुळे पाण्याचा पृष्ठभाग झाकला जाऊन पाण्याची वाफ कमी होते. तसेच केर-कचरा पाण्यात पडत नाही. आज मात्र उपसा नसल्यामुळे टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही आहे.

चर्चच्या डाव्या बाजूस (उत्तरेला) बुरुज आहे. बालेकिल्ल्याची तटबंदी दगड केवळ एकमेकांवर रचून बनवलेली आहे, त्यात चूना वापरलेला नाही आहे. तटबंदी डाव्या हाताला ठेऊन खाली उतरारला सुरुवात केल्यावर २ मिनिटात आपण उत्तराभिमुख दरवाजापाशी येतो. या दरवाजाची कमान व बाजूचे बुरुज उध्वस्त झालेले आहेत. दरवाजातून खाली उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. खालच्या बाजूस मुख्य प्रवेशव्दार आहे. या दरवाजाची कमान व एका बाजूचा बुरुज उध्वस्त झालेला आहे. परंतू दरवाच्या आतील बाजूस असलेल्या देवड्या सुस्थितत आहेत. त्यातील उजव्या बाजूच्या देवडीत गणपती कोरलेला दगड ठेवलेला. एकेकाळी हा दगड प्रवेशव्दाराच्या कमानीच्या मध्यभागी होता. या दगडाला "कि स्टोन" म्हणतात. कमानीचे दगड एकमेकांमध्ये गुंफून मध्यभागी हा दगड बसविला जातो.

मुख्य प्रवेशव्दार पाहून झाल्यावर आलेल्या वाटेने परत न जाता डाव्या बाजूच्या (प्रवेशव्दाराकडे पाठ केल्यावर डाव्या बाजूला) पायर्‍यांच्या वाटेने वर चढायला सुरुवात करावी. पायर्‍या संपल्यावर सरळ जाणारी वाट सोडून डावीकडे जाणारी वाट पकडावी. (सरळ जाणारी वाट पोलिस चौकीकडे जाते.) समोरच्या डोंगरावर दाट झाडीत एक भगवा झेंडा दिसतो, त्या दिशेने चालायला सुरुवात करावी. मळलेल्या पायवाटेने १० मिनिटात आपण वेताळ मंदिरापाशी पोहोचतो. येथे २-२.५ फूट उंचीचा शेंदुर फासलेला दगड आहे, त्यावर पत्र्याची शेड आहे. वेताळ मंदिर पाहून आल्या वाटेने परत यावे. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. गडफेरी मारण्यासाठी ४५ मिनिटे लागतात.
पोहोचण्याच्या वाटा :
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ( J.N.P.T.) या महत्वाच्या बंदरामुळे उरण गाव प्रशस्त रस्त्याने देशाच्या इतर भागाशी जोडलेल आहे. मुंबई, ठाणे, पनवेल येथून दर तासाला उरणसाठी एसटी बसेस आहेत. इतर ठिकाणाहून येणार्‍यांनी पनवेल गाठावे. मुंबई, ठाणे व इतर ठिकाणांहून उरणला जाणार्‍या एसटी बसेस पनवेलला थांबतात. उरण- पनवेल हे अंतर ३० किमी आहे.

उरण एसटी स्थानकाच्या समोर दाट झाडीत लपलेला द्रोणागिरी डोंगर पसरलेला आहे. एसटी स्थानकाच्या समोर असणार्‍या रस्त्याने डाऊर नगरकडे चालत जावे. ५ ते १० मिनिटात आपण डोंगराच्या पायथ्याशी असणार्‍या झोपड्यांपाशी पोहोचतो. येथे उजव्या बाजूला ट्रान्सफॉंर्मर आहे, तर डाव्या बाजूची वाट झोपड्यां मधून प्रथम उजवीकडे व नंतर डावीकडे वळून डोंगरावर जाते. या ठळक पायवाटेने डोंगर चढायला सुरुवात केल्यावर ५ मिनिटात आपण कुंपणापाशी पोहोचतो. येथे ONGC ने "चेतावनी" देणारा फलक लावलेला आहे. कुंपण ओलांडल्यावर २ वाटा फूटतात, आपण उजव्या बाजूची वाट पकडावी. एकाच प्रकारच्या दाट झाडीतून हळूहळू चढत जाणार्‍या या वाटेने १० मिनिटात आपण डोंगराच्या उजव्या टोकाकडील धारेवर पोहोचतो. येथे डावीकडे वळून डोंगराच्या धारेवर चढायला सुरुवात करावी. पायथ्या पासून किल्ल्यावर जाण्यासाठी साधारणत: ४५ मिनिटे लागतात.
राहाण्याची सोय :
गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
उरण गावात जेवणाची सोय आहे.
पाण्याची सोय :
किल्ल्यात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, सोबत पाणी बाळगावे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पायथ्या पासून किल्ल्यावर जाण्यासाठी साधारणत: ४५ मिनिटे लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
द्रोणागिरी किल्ल्याचा ट्रेक सर्व ऋतूत करता येतो.
सूचना :
१)गडावरील पोलिस चौकीत आपल्या नावाची नोंद करून गड पहाण्यास जावे.
२)गडावरून ONGC प्लाण्टचे फोटो काढू नयेत.
3)पिण्याचे पाणी बरोबर न्यावे. गडावर पिण्याचे पाणी नाही.
४)फोटोग्राफीच्या दृष्टीने मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात जावे. खांदेरी उंदेरी ते मुंबई असा विस्तृत प्रदेश स्पष्ट दिसतो.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: D
 दांडा किल्ला (Danda Fort)  दार्‍या घाट (Darya Ghat)  दासगावचा किल्ला (Dasgaon Fort)  दातेगड (Dategad)
 दौलतमंगळ (Daulatmangal)  देहेरगड (भोरगड) (Dehergad (Bhorgad))  डेरमाळ (Dermal)  देवगडचा किल्ला (Devgad Fort)
 देवगिरी (दौलताबाद) (Devgiri (Daulatabad))  ढाक बहिरी (Dhak-Bahiri)  धाकोबा (Dhakoba)  धामणगाव गढी (Dhamangaon Gadhi)
 धारावी किल्ला (Dharavi Fort)  धर्मापूरी (Dharmapuri)  धारूर (Dharur)  धोडप (Dhodap)
 धोत्रीचा किल्ला (गढी) (Dhotri Fort (Gadhi))  द्रोणागिरी (Dronagiri)  डुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera))  दुंधा किल्ला (Dundha)
 दुर्ग (Durg)  दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort)  डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort))