मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

कळसूबाई (Kalsubai) किल्ल्याची ऊंची :  5400
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: कळसूबाई
जिल्हा : नगर श्रेणी : मध्यम
कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६९० मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. यातील अर्ध्या ऊंची पर्यंत गावकर्‍यांनी पायर्‍यांची शेती केलेली आहे. कठीण कातळटप्प्यांवर शिड्या बसविलेल्या आहेत. त्यामुळे ३ ते ४ तासात कळसूबाईचे शिखर सर करणे सहज शक्य आहे. भंडारदरा धरण येथून ६ कि.मी वर आहे. तेथे २ दिवस मुक्काम करून कळसूबाई , रंधा धबधबा, कोकणकडा इत्यादी ठिकाणे पाहाता येतात.
4 Photos available for this fort
Kalsubai
इतिहास :
कळसूबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथा आहे. प्राचीनकाळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती. ती पाटलाच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती की, मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर कामे करीन. एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले, पाटलाने कळसूला भांडी घासायला लावली, त्यामुळे चिडून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच कळसूबाईचा डोंगर होय.
पहाण्याची ठिकाणे :
कळसूबाईचा डोंगर चढायला सुरुवात केल्यावर पहिल्या टप्प्यावर कळसूबाईचे नविन मंदिर लागते. ज्या लोकांना शिखरावर जाणे शक्य नाही, त्यांच्या सोईसाठी हे मंदिर बांधलेले आहे. पुढे दुसरी शिडी पार केल्यावर कातळात दोन पावले कोरलेली आहेत, ती कळसूबाईची पावले आहेत अशी श्रध्दा आहे. शेवटच्या शिडीच्या खाली विहिर व बाजूला एक पत्र्याची शेड आहे. शिखरावर कळसूबाईचे छोटे मंदिर आहे. देवळात साधारण ३ माणसे बसू शकतील एवढीच जागा आहे. येथून समोरच खाली भंडारदयाचा अथांग पसरलेला जलाशय लक्ष वेधून घेतो. या शिखरावरून उत्तरेला रामसेज, अचला, अहिवंत, सप्तश्रुंग, मार्कंडा, धोडप, रवळया जवळया, कोळधेर अशी डोंगररांग नजरेस पडते. पूर्वेकडे औंढा, विश्रामगड, अलंग, मदन, कुलंग, माथेरान, हरिश्चंद्रगड लक्ष वेधून घेतात.
पोहोचण्याच्या वाटा :
या शिखरावर जाण्यासाठी मुख्य वाट ही बारी गावातून जाते. भंडारदर्‍यापासून ‘बारी’ हे गाव अवघ्या ६ कि.मी अंतरावर आहे. बारी गावात जायचे झाल्यास मुंबई-नाशिक मार्गावर इगतपुरी गाठावे. इगतपुरीवरून भंडारदर्‍याला जाणार्‍या एसटी ने बारी या गावी यावे. येथून शिखरावर जाण्यास ३ तास लागतात. वाटेत तीन ठिकाणी आता लोखंडी शिडया बसविलेल्या आहेत. गावातच सामान ठेवून ५ ते ६ तासात शिखरावर जाऊन येता येते. गावातून बाहेर पडल्यावर एक ओढा लागतो. हा ओढा ओलांडून झाल्यावर थोडयाच अंतरावर एक मंदिर लागते. या मंदिराच्या मागच्या बाजूने जाणारी वाट थेट शिखर माथ्यापर्यंत घेऊन जाते.
स्वत:चे वाहन असल्यास मुंबई - कसारा मार्गे घोटी गाठावे. घोटी - सिन्नर मार्गावर भंडारदरा फाटा आहे.या फाट्यावरुन भंडारदर्‍याला जातांना, भंडारदर्‍याच्या अलिकडे ६ कि.मी अंतरावर ‘बारी’ हे गाव आहे.
राहाण्याची सोय :
येथे शिखरावर रहाण्याची सोय नाही. शिखरा खालील शेडमध्ये किंवा भंडारदर्‍याला राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय :
बारी गावात/ भंडारदर्‍याला जेवणाची सोय होते.
पाण्याची सोय :
शिखरावर जाताना शेवटच्या टप्प्यावर शिडीच्या अगोदर एक विहीर आहे. वाटेत पाणी मिळत नसल्याने बारी गावातच पाणी भरून घ्यावे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
बारी गावातून ३ तास लागतात.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: A
 आड (Aad)  आमनेर (Aamner)  अचला (Achala)  अचलपूरचा किल्ला (Achalpur Fort)
 अग्वाडा (Aguada)  अहिवंत (Ahivant)  अजिंक्यतारा (Ajinkyatara)  अजिंठा (Ajintha Fort)
 अजिंठा सराई (Ajintha Sarai)  अजमेरा (Ajmera)  आजोबा (आजा पर्वत) (Ajoba)  अकलूजचा किल्ला (Akluj Fort)
 अलंग (Alang)  अंमळनेर (Amalner)  अंबागड (Ambagad)  आंबोळगड (Ambolgad)
 अमरावतीचा किल्ला (Amravati Fort)  अणघई (Anghai)  अंजनेरी (Anjaneri)  अंकाई(अणकाई) (Ankai)
 अंतुर (Antoor)  अर्जूनगड (Arjungad)  अर्नाळा (Arnala)  आसावा (Asawa)
 अशेरीगड (Asherigad)  औंढा (अवंध) (Aundha)  औसा (Ausa)  अवचितगड (Avchitgad)