मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

महिपतगड (Mahipatgad) किल्ल्याची ऊंची :  3120
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रसाळगड - सुमारगड - महीपतगड
जिल्हा : रत्नागिरी श्रेणी : मध्यम
खेड तालुक्याच्या पूर्वेस महाबळेश्वर - कोयना डोंगररांग पसरलेली आहे. या डोंगर रांगेपासून सुटावलेल्या समांतर डोंगर रांगेत रसाळगड, सुमारगड व महीपतगड हे तीन किल्ले आहेत.या दुर्ग त्रयीतील उत्तरेकडचा महिपतगड हा सर्वात उंच आणि विस्ताराने प्रचंड किल्ला आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ १२० एकर आहे. हे तीन किल्ले एकमेकांच्या जवळजवळ असल्यामुळे अनेक ट्रेकर्स महिपतगड - सुमारगड - रसाळगड असा ट्रेक देखील करतात. किंवा रसाळगड - सुमारगड - महीपतगड असाही करतात.
27 Photos available for this fort
Mahipatgad
Mahipatgad
Mahipatgad
Mahipat-Sumar-Rasal Rasta
Mahipat-Sumar-Rasal Rasta
पहाण्याची ठिकाणे :
महिपतगड किल्ला आकाराने फार मोठा आहे. डोंगराचे कडे चहुबाजूंनी तुटलेले असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी तटबंदीची गरज भासत नाही. जिथे कडा चढण्यास सोपा आहे, तिथे तटबंदी उभारली आहे. सध्या मात्र ही तटबंदी पडून गेलेली आहे. किल्ल्याला एकूण सहा दरवाजे होते. लालदेवडी दरवाजा, पुसाटी दरवाजा, यशवंत दरवाजा, खेड दरवाजा, शिवगंगा दरवाजा, कोतवाल दरवाजा अशी या दरवाजांची नावं आहेत . सद्यस्थितीला हे सर्व दरवाजे होते, याच्या खुणाही उरलेल्या नाहीत.

या किल्ल्याचे पठार म्हणजे एक जंगलच आहे. वाडी बेलदार ही महीपतगडाच्या पायथ्याची वाडी, गडाच्या दोन डोंगर सोंडांमध्ये वसलेली आहे. यातील एका सोंडेवरून २० ते २५ मिनिटात आपण किल्ल्यावर पोहोचतो. या सोंडेवरून चालताना डाव्या बाजूला एक बुरुज दिसत रहातो. या बुरुजच्या उंचीवर पोहोचल्यावर आपल्याला दोन प्रकारे गडफेरी करता येते. एक डाव्या बाजूला बुरुजाच्या दिशेने किंवा उजव्या बाजूला एक पाण्याचा बंधारा लागतो त्या बाजूने. यातील उजव्या हाताला लागणाऱ्या बांधाऱ्याच्या डाव्या बाजूने गेल्यावर एक विहीर लागते ती पाहून परत बांधाऱ्याकडे न जाता डाव्या हाताला झाडीत जाणाऱ्या रस्त्याने पुढे गेल्यावर हा रस्ता खाली खेड दरवाज्यापाशी गर्द झाडीतून उतरतो. प्रवेशव्दराचे अवशेष व पायर्‍या या ठिकाणी पाहायला मिळतात. या दरवाजापाशी जाताना एका झाडाखाली चुन्याच्या घाण्याचे दगडी चाक दिसते. ते पाहून परत फिरल्यावर डाव्या हाताला मारुती व गणपतीचे मंदिर लागते. ते पाहून उजव्या बाजूच्या रस्त्याने वर चढल्यावर अनेक उ्दध्वस्त वास्तूचीं जणूकाही वसाहतच लागते. त्या पाहून वर चढल्यावर एका मोठ्या उ्दध्वस्त वास्तूचे अवशेष लागतात. ते पाहून डाव्या बाजूने उत्तर दिशेला गेल्यावर एक पावसाळी तलाव लागतो. इथून आग्नेय दिशेला डोंगर सोंडेवरून खाली उतरल्यावर आपल्याला या किल्ल्यावर एक आगळावेगळा प्रकार दिसतो, तो म्हणजे न वापरलेल्या चुन्याचे अवशेष येथे पडलेले दिसतात. ते पाहून पुढे खाली उतरल्यावर उजव्या बाजूला पुसाटी बुरुज आणि डाव्या बाजूला यशवंत बुरुज दिसतात. या दोन्ही बुरुजांच्या बाजूला पुसाटी व यशवंत दरवाजा असण्याची शक्यता आहे.

हे सर्व पाहून परत पावसाळी तलावाकडे यावे इथून आलेल्या दिशेने परत न जाता उत्तरेकडे मार्गक्रमण करावे. इथून पुढे गेल्यावर डाव्या हाताला पारेश्वर शिवमंदिर व पिण्याच्या पाण्याची विहीर लागते. इथे मंदिरात मुक्काम सुद्धा करता येतो. मंदिरच्या मागच्या बाजूला झाडीत एका वाड्याचे अवशेष दिसतात. तसेच डाव्या बाजूला दक्षिण दिशेला काळकाई देवीचे मंदिर आहे. ते पाहून परत उत्तर दिशेला कोतवाल दरवाजाकडे प्रयाण करावे. वाटेत मंदिराच्या समोर समाध्या दिसतात. त्या पाहून पुढे गेल्यावर होळीचा माळ लागतो. तो पाहून पुढे गेल्यावर झाडीत अनेक समाध्या दिसतात. इथून पुढे गेल्यावर उजव्या हाताला असणाऱ्या खिंडीत लाल देवडी दरवाजा असण्याची शक्यता आहे. समाध्यापासून ईशान्य दिशेला प्रवास केल्यावर डाव्या बाजूला मारुतीचं मंदिर दिसते. तिथून सरळ खाली उतरल्यावर सध्या अस्तित्वात नसलेल्या कोतवाल दरवाजा पाशी पोहोचतो. तिथून खाली गेल्यावर दोन बुरुज लागतात. परंतु सध्या असलेल्या प्रचंड झाडीमुळे इथे जाता येत नाही. इथून परत मारुती मंदिराकडे यावे व डाव्या बाजूला वळावे. इथे परत आपल्याला चुन्याचा ढिगारा दिसतो. इथून पुढे गेल्यावर गडाच्या ईशान्य डोंगरसोंडेवरून खाली कोतवाल दरवाजाच्या खालचे दोन्हीही बुरुज दिसतात. इथून परत मागे फिरावे व काळकाई देवी मंदिरापाशी परत यावे. मंदिराच्या उजव्या बाजूने जाणारा रस्ता आपल्याला खाली दरीत घेऊन जातो जिथे शिव मंदिर व शिवगंगा हे पाणवठ्याचे ठिकाण आहे. त्याच्या खाली शिव गंगा दरवाजा असावा. ते पाहून वर आल्यावर उजव्या हाताला बुरुज लागतो जो वाडी बेलदार मधून डोंगर सोंडेने चढत असताना डाव्या बाजूला दिसत रहातो. हा बुरुज पाहून उजव्या हाताला आल्यावर आपण ज्या डोंगर सोंडेने वाडी बेलदार मधून वर आलो ती लागते. इथे आपली गडफरी पूर्ण होते. गड फिरण्यास चार ते पाच तास लागतात .

महत्वाची सूचना :- महिपत गडावर घनदाट जंगल तसेच या भागात बिबटया व अस्वलं यांचा वावर असल्याने वाटाड्या घेतल्याशिवाय गड फिरू नये.

पोहोचण्याच्या वाटा :
१) वाडी जैतापूर मार्गे
खेडवरून वाडी जैतापूरला जाणारी गाडी पकडावी. वाडी जैतापूरास उतरल्यावर मळलेल्या वाटेने वाडी बेलदार गावात यावे. वाडीजैतापूर ते वाडीबेलदार हे अंतर दोन ते अडीच तासांचे आहे. खाजगी वहानाने खेड वरून वाडी जैतापूर मार्गे वाडी बेलदार मध्ये जाता येते. वाडी जैतापूर पासून 50 सीटर बस बेलदार वाडीला वर चढू शकत नाही.

वाडी बेलदारहून गडमाथा गाठण्यास 20/25 मिनिटे पुरतात. वाट चांगली मळलेली असल्याने चुकण्याचा संभव नाही.

२) दहिवली वरून :-
खेड वरून दहिवली गावाला जाणारी बस पकडावी. खेड ते दहिवली १ तासाचे अंतर आहे. दहिवली गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. ही वाट लांबची असल्याने गडमाथा गाठण्यास ४ तास लागतात. या वाटेने जातांना आपल्याला दोन खिंडी पार कराव्या लागतात.

३) रसाळगडवरून सुमारगड मार्गे -
रसाळगडवरून सुमारगड मार्गेसुद्धा महिपतगड गाठता येतो. हे अंतर साधारणतता 8 तासांचे आहे. जंगल दाट असल्याने वाट चुकण्याचा फार संभव आहे.
राहाण्याची सोय :
पारेश्वर मंदिरात २० ते ३० जणांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय :
वाडी बेलदार मध्ये जेवणाची सोय होते.
पाण्याची सोय :
पारेश्वर मंदिराच्या जवळील विहिरीत बारामही पाणी उपलब्ध आहे. वाडी बेलदार मध्ये डिसेंबर पासून पाण्याची कमतरता भासते.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
वाडी बेलदार मधून २० ते २५ मिनिटे लागतात. दहिवली गावातून ४ तास लागतात. वाडी जैतापूरपासून 3 तास लागतात
डोंगररांग: Mahabaleshwar, Koyana
 भैरवगड (सातारा) (Bhairavgad (Satara))  जंगली जयगड (Jangli Jaigad)  वसंतगड (Vasantgad)