मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

कुंजरगड (कोंबडगड) (Kunjargad(Kombadgad)) किल्ल्याची ऊंची :  4200
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: बालाघाट रांग
जिल्हा :  श्रेणी : मध्यम
कल्याण मुरबाड मार्गे माळशेज घाट चढून आल्यावर अजून एक डोंगररांग आडवी येते तीला बालाघाट रांग म्हणतात. हरीशचंद्र गडाच्या मागच्या बाजूस येणार्‍या या डोंगररांगेवर कलाल, कुंजर, भैरवगड इत्यादी किल्ले येतात. "कुंज" या संस्कृत शब्दाचा अर्थ हत्ती आहे. याचाच अपभ्रंश होऊन "कुजंरगड" असे पडले असावे. विहिर या पायथ्याच्या गावातून हा गड हत्ती सारखा प्रचंड भासतो.हा किल्ला कोंबड गड या नावानेही ओळखला जातो. पावसाळ्यात या भागात तूफान पाऊस पडतो. कधी कधी अनेक दिवस सूर्याचे दर्शन होत नाही. त्यामूळे पावसाळा ऎन भरात असतांना या भागातील किल्ल्यांवर जाणे टाळावे. पण जर केवळ पावसात मनसोक्त भिजत किल्ला पहायचा असल्यास कुंजरगडा सारखा किल्ला नाही. या भागात अनेक सुंदर धबधबे आहेत.

सुचना
१) खाजगी वाहानाने कुंजरगड (कोंबडगड), भैरवगड(कोळथे), कलालगड, भैरवगड(शिरपुंजे) हे चार किल्ले दोन दिवसात पुढील प्रमाणे पाहाता येतात.सकाळी लवकर कुंजरगडाच्या पायथ्याला पोहोचुन कुंजरगड पाहुन घ्यावा. दुपारी कोथळे गावातील मंदिरात जेवण, आराम करुन भैरवगड पाहावा. कुंजरगड - भैरवगड (कोळथे) हे दोन किल्ले एका दिवसात पाहून पाचनईला मुक्कामाला जावे. पाचनईला जेवणाची आणि मुक्कामाची सोय होते. दुसर्‍या दिवशी सकाळी उन तापण्या अगोदर कलालगड करावा. (कलालगड हा कठीण श्रेणीचा किल्ला आहे. त्याची साईट वरील माहिती वाचुन घ्यावी) दुपारी शिरपुंज्याचा भैरवगड करुन परतीचा प्रवास करावा.
२)वरील सर्व किल्ल्यांची माहिती साईटवर लिहीलेली आहे
10 Photos available for this fort
Kunjargad(Kombadgad)
पहाण्याची ठिकाणे :
विहिर या कुंजरगडाच्या पायथ्याच्या गावातून गडावर जाण्यासाठी २ वाटा आहेत. त्यातील गड व त्याच्या उजव्या बाजूचा डोंगर यांच्या मधून जाणार्‍या वाटेने गडावर पोहोचण्यासाठी कमी वेळ लागतो आणि गडावरील सर्व अवशेष ही पाहता येतात. या वाटेने गडावर चढतांना साधारणत: गडाच्या पाऊण उंचीवर एक वाट डावीकडे वळते. या वाटेने गडाला वळसा घालून जातांना वाटेत दाट झाडीत उघड्यावर ठेवलेल्या दोन मूर्ती पाहायला मिळतात. त्यातील एक मुर्ती हनुमानाची असून दुसर्‍या मुर्तीला काळोबा म्हणतात. या मूर्त्या येथून हलवून गावात नेऊन मंदिर बांधण्याचा गावकर्‍यांचा मानस होता, परंतु त्यांना हलवणे आज पर्यंत शक्य झाले नाही, अशी कथा गावकरी सांगतात.

या मुर्ती पाहून मागे न जाता कड्याला लागून असलेल्या वाटेवरुन कारवीच्या दाट झाडीतून किल्ल्यावर जाता येते किंवा परत मागे फिरुन आलेल्या वाटेने दोन डोंगरामधील खिंडीतून गडावर जाता येते. पहिल्या मार्गाने डोंगराला पूर्ण वळसा घालून आपण विहिर गावाच्या विरुध्द बाजूस पोहोचतो. या बाजूला फोफसंडी गावाकडून येणारी वाट येऊन मिळते. किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यावर गडावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्‍या आहेत. अर्ध्या पायर्‍या चढल्यावर एक गुहा आहे, या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे ती डोंगराच्या आरपार खोदलेली आहे. त्यामुळे एकाच वेळी विहिर गावच्या दिशेला व फोफसंडी गावाच्या बाजूस लक्ष ठेवणे शक्य होत असे. पावसाळ्यात व कडाक्याच्या थंडीत / उन्हात या गुहेचा चांगला उपयोग होत असावा. हि गुहा पाहुन पायर्‍यांच्या मार्गाने उध्वस्त प्रवेशव्दारातून आपण गडावर प्रवेश करतो. समोरच आपल्याला उध्वस्त वास्तुचे अवषेश दिसतात. प्रथम उजव्या बाजूला गेल्यावर पाण्याची सुकलेली २ टाकी दिसतात. या बाजूला किल्लाच्या माथ्यावरील पठार अरुंद होत जाते, टोकावरून दुरवरचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. इथुन पुन्हा प्रवेशव्दारापाशी येऊन विरुध्द (डाव्या बाजूच्या) टोकाकडे जातांना वाटेत पाण्याची ३ सुकलेली टाकी दिसतात. पुढे एका मोठ्या वाड्याचे अवषेश दिसतात.या वाड्यामागे (पिण्याच्या पाण्याच्या) दगडात कोरलेल्या टाक्यांचा समुह आहे. येथून प्रवेशव्दारापाशी परत आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते.

येथुन आलेल्या वाटेने परत न जाता सरळ जाता गडाला (उजव्या बाजुला) लागुन असणार्‍या डोंगरावर जावे. या डोंगरावर ३ नैसर्गिक गुहा आहेत. गावकरी या गुहांचा उपयोग आपली गुरे बांधण्यासाठी करतात.या गुहा पाहुन डोंगर उतरुन विहिर गावात जाता येते.
पोहोचण्याच्या वाटा :
कुंजरगडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.
१) विहिर गावातून :- विहिर गावात पोहोचण्यासाठी मुंबई - कल्याण - मुरबाड - माळशेज घाट मार्गे ओतुर गाव गाठावे. ओतुर बस स्थानकाच्या बाजूने जाणार्‍या रस्त्याने (१६ किमी) ब्राम्हणगाव - (१६ किमी) कोतूळ -(१६ किमी) विहिर गाव आहे.विहिर या कुंजरगडाच्या पायथ्याच्या गावातून गडावर जाण्यासाठी २ वाटा आहेत.
(अ) कुंजरगड व त्याच्या उजव्या बाजूचा डोंगर यामधील खिंडीतून गडावर जाता येते.
(ब) कुंजरगडाच्या उजव्या बाजूच्या डोंगरावर चढून नैसर्गिक गुहा पाहून किल्ल्यावर जाता येते.
त्यातील गड व त्याच्या उजव्या बाजूचा डोंगर यांच्या खिंडीतून जाणार्‍या वाटेने गडावर पोहोचण्यासाठी कमी वेळ लागतो.
सर्वात उत्तम मार्ग म्हणजे गड चढतांना खिंदी मार्गे चढावा तर उतरतांना बाजूच्या डोंगरवरून उतरावा म्हणजे सर्व अबषेश पाहून होतात.

२) फोफसंडी गावाकडून :- फोफसंडी गावात पोहोचण्यासाठी मुंबई - कल्याण - मुरबाड - माळशेज घाट - खिरेश्वर गाठावे. खिरेश्वरच्या पुढे फोफसंडी गावाला जाणारा फाटा आहे. गावातून एकच वाट कुंजर गडावर जाते. या मार्गाने गडावर आल्यास हनुमानाची व काळोबाची मुर्ती पहायला मिळत नाही. त्यासाठी डोंगराला वळसा घालून विहिर गावाच्या बाजूस जाऊन परत फिरावे लागते. तसेच नैसर्गिक गुहा पहाण्यासाठी वेगळा फेरा पडतो.
फोफसंडी गावाकडून गड चढून विहिर गावात उतरता येईल. परंतु या भागात एसटीची सेवा मर्यादीत आहे. त्यामुळे स्वत:चे खाजगी वहान असल्यास उत्तम.
राहाण्याची सोय :
गडावर राहण्याची सोय नाही. विहिर गावातील शाळेत राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
पिण्याचे पाणी बारामही उपलब्ध आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
१) विहिर गावातून कुंजरगडावर जाण्यास २ तास लागतात. २) फोफसंडी गावातून कुंजरगडावर जाण्यास २ तास
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
जुलै ते फेब्रुवारी

Sorry! There is no fort information available of this category.
Please check back later...