मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

इंद्राई (Indrai) किल्ल्याची ऊंची :  4490
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: अजंठा सातमाळ
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम
नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीची एक डोंगररांग सुरगणा पासून चालू होते आणि चांदवड पर्यंत येऊन संपते. पुढे तीच मनमाडच्या जवळ असणार्‍या अंकाइ किल्ल्यापर्यंत जाते. याच रांगेला अजंठा - सातमाळ रांग म्हणतात. चांदवड तालुक्यात ४ किल्ले येतात, राजधेर, कोळधेर, इंद्राई आणि चांदवड .

राजधेरवाडी हे राजधेर व इंद्राई किल्ल्यांच्या पायथ्याचे गाव आहे. त्यामुळे येथे २ दिवस मुक्काम करून दोनही किल्ले पाहाता येतात. तसेच तिसर्‍या दिवशी राजधेर ते कोळधेर हा ट्रेक करता येतो. त्यासाठी गावातून वाटाड्या घेणे आवश्यक आहे. राजधेर - कोळधेर - राजधेरवाडी हा ट्रेक करण्यास साधारणतः १० ते १२ तास लागतात.

20 Photos available for this fort
Indrai
Indrai
Indrai
पहाण्याची ठिकाणे :
राजधेरवाडी किंवा वडबारे मार्गे गड चढतांना आपण कातळ भिंतीपाशी येऊन पोहोचतो. या कातळकड्यापाशी कातळात खोदलेल्या २ गुहा आहेत. यापैकी एका गुहेत पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. हि कातळभिंत कोरुन गडावर जाण्याचा मार्ग बनविलेला आहे. याची रचना एका बाजूने कापलेल्या नळी सारखी आहे. या मार्गावरून चालतांना आपल्या माथ्यावर कातळभिंतीचे छत असते. या मार्गाने ५० पायर्‍या चढून गेल्यावर वाट काटकोनात वळते. येथे कातळ फोडून खिंडी सारखी रचना केलेली आहे. या मार्गाने अंदाजे १०० पायर्‍या चढून गेल्यावर प्रवेशद्वाराच्या अलिकडेच डाव्या बाजूच्या कातळात कोरलेला फारसीतील शिलालेख पाहायला मिळतो. गडाच्या प्रवेशद्वाराचे अवशेष केवळ आजमितिस शिल्लक आहेत. प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश केरुन पुन्हा थोडी चढाई केल्यावर समोरच्या बाजूस व उजवीकडे कातळात खोदलेल्या गुहा दिसतात. याच ठिकाणी तीन वाटा फूटतात. प्रथम उजवीकडची वाट पकडावी थोड्याच अंतरावर कातळात खोदलेल्या गुहांची रांग दिसते. येथून समोर राजधेर व डावीकडे कोळधेर किल्ला दिसतो. दूरवर धोडप, इखारा, कांचना, रवळ्या-जावळ्या इत्यादी किल्ले दिसतात. या सर्व गोष्टी पाहून परत मागे फिरावे. नंतर वर जाणारी वाट पकडावी. थोडे अंतर चढून बुजलेले पाण्याचे टाक आणि वास्तुचे अवषेश पाहायला मिळतात. येथून सरळ वर चढत जाणारी वाट गडाच्या सर्वोच्च टोकावर जाते. तर वास्तुच्या बाजुने खाली उतरणारी वाट पकडून गेल्यास कातळात खोदलेले महादेवाचे मंदिर लागते. मंदिरासमोर दगडात बांधून काढलेला तलाव आहे. मंदिराच्या बाजूला कातळात खोदलेली अरुंद गुहा आहे. मंदिरावरुन पुढे जाणार्‍या वाटनेही गडाच्या सर्वोच्च टोकावर जाता येते .महादेवाचे दर्शन घेऊन गुहेच्या वर चढून गेल्यावर एक मोठा तलाव आहे. तलावात उतरण्यासाठी पायर्‍या कातळात कोरलेल्या पायर्‍या आहेत, तलाव पाहून परत मागे फिरावे आणि महादेव मंदिराकडे यावे. आता डावीकडची वाट पकडावी. थोडे पुढे गेल्यावर कातळात कोरलेल्या पायर्‍या उतरुन गेल्यावर उजव्या बाजूला पाण्याचे टाक आहे. डाव्या बाजूला कातळात खोदलेल्या १८ ते २० गुहांची रांग दिसते. या गुहांमध्ये कोणत्याही प्रकारचे कोरीवकाम आढळत नाही. या गुहांमध्ये बराच राडारोडा जमलेला असल्याने गुहा राहण्यासाठी योग्य नाहीत. गुहेंच्या रांगेच्या शेवटी बारमाही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. येथून समोर २ शिखरे असलेला डोंगर दिसतो, त्याला साडेतीन रोडग्यांचा डोंगर असे म्हणतात. या डोंगराच्या मागे नाशिक - धुळे महामार्ग आणि त्याच्या मागे चांदवड किल्ला दिसतो. येथून किल्ल्याच्या प्रवेशव्दारा जवळ आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. इंद्राई किल्ला पाहाण्यासाठी २ तास लागतात.
पोहोचण्याच्या वाटा :
१) राजधेरवाडी मार्गे :-
चांदवडहून राजधेरवाडी कडे जाणारी बस पकडावी आणि राजधेरवाडीत उतरावे. वडबारे गावाच्या पुढे राजधेरवाडी आहे. राजधेरवाडी हे राजधेर व इंद्राई किल्ल्यांच्या पायथ्याचे गाव आहे. राजधेरवाडी गावामागे इंद्राई किल्ला आहे. गावातून एक रस्ता इंद्राई किल्ल्याच्या डोंगराकडे जातो. मळलेल्या पायवाटेने सुमारे अर्धा तास चढाई केल्यावर एक पठार लागते. येथून कातळ भिंतीच्या डाव्या टोकापर्यंत पोहोचण्यास सुमारे १ तास लागतो. किल्ल्याच्या कातळकड्यापाशी वडबारे गावातून येणारी वाट येऊन मिळते. कातळकड्यापाशी पोहोचल्यावर त्याला वळसा घालून राजधेरवाडी गावाच्या विरुध्द दिशेला गेल्यावर, कातळात खोदलेल्या पायर्‍यांची वाट आपल्याला गडावर घेऊन झाते. या वाटेने किल्ला गाठण्यास २ ते ३ तास लागतात.

राजधेरवाडी गावाच्या पुढे धरण आहे. या धरणापर्यंत जाण्यासाठी रस्ता आहे. धरणाच्या भिंतीजवळ इंद्राई किल्ल्याच्या डोंगराची सोंड उतरलेली आहे. या सोंडेवरुन तास भर चढल्यावर आपण कातळभिंती पाशी पोहोचतो. कातळ भिंतीच्या डाव्या टोकापर्यंत पोहोचण्यास सुमारे अर्धा ते पाउण तास लागतो. येथून कातळकड्याला वळसा घालून राजधेरवाडी गावाच्या विरुध्द दिशेला गेल्यावर, कातळात खोदलेल्या पायर्‍यांची वाट आपल्याला गडावर घेऊन झाते. या वाटेने किल्ला गाठण्यास २ ते ३ तास लागतात.


२) वडबारे मार्गे :-
चांदवडहून राजधेरवाडी कडे जाणारी बस पकडावी. चांदवड पासून ६ किंमी अंतरावर असणार्‍या वडबारे गावात उतरावे. वडबारे गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी एक ठळक पायवाट आहे. या वाटेने किल्ल्यावर जातांना एक झाप लागतो. ही वाट किल्ल्याच्या कातळकड्यापाशी राजधेरवाडीतून येणार्‍या वाटेला येऊन मिळते. गावातून किल्ल्यावर पोहचण्यास ३ तास लागतात.


राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहेत, तसेच महादेव मंदिरात ५ जणांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय :
राजधेरवाडीत जेवणाची सोय होते.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
वडबारे गावातून ३ तास लागतात. राजधेरवाडी गावातून २ ते ३ तास लागतात.
सूचना :
१) राजधेरवाडी हे राजधेर व इंद्राई किल्ल्यांच्या पायथ्याचे गाव आहे. त्यामुळे येथे २ दिवस मुक्काम करून दोनही किल्ले पाहाता येतात. तसेच तिसर्‍या दिवशी राजधेर ते कोळधेर हा ट्रेक करता येतो. त्यासाठी गावातून वाटाड्या घेणे आवश्यक आहे. राजधेर - कोळधेर - राजधेरवाडी हा ट्रेक करण्यास साधारणतः १० ते १२ तास लागतात.
२) राजधेर किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे.

Sorry! There is no fort information available of this category.
Please check back later...