मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

हातगड (Hatgad) किल्ल्याची ऊंची :  3500
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: अजंठा सातमाळ
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम
सुरगणा हे नाशिक मधील एक तालुक्याचे गाव आहे, सह्याद्रीच्या पूर्व भागातील एका डोंगररांगेची सुरुवात याच तालुक्या पासून होते. यालाच "सातमाळ रांग" असे म्हणतात. याच रांगेच्या उपशाखेवर एक छोटासा किल्ला आहे, त्याचे नाव "हातगङ".

11 Photos available for this fort
Hatgad
Hatgad
Hatgad
पहाण्याची ठिकाणे :
गडावर प्रवेश करण्यापूर्वी चार दरवाजे लागतात. पहिल्या दरवाज्याच्या अगोदरच उजवीकडे वरच्या बाजूला कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. येथेच कातळात कोरलेली हनुमानाची मूर्ती आहे. गडाच्या पहिल्या दरवाज्याचे फक्त खांब शिल्लक आहेत. दरवाजाच्या बाजूला शरभ शिल्प आहेत. या दरवाज्या आतील बाजूस दोन शिलालेख कोरलेले आहेत. या दरवाज्यातून थोडे वर चढल्यावर आपण दुसर्‍या संपूर्ण कातळातून खोदलेल्या बोगद्या सारख्या दरवाज्यातून आत शिरतो. या दरवाज्याची ठेवण हरीहर किल्ल्याच्या दरवाज्या सारखी आहे. या दरवाज्याच्या बाजूला एक गुहा कोरलेली आहे. यात पाण्याची तीन टाकी आहेत. या दरवाज्यातून थोडे वर गेल्यावर डाया बाजूच्या भिंतीवर चढून गेल्यावर आपण एका बुरुजावर येतो. या भागाला राणीचा बगिचा म्हणतात. येथुन थोडे पुढे चालत गेल्यावर उजव्या बाजूच्या कतळावर कोरलेला संस्कृत आणि प्राकृत भाषेतला देवनागरी लिपीतील १६ ओळींचा शिलालेख पाहायला मिळतो.

*हातगड किल्ला नाशिकच्या दुर्ग अभ्यासक श्री सुदर्शन कुलथे यांना सापडलेल्या अप्रकाशित शिलालेखाचे वाचन* -

*शिलालेख असलेला किल्ला* - हातगड
*तालुका* - सुरगाणा, *जिल्हा* - नाशिक
*शिलालेखाचे स्थळ* - हातगड किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडून पश्चिमेकडे वर जाताना मार्गावरून डावीकडे
(स्थानिकांच्या भाषेत) 'राणीचा बाग' म्हणून असलेल्या बुरूजावरून 15 मीटर अंतरावर...
*दिशा* - दक्षिण
*लिपी* - देवनागरी
*भाषा* - संस्कृत (मिश्रीत मराठी)
*प्रकार* - कोरीव
*शिलालेखाचा आकार* - (उभा) आयताकृती
*आडवी लांबी* (रूंदी) - 2 फूट 4 इंच (28 इंच)
*उंची* - 4 फूट
*शिलालेखाचे जमिनीपासूनचे अंतर* - 6 फूट 6 इंच
*शिलालेखातील अक्षरांची उंची* - 3 इंच
*एकूण ओळी* - 16

*शिलालेखाचे वाचन* -
*_1. स्वस्ति श्री नृप विक्र मार्क स (स्य)_*
*_2. ....ती ... शाळिवाहन सकें_*
*_3. 1469 ... संवत्सरे आषा_*
*_4. ढ क्षय 11 भौमे तद्दीने महाराजा_*
*_5. धिराज प्रौढ प्रताप चक्रवर्ती वेद मा_*
*_6. र्ग प्रवर्तक आचार परायण सा_*
*_7. रासार विचारक प्रताप नाराय_*
*_8. ण धर्मधुरीण सकळ वेद शा_*
*_9. स्त्र कोविद राष्ट्रौड बागुल मुगु_*
*_10. ट मणी.... वा....... श्री मा_*
*_11. न ब्रह्मकुळ प्रदिप श्री महादेव_*
*_12. सूत तपश्री.... परित श्री_*
*_13. रा (जा) धीराज बहिरम (भैरव) सेन राजा_*
*_14. जबळ पराक्रमे हातगा दुर्ग वेढा_*
*_15. घालुनु (न) नीजाम सहा (शहा) पासुन_*
*_16. घेतला..... विजयी भव_*

*शिलालेखाचा वाचक* - सुदर्शन कुलथे, नाशिक
*शिलालेखाचे भाषांतर* - गिरीश टकले, नाशिक

*शिलालेखाचे प्रयोजन* - बागुलवंशी राजांच्या पराक्रमाबद्दल

*शिलालेखाचा आशय / निष्कर्ष* -
हा शिलालेख शालिवाहन शके 1469 सालच्या आषाढ माहिन्यात क्षय एकादशीला कोरलेला आहे. म्हणजेच इ.स. 1547 साली कोरलेल्या शिलालेखाला आज 470 वर्ष पूर्ण झालेली आहेत. जवळपास पाचशे वर्ष जुन्या शिलालेखात बागुलवंशी राजांच्या पराक्रमाबद्दलच्या ओळी सापडल्या आहेत. या शिलालेखात बागलाण प्रांतातील बागुलराजे जे स्वतःला राष्ट्रौढ वंशीय म्हणत असत यांच्या विजयाचा आशय आहे. बागुलवंशातील राजा महादेवसेन यांचा पुत्र भैरवसेन यांनी अहमदनगर निजामाच्या (बुरहान निजाम) ताब्यातून हातगड किल्ल्याला वेढा घालून किल्ला जिंकल्याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे.
सोळाव्या शतकाच्या मध्यावर अहमदनगरचा बुरहान निजामशहा हा या भागातल्या राजवटीतला बलाढ्य राजा होता. त्याच्या ताब्यात असलेला मोक्यावरच्या ठिकाणी वसलेला हातगड किल्ला मिळवणे हा बागुलवंशीय भैरवसेन राजाचा मोठा पराक्रम होता. हे या शिलालेखावरून स्पष्ट होते. बागुलवंशीय राजांच्या दरबारी असलेल्या रूद्र कवी विरचित
'राष्ट्रौढवंशम् महाकाव्यम्' या ग्रंथात भैरवसेन यांनी 'हस्तगिरी' किल्ला ताब्यात घेतल्याचाही उल्लेख आलेला आहे. यावरून हातगड विजय या शिलालेखालातील मजकूराला अधिक पुष्टी मिळाली आहे.

*शिलालेखाचे महत्त्व* - महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवरील एकूण शिलालेखांत संस्कृत भाषेतील सर्वांत मोठा शिलालेख.

शिलालेख पाहून आल्या मार्गाने परत पायर्‍यांपाशी येऊन वर चढत गेल्यावर गडाचा तिसरा आणि चौथा दरवाजा लागतो. चौथ्या दरवाजाला ग्रिल लावलेले आहे. संध्याकाळी ६ नंतर किल्ला बंद करण्यात येतो. चौथ्या प्रवेशव्दरातून आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. गडमाथा खूप विस्तीर्ण आहे. संपूर्ण गडमाथा फिरण्यास १ तास लागतो. प्रवेशव्दारातून वर आल्यावर पायर्‍यांची एक वाट डावीकडे खाली उतरते. येथे मोठ्या प्रमाणावर तटबंदी आहे, ती आजही बर्‍यापैकी शाबूत आहे. तटबंदीच्या कडेकडेने चालत गेल्यावर समोरच एक पीर आहे. उजव्या बाजूच्या तटात एक कमान कोरलेली आहे. पीराच्या समोरील बाजूस पाण्याचे प्रचंड मोठे टाक आहे. हे पाहून परत प्रवेशव्दारापाशी येऊन उजव्या बाजूला चालायला सुरुवात केल्यावर कातळात कोरलेले शिवलिंग आणि त्याच्या बाजूला पाण्याचे एक कोरडे टाके आहे. पुढे चालत जाऊन डाव्यास बाजूला खाली उतरल्यावर बुरुजासारखी रचना असलेली एक इमारत दिसते. या ठिकाणी धान्य कोठार होते. त्याच्या बाजूला पाण्याचे एक मोठे टाक आहे. धान्य कोठाराच्या खालच्या बाजूला उतरुन गेल्यावर कातळात कोरलेला पाण्याचा मोठा तलाव आहे. तलावाच्या मध्यभागी एक खांब आहे. तलावातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी हा खांब उभारला असावा. तलाव पाहून वर चढून गेल्यावर एक गजपृष्ठाकार रचनेचे छत असलेली इमारत दिसते. हे किल्ल्याचे दारु कोठार आहे. दारु कोठाराच्या बाजूला पाण्याचे टाक आहे. दारु कोठार पाहून खाली उतरुन गडाची तटबंदी डाव्या बाजूला ठेवत पुढे चालत गेल्यावर आपण गडाच्या पूर्व टोकावर पोहोचतो. वाटेत एक टाक आणि काही उध्वस्त वास्तूंचे चौथरे पाहायला मिळतात. गडाचे पूर्व टोक पाहून विरुध्द बाजूने (म्हणजे हातगड गावाच्या बाजूने) पुढे चालत गेल्यावर नविन उभारलेला ध्वजस्तंभ दिसतो. त्याच्या उजव्या बाजूला जी इमारत आहे त्या ठिकाणी मुदपाकखाना होता. पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एका भव्य वाड्याचे अवशेष दिसतात. त्याला किल्लेदाराचा वाडा म्हणतात. वाडा पाहून प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. संपूर्ण गडफेरीस एक तास लागतो. गडावरुन साल्हेर, सालोटा, वणी, मार्कंडेय, रावळ्या जावळ्या, धोडप हे किल्ले दिसतात. सापुतारा परीसर दिसतो.

हातगड गावात काही अवशेष आहेत. त्यासाठी किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशव्दारा समोर असलेल्या रस्त्याच्या टोका पासून गावात उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. पायर्‍या संपल्यावर उजव्या बाजूने गावात जाणारी वाट पकडावी. ५ मिनिटावर एक जुनी कमान असलेली इमारत दिसते. या इमारतीला घोड्याच्या पागा म्हणतात. याच्या बाजूला एक बांधीव तलाव आहे. तेथुन गावात येणार्‍या रस्त्यावर एक चुन्याच्या घाण्याचा दगड पडलेला आहे. दगड पाहून रस्त्याने नाशिक सापुतारा रस्तावर आल्यावर डाव्या बाजूला शेड खाली गोमाजी मोरे यांची समाधी आहे.

पोहोचण्याच्या वाटा :
हातगडवाडी मार्गे :-
हातगडाला जाण्यासाठी नाशिक गाठावे. नाशिक - सापुतारा मार्गावर, नाशिक पासून ७४ कि.मी अंतरावर (सापुतार्‍या पासून ६ कि.मी अंतरावर) बोरगाव नावाचा फाटा आहे. येथून एक रस्ता सुरगण्याला जातो, तर दुसरा सापुतार्‍याला जातो. सापुतार्‍याला जाणार्‍या रस्त्यावर बोरगावपासून ४ कि.मी अंतरावर हातगडवाडी नावाचे गाव आहे. हेच गडाच्या पायथ्याचे गाव आहे. गावातून उजवी बाजूस जाणारी डांबरी सडक कळवणला जाते. या सडकेवरून पुढे जायचे ,हातगडवाडी डाव्या हाताला ठेवायची. पुढे डावीकडे एक चुन्याच्या घाण्याचा दगड दिसतो येथे डांबरी सडक सोडून गावातील घरे पार करुन डावीकडे दिसणार्‍या आंब्याच्या झाडा पर्यंत पोहोचावे. येथुन गडावर जाणार्‍या पायर्‍या आहेत. पायथ्यापासून गडमाथा गाठण्यास पाऊण तास लागतो.

खाजगी वाहानाने थेट गडाच्या प्रवेशव्दारा पर्यंत जाता येते. नाशिक सापुतारा मार्गावर हातगड गावाच्या फ़ाट्याच्या पुढे एक चढण लागते. या चढणीवर क्लब महेंद्र आणि इतर हॉटेल्स आहेत. त्याच्या पुढेच हातगड किल्ल्यावर जाणार्‍या रस्य्ताचा फ़ाटा आहे. याठिकाणी वनखात्याची चौकी आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी प्रवेश फ़ी भरावे लागते.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
हातगडवाडी मार्गे पाऊण तास लागतो.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: H
 हडसर (Hadsar)  हनुमंतगड (निमगिरी) (Hanumantgad(Nimgiri))  हनुमंतगड (Hanumantgad(Sindhudurg))  हरगड (Hargad)
 हरिहर (Harihar)  हरिश्चंद्रगड (Harishchandragad)  हातगड (Hatgad)  हटकेश्वर ते लेण्याद्री (Hatkeshwar to Lenyadri)
 हिराकोट (Hirakot)  होन्नुर किल्ला (Honnur Fort)