मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

हनुमंतगड (निमगिरी) (Hanumantgad(Nimgiri)) किल्ल्याची ऊंची :  3450
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: बालाघाट रांग
जिल्हा : पुणे श्रेणी : मध्यम
सह्याद्रीच्या बालाघाट रांग ही पश्चिम पूर्व पसरलेली आहे. ती नाशिक, नगर आणि पूणे या जिल्ह्यांना छेदत पुढे जाते. या रांगेत अनेक दुर्गपुष्प आहेत, अनेक घाट वाटा आहेत. माळशेज, दर्‍याघाट, नाणेघाट, साकुर्डीघाट असे अनेक घाट आहेत तर हरिश्चंद्रगड, कुंजरगड, पाबर, कलाड, निमगिरी, हडसर आणि भैरव सारखे किल्ले आहेत. यातील हरिश्चंद्रगडाच्या समोर निमगिरी आणि हनुमंतगड हे किल्ले आहेत. या किल्ल्यांच्या कातळात खोदलेल्या पायर्‍या वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

निमगिरी आणि हनुमंतगड हे दोन जोड किल्ले एका खिंडीने वेगळे झालेले आहेत. दोन्ही किल्ले पाहायला चार तास लागतात.


निमगिरीची माहिती साईटवर दिलेली आहे.
6 Photos available for this fort
Hanumantgad(Nimgiri)
Hanumantgad(Nimgiri)
Hanumantgad(Nimgiri)
पहाण्याची ठिकाणे :
निमगिरी आणि हनुमंतगड किल्ल्याचे दोन डोंगर एका खिंडीने वेगळे झालेले आहेत. आपली चढाई दोन्ही डोंगरांच्या मधून होते. खांडीपाड्याच्या प्राथमिक शाळे पुढील मैदानातून इलेक्ट्रीक टॉवरच्या दिशेने चढत जावे. टॉवरच्या वरच्या टप्प्यावर चढुन गेल्यावर शेतजमिनीचे तुकडे आहेत. या टप्प्यावर पायवाट सोडून डाव्या बाजूला गेल्यावर उघड्यावर असलेली एक सुंदर मुर्ती आणि मंदिराचे काही अवशेष दिसतात. त्याच्या समोरच एक मोठे पाण्याचे टाक आहे. पुन्हा पायवाटेवर येऊन चढायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला झाडीत लपलेली गणपतीची मुर्ती, पिंड आणि नंदी पाहायला मिळतो. थोडे पुढे चढुन गेल्यावर एका पुरातन वृक्षाखाली हनुमंताची मुर्ती आहे. समोरच एक समाधीचा दगड आहे. त्यावर शिल्प कोरलेल आहे. पुढे थोड्याच अंतरावर ४२ वीरगळ एका रांगेत ठेवलेल्या पाहायला मिळतात. त्यातील काही वीरगळींवर शिलालेख कोरलेले आहेत.

वीरगळी पाहून खिंडीच्या दिशेने अर्धातास चढून गेल्यावर उजवीकडच्या डोंगराच्या कातळात गुहा दिसतात. या गुहा टेहळणीसाठी बनवलेल्या आहेत. इथून कातळात खोदलेल्या पायर्‍यांची वाट आहे. पण पायर्‍या तुटल्या असल्यामुळे वाट बरीच अडचणीची झालेली आहे. सोबत रोप असल्यास या वाटेने जाता येते. या वाटेच्याच खाली एक पायवाट वळणा वळणाने निमगिरी आणि हनुमंतगड यांच्या मधिल खिंडीत जाते. या वाटेने आपण १५ मिनिटात खिंडीत पोहोचतो. खिंडीच्या उजव्या बाजूला निमगिरी तर डाव्या बाजूला हनुमंतगड आहे.

डाव्या बाजूला असलेल्या डोंगरावर चढतांना मधेच कातळ कोरीव या पायर्‍या लागतात. खिंडीतून १० मिनिटात हनुमंतगडाच्या गडमाथ्यावर पोहोचता येते. हनुमंतगडाचे प्रवेशव्दार आणि त्याच्या बाजूचे बुरुज शाबुत आहेत. पण प्रवेशव्दार कमानी पर्यंत मातीत गाडलेले आहे. प्रवेशव्दारा वरील व्दारशिल्प ओळखण्या पलिकडे झिजलेल आहे. प्रवेशव्दार पाहुन प्रवेशव्दारा मागील टेकडी न चढता उजव्या बाजूला तटबंदीच्या कडेकडेने चालत गेल्यावर एक भव्य टाक पाहायला मिळत. टाक पाहून टेकडी चढुन गेल्यावर उध्वस्त घरांचे अवशेष दिसतात. त्याचेच दगड वापरुन गडावर येणार्‍या गुराख्यांनी तात्पुरता निवारा उभारलेला आहे. उध्वस्त वास्तू पाहून पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजूला पठार आहे. त्या पठारावर तीन पाण्यची टाकी आहेत. ती पाहून प्रवेशव्दाराकडे येतांना वाड्याच्या खालच्या बाजूला एक सुकलेल टाक दिसते. ते पाहून दरवाजापाशी परत आल्यवर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. गडावरून हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला आणि टोलारखिंड दिसते. समोर चावंडचा किल्लाही दिसतो. संपूर्ण किल्ला फिरण्यास अर्धा तास लागतो.

किल्ला उतरतांना वीरगळींपाशी येउन उजव्या बाजूस चालत गेल्यावर काळूबाईचे मंदिर आहे. मंदिर मुक्कामासाठी योग्य आहे. मंदिराच्या मागे २ वीरगळी आहेत.
पोहोचण्याच्या वाटा :
हनुमंतगड - निमगिरीला जायचे असल्यास कल्याण - मुरबाड मार्गे नगर; आळेफाटा किंवा जुन्नर अशी कुठलीही एसटी पकडावी. पुण्याहून येणार्‍यांना जुन्नर शिवाय पर्याय नाही. माळशेज घाट पार केल्यावर दोन किमी वर खुबी फाटा आहे. त्याच्या पुढे ४ किमी वर वेळखिंड लागते. वेळखिंड संपली की पारगाव नावाचे गाव आहे. या पारगाव वरुन एक रस्ता उजवीकडे जातो. तो बोरवाडी - मढ मार्गे खांडीपाड्यार्पंत जातो. हाच रस्ता पुढे हडसरला पण जातो. पारगाव पासून खांडीपाडा ७ किमी वर आहे. हेच किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. खांडीपाड्यापर्यंत खाजगी वहानाने जाता येते. एसटीची बस जुन्नरहून १ किमीवरील निमगिरी गावापर्यंत येते. (एसटीचे वेळापत्रक खाली दिलेले आहे.) . तेथुन चालत खांडीपाड्यापर्यंत जावे लागते.

निमगिरी आणि हनुमंतगड किल्ल्याचे दोन डोंगर एका खिंडीने वेगळे झालेले आहेत. आपली चढाई दोन्ही डोंगरांच्या मधून होते. खांडीपाड्याच्या प्राथमिक शाळे पुढील मैदनातून इलेक्ट्रीक टॉवरच्या दिशेने चढत जावे. पुढे एका पुरातन वृक्षाखाली हनुमंताची मुर्ती आणि समोरच ४२ वीरगळ एका रांगेत ठेवलेल्या पाहायला मिळतात. तेथुन खिंडीच्या दिशेने अर्धातास चढून गेल्यावर उजवीकडच्या डोंगराच्या कातळात गुहा दिसतात. इथून पुढे जाणारी वाट कातळात खोदलेल्या पायर्‍यांची आहे. पण पायर्‍या तुटल्या असल्यामुळे वाट बरीच अडचणीची झालेली आहे. सोबत रोप असल्यास या वाटेने जाता येते. या वाटेच्याच खाली एक वाट वळणा वळणाने निमगिरी आणि हनुमंतगड यांच्या मधिल खिंडीत जाते. या वाटेने आपण १५ मिनिटात खिंडीत पोहोचतो. खिंडीच्या उजव्या बाजूला निमगिरी तर डाव्या बाजूला हनुमंतगड आहे. डाव्या बाजूला असलेल्या डोंगरावर चढतांना मधेच कातळ कोरीव या पायर्‍या लागतात. खिंडीतून १० मिनिटात हनुमंतगडाच्या गडमाथ्यावर पोहोचता येते.
राहाण्याची सोय :
काळुबाई मंदिरात १०, निमगिरी किल्ल्यावर गुहेत ६ लोक राहू शकतात.
जेवणाची सोय :
आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
निमगिरीवर पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
खांडीपाड्यापासून १ तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
डोंगररांग: Balaghat
 आजोबा (आजा पर्वत) (Ajoba)  औसा (Ausa)  भैरवगड(कोथळे) (Bhairavgad(kothale))  हनुमंतगड (निमगिरी) (Hanumantgad(Nimgiri))
 कुंजरगड (कोंबडगड) (Kunjargad(Kombadgad))  सालोटा (Salota)  उदगीर (Udgir)