मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

मल्हारगड (सोनोरी) (Malhargad) किल्ल्याची ऊंची :  3100
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: भुलेश्वर,पुणे
जिल्हा : पुणे श्रेणी : मध्यम
महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला किल्ला म्हणून ’मल्हारगड’ प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात. एका डोंगररांगेवर राजगड आणि तोरणा तर दुसरी डोंगररांग ही पूर्वपश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड याच रांगेवर वसलेले किल्ले आहेत. पुण्याहून सासवडला जातांना लागणार्‍या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती अगदी अलीकडची म्हणजे इ. स १७५७ ते १७६० या काळातील आहे पायथ्याला असणार्‍या सोनोरी गावामुळे या गडाला ’सोनोरी’ म्हणूनही ओळखले जाते.

मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकाराचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकाराचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान असून संपूर्ण किल्ला पाहण्यास अर्धापाऊण तास पुरतो. किल्ल्याची तटबंदी, बुरूज यांची काही ठिकाणी पडझड झाली असली, तरी बर्‍याच ठिकाणी ती शाबूत आहे. याशिवाय सोनोरी गावात असलेली पानसे यांची गढी, लक्ष्मी - नारायणाचे मंदिर, मुरलीधराचे मंदिर या पहाण्यासारख्या गोष्टी आहेत.

मल्हारगड हा छोटेखानी किल्ला, पानसे (वाडा) गढी, लक्ष्मी - नारायणचे व मुरलीधराचे मंदिर हि ठिकाणे मुंबई - पुण्याहून एका दिवसात पाहून होतात.
7 Photos available for this fort
Malhargad
Malhargad
Malhargad
इतिहास :
या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार पानसे यांनी केली. पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. मल्हारगडाचे बांधकाम १७५७ ते १७६० या काळात झाले. सन १७७१ - ७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या किल्ल्याचा उपयोग दिवेघाटावर आणि आजुबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे. इंग्रजां विरुध्दच्या बंडात उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांनी या किल्ल्याचा आश्रय घेतला होता.
पहाण्याची ठिकाणे :
पूर्वेकडच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर उजव्या बाजूने पुढे गेले असता बालेकिल्ल्याच्या तटाआधी आपल्याला एका वाड्याचे अवशेष दिसतात. बाजूलाच एक विहीरही आहे, मात्र ती वापरात नसल्याने गडावरील इतर विहिरीं प्रमाणेच यात पाणी अजिबात नाही. बालेकिल्ल्यात प्रवेश न करता असेच तटाच्या बाजूने पुढे गेल्यावर समोरच एक बांधीव तळे लागते. या तळ्यात उतरण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या अहेत. किल्ल्याच्या दक्षिणेला असणारे हे तळे बालेकिल्ल्याच्या तटाला लागून आहे. बालेकिल्ल्यातून तलावावर जाण्यासाठी तटबंदीत एक दिंडी दरवाजा बांधलेला आहे. तलाव पावसाळ्यात व हिवाळ्यात पाण्याने भरलेले असते. यातील पाणी वापरण्यास उपयुक्त असले तरी पिण्यायोग्य मात्र नाही.

तलावाच्या पुढे किल्ल्याच्या टोकावर असणार्‍या बुरुजाकडे जाताना अजून एक विहीर लागते. याही विहिरीत पाणी नाही. या बुरुजाच्या खाली आपल्याला एक बुजलेला दरवाजा दिसतो. या बुरुजाकडून उजवी कडे पुढे गेल्यावर आपल्याला एक चोर दरवाजा दिसतो. झेंडेवाडी गावातून आल्यावर याच दरवाज्यातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो.

चोर दरवाजापासून बालेकिल्ल्याच्या तटबंदीच्या बाजूने मुख्य प्रवेशव्दाराच्या दिशेने चालत गेल्यावर बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार लागते. बालेकिल्ल्याचा तट चौकोनी असून काही ठिकाणी त्याची पडझड झाली आहे. बालेकिल्ल्यातील दोन मंदिरांची शिखरे आपल्याला किल्ल्याच्या पायथ्यापासून खुणावत असतात. ही दोन मंदिरे बालेकिल्ल्यात बाजूबाजूलाच असून यातील लहानसे देऊळ खंडोबाचे, तर दुसरे थोडे मोठे देऊळ महादेवाचे आहे. खंडोबाच्या देवळामुळेच या गडाला मल्हारगड हे नाव पडले असावे. महादेवाच्या देवळात शंकराची पिंडी असून या मंदिरात रहायचे झाल्यास फारतर ५ ते ६ माणसे दाटीवाटीने राहू शकतात.

पानसे (गढी) वाडा :- पेशव्यांचे तोफखाना प्रमुख सरदार कृष्णराव माधवराव पानसे यांनी बांधलेली गढी मल्हारगडच्या पायथ्याशी असलेल्या सोनोरी गावात आहे. गढीचे १२ फूटी उंच पश्चिमाभिमुख प्रवेशव्दार एखाद्या किल्ल्यासारखेच आहे. गढीला ६ बुरुज आहेत. बुरुजांमधील तटबंदीची जाडी ९ फूट व उंची १९ फूट आहे.

गढीत शिरल्यावर प्रथम लक्ष्मी - नारायणाचे मंदिर आहे. या मंदिरात संगमरवरात कोरलेली लक्ष्मी - नारायणाची मुर्ती आहे. या मुर्तीत गरूडाच्या खांद्यावर बसलेला विष्णू व त्याच्या डाव्या बाजूला लक्ष्मी दाखवलेली आहे. हि मुर्ती ७ मार्च १७७४ रोजी कर्नाटक स्वारीच्या वेळी मेळेकोट येथे केलेल्या लुटीत मिळाली होती. याशिवाय दगडात कोरलेली गरुडाची मुर्ती गाभार्‍यातील कोनाड्यात ठेवलेली आहे. मंदिराच्या समोर पाण्याच सुकलेल टाक आहे. तर मागच्या बाजूला पायर्‍या असलेली मोठी विहिर आहे. मंदिराच्या उजव्या व डाव्या बाजूस ३ छोट्या देवळ्या आहेत. त्यात उजव्या सोंडेचा गणपती, सूर्य, यांच्या मुर्ती व शिवलिंग आहेत.

मंदिराच्या मागे असलेल्या विहिरिच्या बाजूला पानसे यांचा आहे. या वाड्याला चारही बाजूंनी तटबंदी व दिंडी दरवाजा असलेले लाकडी प्रवेशव्दार आहे. पानसे यांचा तीन मजली वाडा होता, आता केवळ एक मजली राहीला आहे. वाड्यातील शिसवी देवघर पहाण्या सारखे आहे. दरवर्षी या वाड्यात जम्नाष्ट्मीचा (कृष्ण जन्माचा) उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. वाड्याच्या समोरील बाजूस घोड्याच्या पागा होत्या.

पानसे यांचा वाडा पाहून लक्ष्मी - नारायणाच्या मंदिराला वळसा घालून प्रवेशव्दाराच्या विरुध्द दिशेला चालत गेल्यावर ढासळलेली तटबंदी दिसते. येथे गढीचा दुसरा दरवाजा होता. (गावकर्‍यांनी यातूनच रस्ता काढलेला आहे.) या तटबंदीत रस्त्याच्या डाव्या बाजूस गणपतीचे मंदिर आहे. ते पाहून मागे फिरून गढीच्या प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गढीची फेरी पूर्ण होते.

सोनोरी गावात मुरलीधराचे मंदिर आहे. मंदिरात काळ्या पाषाणातील श्रीकृष्णाची अत्यंत सुंदर मूर्ती आहे.

पोहोचण्याच्या वाटा :
मल्हारगडावर आपल्याला प्रामुख्याने दोन वाटांनी जाता येते.
१) सासवडहून :-
सासवड पासून ६ किमी वर ’सोनोरी’ हे गाव आहे. या गावाला एसटी सासवडहून निघून दिवसातून तीन वेळा म्हणजे स १०, दु २ आणि संध्या ५ या वेळेत भेट देते. सोनोरी गावातून समोरच दिसणारा मल्हारगड आपले लक्ष वेधून घेतो. सोनोरी गावातून कच्च्या रत्याने किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी २० ते २५ मिनिटे लागतात. वाहनाने पायथ्या पर्यंत जाता येते. किल्ल्याच्या उजव्या बाजूच्या खिंडीत इलेक्ट्रीकचे टॉवर आहेत. टॉवरच्या बाजूने एक पायवाट गडावर जाते. या वाटेने किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी जातो.(गडाचे प्रवेशव्दार सोनोरी गावाच्या विरुध्द बाजूस आहे.) . पायथ्या पासून किल्ल्यावर जाण्यासाठी अर्धा तास लागतो.

२) झेंडेवाडीतून :-
पुण्याहून सासवडला निघाल्यावर दिवे घाट संपल्यावर काही वेळाने ’झेंडेवाडी’ गावाचा फाटा लागतो. येथून २ किमी वर झेंडेवाडी हे गाव आहे. या गावात आपल्याला झेंडूच्या फुलांची शेती केलेली दिसते. गाव पार करून आपल्याला समोरच्या डोंगर रांगांमध्ये दिसणार्‍या खिंडीत जावे लागते. गावात विचारल्यावर गावकरीही आपल्याला ती खिंड दाखवतात. या खिंडीत पोहोचल्याशिवाय मल्हारगडाचे आपल्याला बिलकुल दर्शन होत नाही. या खिंडीत गेल्यावर समोरच याच डोंगररांगेमध्ये असणारा मल्हारगड आपल्याला दिसतो. तटबंदींनी सजलेल्या मल्हारगडावर जायला आपल्याला पुन्हा डोंगर उतरावा लागत नाही. खिंडीतून किल्ल्यावर जाण्यास अर्धातास तर आपण उतरलेल्या झेंडेवाडीफाट्या पासून खिंडपार करून किल्ल्यावर जाण्यास साधारणपणे दीड तास लागतो.
राहाण्याची सोय :
फक्त ५ ते ६ माणसे महादेवाच्या मंदिरात दाटीवाटीने राहू शकतात. गडावर अन्यत्र राहाण्याची सोय नाही. मात्र पायथ्याला असणार्‍या सोनोरी गावात किंवा झेंडेवाडीत शाळेच्या आवारात राहता येते.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय आपणच करावी. सासवडला जेवणासाठी हॉटेल्स आहेत.
पाण्याची सोय :
गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
१) सोनोरी गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी पाऊण तास लागतो. २) झेंडेवाडीफाट्या पासून खिंडपार करून किल्ल्यावर जाण्यास दीड तास लागतो.
 बसचे वेळापत्रक

Depot Village From Depot From Village km
Sasvad   Sonori   -   10.00,2.00,5.00   

जिल्हा Pune
 भोरगिरी (Bhorgiri)  चाकणचा किल्ला (Chakan Fort)  चावंड (Chavand)  दौलतमंगळ (Daulatmangal)
 धाकोबा (Dhakoba)  दुर्ग (Durg)  घनगड (Ghangad)  हडसर (Hadsar)
 हनुमंतगड (निमगिरी) (Hanumantgad(Nimgiri))  हटकेश्वर ते लेण्याद्री (Hatkeshwar to Lenyadri)  इंदुरीचा किल्ला (गढी) (Induri Fort (Gadhi))  जीवधन (Jivdhan)
 कैलासगड (Kailasgad)  कोरीगड (कोराईगड) (Korigad)  लोहगड (Lohgad)  मल्हारगड (सोनोरी) (Malhargad)
 मोहनगड (Mohangad)  मोरगिरी (Morgiri)  नाणेघाट (Naneghat)  नारायणगड (Narayangad)
 निमगिरी (Nimgiri)  प्लस व्हॅली ट्रेक (Plus Valley)  पुरंदर (Purandar)  रायरेश्वर (Raireshwar)
 राजगड (Rajgad)  राजमाची (Rajmachi)  रोहीडा (Rohida)  शिवनेरी (Shivneri)
 सिंहगड (Sinhagad)  सुभानमंगळ (Subhan Mangal)  तैलबैला (Tailbaila)  तिकोना (Tikona)
 तोरणा (Torna)  तुंग (Tung)  उंबरखिंड (Umberkhind)  विसापूर (Visapur)