मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

हटकेश्वर ते लेण्याद्री (Hatkeshwar to Lenyadri) किल्ल्याची ऊंची :  4200
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: लेण्याद्री
जिल्हा : पुणे श्रेणी : मध्यम
क्षेत्र हटकेश्वर ते अष्टविनायक गणपती मधील लेण्याद्री पर्यंतचा पायी प्रवास म्हणजेच हटकेश्वर ते लेण्याद्री पर्वतरांग ट्रेक. या डोंगरावर एकही किल्ला नाही परंतू निसर्गनिर्मित गुहा, नेढे (नैसर्गिक पूल), लेण्याद्रीची मानव निर्मित लेणी या गोष्टी या भ्रमंतीत पाहाता येतात. पावसाळ्याच्या शेवटी या भागात अनेक रानफ़ूल फ़ुलतात. हटकेश्वर ते लेण्याद्री ही वेगळ्या वाटेवरची भटकंतीत आपल्याला सह्याद्रीची अनेक रुप पाहायला मिळतात. गोद्रे या हटकेश्वरच्या पायथ्याच्या गावासून हटकेश्वरला जाण्यासाठी ३ तास लागतात. हटकेश्वर परिसर फ़िरायला एक ते दिड तास लागतो. हटकेश्वर ते लेण्याद्री हे अंतर कापायला ३ ते ४ तास लागतात. त्यामुळे हटकेश्वर ते लेण्याद्री हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी ८ ते ९ तास लागतात, त्यामुळे चालण्याची कसोटी पाहाणारा हा ट्रेक आहे.
10 Photos available for this fort
Hatkeshwar to Lenyadri
पहाण्याची ठिकाणे :
१) हटकेश्वर मंदिर - एका साध्या पत्र्याच्या शेडमध्ये असलेले शिवलिंग, त्या बाजूला असलेला नैसर्गिक झरा व असंख्य नंदी म्हणजेच हटकेश्वर मंदिर. नैसर्गिक झऱ्याचे पाणी अतिशय शुद्ध व पिण्यायोग्य आहे. हटकेश्वर मंदिराला जास्त प्रसिद्धी नसली तरी काही ग्रंथात याचा उल्लेख आढळतो. या ठिकाणावरून उत्तरेला हरिश्चंद्रगड, सिंदोळा हे किल्ले आणि पिंपळगाव धरण दिसते. पश्चिमेला हडसर, निमगिरी - हनुमंतगड आणि माणिकडोह धरणाचा परिसर दिसतो. दक्षिणेला शिवनेरी, नारायणगड हे किल्ले दिसतात.

२) निसर्गनिर्मित गुहा - मंदिराच्या पश्चिम दिशेला २ निसर्ग निर्मित गुहा आहेत. गुहेपर्यंत जाण्यासाठी थोडेसे खालच्या बाजूला उतरावे लागते. यातील एका गुहेजवळ ५-७ माणसांना जाण्याइतकीच जागा आहे. याच गुहेत गणपतीची मूर्ती असून ती अलीकडच्या काळात स्थापना केलेली वाटते. दुसरी गुहा अतिशय अरुंद असून १५-२० मीटर आत जाता येते.

३) निसर्गनिर्मित पूल (नेढ) - मंदिरापासून थोड्याच अंतरावर निसर्गनिर्मित पूल आहे. याची समुद्रासपाटी पासूनची अंदाजे उंची ४२०० फूट आहे. लांबून बघताना आपण नेढे म्हणतो तीच ही जागा. या पुलावर जाण्यासाठी अतिशय अरुंद वाट असून येथे उतरण्यासाठी दोरखंडाचा वापर करावा, तसेच प्रशिक्षित लोक आपल्याबरोबर असल्यास उत्तम. या पुलावरही एका वेळी ५-७ इतक्याच संख्येत जाता येते.

४) लेण्याद्री गणपती व लेणी संकुल - या ट्रेक मधील शेवटचा टप्पा म्हणजे लेण्याद्री गणपती व लेणी संकुल. या परिसरात ३० पुरातन लेणी असून सातव्या क्रमांकाच्या लेणीत गणपती आहे. लेणी क्रमांक ६ आणि १४ चैत्यगृह तर बाकी बौद्ध भिक्खूंची निवारागृहे (dwellings for monks) आहेत. लेण्यांच्या परिसरात पुष्कळ पाण्याचे टाके आहेत. त्यापैकी दोन टाक्यांजवळ शिलालेख आहेत. सर्व लेणी फिरण्यास अंदाजे २-३ तासाचा कालावधी लागतो.
पोहोचण्याच्या वाटा :
१) गोद्रे मार्गे :- मुंबई - कल्याण - माळशेज मार्गे जुन्नर फ़ाटा गाठावा. जुन्नर रस्त्यावर १० किमीवर गोद्रे गावात जाणारा फ़ाटा आहे. कल्याण ते अंतर १२० किलोमीटर आहे. गोद्रे गावातून हटकेश्वर मार्गे लेण्याद्रीला जाणारी वाट आहे.

२) कोळवाडी मार्गे :- मुंबई - कल्याण - माळशेज मार्गे जुन्नर फ़ाट्याच्या पुढे पिंपळगाव धरणाजवळील कोळेवाडी ( कल्याण पासून अंतर ११४ किलोमीटर ) गावातून हटकेश्वर कडे जाता येते पण ही वाट तीव्र उताराची व दमवणारी आहे.
दोन्ही वाटांनी हटकेश्वर ते लेण्याद्री पर्यंत अंदाजे अंतर १६.५ किमी असल्यामुळे चालण्याची सवय व शारीरिक क्षमता असलेल्यांनी जाण्यास योग्य.

गोद्रे ते लेण्याद्री पर्यंत अंदाजे अंतर १६.५ किमी
गोद्रे ते हटकेश्वर पर्यंत अंदाजे अंतर ७ किमी
हटकेश्वर ते लेण्याद्री अंदाजे अंतर ९.५ किमी
राहाण्याची सोय :
लेण्याद्रीला राहाण्याची सोय आहे.
जेवणाची सोय :
लेण्याद्रीला जेवणाची सोय आहे.
पाण्याची सोय :
हटकेश्वर मंदिरा जवळील झऱ्याचे पाणी पिण्यायोग्य आहे. तरी गोद्रे गाव ते मंदिर 3 तास अंतर असल्याने पाणी जवळ ठेवणे आवश्यक आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
गोद्रे किंवा कोळवाडी गावातून हटकेश्वर - ३ तास, हटकेश्वर ते लेण्याद्री - ३ ते ४ तास
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
मार्च ते मे हे उन्हाळ्याचे महिने सोडून वर्षभर जाता येते.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: H
 हडसर (Hadsar)  हनुमंतगड (निमगिरी) (Hanumantgad(Nimgiri))  हनुमंतगड (Hanumantgad(Sindhudurg))  हरगड (Hargad)
 हरिहर (Harihar)  हरिश्चंद्रगड (Harishchandragad)  हातगड (Hatgad)  हटकेश्वर ते लेण्याद्री (Hatkeshwar to Lenyadri)
 हिराकोट (Hirakot)  होन्नुर किल्ला (Honnur Fort)