मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

घनगड (Ghangad) किल्ल्याची ऊंची :  3000
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: सुधागड
जिल्हा : पुणे श्रेणी : मध्यम
मुळशी धरणाच्या पश्चिमेला असलेल्या मावळाला ‘कोरसबारस’ मावळ म्हणतात. याच मावळात येणारा हा घनगड हा आड बाजूला असलेला छोटेखानी किल्ला आहे.लोणावळ्याच्या परीसरात असल्यामुळे मुंबई - पुण्याहून एका दिवसात हा किल्ला पाहून परत येता येते. प्राचीन काळापासून कोकणातल्या बंदरांमध्ये उतरणारा माल घाटावरील बाजारपेठांमध्ये आणला जात असे. या मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदरापासून बाजारपेठे पर्यंत किल्ल्यांची साखळी बनवलेली असे. कोकणातील पाली गावातून घाटमाथ्यावरील लोणावळा - खंडाळा परीसरात येण्यासाठी प्राचिन काळापासून दोन घाटमार्ग आहेत.
१) पाली - सरसगड - ठाणाळे लेणी - वाघजाई घाट - तैलबैला - कोरीगड.
२) पाली - सरसगड - सुधागड - सवाष्णीचा घाट - घनगड - तैलबैला - कोरीगड.
घनगड किल्ल्याबद्दल इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. याचा उपयोग टेहळणीसाठी व कैदी ठेवण्यासाठी केला जात होता.
8 Photos available for this fort
Ghangad
पहाण्याची ठिकाणे :
एकोले गावातून मळलेली पायवाट किल्ल्यावर जाते. या पायवाटेने १० मिनिटे चढून गेल्यावर उजव्या बाजूला एक वाट झाडीत जाते. येथे पूरातन शंकर मंदिराचे अवशेष आहेत.त्याबरोबर शिवपिंड, नंदी ,वीरगळ व काही तोफगोळे पहायला मिळतात. हे मंदिराचे अवशेष पाहून पुन्हा मुळ पायवाटेवर येऊन वर चढून गेल्यावर ५ मिनिटात आपण गारजाई देवी मंदिरापाशी पोहोचतो. या मंदिराच्या दरवाजाच्या डाव्या बाजूच्या भिंतीत शिलालेख कोरलेला आहे. मंदिरात गारजाई देवीची मूर्ती व इतर मुर्त्या आहेत. मंदिराच्या समोर दिपमाळ आहे बाजूला काही वीरगळ पडलेले आहेत. मंदिरापासून वर चढून गेल्यावर ५ मिनिटात आपण पूर्वाभिमुख प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश करतो.

प्रवेशव्दारासमोर कातळात कोरलेली गुहा आहे. यात ४-५ जणांना रहाता येईल. प्रवेशव्दारातून आत आल्यावर डाव्या बाजूस एक प्रचंड मोठा खडक वरच्या कातळातून निसटून खाली आलेला आहे. हा दगड कातळाला रेलून उभा राहील्यामुळे येथे नैसर्गिक कमान तयार झालेली आहे. या कमानीतून पुढे गेल्यावर वरच्या बाजूस कातळात कोरलेली छोटी गुहा आहे. गुहेच्या खालून पुढे गेल्यावर एक अरूंद निसरडी पायवाट कातळकड्याला वळसा घालून पुढे जाते. या वाटेच्या शेवटी कातळात कोरलेले टाक पहायला मिळते. ते पाहून परत प्रवेशव्दारापाशी यावे. प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूला १५ फुटाच्या कडा आहे. या ठिकाणी पूर्वी पायर्‍या होत्या. त्या इग्रजांनी सुरुंग लावून उध्वस्त केल्या आहेत. येथे आता लोखंडी शिडी बसवलेली आहे. शिडीच्या शेवटच्या पायरी समोरच कातळात कोरलेले टाक आहे. यातील पाणी गार व चवदार असून बारमाही उपलब्ध असते.

शिडी चढून गेल्यावर कड्याला लागून कातळात कोरलेल्या पायर्‍यांची पायावाट लागते. या वाटेने पुढे गेल्यावर आपण घनगड व बाजूचा डोंगर यामधील खिंडीच्या वरच्या भागात पोहोचतो. या ठिकाणी कातळात कोरलेली एक गुहा आहे. हीचा उपयोग टेहळ्यांना बसण्यासाठी होत असे. ही गुहा पाहून परत पायवाटेवर येऊन १०-१२ पायर्‍या चढून गेल्यावर उजव्या बाजूला कातळात कोरलेली गुहा दिसते. गुहेच्या पुढे पाण्याची ४ कोरलेली टाक आहेत. त्यातील पहीली २ टाकं खांब टाकी आहेत. तिसर टाक जोड टाक आहे. चौथ टाक छोट असून त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.

टाकी पाहून परत पायवाटेवर येऊन १०-१२ पायर्‍या चढून गेल्यावर डाव्या बाजूला पायवाटेच्या वरच्या बाजूस कातळात कोरलेली गुहा दिसते. हीचा उपयोग टेहळ्यांना बसण्यासाठी होत असे. येथून १५ पायर्‍या चढून गेल्यावर आपण पूर्वाभिमुख प्रवेशव्दारातून किल्ल्याच्या माथ्यावर प्रवेश करतो. किल्ल्याचा माथा छोटा आहे. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला असलेल्या पायवाटेने थोड पुढे गेल्यावर कोरड पडलेल पाण्याच टाक आहे. त्याच्या वरच्या बाजूला पायर्‍या असलेल पाण्याच टाक आहे. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. पुढे डोंगराच्या टोकाला वास्तूचे अवशेष आहेत. गडमाथ्यावर झेंड्याच्या आजूबाजूला वास्तुंचे अवशेष आहेत. प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूला प्रचंड मोठा बुरुज आहे. त्यात तोफेसाठी झरोके आहेत. हा बुरुज पाहून प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते.
किल्ल्यावरून सुधागड, सरसगड आणि तैलबैलाची भिंत हा परिसर दिसतो. तसेच नाणदांड घाट ,सवाष्णीचा घाट ,भोरप्याची नाळ या कोकणातील घाटवाटा दिसतात.

किल्ल्यावर "शिवाजी ट्रेल" या संस्थेने अवघड ठिकाणी शिडी व लोखंडाच्या तारा बसवलेल्या आहेत. तसेच किल्ल्याची डागडुजी करून माहीती फलक लावलेले आहेत.
पोहोचण्याच्या वाटा :
किल्ल्यावर जाण्यासाठी एकच वाट आहे अणि ती एकोले या किल्ल्याच्या पायथ्याच्य गावातूनच वर जाते. एकोले गावात जाण्यासाठी मुंबई आणि पुण्याहून लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भांबुर्डेकडे जाणारी एस. टी पकडावी. लोणावळा ते भांबुर्डे हे अंतर ३२ कि.मी चे आहे. भांबुर्डे गावातून चालत १५ मिनिटात एकोले गावात पोहोचता येते. एकोले गावातूनच किल्ल्यावर जाण्याचा रस्ता आहे. गावातील हनुमान मंदिराच्या विरुध्द बाजूस (रस्त्याच्या डाव्या बाजूला) गडावर जाणारी पायवाट आहे. ही वाट थेट किल्ल्यावर जाते.

खाजगी वहानाने घनगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणार्‍या एकोले गावात जाण्यासाठी प्रथम लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भूशी डॅम, आय.एन.एस.शिवाजी मार्गे ऍम्बी व्हॅलीच्या दिशेने जावे. लोणावळ्यापासून २० किमीवर असलेल्या पेठशहापूर गावातून (हे कोरीगडाच्या पायथ्याचे गाव आहे.) उजव्या बाजूचा फाटा भांबुर्डे गावाकडे जातो. येथून खडबडीत डांबरी रस्ता १२ किमीवरील भांबुर्डे गावात जातो. भांबुर्डे गावात मुख्य रस्ता सोडून उजव्या बाजूचा रस्ता पकडावा, हा रस्ता ३ किमीवरील एकोले गावात जातो.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर गुहेत ४-५ जणांची, गारजाई मंदिरात १० लोकांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही, आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याचे पाणी शिडी जवळील टाक्यात आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
एकोले गावातून घनगडावर जाण्यासाठी पाऊण तास लागतो.
सूचना :
१) मुंबई - पुण्याहून पहाटे खाजगी वहानाने निघाल्यास घनगड व कोरीगड हे दोनही किल्ले एका दिवसात पहाता येतात.
२) कोरीगडाची माहीती साईटवर दिलेली आहे.
३) पावसाळ्यात निसरड्या वाटेमुळे घनगडावर जाणे टाळावे.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: G
 गडगडा (घरगड) (Gadgada (Ghargad))  गगनगड (Gagangad)  किल्ले गाळणा (Galna)  गंभीरगड (Gambhirgad)
 गंधर्वगड (Gandharvgad)  गाविलगड (Gavilgad)  घनगड (Ghangad)  घारापुरी (Gharapuri)
 घोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort)  घोसाळगड (Ghosalgad)  घोटवडा किल्ला (गोतारा किल्ला) (Ghotawada Fort (Gotara))  गोवा किल्ला (Goa Fort)
 गोपाळगड (Gopalgad)  गोरखगड (Gorakhgad)  गोरखगड(मनमाड) (Gorakhgad(Manmad))  गोवळकोट (Gowalkot)
 गुणवंतगड (Gunawantgad)