मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

खैराई किल्ला (Khairai) किल्ल्याची ऊंची :  2296
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: पेठ, नाशिक
जिल्हा : नाशिक श्रेणी : कठीण
त्र्यंबकेश्वर हा घाटांचा प्रदेश. कोकणातून जव्हारमार्गे गुजरातेत जाणाऱ्या घाटांवर लक्ष ठेवण्यासाठी खैराई आणि सोनगीर या किल्ल्यांची निर्मिती केली गेली. खैराई पासून जव्हारकडे उतरणारा घाट हा साधारण १५ किमी आहे. प्रामुख्याने या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी खैराई किल्ल्याचा वापर केला जात असे. इसवीसन १६७६ मध्ये छ. शिवाजी महाराजांनी खैराई किल्ला जिंकून घेतला.

24 Photos available for this fort
Khairai
Khairai
Khairai
पहाण्याची ठिकाणे :
साट्याचा पाडा या पायथ्याच्या गावातून मळलेली पायवाट गडावर जाते. गड चढायला सुरुवात केली की सुरुवातीला वळणा वळणाची पायवाट आहे. गडाचा चढ सुरुवातीला मध्यम तर नंतर खडा चढ आहे. वाटेत जास्त झाडे नसल्याने चढताना दमछाक होते. शेवटच्या टप्प्यात मध्यम रॉक पॅच आहे. साधारण तासाभरात आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोचतो. किल्ल्याचा माथा आकाराने लहान आहे. किल्ला चढून आल्यावर समोर एक बुरुज आहे. बुरुजाच्या मागे पाण्याची तीन टाकी आहेत. ही टाकी पाहून पुढे गेले की टाक्यांच्या मागे वाड्याच्या जोती आहेत. या वाड्याचा घेर मोठा आहे. वाड्याच्या उजव्या बाजूस कड्यावर एक पडका बुरुज दृष्टीस येतो. वाड्याच्या जोती ओलांडून पलीकडे गेले की पाण्याचे एक मोठे टाके लागते. या टाक्याला पायऱ्या आहेत. कदाचित वाड्यातील लोकांसाठी हे टाके वापरले जात असेल. टाके पाहून आपण पुढे आलो की आपल्याला एक मंदिर लागते. हे वेताळाचे मंदिर आहे. मंदिरात फक्त एक शिवलिंग आहे. येथे रोज गावातून गावकरी येउन पूजा करतो. मंदिरासमोरच दोन तोफा पडलेल्या दिसतात. यातील एक तोफ लहान आहे तर दुसरी साधारण अडीच मीटर लांबीची आहे. ही तोफ सुतरनाळ प्रकारातील आहे. मंदिराच्या डाव्या बाजूस कड्याजवळ तुटलेली तटबंदी आहे. ही तटबंदी उजव्या बाजुला ठेवून आपण पुढे गेलो की डाव्या बाजूला थोड्या उंचवट्यावर तुटलेल्या वाडा सदृश वास्तूचे अवशेष आहेत. येथून उजव्या बाजुने एक वाट खाली उतरते. पण ही वाट मळलेली नाही. वाटाड्याशिवाय या वाटेवरुन जाउ नये. या अवशेषांमागे मोठा तलाव आहे. हा तलाव पाहून आपण पुढे जाउन वाड्याला वळसा घालतो आणि परत वेताळाच्या मंदिरापाशी येतो. येथून आपण पुढे चालत गेलो की मगाशी पाहिलेले पायऱ्या असलेले टाके आणि वाड्याच्या जोती आपल्या डावीकडे असतात. येथूनच पुढे आपण आलो त्या रस्त्याने उतरायला सुरुवात करु शकतो. गड संपूर्ण पाहायला साधारण पाउण तास पुरेसा होतो. संपूर्ण किल्ला तटबंदीने घेरलेला आहे. तशा खुणा दिसतात.
पोहोचण्याच्या वाटा :
किल्ल्यावर जाण्यासाठी पायथ्याच्या साट्याचा पाडा या गावात यावे लागते. साट्याचा पाड्यात जाण्यासाठी नाशिक मार्गे हरसूल या गावी जावे. हे अंतर साधारण ५२ किलोमीटरचे आहे. हरसूल पासून १० किमी वरील खैरपाली गाव गाठावे. हे अंतर १४ किलोमीटर आहे. येथे वाहन ठेवून आपण चालत १० मिनिटात साट्याचा पाडा या गावी पोहोचतो. या भागात एसटी आणि खाजगी गाड्यांची सोय कमी असल्याने शक्यतो प्रवास खाजगी वाहनाने करावा.

राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्यायोग्य पाणी आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
साट्याचा पाडा वरुन एक तास लागतो.

Sorry! There is no fort information available of this category.
Please check back later...