मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

दुर्ग (Durg) किल्ल्याची ऊंची :  3900
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: दुर्ग - धाकोबा
जिल्हा : पुणे श्रेणी : मध्यम
नाणेघाट आणि जीवधनच्या दक्षिणेकडे एक उत्तुंग पर्वत रांग दिसून येते. उत्तुंग खड्या कातळ भिंती आणि कोकणात कोसळणारे एकाहून एक बेलाग कडे, अप्रतिम जंगल यांनी ही रांग सजलेली आहे. या डोंगर रांगेत कळसूबाई (५२०० फूट) , कुलंग (४८०० फूट), रतनगड (४२०० फूट), आजोबा पर्वत (४६०० फूट) ,हरिश्चंद्रगड (४७००फूट) , जीवधन (३८०० फूट ), दुर्ग किल्ला (३९०० फूट), सिध्दगड (३२०० फूट), नानाचा अंगठा अशी एकाहून एक ऊंच शिखर / किल्ले आहेत. नाणेघाट, दर्‍या घाट, साकुर्डी घाट, सादडे घाट, अहुपे घाट, माळशेज घाट इत्यादी घाट वाटा या डोंगररांगेत आहेत. याच रांगेतील एका डोंगरावर दुर्ग किल्ला आहे. दुर्ग या घाटमाथ्यावर असणार्‍या किल्ल्या जवळून खाली कोकणात असलेल्या पळू सोनावळे गावात जाणारी वाट आहे. पळू सोनावळे गावातील गणपती गडद लेणी याच घाट मार्गावर आहेत. या घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी ‘दुर्ग’ किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती .
दुर्गवाडी ते दुर्ग - धाकोबा - आंबोली हा पूर्ण दिवसाचा ट्रेक आहे
20 Photos available for this fort
Durg
इतिहास :
कल्याण बंदरात उतरणारा माल मुरबाड , वैशाखरे मार्गे विविध घाट मार्गांनी सह्याद्रीची रांग ओलांडून घाट माथ्यावरील बाजारपेठेत जात असे. या घाट मार्गांवर नजर ठेवण्यासाठी प्राचिन काळापासून अनेक किल्ले बांधण्यात आले. या किल्ल्यांचा मुख्य उद्देश म्हणजे या व्यापारी मार्गांचे रक्षण करणे , त्यावर नजर ठेवणे. दुर्ग किल्ल्याचा उपयोग ही टेहळ्णीसाठी होत असावा.

पहाण्याची ठिकाणे :
दुर्ग किल्ल्यावर दुर्गादेवीचे मंदिर आहे. मंदिरा समोरची वाट दाट जंगलातून १० मिनिटात दुर्ग किल्ल्याच्या माथ्यावर घेऊन जाते. वाटेत काही कातळ कोरीव पायर्‍या लागतात. उध्वस्त वास्तूचे काही चौथरे सोडल्यास कोणतेही अवशेष नाहीत. दोन ठिकाणी दगडाखाली असलेल्या पोकळीत पाणी साचते. ती पाणी साठवण्याची जागा म्हणून गावकरी दाखवतात. गडावरुन पश्चिमेला धाकोबा किल्ला दिसतो , तर पूर्वेला सिध्दगड ते भिमाशंकर ही डोंगररांग दिसते. गडमाथ्यावरुन उतरून मंदिरापाशी येऊन उजव्या बाजूला कोकण कड्यापर्यंत चालत गेल्यावर खाली कोकणातले पळू सोनावळे गाव दिसते. या ठिकाणी वनखात्याने रेलिंग लावलेले आहे. या कड्याच्या बाजूनेच धाकोबाला जाणारी वाट आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
दुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक दुर्गवाडीतून जाणारा सोपा मार्ग आणि दुसरा मार्ग आंबोली ते धाकोबा ते दुर्ग हा चढाईचा ट्रेक पूर्ण दिवसाचा आहे.

१) जुन्नर - हातवीज एसटीची बस दिवसातून २ वेळा सकाळी १०.३० आणि दुपारी ४.०० वाजता आहे. याने हातवीज फ़ाट्यावर उतरुन चालत दुर्गवाडी आणि पुढे दुर्ग किल्ला हे ३ किलोमीटरचे अंतर गाठायला पाऊण तास लागतो. खाजगी वहानाने थेट दुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी जाता येते. येथे वनखात्याने उद्यान बनवलेले आहे. येथून सिमेंटमध्ये बांधलेल्या पायर्‍या चढून ५ मिनिटात दुर्गादेवीच्या मंदिरात पोहोचतो. दर मंगळवारी येथे भाविकांची गर्दी असते.

२) जुन्नर - आपटाळे मार्गे आंबोली गावात जाण्यासाठी जुन्नरहून एसटीची बस दर तासाला आहे. आंबोली गावा़च्या अलिकडे उच्छिल गाव आहे तेथपर्यंत जाण्यासाठी जीप्स आहेत. आंबोली गावात रस्ता संपतो तेथून एक वाट दार्‍या घाटाकडे जाते. या वाटेने थोडे चालल्यावर डावीकडे जाणारा फाटा फुटतो. या वाटेने दार्‍या घाट उजवीकडे ठेवून चढत राहील्यास थोड्याच वेळात एक गुहा दिसते. या वाटेने काही डोंगर चढत उतरत आपण २ तासात ढाकेश्वराच्या मंदिरापाशी पोहोचतो . मंदिरापासून धाकोबा किल्ल्यावर जाण्यासाठी अर्धातास लागतो. धाकोबा किल्ल्यापसून दुर्ग किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी २ ते ३ तास लागतात. आंबोली ते धाकोबा ते दुर्ग हा ट्रेक पूर्ण दिवसाचा आहे. या मार्गाने चढाई मोठ्या प्रमाणावर करावी लागते.

दुर्ग - धाकोबा - आंबोली हा पूर्ण दिवसाचा ट्रेक आहे. पण यात आपण धाकोबा किल्ल्या नंतर आंबोली गावापर्यंत उतरत असल्याने . आंबोली - धाकोबा - दुर्ग या ट्रेक पेक्षा कमी श्रम लागतात.

वरील दोन्ही मार्गाने दुर्ग धाकोबा हे किल्ले पाहायचे असल्यास गावातून वाटाड्या घेऊन जाणे आवश्यक आहे.
राहाण्याची सोय :
दुर्गच्या पायथ्याशी असणार्‍या दुर्गादेवीच्या मंदिरात ५ जणांची राहण्याची सोय होते
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही, आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
दुर्गादेवीच्या मंदिराच्या बाजूलाच पिण्याच्या पाण्याची तळी आहेत.
सूचना :
धाकोबा आणि दुर्ग हे किल्ले पाहाण्यासाठी वाटाड्या घेऊन जाणे आवश्यक आहे.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: D
 दांडा किल्ला (Danda Fort)  दार्‍या घाट (Darya Ghat)  दासगावचा किल्ला (Dasgaon Fort)  दातेगड (Dategad)
 दौलतमंगळ (Daulatmangal)  देहेरगड (भोरगड) (Dehergad (Bhorgad))  डेरमाळ (Dermal)  देवगडचा किल्ला (Devgad Fort)
 देवगिरी (दौलताबाद) (Devgiri (Daulatabad))  ढाक बहिरी (Dhak-Bahiri)  धाकोबा (Dhakoba)  धारावी किल्ला (Dharavi Fort)
 धर्मापूरी (Dharmapuri)  धारूर (Dharur)  धोडप (Dhodap)  धोत्रीचा किल्ला (गढी) (Dhotri Fort (Gadhi))
 द्रोणागिरी (Dronagiri)  डुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera))  दुंधा किल्ला (Dundha)  दुर्ग (Durg)
 दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort)  डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort))