मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

जंजाळा (वैशागड) (Janjala (Vaishagad)) किल्ल्याची ऊंची :  3000
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: अजंठा
जिल्हा : औरंगाबाद श्रेणी : मध्यम
औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात वैशागड उर्फ जंजाळा उर्फ तलतमचा किल्ला या नावाचा विस्ताराने प्रचंड असलेला किल्ला आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे जंजाळा गावाच्या दिशेने हा भूदुर्ग आहे तर इतर तीन बाजूने हा किल्ला डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्याचा विस्तार त्यावरील अवशेष, ३ तलाव पहाता या किल्ल्यावर पूर्वी मोठ्या प्रमाणात वस्ती असावी. या किल्ल्या जवळील डोंगरात असलेले घटोत्कच लेण आहे. त्यावरून या भागाचे ऎतिहासिक महत्व सिध्द होते.


Janjala (Vaishagad)
42 Photos available for this fort
Janjala (Vaishagad)
Janjala (Vaishagad)
Janjala (Vaishagad)
इतिहास :
घटोत्कच लेण्यातील शिलालेखात अशमाकच्या राजकन्येचा उल्लेख आहे. वाकटाक नरेशाचा मंत्री वराहदेव याने ही लेणी इ.सनाच्या ५ व्या शतकात खोदवली अशी माहिती दिलेली आहे. जंजाळा गावाचे पूरातन नाव जिंजाला होते.
इ.स.१५५३ मध्ये अहमदनगरच्या बुर्‍हान निजामशहाने हा गड जिंकून घेतला. त्यानंतर इ.स.१६३१ मध्ये शहाजहानने हा किल्ला जिंकला.
पहाण्याची ठिकाणे :
जंजाळा किल्ल्यावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. त्यापैकी एक वाट जरंडी या किल्ल्याच्या पायथ्याकडून गडाच्या पश्चिमेकडील प्रवेशव्दारातून गडावर येते. दुसरी वाट वेताळवाडी धरणा जवळून गडाच्या वेताळगड प्रवेशव्दारातून गडावर येते. तिसरी वाट जंजाळा गावातून बैलगाडीच्या रस्त्याने गडावर येते. खाली जी माहिती दिली आहे ती, जंजाळा गावाच्या बाजूने गडावर जातांना दिसणार्‍या अवशेषांची आहे.

जंजाळा गावातून बैलगाडीच्या रस्त्याने अर्ध्या तासात गडाच्या दक्षिणेकडील तटबंदीपाशी पोहोचतो. सध्या तटबंदी फोडून किल्ल्यात जाण्यासाठी रस्ता केलेला आहे. तटबंदीच्या बाहेर शेतात ८ फूटी तोफ पडलेली आहे. ती पाहून गडात प्रवेश करावा. गडाची तटबंदी आजही शाबूत आहे. उजव्या बाजूला (पूर्वेकडे) तटबंदीत एक छोटा (चोर) दरवाजा दिसतो. या दरवाजातून दूरवर वेताळवाडी किल्ला व धरण दिसत. पुढे गेल्यावर उजव्या बाजूला पूर्वाभिमुख दरवाजा आहे. दरवाजा २० फूट उंच असून त्याची कमान शाबूत आहे. दरवाच्या आतील बाजूस देवड्या आहेत. देवड्यांपासून ते दरवाजाच्या बाहेरपर्यंत फरसबंदी केलेली आहे. दरवाजाच्या बाहेर काही कोरीव काम , नक्षीकाम केलेले दगड पडलेले आहेत. हा दरवाजा पाहून पुन्हा मुळ पायवाटेवर येऊन थोडे पुढे गेल्यावर एक बांधीव तलाव पहायला मिळतो. आज तलावाचा बंधारा अनेक ठिकाणी कोसळल्यामुळे त्यात पाणी कमी प्रमाणात साठते. तलाव ओलांडून पुढे गेल्यावर डाव्या बाजूस उत्तरांभिमुख जरंडी दरवाजा आहे. गडाच्या पश्चिमेकडील जरंडी या किल्ल्याच्या पायथ्याच्या गावातून येणारी वाट या प्रवेशव्दारातून गडावर येते.या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला दोन ओळींचे दोन फारसी लिपितील शिलालेख कोरलेले आहेत.

जरंडी दरवाजा पाहून पुढे गेल्यावर एक कमान दिसते. या कमानी भोवती पूर्वी तटबंदी होती. या तटबंदीच्या आत महत्वाच्या / खाशांच्या इमारती होत्या. या कमानीच्या बाजूने पुढे गेल्यावर दोन बुरुज दिसतात. यापैकी पहिल्या बुरुजाच्या खाली अनेक दगड विखरून पडलेले आहेत. त्यात शरभाच शिल्प कोरलेला दगड दोन भागात तुटलेला पहायला मिळतो. दगडाच्या एका तुकड्यावर शरभाच डोक व धड कोरलेले असून पाय व नख्या दुसर्‍या तुकड्यावर कोरलेले दिसतात. या शरभ शिल्पाच्या पूर्वेला (पायवाटेच्या उजव्या बाजूस) दुसरे शरभ शिल्प पडलेले दिसते. दोन बुरुजांच्या मध्ये सय्यद -अल -कबीर काद्री या पीराची कबर आहे. त्या कबरी समोर तीन ओळींचे दोन फारसी लिपितील शिलालेख कोरलेले दगड ठेवलेले आहेत. या दर्ग्या मागे तलाव असून त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.

दर्गा पाहून झाल्यावर त्याला वळसा घालून डावीकडे जावे. ही पायवाट दर्ग्या मागिल इमारतींकडे जाते. प्रथम एक मोठी खिडकी व घुमट असलेली इमारत दिसते. त्याच्या बाजूला असलेल्या बुरुजावर शरभाच शिल्प कोरलेल आहे. खिडकीतून वास्तूत प्रवेश करून उजव्या बाजूस काही अंतर दाट झाडीतून (गचपणातून) चालत गेल्यावर अनेक कमानी असलेला राणी महाल पहायला मिळतो. त्याच्या समोर ४ इमारतींचे अवशेष दिसतात. राणी महालाच्या पुढे एका उंचवट्यावर तीन कमानींची मस्जिद आहे. मस्जिदी समोर एकापुढे एक असलेले दोन तलाव पहायला मिळतात.

मस्जिदीच्या उंचवट्यावरून खाली उतरून तलावाला वळसा घालून पूर्वेकडे चालत गेल्यावर ५ मिनिटात आपण पूर्वाभिमुख वेताळवाडीगड दरवाजापाशी पोहोचतो. दरवाजा २० फूट उंच असून त्याची कमान उध्वस्त झालेली आहे. दरवाच्या आतील बाजूस देवड्या आहेत. देवड्यांपासून ते दरवाजाच्या बाहेरपर्यंत फरसबंदी केलेली आहे. दरवाजाच्या बाहेरच्या बाजूस कोरीव काम , केलेले आहे. या दरवाजातून उतरणारी वाट वेताळवाडी धरणा जवळून वेताळवाडी गावात जाते. या दरवाच्या बाहेरून जंजाळा किल्ल्याच्या उत्तरेकडील माचीला असलेली लांबलचक तटबंदी दिसते. तसेच या तटबंदीत असलेला चोर दरवाजाही पहायला मिळतो. येथून दोन तलावांच्या मधल्या वाटेने जंजाळा गावाकडे जाता येते. येथे आपली गड फेरी पूर्ण होते.

घटोत्कच लेणी :-जंजाळा गाव व किल्ला यांच्या मधे ही लेणी आहेत. हि बौध्द लेणी आहेत. या लेण्यातील दर्शनी दालन प्रशस्त असून त्याला २० खांब आहेत. मधल्या दोन व कोपर्‍यातील दोन खांबांचा आकार व त्यावरील नक्षी इतरांपेक्षा वेगळी आहे. दालनाच्या डाव्या बाजूला बुध्दमूर्ती व शिलालेख आहे. त्यात अशमाकच्या राजकन्येचा उल्लेख आहे. वाकटाक नरेशाचा मंत्री वराहदेव याने ही लेणी इ.सनाच्या ५ व्या शतकात खोदवली अशी माहिती दिलेली आहे. गाभार्‍यात बुध्दाची आसनस्थ मूर्ती आहे.आसनाखाली हरणे व मधे धर्मचक्र आहे.

अंभई गावात प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे.

जंजाळा किल्ला पहाण्यासाठी २ ते ३ तास लागतात. तेथून घटोत्कच लेणी पाऊण तासांवर आहेत. लेणी पहाण्यास अर्धा तास व लेणी पाहून जंजाळा गावात जाण्यास पाऊण तास लागतो.
पोहोचण्याच्या वाटा :
स्वत:चे वहान असल्यास औरंगाबादहून जंजाळा गडावर जाण्यासाठी.

औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून ६५ किमी अंतरावर सिल्लोड गाव आहे.सिल्लोडच्या पुढे १४ किमीवर गोळेगाव आहे. गोळेगावच्या अलिकडे डाव्याबाजूस उंडणगावाकडे जाणारा फाटा फूटतो. येथून उंडणगाव ५ किमीवर आहे. उंडणगावहुन दोन रस्ते फूटतात. एक हळदा मार्गे वेताळवाडीगड - वेताळवाडी - सोयगाव असा जातो. तर दुसरा रस्ता १२ किमी वरील अंभई गावात जातो. अंभईहून १० किमीवर जंजाळा गाव आहे. गावाच्या मागे ३ किमीवर जंजाळा किल्ला आहे.

स्वत:चे वहान नसल्यास / गडा खालील जरंडी व वेताळवाडी गावातून पायी गड चढण्यासाठी

१) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर - चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. येथे येण्यासाठी औरंगाबादहून थेट एसटी सेवा आहे.

अ) सोयगाव - जरंडी अंतर ९ किमी आहे. जरंडी गावात जाण्यासाठी सोयगावहून एसटी व सहा आसनी रिक्षा उपलब्ध आहेत.जरंडी गावाच्या पूर्वेला जंजाळा किल्ल्याची एक डोंगरसोंड उतरलेली आहे. त्यावरून २ तासात गडावर जाता येते.

ब) सोयगाव - वेताळवाडी अंतर ४ किमी आहे. वेताळवाडी ते धरण अंतर २ किमी आहे. वेताळवाडी गावात जाण्यासाठी सोयगावहून एसटी व सहा आसनी रिक्षा उपलब्ध आहेत. वेताळवाडी धरणच्या पश्चिमेला जंजाळा किल्ल्याची एक डोंगरसोंड उतरलेली आहे. त्यावरून २ तासात गडावर जाता येते.
वरील दोन्ही मार्गांसाठी गावातून वाटाडा घ्यावा.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय गडावर नाही सोयगावातील हॉटेलांत होऊ शकते.
पाण्याची सोय :
गडावरील दर्ग्या जवळील तलावातील पाणी पिण्यायोग्य आहे. तरीही पाणी बरोबर बाळगावे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
१) जंजाळा गावातून ३० मिनीटे लागतात. २) जरंडी गावातून २ तासात गडावर जाता येते. ३) वेताळवाडी गावातून ३ तासात गडावर जाता येते.
सूचना :
जंजाळा किल्ला , घटोत्कच लेणी, वेताळगड व रुद्रेश्वर लेणी एका दिवसात पहाता येतात.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: J
 जयगड (Jaigad)  जामगावचा किल्ला (Jamgaon Fort)  जंगली जयगड (Jangli Jaigad)  जंजाळा (वैशागड) (Janjala (Vaishagad))
 जंजिरा (Janjira)  जवळ्या (Jawlya)  जीवधन (Jivdhan)