मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

कात्रा (Katra) किल्ल्याची ऊंची :  2680
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: अजंठा सातमाळ
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम
मनमाडहून औरंगाबादला रेल्वेने किंवा रस्त्याने जाताना; मनमाड सोडल्यावर लगेच आभाळात घुसलेला सुंदर सुळका आपले लक्ष वेधून घेतो ‘‘हडबीची शेंडी‘‘ किंवा ‘‘थम्स अप‘‘ या नावाने हा सुळका ओळखला जातो. या सुळक्याजवळच अजिंठा -सातमाळ रांगेतून एका बाजूला पडलेल्या डोंगरावर अपरिचीत असा ‘‘कात्रा‘‘ किल्ला आहे.


अंकाई टंकाई हे दोन किल्ले नीट पाहाण्यास पाच ते सहा तास लागतात. जर आदल्या दिवशी मुंबई किंवा पुण्याहुन निघुन पहाटे मनमाडला पोहोचल्यास दुपार पर्यंत अंकाई आणि टंकाई किल्ले पाहुन होतात. त्यानंतर त्याच्या पासुन ६ किमीवर असलेला गोरखगड पाहुन पायथ्याच्या मंदिरात मुक्काम करता येतो किंवा ७ किमीवरील कात्रा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कातरवाडीतील हनुमान मंदिरात मुक्कामाला जाता येते. दुसर्‍या दिवशी कात्रा किल्ला पाहाता येतो. काटेकोरपणे कार्यक्रम आखल्यास ४ किल्ले दोन दिवसात पाहुन होतात. अर्थात त्यासाठी बरोबर खाजगी वाहान असणे आवश्यक आहे. कारण या आतल्या भागात एसटी आणि रिक्षांची सोय नाही. अंकाई, गोरखगड, कात्रा या किल्ल्यांची माहिती साईटवर लिहिलेली आहे.

मनमाडहुन एका दिवसात कात्रा आणि मेसणा हे दोन किल्ले पाहाता येतात.त्यासाठी बरोबर खाजगी वाहान असणे आवश्यक आहे. कारण या आतल्या भागात एसटी आणि रिक्षांची सोय नाही.
12 Photos available for this fort
Katra
Katra
Katra
पहाण्याची ठिकाणे :
कात्रा किल्ल्याच्या पायथ्याशी कातरवाडी हे छोट गाव आहे. गावामागील डोंगरात कपिल मुनींचा आश्रम आहे. हा आश्रम कात्रा किल्ल्याच्या बाजुच्या डोंगरात आहे. आश्रमाच्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत कच्चा रस्ता आहे. या रस्त्याने जाताना वाटेत मारुतीच मंदिर व त्यासमोर वीरगळी पाहायला मिळतात. हे मंदिर मुक्कामासाठी योग्य आहे. या मंदिरापासुन डावीकडे वळणारा रस्ता कपिलमुनी आश्रमाकडे जातो. पायथ्यापासुन ५ मिनिटे चढल्यावर आपण आश्रमापाशी पोहोचतो. येथे एक प्रशस्त कातळकोरीव गुहा आहे. गुहा आतून वाहेरुन रंगवलेली आहे. गुहेला बाहेरुन दिलेला केशरी रंग दुरुनही उठून दिसतो, या गुहेत कपिलमुनींची मुर्ती स्थापन केलेली आहे. गुहे समोरील जागा सारवुन स्वच्छ केलेली आहे. त्यात एक धुनी कायम पेटवलेली असते. गुहेच्या बाजुला एक पाण्याच टाक आहे. पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. या गुहेतील साधु राजुबाबा १२ वर्ष मौन व्रतात आहे. पण त्याना किल्ल्याची खडानखडा माहिती आहे.

कपिल मुनींचा आश्रम पाहुन बाजुच्या डोंगराला वळसा घालुन कात्रा किल्ल्याचा डोंगर आणि आपण चढतोय तो डोंगर यांच्या मधील खिंडींच्या रोखाने चालायला सुरुवात करावी. गावकर्‍यांचा किल्ल्यावर वावर नसल्याने इथे ठळक अशी पायवाट नाही. सर्व ढोरवाटा आहेत. सर्वत्र घसारा (स्क्री) आहे. त्यामुळे आपल्याला योग्य वाटेल त्या वाटेने खिंडीच्या दिशेने चढायला सुरुवात करावी. साधारणपणे अर्ध्या तासात आपण खिंडीत पोहोचतो. इथे एका अनघड दगडाला शेंदुर फासुन ठेवलेला आहे. खिंडीतुन उजवीकडे वळुन कात्रा किल्ल्याच्या कातळभिंती खालुन जाणार्‍या पायवाटेने आपण १० मिनिटात किल्ल्याचा उत्तर टोकाला पोहोचतो. येथे कातळात कोरलेल्या पायर्‍या आहेत. त्या पायर्‍या अर्ध्या चढल्यावर उजव्या बाजुला कातळात कोरलेली गुहा आहे. ती पाहाण्यासाठी कातळाच्या धारेवरुन जावे लागते. जेमतेम पाउल मावेल एवढ्या धारेवरुन गुहेपर्यंत जाउन गुहा पाहुन परत पायर्‍या चढुन वर आल्यावर दोन पाण्याची टाकी पाहायला मिळतात. ती टाकी पाहुन डाव्या बाजूला वळून थोड्या पायर्‍या चढल्यावर गड माथ्यावर आपला प्रवेश होतो. गडमाथ्यावर एक टेकडी आहे. टेकडीच्या रोखाने चालायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूला आपल्याला ५ बुजलेली टाकी पाहायला मिळतात. पुढे टेकडी उजव्या हाताला ठेउन दरीच्या बाजुला जावे. तिथे एक खाच आहे. १५ फ़ुटाचा कातळटप्पा काळजीपूर्वक उतरुन गेल्यास एक कातळात कोरलेली लांबलचक गुहा पाहायला मिळते. या गुहेच तोंड झाडीने पूर्ण झाकलेल असल्यामुळे वरुन दिसत नाही. गुहा पाहुन वर येउन ५ टाक्यांपाशी जाऊन टेकडीला वळसा घालावा. आता टेकडी डाव्या हाताल ठेउन चालायला सुरुवात केल्यावर कातळात खोदलेल पाण्याच टाक पाहायला मिळत. त्या टाक्यावरुन सरळ पुढे चालत गेल्यावर कातळाच्या पोटात खोदलेली २ खांबी गुहा पाहायला मिळते. या गुहे समोर एक पाण्याच टाक आहे. गुहेच्या वरच्या बाजुस चढुन गेल्यावर अजुन एक पाण्याच टाक आहे. हे टाक पाहुन परत गुहेच्या पातळीत खाली उतरुन किल्ल्याच्या उत्तर टोकाकडे चालत जाव. इथेही झाडोर्‍यात लपलेली गुहा आहे. ती पाहुन किल्ल्याच्या मधे असणार्‍या टेकडीवर चढायला सुरुवात करावी. ५ मिनिटांचा खडा चढ चढुन आपण किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचतो. येथे साधुने अलिकडच्या काळात जमिनीत सिमेंट कॉंक्रीटने बांधलेली ध्यान गुंफा आहे. त्याच्या बाजुला ध्वज स्तंभ आहे. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरुन अंकाई ,टंकाई, गोरखगड, मेसणा हे किल्ले आणि हडबीची शेंडी हा सुळका दिसतो. टेकडीवरुन विरुध्द बाजुला ५ टाक्यांजवळ उतरावे. येथुन समोर दिसणार्‍या सपाट पठारावरुन दक्षिण टोकाकडे चालायला सुरुवात करावी. वाटेत वास्तुंचे चौथरे पाहायला मिळतात. किल्ल्याच्या दक्षिण टोकावर जाउन परत येताना उजव्या बाजुस (दरीच्या बाजुला) तटबंदी आणि बुरुजाचे अवशेष दिसतात. त्यांच्या बाजुने चालत. पायर्‍यांपर्यंत आल्यावर आपली गड प्रदक्षिणा पूर्ण होते. गड पूर्ण पाहाण्यास पाउण तास लागतो. गड उतरुन खिंडीत आल्यावर बाजुच्या डोंगरावर चढुन जावे त्याच्यावर शंकराचे एक लहानसे मंदिर आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
१) मनमाड - औरंगाबाद या राज्य महामार्गावर क्र. १० वर मनमाडपासून ८ किमीवर एक रस्ता उजवीकडे वळतो. या रस्त्याने २ किमी अंतरावर किल्ल्याच्या पायथ्याचे कातरवाडी गाव आहे. कातरवाडी गाव गडाच्या पूर्वेस आहे. गावा मागच्या डोंगरात कपिलमुनींचा अश्रम आहे. आश्रमाच्या डोंगराच्या पायथ्या पर्यंत जीप सारख्या वाहानाने जाता येते.

२) मनमाडहुन एक रस्ता थेट कातरवाडीत येतो. हे अंतर ७ किमी आहे. मनमाडहुन रिक्षाने अथवा खाजगी वाहानाने किल्ल्याच्या पायथ्याच्या कपिलमुनी आश्रमा पर्यंत पोहोचता येते.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही. कातरवाडीतील मारुती मंदिरात १० जणांची राहाण्याची सोय होते. कात्रा बरोबरच अंकाई , टंकाई, गोरखगड किल्लाही पाहाणार असल्यास; गोरखगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरा बाहेर राहाण्याची सोय होउ शकेल. कपिलमुनी आश्रमात पाणी नसल्यामुळे राहाण्यासाठी गैरसोईचा आहे.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय स्वत: करावी.
पाण्याची सोय :
गडावर पिण्याचे पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
कातरवाडीतून ४५ मिनीटे लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
जुलै ते फेब्रुवारी

Sorry! There is no fort information available of this category.
Please check back later...