मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

महिमानगड (Mahimangad) किल्ल्याची ऊंची :  3200
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: सातारा
जिल्हा : सातारा श्रेणी : मध्यम
महिमानगड हा सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात मोडणारा किल्ला आहे. या परिसरातील किल्ले हे मुख्य डोंगररांगेपासून अलग झालेल्या डोंगरावर विराजमान झालेले आहेत. सातारा - पंढरपूर रस्त्यावर महिमानगड गाव आहे . गावाच्या मागे मुख्य डोंगररांगेपासून अलग झालेल्या डोंगरावर असलेला महिमानगड किल्ला त्याच्या ताशीव कातळ कड्यांमुळे आपले लक्ष वेधून घेतो. स्वत:चे वाहन असल्यास एका दिवसात महिमानगडा बरोबर माण तालुक्यातील (अंदाजे २० कि.मी वरील) वर्धनगड, (अंदाजे २५ कि.मी वरील) शिखर शिंगणापूरचे मंदिर व (८ कि.मी. वरील ) गोंदवलेकर महाराजांचे समाधी मंदिर पाहाता येते.


Mahimangad
8 Photos available for this fort
Mahimangad
Mahimangad
Mahimangad
इतिहास :
आदिलशहाच्या काळात विजापूर या राजधानीपासून कोकणातल्या बंदरांपर्यंत जाणारा, विजापूर - पंढरपूर - सातारा - वाई - महाड असा व्यापारी मार्ग होता. या मार्गाचे रक्षण करण्यासाठी महिमानगड किल्ल्याची योजना केली होती. साताराच्या पूर्वेकडील प्रांताचे संरक्षण करण्याकरीता शिवरायांनी जे किल्ले घेतले, त्यापैकीच एक महिमानगड. पूर्वी किल्ल्याच्या रक्षणाकरीता महार रामोशी मिळून ७५ इसम ठेवलेले होते. किल्ल्याचा हवालदार आणि सबनीस यांची इनामे अद्यापही वंशज पाटील व कुळकर्णी यांच्याकडे चालू आहे.
पहाण्याची ठिकाणे :
गडाच्या उध्वस्त प्रवेशद्वारातून आपण गडावर प्रवेश करतो. प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस असलेल्या बुरुजांची रचना अशी केलेली आहे की, प्रवेशद्वाराजवळ येई पर्यंत आपल्याला ते दिसत नाही. प्रवेशद्वाराच्या चौकटीतच हत्तीचे सुंदर शिल्प कोरलेले आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या आजुबाजुला असणारी तटबंदी चांगल्या स्थितित शाबूत आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर ऊजव्या बाजूस समोरच हनुमानाचे देऊळ दिसते. त्याच्या समोरच बुरुजावर जाण्यासाठी केलेल्या पायर्‍या दिसतात.येथून संपूर्ण गडाची तटबंदी नजरेस पडते. थोडे पुढे गेल्यावर खालच्या बाजूस पाण्याचे सुंदर तलाव आहे, तलाव बर्‍यापैकी खोल आहे. या तलावाला बारामही पाणी असते. त्याच्याच बाजूला वाड्यांचे भग्नावशेष दिसतात. या बांधीव तलावाच्या बाजूला एक मोठा खड्डा आहे, तो साच पाण्याचा तलाव असावा. या दोन तलावांच्या मधून वाट गडाच्या ईशान्येस असलेल्या सोंडेकडे जाते. या सोंडेवर असलेल्या तटबंदीमध्ये एक चोर दरवाजा आहे. या दरवाजातून पलिकडे गेल्यावर लांबवर पसरलेली सोंड दिसते. सोंडेच्या टोकाला एक बुरुज आहे. हे पाहून परत येतांना २ तलावांमधून न येता किल्ल्याच्या रस्त्याकडील तटबंदीच्या बाजूने यावे, येथे तलावाच्या वरच्या बाजूस एक पीराचे थडगे आहे. येथून प्रवेशद्वारापाशी येऊन प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस गेल्यावर तटबंदी व बुरुजांचे अवशेष पाहायला मिळतात. येथील तटबंदीवरुन खालचे महिमानगड गाव दिसते. गड फिरण्यास साधारण अर्धातास लागतो. किल्ल्यावरून वर्धनगड, ईशान्येकडे असणारा मोळ घाट असा सर्व परिसर दिसतो.
पोहोचण्याच्या वाटा :
१. महिमानगड गाव मार्गे:-
सातारा - पंढरपूर मार्गावर पुसेगावच्या पुढे १२ किमी अंतरावर (व दहीवडीच्या अलिकडे ७ किमी वर) महिमानगड गावाला जाणारा फाटा आहे. फलटण - दहिवडी मार्गे सातारा गाडी किंवा सातारा पुसेगावमार्गे पंढरपूर जाणारी गाडी देखील महिमानगड फाट्यापाशी थांबते. महिमानगड फाट्यावरून १.५ किमी वरील महिमानगड गावात पायी चालत जाण्यास वीस मिनिटे लागतात. महिमानगड गावाच्या जिल्हापरिषदेच्या कार्यालया समोरूनच एक वाट गडावर जाते . ही वाट थेट प्रवेशद्वारात घेऊन जाते, शेवटच्या टप्प्यात बांधीव व दगडात खोद्लेल्या पायर्‍या लागतात. या वाटेने गड गाठण्यास २५ मिनिटे लागतात.

२. दहीवडी मार्गे :-
दहीवडीतून एक रस्ता ५.५ किमीवरील शिंदी बद्रुक या खेड्यात जातो. दहीवडीहून रिक्षाने या गावात जाता येते. येथून एक पायवाट गडाला वळसा घालून तटबंदी खालून जात, प्रवेशद्वाराजवळील पायर्‍यांपाशी महिमानगड गावतून येणार्‍या वाटेला मिळते.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. महिमानगड गावातील शाळेत राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही, दहीवडी व गोंदवले गावात जेवणाची सोय होते.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
महिमानगड गावातून अर्धातास लागतो.
सूचना :
१) स्वत:चे वाहन असल्यास सातारा किंवा पुण्याहून एका दिवसात महिमानगडा बरोबर माण तालुक्यातील (अंदाजे २० कि.मी वरील) वर्धनगड, (अंदाजे २५ कि.मी वरील) शिखर शिंगणापूरचे मंदिर व (८ कि.मी. वरील ) गोंदवलेकर महाराजांचे समाधी मंदिर पाहाता येते. वर्धनगडाची माहिती साईटवर दिलेली आहे.

२) सातारा - पंढरपूर रस्त्यावर कल्याणगड (नांदगिरी), वर्धनगड , महिमानगड हे तीन किल्ले आहेत. मुंबई / पुण्याहून रात्री निघून प्रथम कल्याणगड (नांदगिरी) पाहून घ्यावा. त्यानंतर वर्धनगड , महिमानगड हे किल्ले पाहून फलटण मार्गे परत यावे. यातील वर्धनगड , महिमानगड हे किल्ले आटोपशीर असल्यामुळे तीनही किल्ले एका दिवसात पाहून होतात. त्यासाठी काटेकोर नियोजन आवश्यक आहे.

३) कल्याणगड (नांदगिरी), वर्धनगड , या किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे.
जिल्हा Satara
 अजिंक्यतारा (Ajinkyatara)  भैरवगड (सातारा) (Bhairavgad (Satara))  भूषणगड (Bhushangad)  चंदन वंदन (Chandan-vandan)
 दातेगड (Dategad)  गुणवंतगड (Gunawantgad)  जंगली जयगड (Jangli Jaigad)  कल्याणगड (नांदगिरी) (Kalyangad(Nandgiri))
 कमळगड (Kamalgad)  केंजळगड (Kenjalgad)  मधुमकरंदगड (Madhu makarandgad)  महिमानगड (Mahimangad)
 पांडवगड (Pandavgad)  पाटेश्वर (Pateshwar)  प्रतापगड (Pratapgad)  सदाशिवगड (Sadashivgad)
 सज्जनगड (Sajjangad)  संतोषगड (Santoshgad)  वैराटगड (Vairatgad)  वर्धनगड (Vardhangad)
 वारुगड (Varugad)  वसंतगड (Vasantgad)  वासोटा (Vasota)