मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

कोहोजगड (Kohoj) किल्ल्याची ऊंची :  3200
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: पालघर
जिल्हा : पालघर श्रेणी : मध्यम
पालघर जिल्ह्यातील वैतरणा नदीच्या खोर्यात गोतारा, कामणदुर्ग, कोहोज असे काहीसे अल्पपरिचित किल्ले आहेत. यापैकी वाडा - पालघर रस्त्यावरचा ‘कोहोज’ हा प्रमुख किल्ला वाड्यापासून अवघ्या १० ते ११ किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. ‘कोहोज’ किल्ल्यावरील माणसाच्या आकाराच्या निसर्ग निर्मित सुळक्यामुळे या भागातून प्रवास करताना हा किल्ला आपले लक्ष वेधून घेतो. मुंबई - ठाण्याहून जवळ असूनही या भागातल्या किल्ल्यांवर डोंगर भटक्यांचा वावर तसा कमीच आहे. त्यामूळे किल्ल्यांवर जाणार्या वाटा मोडलेल्या आहेत. तसेच अनेक ढोरवाटांमुळे याभागात वाट चूकण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे या किल्ल्यांवर जातांना गावातून वाटाड्या घेऊनच जावे.
18 Photos available for this fort
Kohoj
Kohoj
Kohoj
इतिहास :
गडावरच्या खोदीव टाक्यांवरून हा गड सातवाहनकालीन असावा . १६ व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी गुजरातच्या राजाकडून हा प्रदेश जिंकून घेतला व या गडावर तट बुरूज चढवले. छ. शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला स्वराज्यात होता. पुढे पेशव्यांनी १८ व्या शतकात (१७३७) काढलेल्या मोहिमेत हा प्रदेश जिंकला होता.
पहाण्याची ठिकाणे :
नाणे मार्गे किल्ला चढाईला सुरुवात केल्यावर साधारण एक तासात आपण कारवीच्या दाट झाडीतून छोट्या पठारावर पोहोचतो. पुढे ठळक पाऊलवाट वाट कातळ टप्प्यापाशी येते. कातळटप्पा चढून गेल्यावर आपण मोठ्या पठारावर पोहोचतो. पठारावर पायवाटेच्या उजव्या बाजूला सात पाण्याची टाकी कातळात कोरलेली आहेत. पुढे गेल्यावर शंकराचे जिर्णोद्धारीत मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवर देवीची मुर्ती आहे. या मंदिराला कोहोजाई माता मंदिर या नावानेही गावकरी ओळखतात. त्याच्या समोरच दोन टाकी आहेत. जवळच एका झाडाखाली काही शेंदुर लावलेले दगड व समाध्या ठेवलेल्या आहेत. याठिकाणी वाघोट्याहून येणारी पायवाट मिळते. पुढे गडमाथ्याकडे चढाई करतांना उध्वस्त प्रवेशद्वाराचे अवशेष दिसतात. त्याच्या डाव्या बाजूला चिलखती बुरुज आहे. बुरुजाच्या आत मारुतीची मुर्ती आहे. बुरुजाच्या पुढे तीन खांब टाकी आहेत. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.

किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याकडे चढत जातांना पायवाटेच्या उजवीकडे पाण्याची दोन टाकी आहेत. पुढे चढत गेल्यावर किल्ल्यावरील निसर्ग निर्मित शिल्प (माणसाच्या आकाराचा सारखा भासणारा दगडी सुळका) आहे. विविध दिशांतून विविध आकार व भास दाखवणारी ही कृती पाहून आपण अचंबित होतो. इथून थोडे पुढे कृष्णाचे छोटे देऊळ आहे. येथून खालचा (वाडा - मनोर) रस्ता छान दिसतो. याठिकाणी आपली गडफ़ेरी पूर्ण होते.

पोहोचण्याच्या वाटा :
किल्ल्याच्या पश्चिमेला नाणे गाव आहे आणि पूर्वेला वाघोटे गाव आहे . दोन्ही गावातून गडावर जाण्याच्या वाटा आहेत.

वाघोटे मार्गे जाण्यासाठी :-
१) मुंबई - अहमदाबाद महामार्गावर (एन.एच.८) मुंबई पासून ९० किलोमीटरवर मनोर गाव आहे. येथून वाड्याला जाणारा फाटा फूटतो. या मनोर - वाडा रस्त्यावर मनोर पासून १३ कि.मीवर "वाघोटे" हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या गावातून ठळक पायवाट धरणाच्या तलावाच्या भितींवरुन किल्ल्यावर जाते.

२) कल्याण - भिवंडी - वाघोटे ( कोहोजच्या पायथ्याचे गाव) हे अंतर ६३ किलोमीटर आहे. गावातून ठळक पायवाट धरणाच्या तलावाच्या भितींवरुन किल्ल्यावर जाते.

नाणे मार्गे जाण्यासाठी :-

३) मुंबई - अहमदाबाद महामार्गावर (एन.एच.८) मुंबई पासून ९० किलोमीटरवर मनोर गाव आहे. येथून वाड्याला जाणारा फाटा फूटतो. या मनोर - वाडा रस्त्यावर मनोर पासून ३ किलोमीटर अंतरावर उजवीकडे "नाणे" गावाला जाणारा फ़ाटा आहे . नाणे हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या गावातून पायवाट किल्ल्यावर जाते.

४) कल्याण - भिवंडी - कुडूस - नाणे हे अंतर १०४ किलोमीटर आहे. नाणे गावातून पायवाट किल्ल्यावर जाते.
राहाण्याची सोय :
गडावर राहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
पिण्याचे पाणी गडावरील खांब टाक्यात मार्चपर्यंत असते.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
वाघोटे मार्गे ३ तास लागतात. नाणे मार्गे ३ तास लागतात.
डोंगररांग: Palghar
 आसावा (Asawa)  अशेरीगड (Asherigad)  बल्लाळगड (Ballalgad)  गंभीरगड (Gambhirgad)
 काळदुर्ग (Kaldurg)  कोहोजगड (Kohoj)  सेगवा किल्ला (Segawa)  तांदुळवाडी (Tandulwadi)