मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

हरगड (Hargad) किल्ल्याची ऊंची :  4420
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: बागलाण
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम
साल्हेर - मुल्हेर किल्ले महाराष्ट्रातील गडप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहेत. यातील मुल्हेर गावात गेल्यावर आपल्याला हरगडचे दर्शन होते. मुल्हेर गावातून समोर दिसणारा मुल्हेर, डावीकडे मोरागड आणि उजवीकडचा हरगड किल्ला होय. हरगडाची उंची मुल्हेरपेक्षा थोडी जास्त आहे.
2 Photos available for this fort
Hargad
Hargad
Hargad
पहाण्याची ठिकाणे :
हरगडाचा गडमाथा प्रशस्त आहे. मुल्हेर माचीवरुन येणार्‍या वाटेने गडावर प्रवेश करताना तीन दरवाजे लागतात. सगळ्या दरवाजांची पडझड झालेली आहे. दरवाजा असल्याच्या खुणा केवळ शिल्लक आहेत. सर्वात शेवटच्या दरवाजाने गडावर प्रवेश केल्यावर समोरच महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या समोर चार दगडी तोफगोळे पडलेले आहेत.

मंदिरासमोरुन दोन वाटा फ़ुटतात. डावीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर पाण्याचे एक टाके लागते. तेथेच समोर घरांचे व वाड्याचे अवशेष दिसतात. पाण्याच्या टाक्याच्या खालून एक वाट खाली उतरते. या वाटेने खाली उतरल्यावर आपण एका तळ्याजवळ पोहोचतो. तळ्याच्या मागच्या बाजूला एक गुप्त दरवाजा आहे. हे सर्व पाहून पुन्हा मंदिरापाशी परत यावे. आता उजवीकडची वाट पकडावी आणि गडाच्या दुसर्‍या टोकाला पोहोचावे. गडाच्या या टोकावर भली मोठी १४ फ़ूट लांबीची तोफ़ पडलेली दिसते. एवढी मोठी तोफ़ किल्ल्यावर कशी आणली असेल हे एक कोडेच आहे. गडावरुन मुल्हेर गडाची माची, मोरागड, न्हावीगड, मांगीतुंगी आणि साल्हेर असा सगळा परिसर दिसतो. गडमाथा फ़िरण्यास २ तास पुरतात
पोहोचण्याच्या वाटा :
हरगड किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा अस्तित्वात आहेत. या दोन्ही वाटा मुल्हेरवाडी गावातूनच जातात. मुल्हेरवाडी गावात पोहोचण्यासाठी नाशिक मार्गे ९५ किमी वरील सटाणा गाव गाठावे. सटाण्याहून २५ किमी वरील ताहाराबादला जावे. ताहाराबाद गावातून ७.५ किमी वरील मुल्हेरवाडीला जाण्यासाठी एसटी किंवा जीप मिळतात. मुल्हेरवाडी गाव ते किल्ल्याचा पायथा यात २ कि.मी चे अंतर आहे. गावातून २५ मिनिटे चालत गेल्यावर डावीकडे एक घर लागते आणि समोरच वडाचे एक झाड दिसते. झाडापासून सरळ पुढे जावे, दहा मिनिटांतच धनगरवाडी लागते. धनगरवाडी वरून जाणारी वाट पकडावी. साधारण ४५ मिनिटांनी २ वाटा फुटतात, एक वाट सरळ, तर दुसरी उजवीकडे वळते. उजवीकडे जाणार्‍या वाटेने ४५ मिनिटांत मुल्हेर माची आणि हरगड यांच्या मधील खिंडीत पोहोचता येते. या खिंडीतून डावीकडे मुल्हेर तर उजवीकडे हरगड लागतो. या खिंडीत डावीकडून मुल्हेरच्या गणोश मंदिराजवळून येणारी वाट सुध्दा येऊन मिळते. येथून पुढे अर्धा तास चालत गेल्यावर आपण एका घळी पाशी पोहचतो. या घळीतून वर चढल्यावर आपण हरगडाचे पहिले प्रवेशद्वार गाठू शकतो. संपूर्ण घळ पार करण्यास १ तास लागतो.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याचा तलाव आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
मुल्हेरवाडी गावातून हरगडावर जाण्यास ३ तास लागतात.
सूचना :
१) साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरागड, हरगड हे आसपासचे किल्ले ३ दिवसात पाहाता येतात.
२) साल्हेर, सालोटा, मुल्हेर, हरगड यांची माहिती साईटवर दिलेली आहे.
डोंगररांग: Baglan
 चौल्हेर (Chaulher)  हरगड (Hargad)  मांगी - तुंगी (Mangi-Tungi)  मोरागड (Moragad)
 मुल्हेर (Mulher)  न्हावीगड (Nhavigad)  साल्हेर (Salher)