मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

माहूर (Mahurgad) किल्ल्याची ऊंची :  2650
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: माहूर
जिल्हा : नांदेड श्रेणी : मध्यम
साडेतीन शक्तीपिठा पैकी एक असलेले माहुरचे रेणुकादेवी मंदिर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे या ठिकाणी भक्तांचा वर्षभर राबता असतो. राष्ट्रकुटांच्या काळात हे गाव महापूर या नावाने ओळखले जात असे . याचाच अपभ्रंश होउन सध्याचे माहूर नाव प्रचलित झालेले आहे . या महापूर गावा नजिकच्या डोंगरावर रामगड नावाचा किल्ला होता हाच किल्ला आज माहूरचा किल्ला म्हणून ओळखला जातो.

माहूर गाव आणि प्राचिन व मध्ययुगीन काळापासून अस्तित्वात आहे. या गावातील एसटी स्थानकाच्या मागिल डोंगरात आठव्या नवव्या शतकात खोदलेली हिंदू लेणी आहेत.त्यांना पांडवलेणी या नावाने ऒळखले जाते. गावात मातृतीर्थ नावाचा ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असलेला तलाव आहे. माहूर गावात मध्ययुगात बांधलेली हत्तीखाना नावाची इमारत आहे. पुरातत्व खात्याने या इमारतीत पुराण वस्तू संग्रहालय तयार केलेले आहे. या संग्रहालयात प्रवेश करण्यासाठी रुपये ३/- शुल्क भरावे लागते. माहूर परिसरात सापडलेल्या मुर्ती, ताम्रपट, साहीत्य, तोफा इत्यादींच कायमस्वरूपी प्रदर्शन इथे मांडलेले आहे .

रेणुकादेवीचे दर्शन घेउन किल्ला, लेणी, मातृतीर्थ आणि हत्तीखाना ही सर्व ठिकाणे पाहाण्यासाठी संपूर्ण दिवस लागतो.
54 Photos available for this fort
Mahurgad
Mahurgad
Mahurgad
इतिहास :
माहूर गावातील डोंगरात आठव्या नवव्या शतकात खोदलेली हिंदू लेणी (पांडवलेणी) आहेत. राष्ट्रकुटांच्या काळात हे गाव महापूर या नावाने ओळखले जात असे. याचाच अपभ्रंश होउन सध्याचे माहूर नाव प्रचलित झालेले आहे . या महापूर गावा नजिकच्या डोंगरावर रामगड नावाचा किल्ला होता हाच किल्ला आज माहूरचा किल्ला म्हणून ओळखला जातो. यादवांच्या काळात रामपूर किल्ला प्रशासकीय विभागाचे प्रमुख ठाणे होते. चौदाव्या शतकात रामगड किल्ला गौंड राजांच्या ताब्यात होता.सुलतान हसन शहाने १३५० मध्ये रामगड किल्ल्यावर हल्ला केला. त्यावेळी तलवारसिंहने खंडणी देऊन बहामनी संकट टाळले. त्यानंतर १४१२ मध्ये रामगडवर बहामनीनी पुन्हा हल्ला केला पण तो त्यांना जिंकता आला नाही. इसवीसन १४२२ मध्ये बहामनी सुलतान अहमदशहावलीने रामगडवर अचानक हल्ला करुन जिंकून घेतला. त्यावेळी त्याने गौंडराजा जयसिंह व त्याच्या ५ ते ६ हजार सैन्याची कत्तल केली. त्याच्या बायका मुलांना सक्तीने इस्लाम धर्म स्विकारायला भाग पाडले. रामगड किल्ल्याचे नाव बदलून अहमदाबाद असे ठेवले. त्याने अहमदाबाद गडाला द्क्षिण विदर्भ सुभ्याचे प्रमुख ठाणे बनवले व खुदावंतखान याची सुभेदार म्हणून नेमणुक केली. खुदावंतखानाने बहामनी सत्तेविरुध्द बंड केले आणि किल्ल्याच्या आश्रयाने बहामनी साम्राज्याला बरेच दिवस झुलवले.शेवटी बहामनी सुभेदार अमीर बरीद याने किल्ला ताब्यात घेऊन खुदावंतसिंग याला ठार मारले. माहुर बरीदने जिंकलेले पाहून इमादशहाने माहूर जिंकून आपल्या राज्याला जोडून टाकले. पुढच्या काळा निजामाने माहूर किल्ला जिंकून घेतला.

मोगल सम्राट अकबराने मे १५२९ मध्ये निजामाकडून माहूरचा किल्ला जिंकून घेतला. त्याने उदाजीराम याला पम्चहजारी मनसब देऊन माहूरवर नेमले.पुढे या घराण्याचा या किल्ल्यावर अनेक पिढ्या ताबा होता. जहांगिर बादशहाचा मुलगा शहाजहान याने बापा विरुध्द बंड केले. तो बुर्‍हाणपूरहून बंगालकडे निघतांना त्याने माहूर किल्ल्यावर मुक्काम केला होता. उदारम नंतर त्याचा मुलगा जगजीवनराम किल्लेदार बनला त्याने किल्ल्याची दुरुस्ती केल्याचा उल्लेख मिळतो. इसवीसन १६५८ला त्याचा मृत्यु झाला. त्याच्या नणतर त्याचा अल्पवयीन मुलगा बाबूराव याच्याकडे सुत्र गेली. त्याच्या वतीने त्याची आई सावित्रीबाई कारभार पाहात असे. हरचण्दा राजपूत याने माहूरगडावर हल्ला केली तेंव्हा सावित्रीबाईने त्याचा युध्दात पराभव केला. तिची कर्तबगारी आणि सौर्य पाहून औरण्गजेबामे तीला पंडीता रायबाघन हा किताब दिला. शाहिस्तेख्हानाच्या सैन्या बरोबर ती उंबरखिंडीच्या लढाईत होती.

अठराव्या शतकात माहूरचा किल्ला नागपूरकर भोसल्यांनी मुघलांकडून जिंकून घेतला. त्यानंतर तो किल्ला निजामाने मराठ्यांकडून जिंकून घेतला. स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा किल्ला निजामाकडे होता.

पहाण्याची ठिकाणे :
माहुर किल्ला पाहाण्यासाठी दोन मार्ग आहेत. रेणुका मातेचे मंदिर आणि किल्ल्याचा महाकाली बुरुज यामधील खिंडीतून जो रस्ता जातो त्या रस्त्यावरुन मळलेल्या पायवाटेने आपण १० मिनिटात महाकाली बुरुजापाशी पोहोचतो . येथून किल्ला बघायला सुरुवात केली तर आपल्याला संपूर्ण किल्ला बघण्यासाठी बरेच उलटसुलट फिरावे लागते . किल्ल्यावर जाणारा दुसरा मार्ग हा रेणुकादेवी मंदिरापासून साधारणपणे १ किमीवर आहे. रेणुकामातेच्या मंदिराच्या पुढे दत्तात्रेय आणि अनुसुया मातेची शिखरे आहेत. या शिखरांकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेणुका माता मंदिरापासून एक किमीवर एक कमान व पायऱ्यांचा मार्ग आहे . याठिकाणी महानुभाव पंथीयांचे पवित्र ठिकाण इंजाळा (विशेष) तलावाकाठी आहे . हा तलाव किल्ल्यात असला तरी भक्तांच्या सोइसाठी येथे तटबंदी फोडून पायऱ्याचा मार्ग बनवलेला आहे . या मार्गाने किल्ला पाहायला सुरुवात केली तर किल्ला कमी श्रमात व्यवस्थित पाहाता येतो. हे ठिकाण रेणुकामाता मंदिरापासून दूर असल्याने याठिकाणी वहानांची तसेच भक्तांची वर्दळ कमी असते.

माहूर किल्ल्याला दोन तटंबंद्या आहेत. तटबंदी दगड, विटा चुना याने बांधून काढलेली आहे. दोन तटबंदीतील अंतर डोंगराच्या भौगोलिक रचनेप्रमाणे कमी जास्त आहे. किल्ल्याच्या बाह्य तटबंदीस डुक्कर किल्ला या नावाने ओळखले जाते. या भागात मोठ्याप्रमाणावर जंगल असल्याने रानडुक्करांचा वावर या भागात जास्त असावा म्हणुन हे नाव पडले असण्याची शक्यता आहे. दोन तटबंदीच्या मध्ये म्हणजेच या डुक्कर किल्ल्यामध्ये जेथे दोन तटबंदीतील अंतर जास्त आहे त्या ठिकाणी काही वास्तू आहेत. रेणुकादेवी मंदिराच्या दिशेला तटाला लागून एक मस्जिद आहे तर उत्तरेला तीन दर्गा आणि गौतम झरा आहे . किल्ला १७६ एकरावर पसरलेला असून किल्ल्याच्या दोन्ही तटबंदीत मिळून ४५ बुरुज आहेत. भौगोलिक रचने प्रमाणे बुरुजांची उंचीही वेगवेगळी आहे.

विशेष तलावा जवळून पायऱ्यांची वाट वर चढत जाते . या पायऱ्यांनी आपण १० मिनिटांत हत्ती दरवाजापाशी पोहोचतो. आपण किल्ल्याच्या आतून प्रवेशव्दारात प्रवेश करत असल्याने प्रथम देवड्या दिसतात. प्रवेशव्दाराच्या आतील बाजूस भक्कम खांब आणि कमानदार छत आहे. या छतावर एकेकाळी सुंदर नक्षीकाम केलेले असावे पण पुरातत्त्व खात्याने केलेल्या दुरुस्तीत त्याठिकाणी गुळगुळीत (प्लास्टर ) गिलावा केलेला आहे. कमानींच्या कोपऱ्यात कुठेतरी जुन्या नक्षीकामांची झलक पाहायला मिळते. प्रवेशद्वारातून बाहेर पडून ईशान्यभिमुख भव्य प्रवेशव्दारा समोर आपण उभे राहातो. हे प्रवेशद्वार किल्ल्याच्या आतील तटबंदीत बांधलेले आहे. प्रवेशद्वाराची उंची १३ फूट आणि रुंदी ८ फूट आहे. प्रवेशव्दाराच्या दोन्ही बाजूला चुन्यात बनवलेली शरभशिल्प होती, पण काळाच्या ओघात ती नष्ट झालेली आहेत. त्यांचे ठसे त्याठिकाणी पाहायला मिळतात. प्रवेशव्दारावर चुन्यात नक्षीकाम केलेले असून त्यावर निळ्या पर्शियन टाइल्सचे तुकडे वापरलेले होते . तेही काळाच्या ओघात पडून गेले आहे त्यातील थोडासा भाग दरवाजावरील कोपऱ्यात पाहाता येतो. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस ३ फुट उंच आणि २ फुट रुंदीचे ६ झरोके आहेत. प्रवेशद्वाराच्या बाजूला दोन भव्य बुरुज आहेत. त्या बुरुजावर गजलक्ष्मीचे शिल्प होते त्यामुळे हा दरवाजा हत्ती दरवाजा या नावाने ओळखला जात असे. आज याठिकाणी हे शिल्प आढळत नाही. एकेकाळी किल्ल्यावर येण्याचा मुख्य मार्ग येथून होता त्यामुळे याठिकाणी संरक्षणासाठी दरवाजांची साखळी उभारलेली होती पण हा मार्ग आता जंगलात लुप्त झाल्याने आपल्याला हे सर्व दरवाजे पाहाता येत नाहीत. हत्ती दरवाजासमोर एक भक्कम भिंत बांधलेली असून त्याला जिभी म्हणतात. मुख्य प्रवेशद्वारावर हल्ला करता येउ नये यासाठी ही भिंत बांधलेली होती. हत्ती दरवाजातून थोडे खाली उतरल्यावर वाट काटकोनात वळते. येथे पश्चिमाभिमुख दरवाजा आहे याची उंची ११ फुट असुन रुंदी ७ फुट आहे. या दरवाजातून खाली उतरल्यावर उजव्या बाजूला देवड्या दिसतात . देवड्यांच्या पुढे आग्नेयभिमुख दरवाजा आहे. हे दोन्ही दरवाजे जिभी मध्ये आहेत. मुख्य मार्गावरील यापुढील दरवाजा बाहेरील तटबंदीत असून तो पूर्वाभिमुख आहे त्याच्या समोरही जीभीची भिंत बांधलेली आहे.

हे दरवाजे पाहून परत हत्ती दरवाजातून किल्ल्यात प्रवेश करुन उजव्या बाजुला वळल्यावर दरवाजा लगत एक वास्तू दिसते. त्या वास्तूला स्थानिक लोक घोड्याच्या पागा म्हणतात. तर ऐतिहासिक पुस्तकात याचा उल्लेख चिनी महाल म्हणुन आहे. या वास्तूत असलेली ३६ खांबांची कमानदार रचना पाहाता या वास्तूचा उपयोग दरवाजाच्या संरक्षणासाठी असलेल्या सैनिकाना विश्रांतीसाठी, तसेच कचेरीसाठी होत असावा. या वास्तूच्या बाजूला असलेल्या जिन्याने हत्ती दरवाजावर चढून गेल्यावर पूर्वाभिमुख प्रवेशद्वार लागते. त्याच्या आत एका उध्वस्त वास्तूचे अवशेष आढळतात. या वास्तूला हवामहल या नावाने ओळखले जाते. या वास्तूच्या मधोमध पाण्याचा हौद आहे. त्यात कारंजाची सोय केलेली आहे. या वास्तूच्या उत्तर बाजूला हत्ती प्रवेशद्वारावरील ६ झरोके आहेत . या झरोक्यातून येणाऱ्या हवेमुळे आणि वास्तू मधल्या पाण्याच्या हौदातील कारंजामुळे याठिकाणी थंडावा राहात असे. त्यामुळे या वास्तूला हवामहल म्हणून ओळखले जाते .

हवामहल पाहून तटबंदी डावीकडे ठेवून सरळ पुढे चालत जावे. किल्ल्याच्या आतील तटबंदीवर चर्या आहेत. किल्ला पाहाण्यासाठी आपण तटबंदीला लागून असलेल्या फांजी वरुनच मुख्यतः फिरतो. हवामहाला पासून पुढे गेल्यावर आपल्याला अनेक उध्वस्त वास्तूंचे अवशेष पाहायला मिळातात. त्या ठिकाणी राणी महाल होता. पुढे चालत गेल्यावर एक प्रवेशद्वार लागते. प्रवेशद्वाराला लागूनच एक भव्य दुहेरी बुरुज आहे. त्याला धन बुरुज (मुळ नाव दल बुरुज) या नावाने ओळखले जाते. या बुरुजाच्या बाहेरील भागात जाण्यासाठी खालच्या बाजूला दरवाजा आहे. धन बुरुज हा किल्ल्याच्या पूर्व टोकावरचा शेवटचा बुरुज आहे. या बुरुजावरुन आजूबाजूचा विस्तृत प्रदेश दिसतो. बुरुज पाहून तटबंदी उजवीकडे ठेवत पुढे सरळ चालत गेल्यावर तटबंदीवरुन खाली उतरण्यासाठी जीना लागतो. जीना उतरुन खाली गेल्यावर आपण चोर दरवाजापाशी पोहोचतो. चोर दरवाजा दक्षिणाभिमुख आहे. चोर दरवाजा पाहून जीन्याने परत फांजीवर चढून पुढे चालत गेल्यावर तटबंदी तुटलेली आहे. ती तुटलेली तटबंदी ओलांडून पुढे गेल्यावर फ़ांजीवर एक बांगडी तोफ़ पाहायला मिळते. तोफ़ पाहून पुढे न जाता परत तुटलेल्या तटबंदीपाशी येऊन किल्ल्याच्या अंतर्भागात दिसणार्‍या इमारतीकडे चालत जावे. या इमारतीला दारु कोठार, धान्य कोठार इत्यादी नावांनी ओळखले जाते. या इमारतीच्या बाहेर एक पाण्याचा हौद आहे. इमारतीच्या बाहेरेच्या भिंतीत ७ फ़ुटाचे एक कमान असलेले प्रवेशव्दार आहे. त्यातून आत गेल्यावर उजव्या बाजूच्या भिंतीत एक खिडकी दिसते. आता ही जागा छत कोसळल्यामुळे उघडी झालेली आहे. आतील वास्तू अजून शाबूत असून त्या वास्तूत १२ कमानी आहेत. त्यात आडव्या रांगेत तीन आणि उभ्या रांगेत चार कमानींच्या ओळी आहेत. वास्तूची उंची १२ फ़ूट असून तिच्यामध्ये दोन खिडक्या आहेत.

वास्तू पाहून पायवाटेने ५ मिनिटात आपण हत्ती दरवाजापाशी पोहोचतो. हत्ती दरवाजाच्या बाजूला असलेल्या चीनी महालाच्या बाजूने पूरातत्व खात्याने बांधलेली फ़रसबंदी वाट आहे. या वाटेने तटबंदी उजवीकडे ठेवत चालत जावे. तटबंदीत दर १०० मीटरवर फ़ांजीवर जाण्यासाठी जीने बांधलेले आहेत. या वाटेने १० मिनिटे चालल्यावर डाव्या बाजूला एक उध्वस्त मशिद दिसते. किल्ल्यावरील देवळाचेच मशिदीत रुपांतर करतांना देवळातील खांब तसेच ठेवलेले पाहायला मिळतात. मशिदीच्या बाहेरच्या भिंतीवरही फ़ुलांची नक्षी कोरलेले दगड वापरलेले पाहायला मिळतात. मशिदी समोर छोटा तलाव आहे.मशिद पाहून उजव्या बाजूच्या तटबंदीवर चढून चालत गेल्यावर पश्चिम टोकावरील शेवटच्या बुरुजावर आपण पोहोचतो. या बुरुजाला निशाण बुरुज या नावाने ओळखले जाते. पूर्वीच्या काळी या बुरुजावर ध्वज लावलेला होता. आता तो महाकाली बुरुजावर लावलेला आहे. निशाण बुरुजाची उंची ६२ फ़ूट आहे. बुरुजावरून दुरवरचा प्रदेश दिसतो. तसेच माहूरच्या डोंगरावर चढत जाणारा वळणावळणांचा रस्ता बाह्य तटबंदी पाहायला मिळते. पश्चिम टोकावरील बुरुज पाहून मशिदीपाशी येऊन फ़रसबंदी मार्गाने पुढे चालत गेल्यावर १० मिनिटात आपण किल्ल्यावरील महाकाली या भव्य दुहेरी बुरुजावर पोहोचतो. या बुरुजाची उंची ३८ फ़ुट आहे. बुरुजाच्या आत असलेल्या खोलीमध्ये महाकालीची स्थापना केलेली असल्यामुळे या बुरुजाला महाकाली बुरुज हे नाव पडले आहे. महाकाली मंदिराजवळ एक दगडी रांजण आहे. महाकाली मंदिराच्या समोरच्या भागात कमानदार ओवर्‍या आहेत. याठिकाणी बुरुजावर संरक्षणासाठी असलेल्या सैनिकांची राहाण्याची सोय होती. या ठिकाणी टेहळणीसाठी काही खिडक्या आहेत. या ठिकाणी बुरुजातीन खाली उतरुन बाहेरच्या भागात जाण्यासाठी जीना आणि छोटा दरवाजा आहे. यावाटेने १० मिनिटात रेणुका मातेच्या मंदिरा समोरील रस्त्यावर उतरता येते. अशाप्रकारचा जीना आणि दरवाजा महाकाली मंदिराच्या बाजूलाही आहे. महाकाली बुरुजाबर तोफ़ांसाठी तीन जंग्या आहेत. एकाच वेळी ९ तोफ़ा ठेवता येतील अशी तोहमार्‍याच्या जागा आहेत.

महाकाली बुरुज पाहून झाल्यावर आलेल्या वाटेने ने जाता बुरुजाच्या महाकाली मंदिराच्या बाजूल असलेल्या फ़ांजीवरून ख्हाली उतरल्यावर एक फ़रसबंदी वाट खाली उतरते. या वाटेने १० मिनिटे उतरल्यावर उजव्या बाजूला देवड्या दिसतात. फ़रसबंदी वाट सोडून या देवड्या पार करुन गेल्यावर आतील तटबंदीतला दरवाजा लागतो. या दरवाजाच्या बाजूला असलेले दोन्ही भव्य बुरुज वैशिष्ट्यपूर्ण आहेत. एक बुरुज चौकोनी आकाराचा असून दुसरा अंडाकृती आकाराचा आहे.हा दरवाजा पाहून ५ मिनिटे खाली उतरल्यावर बाहेरच्या तटबंदीतील दरवाजा आहे.हे दोन्ही दरवाजे पाहून परत फ़रसबंदी वाटेवर येऊन खाली उतरल्यावर आपण विशेष तलावाच्या दुसर्‍या बाजूला पोहोचतो. याठिकाणी आपली गडफ़ेरी पूर्ण होते.संपूर्णगड पाहाण्यासाठी ४ ते ५ तास लागतात.
पोहोचण्याच्या वाटा :
माहुर गाव नांदेड जिल्ह्यात असले तरी ते जिल्ह्याच्या एका टोकाला आहे. त्यामुळे तेथे जाण्यासाठी मुंबईहून नंदिग्राम एक्सप्रेसने किनवट गाठावे. किनवटहून ५० किलोमीटरवर माहुर आहे. नंदिग्राम, देवगिरी एक्सप्रेसने नांदेड गाठावे. नांदेडहून १३० किलोमीटरवर माहूरगड आहे. एसटी किंवा खाजगी वाहानाने माहूरला जाता येते. मुंबईहून एक्सप्रेसने शेगाव गाठावे शेगाहून माहूर २०५ किमीवर आहे. माहूर गावापासून किल्ला ८ किमीवर आहे.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.माहूर गावात अनेक हॉटेल्स आहेत.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही. माहूर गावात अनेक हॉटेल्स आहेत.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्यायोग्य पाणी नाही .
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
सप्टेंबर ते फ़ेब्रुवारी.
जिल्हा Nanded
 कंधार (Kandhar)  माहूर (Mahurgad)  नांदेडचा किल्ला (नंदगिरी किल्ला) (Nanded Fort (Nadgiri))