मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

गुणवंतगड (Gunawantgad) किल्ल्याची ऊंची :  2700
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: पाटण, सातारा
जिल्हा : सातारा श्रेणी : मध्यम
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात गुणवंतगड नावाचा काहीसा अपरीचित किल्ला आहे. कराड - चिपळूण या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली असावी. किल्ल्याचा आकार त्यावरील वास्तूंचे अवशेष, पाण्याची व्यवस्था पाहाता हा केवळ टेहळणीचा किल्ला असावा.गुणवंतगडाच्या पायथ्याशी असलेल्या मोरगिरी गावामुळे या किल्ल्याला मोरगिरीचा किल्ला या नावानेही ओळखतात.

दातेगड, गुणवंतगड आणि वसंतगड हे तिन्ही किल्ले खाजगी वहानाने एका दिवसात पाहाता येतात.
10 Photos available for this fort
Gunawantgad
पहाण्याची ठिकाणे :
गुणवंतगडाच्या पायथ्याचे गाव मोरगिरी आहे. मोरगिरी गावाच्या मागे किल्ल्याचा डोंगर वायव्य - ईशान्य पसरलेला आहे. गावातून किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भैरवनाथ मंदिरापर्यंत पक्का रस्ता आहे. भैरवनाथाची यात्रा दरवर्षी डिसेंबर महिन्यात भरते. मंदिराच्या समोरील चौथऱ्यावर वीरगळ आणि समाधीचे काही दगड ठेवलेले आहेत. मंदिरा समोर एक तोफ उलटी पुरुन ठेवलेली आहे. हे अवशेष पाहून आणि मंदिर परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीतून पाणी भरुन घेऊन मंदिराच्या मागच्या बाजूने बाहेर पडावे.

मंदिराच्या मागून किल्ल्यावर जाणारी वाट आहे. वाट मळलेली आणि ठळक आहे. या वाटेने आपण वायव्य - ईशान्य पसरलेल्या किल्ल्याच्या कातळ टोपीच्या साधारण मध्यावरुन किल्ल्यावर प्रवेश करतो. पायथ्यापासून अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या कातळ टोपीच्या खाली पोहोचतो. इथून डावीकडे थोडे अंतर चालून गेल्यावर एक कातळात खोदलेले टाके आहे. पण सध्या ते बुजलेले आहे. टाके पाहून पुन्हा मुख्य पायवाटेवर येउन चढायला सुरुवात केल्यावर कातळात कोरलेल्या ओबडधोबड पायऱ्या दिसतात. त्या चढून गेल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. गडावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला किल्ल्याच्या सर्वोच्च भागावर भगवा झेंडा लावलेला आहे. त्या झेंड्याच्या दिशेने चालत जाताना उजव्या बाजूला (आपण चढून आलो त्याच्या वरच्या बाजूला) एक पाण्याचे कोरडे टाके आहे . पुढे गेल्यावर डाव्या बाजूला पाण्याचा मोठा खोल तलाव आहे. यात पाणी टिकत नसल्याने तो कोरडा आहे. तलावाच्या वरच्या बाजूस दोन वास्तूंचे अवशेष आहेत. त्यापैकी दुसऱ्या वास्तूच्या अवशेषांवरच झेंडा उभारलेला आहे. हा किल्ल्याचा सर्वोच्च भाग आहे येथून पूर्ण किल्ला दिसतो. किल्ल्याची ईशान्य बाजू बघून झाल्यावर आल्या वाटेने परत गदमाथ्यावर प्रवेश केला त्या ठिकाणी जाऊन किल्ल्याच्या वायव्य टोकाकडे जावे. वाटेत दोन उध्वस्त वास्तूंचे अवशेष दिसतात. या वास्तूंच्या पुढे एक पाण्याचे कोरडे टाक आणि एक कोरडा तलाव आहे. किल्ल्याच्या वायव्य टोकावर त्यामानाने बऱ्यापैकी मोठी जागा आहे. या वायव्य टोकावरून मागे फिरून प्रवेश केला त्या ठिकाणी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते . किल्ला पाहायला अर्धा तास लागतो.
पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई - कोल्हापूर रस्त्यावरील उंब्रज गाठावे. उंब्रज वरुन उंब्रज - चिपळूण रस्ता आहे. या रस्त्यावर उंब्रज पासून २८ किलोमीटरवर पाटण हे तालुक्याचे गाव आहे. पाटणहून मोरेगिरी हे गुणवंतगडच्या पायथ्याचे गाव ८ किलोमीटरवर आहे. पाटणहून मोरगिरीला जाण्यासाठी भरपूर एसटी बसेस तसेच खाजगी जीप्स आहेत. गुणवंतगडाच्या पायथ्याचे गाव मोरगिरी आहे. मोरगिरी गावाच्या मागे किल्ल्याचा डोंगर वायव्य - ईशान्य पसरलेला आहे. गावातून किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भैरवनाथ मंदिरापर्यंत पक्का रस्ता आहे. खाजगी वहानाने थेट भैरवनाथ मंदिराजवळ जाता येते. अन्यथा मोरगिरी गावाच्या चौकात उतरुन १० मिनिटात भैरवनाथ मंदिरात पोहोचता येते. मंदिराच्या मागून किल्ल्यावर जाणारी वाट आहे. वाट मळलेली आणि ठळक आहे.

राहाण्याची सोय :
गडावर राहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय मोरगिरी गावातील हॉटेलात होऊ शकते.
पाण्याची सोय :
गडावर पिण्याचे पाणी नाही. भैरवनाथ मंदिरात पाण्याची टाकी आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पायथ्या पासून अर्धा तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
ऑक्टोबर ते मार्च
डोंगररांग: Patan, Satara
 दातेगड (Dategad)  गुणवंतगड (Gunawantgad)