मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

महिमतगड (Mahimatgad) किल्ल्याची ऊंची :  2651
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रत्नागिरी ,कोकण
जिल्हा : रत्नागिरी श्रेणी : मध्यम
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात ‘‘महिमतगड‘‘ हा डोंगरी किल्ला आहे. दक्षिणोत्तर पसरलेल्या या किल्ल्यावर दाट झाडी आहे. झाडीत किल्ल्याचे भरपूर अवशेष आहेत. किल्ल्याच्या उत्तरेस कुंडी व पूर्वेस निगुडवाडी गाव आहे. दोनही गावातून किल्ल्यावर पोहोचण्यास २.५ ते ३ तास लागतात. दरवर्षी दसर्‍याला गावकरी किल्ल्यावर देवीचा उत्सव साजरा करतात.


Mahimatgad
17 Photos available for this fort
Mahimatgad
पहाण्याची ठिकाणे :
महिमतगडाचे पूर्वाभिमुख प्रवेशद्वार इतिहासाची साक्ष देत अजूनही उभे आहे. दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूंना पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. गड प्रवेश केल्यावर दोन वाटा फुटतात. त्यातील समोरच्या वाटेने गेल्यास तटबंदीला लागून असलेला बांधीव तलाव उजव्या बाजूस दिसतो. पण या तलावाला गळती लागल्यामुळे त्यात पाणी साठत नाही. तलावावरुन पुढे गेल्यावर डाव्या बाजूस कातळात खोदलेले एक खांबी टाकें लागते यातील पाणी पिण्यास योग्य आहे; परंतू टाक्यात गाळ साचल्यामुळे त्यात थोडेच पाणी जमा होते. टाक्यावरुन तसेच पुढे गेल्यावर तटबंदीत बांधलेले एक शौचकुप पाहायला मिळते. या बाजूची गडाची तटबंदी शाबुत असून, ती दगड एकावर एक रचून बांधलेली आहे. दगड सांधण्यासाठी चुन्याचा वापर केलेला दिसत नाही. हे सर्व पाहून पुन्हा प्रवेशद्वारापाशी येऊन पायर्‍यांच्या मार्गाने चढून गेल्यावर दुसरे उध्वस्त प्रवेशद्वार लागते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डाव्या हाताला बांधीव तलाव दिसतो. यालाही गळती लागली असल्यामुळे यात पाणी साठत नाही. तळ्याला वळसा घालून जाणार्‍या पायवाटेने गेल्यावर महिषासूर मर्दिनीचे मंदिर लागते. या मंदिरात अनेक झिजलेल्या मुर्ती व तांदळे ठेवलेले आहेत. मंदिरा समोर दोन छोट्या तोफा ठेवलेल्या आहेत. या बाजूची किल्ल्याची तटबंदी शाबूत आहे. मंदिरा समोरील पायवाटेने पुढे गेल्यावर झाडीत पडलेली एक मोठी तोफ दिसते.
या गोष्टी पाहून मागे येऊन पुन्हा तळ्याला वळसा घालणार्‍या पायवाटेने अर्धे अंतर चालून गेल्यावर डाव्या बाजूस डोंगरावर जाणारी पायवाट दिसते. या वाटेने चढून गेल्यावर प्रथम उजव्या बाजूस शंकराचे मंदिर दिसते. मंदिरा समोरच उघड्यावर नंदी आहे. मंदिरातील पिंडीवर धातूचे आवरण घातलेले आहे. पुन्हा पायवाटेने वरच्या दिशेने गेल्यावर हनुमंताची दगडात कोरलेली मूर्ती आढळते. याच वाटेने दाट झाडीतून चढत गेल्यावर आपण गडाच्या बालेकिल्ल्याच्या तळाशी येतो. येथून खालच्या बाजूस नौकेच्या नाकाच्या आकाराचा देखणा बुरुज पाहायला मिळतो, पण तिथपर्यंत जाणे अवघड आहे.

बालेकिल्ल्यावर फक्त ध्वजस्तंभ आहे. येथून किल्ल्याचा अवाढव्य विस्तार कळतो. पूर्वेला सुस्थितीत असलेले दोन बुरुज दिसतात. बालेकिल्ल्यावरुन आजूबाजूचा विस्तिर्ण प्रदेश व दक्षिणेला विशाळगड दिसतो. येथे आपली गडफेरी पूर्ण होते.


पोहोचण्याच्या वाटा :
महिमतगडाच्या पायथ्याशी निगुडवाडी व कुंडी ही दोन गावे विरुध्द दिशांना आहेत. या दोनही गावातून गडावर जाण्यास २.५ ते ३ तास लागतात. मुंबई - गोवा महामार्गावरील संगमेश्वर या गावापासून १६ किमी वर देवरुख गाव आहे. देवरुख गावापासून निवे गाव ६ किमी वर आहे. या गावातून दोन फाटे फुटतात. उजव्या बाजूचा रस्ता मार्लेश्वर व डाव्या बाजूचा रस्ता (१० किमी) वरील निगुडवाडी व कुंडीला जाणारा रस्ता आहे.
निगुडवाडी गावातून कच्च्या रस्त्याने १ तास चालल्यावर गर्द झाडीतून जाणारी पाऊलवाट लागते. या वाटेने जाताना किल्ला आपल्याला उजव्या बाजूस दिसत राहतो. थोड्याच वेळात आपण खिंडीत येऊन पोहोचतो. येथून उजव्या बाजूस महिमतगडाचा बुरुज, डाव्या बाजूस डोंगराची सोंड व समोरच्या बाजूस कुंडी गावाला जाणारी पायवाट दिसते. ती पायवाट सोडून उजव्या हाताला झाडीत घुसणारी पायवाट पकडावी. या वाटेने २० मिनिटात आपण बुरुजाखालील उघड्या टप्प्यावर येतो. येथून डाव्या हाताला जाणारी पायवाट पकडावी. या वाटेची खुण म्हणून गावकर्‍यांनी दोन मोठे दगड एकावर एक रचून ठेवलेले आहेत. या वाटेने २० मिनिटात आपला गडप्रवेश होतो. किल्ला चढतांना बुरुज कायम उजव्या बाजूस राहील याची खबरदारी घेतल्यास वाट चुकण्याचा संभव नाही. किल्ल्यावर व वाटेत अनेक जातीची फुलपाखरे पाहायला मिळतात. हे ही किल्ल्याचे एक वैशिष्ट्य आहे.

निगुडवाडी ते कुंडी ह्या कच्च्या रस्त्यावर जीप सारखे वहान अर्ध्या रस्त्यापर्यंत पावसाळा सोडून नेता येते. हा नियोजीत रस्ता पूर्ण झाल्यावर महिमतगड १ तासात सर करता येईल.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही. निगुडवाडीतील मंदिरात/शाळेत १० जणांची सोय होऊ शकेल.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :

किल्ल्यावर पिण्याचे पाणी जानेवारी पर्यंत उपलब्ध असते. परंतू किल्ल्याला जाण्याच्या वाटेवर कोठेही पाणी नाही. त्यामुळे पाण्याचा मुबलक साठा बरोबर न्यावा.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
निगुडवाडी व कुंडी ही दोन गावे विरुध्द दिशांना आहेत. या दोनही गावातून गडावर जाण्यास २.५ ते ३ तास लागतात.
सूचना :
१) संगमेश्वर तालुक्यातील महिमतगड - मार्लेश्वर - भवानीगड ही ठिकाणे दोन दिवसात पाहाता येतात. त्यासाठी पहिल्या दिवशी सकाळी महिमतगड पाहून दुपारी (१६ किमी) वरील मार्लेश्वर गाठावे. मार्लेश्वर पाहून झाल्यावर १९ किमी वरील ‘‘संगमेश्वर कसबा‘‘ ( मुंबई - गोवा महामार्गावरील संगमेश्वरहून ३ किमी वर हे गाव आहे.) गावातील संभाजी महाराजांचे स्मारक व कर्णेश्वराचे प्राचिन मंदिर पाहून भवानीगडावर वस्तीस जावे. दुसर्‍या दिवशी भवानीगड पाहून ४५ किमी वरील चिपळूणचा गोवळकोट उर्फ गोविंदगड हा किल्ला पाहून मुंबई / पुण्याला परतता येते.

२) भवानीगड, गोवळकोट उर्फ गोविंदगड यांची माहीती साईटवर दिलेली आहे.
जिल्हा Ratnagiri
 आंबोळगड (Ambolgad)  बाणकोट (Bankot)  बारवाई (Barvai)  भवानीगड (Bhavanigad)
 फत्तेगड / फतेदुर्ग (Fattegad)  गोवा किल्ला (Goa Fort)  गोपाळगड (Gopalgad)  गोवळकोट (Gowalkot)
 जयगड (Jaigad)  कनकदुर्ग (Kanakdurg)  कोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi)  महिमतगड (Mahimatgad)
 महिपतगड (Mahipatgad)  मंडणगड (Mandangad)  माणिकदूर्ग (Manikdurg)  पन्हाळेकाजी (प्रणालक दुर्ग) (Panhalekaji Fort)
 पूर्णगड (Purnagad)  ऱाजापूरची वखार (Rajapur Fort (British warehouse))  रसाळगड (Rasalgad)  रत्नदुर्ग ( भगवतीचा किल्ला ) (Ratnadurg)
 साटवलीचा किल्ला (Satavali Fort)  सुमारगड (Sumargad)  सूवर्णदूर्ग (Suvarnadurg)  यशवंतगड(नाटे) (Yashwantgad(Nate))