मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

कोळदुर्ग (Koldurg) किल्ल्याची ऊंची :  2250
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: शुकाचार्य
जिल्हा : सांगली श्रेणी : मध्यम
कोळदुर्ग आणि बाणूरगड हे दोन किल्ले सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात वसलेले आहेत. यातला बाणूरगड (भुपाळगड) किल्ला छ्त्रपती संभाजी राजांनी मुघलांच्या फ़ौजांच्या सहाय्याने जिंकल्यामुळे इतिहात प्रसिध्द आहे. पण त्याच्या जवळ असलेला कोळदुर्ग मात्र अपरिचित आहे. कोळदुर्गावरील अवशॆषांची पण वाताहात झालेली आहे. किल्ल्यावरील मंदिराचे अवशेष वापरुन पळशी गावातील सिध्देश्वराचे मंदिर बांधलेले आहे.

कोळदुर्ग किल्ल्याजवळ असलेले शुकाचार्यांचे मंदिर आणि परिसर या भागात प्रसिध्द आहे. वर्षभर याठिकाणी लोकांचा राबता असतो, पण त्याला लागूनच असलेला कोळदुर्ग किल्ला मात्र दुर्लक्षित राहीलेला आहे. पळशीचे सिध्देश्वर मंदिर, शुकाचार्य मंदिर, कोळदुर्ग आणि बाणूरगड ही ठिकाणे खाजगी वहान असल्यास एका दिवसात पाहाता येतात. बाणुरदुर्गाची माहिती साईटवर दिलेली आहे.
16 Photos available for this fort
Koldurg
पहाण्याची ठिकाणे :
कोळदुर्ग किल्ल्याच्या पश्चिम बाजूला पठार आहे ते पळशी - बाणूरगड रस्त्याला जोडलेले आहे. तेथून किल्ल्यापर्यंत जायला १५ मिनिटे लागतात. कोळदुर्गाच्या इतर तीन बाजूना मात्र कडे आहेत. कोळदुर्गाला येणारी दुसरी वाट शुकाचार्याकडून येते. एसटी अथवा खाजगी वहानाने शुकाचार्य पर्यंत पोहोचता येते. इथे दोन डोंगरांमधील दरीत शुकाचार्यांचे पवित्र स्थान आहे. व्यास ऋषींचे पुत्र शुकाचार्य यांची ही तपोभुमी याठिकांई त्यांनी पांडवांचे पणतू राजा परिक्षित याला सात दिवसात भागवत सांगितले होते अशी आख्यायिका आहे. या ठिकाणी त्यांची समाधी आहे. इथे जाण्यासाठी व्यवस्थित पायर्‍या बांधलेल्या आहेत. शुकाचार्यांचे मंदिर दाट झाडीत आहे. बाजूला बारमाही झरा आणि कुंड आहे. मंदिराच्या बाजूला दोन गुहा आहेत. या रखरखीत प्रदेशातील निसर्गरम्य स्थानाला भेट देऊन झर्‍याचे पाणी बाटल्यात भरुन घ्यावे. आल्या वाटेने कुंडाच्या पुढे १० पायर्‍या चढल्यावर उजव्या बाजूला एक ठळक पायवाट जंगलात जाते. या पायवाटेने बाजूच्या डोंगरावर चढायला सुरुवात करावी. पुढे एक सहज पार करता येण्याजोगा कातळ टप्पा आहे तो पार केल्यावर आपण पठारावर पोहोचतो. शुकाचार्य मंदिर ते पठार पोहोचण्यासठी फ़क्त १० मिनिटे लागतात.

पठारावर समोरच दत्त मंदिर आहे. त्याचे दर्शन घेऊन मंदिराच्या मागिल पायवाटेने पुढे गेल्यावर दोन पायवाटा आहेत सरळ जाणारी वाट कुसबावडे गावात जाते. तर उजव्या बाजूला जाणारी वाट कोळदुर्गकडे जाते. शेतातून जाणार्‍या या वाटेवरुन थोडे पुढे गेल्यावर समोर कोळदुर्ग दिसतो. त्या किल्ल्यावरील दोन घर दिसतात. त्या घरांच्या दिशेने चालत जावे. पुढे गेल्यावर पठार संपते. कोळदुर्ग आणि कुसबावडे गावाच्या पठारा मधील दरी दिसते. शुकाचार्या पासून या दरीपर्यंत येण्यासाठी २० मिनिटे लागतात. दरीत उतरायला पायवाट आहे. या बजूला दरी फ़ारशी खोल नाही त्यामुळे ती पार करायला ५ मिनिटे लागतात. दरीतून किल्ल्याच्या दक्षिण बाजूची रचीव तटबंदी दिसते. तटबंदीतून किल्ल्यावर आपला प्रवेश होतो. शुकाचार्य ते किल्ला साधारणपणे ३० मिनिटात पोहोचता येते.

किल्ल्यावर चव्हाणांची हल्ली बांधलेली घर आहेत. घराच्या मागे तटबंदी आहे. ती फ़ोडून केलेला रस्ता पळधी - बाणूरगड रस्ताकडे जातो. घरच्या समोर थोडे पुढे चालत गेल्यावर किल्ल्यावरील देवळाचे काही अवशेष, पिंड, तुटलेला नंदी, दोन वीरगळ आणि एक सतीगळ पाहायला मिळते. पुढे गेल्यावर खालच्या बाजूला तलाव आहे. त्या तलावाचा बांध फ़ोडून तलावाच्या जागी आता शेती केली जाते. किल्ल्याच्या उत्तरेला कड्या लगत तुरळक तटबंदी आहे. किल्ल्याचा घेर फ़ार मोठा आहे पण किल्ल्यावर इतर काही अवशेष दृष्टीस पडत नाहीत. किल्ल्यावरुन उत्तरेला बाणूरगडावरील मंदिर दिसते.

चव्हाणांच्या घरासमोर असलेल्या किल्ल्याच्या पूर्व टोकावरून एक ठळक पायवाट खालच्या हिवतड गावात उतरते. या वाटेने हिवतड गावात उतरण्यास १० मिनिटे लागतात. वाट उतरते तेथे गोशाळा आणि आश्रम आहे. या आश्रमा जवळच शुकाचार्यच्या पायर्‍या चालू होतात. या पायर्‍यांनी ५ मिनिटात शुकाचार्य मंदिरात पोहोचता येते. अशा प्रकारे शुकाचार्य मंदिर ते कोळदुर्ग ते परत शुकाचार्य मंदिर असा १ ते दिड तासाचा सोपा ट्रेक करता येतो.

पोहोचण्याच्या वाटा :
कोळदुर्गावर जाण्यासाठी प्रथम कराड गाठावे. कराड - पंढरपूर रस्त्याने (४२ किमी वरील) विटा गाव गाठावे विटा गावातून थेट बाणूर गडावर जाण्यासाठी एसटी बसेस आहेत. या बसने शुकाचार्यला उतरावे. खाजगी वहान असल्यास विटा गावाच्या पुढे २२ किमीवरील खानापूर हे तालुक्याचे गाव गाठावे. खानापूरच्या पुढे भिवघाट गाव आहे त्यापूढे शुकाचार्य, पळशी आणि बाणूरगडाचा फ़ाटा १० किमीवर आहे. पळशीच्या सिध्देशवर मंदिराच्या गाभार्‍याच्या भिंतीत कोळदुर्ग वरुन आणलेल्या मुर्ती आणि वीरगळी बसवलेल्या आहेत. त्या पाहून ४ किमी अंतरावरील शुकाचार्य गाठावे. शुकाचार्यच्या बाजूच्या डोंगरावर कोळदुर्ग आहे. कोळदुर्गवर जाण्यासाठी वर दिल्याप्रमाणे ट्रेक करावा. एसटीचे वेळापत्रक खाली दिलेले आहे.

खाजगी वहान असल्यास थेट हिवतड गावातील गोशाळेपर्यंत जाता येते. भिवघाट गावातून निलकरंजे गाव गाठावे. तेथून एक रस्ता गोमेवाडी मार्गे हिवतड आणि पुढे शुकाचार्यला जातो.

राहाण्याची सोय :
किल्ल्यावरील राहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत: करावी. भिवघाटला हॉटेल्स आहेत

पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याच्या पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
शुकाचार्य पासून अर्धा तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
 बसचे वेळापत्रक

Depot Village From Depot From Village km
Tasgaon   Shukacharya   9.30 (Tasgaon-Kohala), 18.00 (Tasgaon -Banurgad)   6.15 (Tasgaon-Banurgad), 12.00 (Kohala - Tasgaon)   45
Vita   Shukacharya   8.30, 10.00, 15.00, 18.00 (Vita-Banurgad)   6.15 , 11.45, 17.00, 18.15 (Banurgad-Vita)   45

डोंगररांग: Shukacharya
 कोळदुर्ग (Koldurg)