मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

कावनई (Kavnai) किल्ल्याची ऊंची :  2500
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: इगतपुरी पश्चिम
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम
इगतपुरी परिसरात असणारी सह्याद्रीची रांग दोन दिशांना विभागली जाते. एक पूर्वेकडे तर दुसरी पश्चिमेकडे, पूर्वेकडे असणार्‍या सह्याद्रीच्या रांगेला कळसूबाई रांग म्हणतात. यात कळसूबाई ,अलंग, कुलंग, औंढा, पट्टा हे किल्ले येतात. तर पश्चिमेकडे असणार्‍या रांगेत त्रिंगलवाडी, कावनई, हरीहर, ब्रम्हगिरी, अंजनेरी हे किल्ले येतात. कावनई किल्ला आणि त्याच्या पायथ्याशी असलेले कपिलधारा तिर्थ ही दोन्ही ठिकाणे एका दिवसात सहज पाहाता येतात.
26 Photos available for this fort
Kavnai
Kavnai
Kavnai
पहाण्याची ठिकाणे :
कावनई किल्ल्याच्या प्रवेशव्दारा पर्यंत पोहोचण्यासाठी दगडात कोरलेल्या पायर्‍या आहेत. प्रवेशव्दारा जवळील पायर्‍या उध्वस्त केल्यामुळे या ठिकाणी सध्या लोखंडी शिडी लावलेली आहे. या पाय‍र्‍या सुरु होतात, त्याठिकाणी (पायर्‍या चढण्यापूर्वी) उजव्या बाजूला एक पायवाट जाते . याठिकाणी एक गुहा आहे. या गुहेचा उपयोग टेहळणीसाठी होत होता. या गुहेच्या खालच्या बाजूस एक चौकोनी कोरडे टाके आहे. या दोन्ही गोष्टी पाहून पायर्‍या आणि शिडीच्या मार्गाने प्रवेशव्दारातून किल्ल्यावर प्रवेश करावा. प्रवेशव्दाराच्या बाजूला दोन बुरुज आहेत. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर उजव्या
बाजूला गुहा आहे. पाहारेकर्‍यांसाठी या गुहेचा देवडी म्हणून वापर होत असावा. गुहेत ४ ते ५ जणांना राहता येईल एवढी जागा आहे. पायर्‍या चढून वर गेल्यावर समोरच बुजलेले पाण्याचे टाके आहे. हे टाके पाहून प्रवेशव्दाराच्या बाजूच्या बुरुजावर जावे येथून दूर वरचा प्रदेश दिसतो. बुरुज पाहून परत पायर्‍या चढुन २ मिनिटात आपण गडमाथ्यावर पोहोचतो. गडमाथ्यावर पोहोचल्यावर समोर एक तलाव आहे. तलाव आजुबाजूला पडक्या वाड्यांचे अनेक अवशेष आहेत. काठावर उघड्यावर एक पिंड आणि नंदी आहे. तिथेच कातळात सर्प कोरलेला आहे. तलावाच्या काठी पार्वतीचे मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला खोलगट भाग आहे. त्यात कातळात कोरलेले एक पाण्याचे टाके आहे. येथून पायवाटेने एक उंचवटा चढून गेल्यावर कड्याच्या बाजूला एक प्रशस्त टाके आहे. त्याचा वरचा भाग घडीव दगडांनी बांधून काढलेला आहे.

या टाक्यापासून उजव्या बाजूची वाट प्रवेशव्दाराच्या वरच्या बाजूस बुरुजावर जाते. याठिकाणी काही वास्तूंचे अवशेष आणि बुरुजावर एक ध्वजस्तंभ आहे. हे पाहून आल्या वाटेने परत टाक्यापाशी येऊन पायवाटेने पुढे चालत गेल्यावर समोर कातळात कोरलेले टाके दिसते. या टाक्याकडे जाण्यापूर्वी उजव्या बाजूला वळून कड्यापाशी गेल्यावर एक कड्याच्या खाली कातळात कोरलेले छोटे टाके आहे. या टाक्यातील पाणी पिण्यालायक आहे. हे टाके पाहून पुन्हा माघारी वळून समोर दिसंणार्‍या टाक्याच्या बाजूने बुरुजावर जावे. या बूरुजा खालून डोंगराची एक सोंड खाली रस्त्यापर्यंत गेलेली दिसते. येथून एक पायवाट किल्ल्यावर येते. बुरुजावर चढून येण्यासाठी इथे एक शिडी लावलेली आहे. सध्या बुरुज ढासळल्यामुळे ही वाट वापरात नाही. हा बुरुज पाहून पुन्हा तलावापाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. किल्ल्यावरून कळसूबाई रांग, त्र्यंबक रांग, त्रिंगलवाडी असा सर्व परिसर दिसतो.
पोहोचण्याच्या वाटा :
कावनई गावामार्गे :-
कावनईला जायचे असल्यास इगतपुरीला किंवा घोटीला यावे. येथून कावनई गावाकडे जाणारी बस पकडावी. कावनई गाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. इगतपुरीहून अप्पर वैतरणाला जाणारी बस पकडून वाकी फाट्यावर उतरावे. वैतरणाकडे जाणारा रस्ता सोडून उजवकडची वाट पकडावी. या फाटयापासून १ तासाच्या चाली नंतर आपण कावनई गावात पोहचतो. गावाच्या अलिकडे कपिलाधारातीर्थ नावाचा आश्रम आहे. गावात शिरल्यावर उजव्या हातालाच किल्ला दिसतो. गावातील मारुती मंदीरा समोरुन (शाळे समोरुन) किल्ल्यावर जाणारी मळलेली वाट आहे.
(खाजगी वहानाने थेट मारुती मंदिरापाशी जाता येते.). पाऊल वाटेने पाऊण तासाच्या चालीनंतर आपण प्रवेशव्दारा खालील कातळात कोरलेल्या पायर्‍यांपाशी पोहोचतो. पायर्‍या आणि शेवटच्या भागात लावलेली शिडी चढून आपण किल्ल्याच्या प्रवेशव्दारापाशी येऊन पोहचतो. गावापासून गडमाथ्यावर पोहचण्यास १ तास पुरतो.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आणि देऊळ आहे. यात ४ ते ५ लोकांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही. आपण स्वत: करावी
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. यात मार्च पर्यंत पाणी असते.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
कावनई गावातून एक तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
जुलै ते मार्च
डोंगररांग: Igatpuri west
 कावनई (Kavnai)