मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

मांजरसुभा (Manjarsubha Fort) किल्ल्याची ऊंची :  2610
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: गोरक्षनाथ डोंगररांग
जिल्हा : नगर श्रेणी : मध्यम
नगर जिल्ह्यात अलंग, मदन, कुलंग, हरिशचंद्र सारखे बेलाग आणि सुपरिचित किल्ले आहेत, तसेच मांजरसुभा किल्ल्या सारखे छोटे आणि अपरिचित किल्लेही आहेत. नगर शहरापासून केवळ २१ किलोमीटर अंतरावर मांजरसुभा नावाचा सुंदर किल्ला आहे. गडा खालून जाणार्‍या वांबोरी घाटाचे संरक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधला गेला. या किल्ल्याच्या जवळच्या डोंगरांवर सीतामाईची न्हाणी आणि गोरक्षनाथाचे मंदिर आहे. नगर मध्ये मुक्काम करुन मांजरसुभा किल्ल्या बरोबर नगरचा किल्ला, रणगाडा म्युझियम, सलाबत खानची कबर (चांदबीबी महाल) आणि हत्ती बारव ही ठिकाणेही पाहाता येतील.
34 Photos available for this fort
Manjarsubha Fort
पहाण्याची ठिकाणे :
मांजरसुभा गावाच्या मागील डोंगरावर किल्ला आहे. किल्ल्याच्या डोंगराच्या सर्व बाजूंनी छोटी दरी आहे. या नैसर्गिक खंदकामुळे किल्ल्याला आयतेच संरक्षण मिळालेले आहे. एका बाजूला जमिन नैसर्गिकरित्याच वर येऊन चिंचोळ्या पट्ट्याने डोंगराला जोडलेली आहे. या जमिनीच्या चिंचोळ्या पट्ट्यावरुन आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. हा किल्ल्याकडे जाणारा मार्ग संरक्षित करण्यासाठी येथे बुरुज आणि प्रवशेव्दार असावे. यातील डाव्या बाजूचा अष्टकोनी भक्कम बुरुज अजून तग धरुन उभा आहे. त्यावर आता हनुमान मंदिर बांधलेले आहे. दुसर्‍या बाजूचा बुरुज नष्ट झालेला असून त्याठिकाणी दगड मातीचा ढिगारा आहे. या बुरुजापर्यंत कच्च्या रस्ता आहे. खाजगी वहानाने बुरुजा पर्यंत जाता येते. किल्ल्यावर जाण्यासाठी कधीकाळी रस्ता बनवलेला होता. आज तो पूर्णपणे ढासळलेला आहे. या रस्त्याने १५ मिनिटात आपण गडमाथ्यावरील प्रवेशव्दारा समोर पोहोचतो. या पश्चिमाभिमुख प्रवेशव्दारा समोरील भाग रस्ता बनविण्यासाठी खोदला असल्याने आपल्याला थेट गड माथ्यावर प्रवेश करावा लागतो. गड दक्षिणोत्तर पसरलेला आहे. गडाचे मुख्य प्रवेशव्दार गडाच्या दक्षिण टोकावर आहे. प्रवेशव्दार भक्कम असून सुस्थितीत आहे. प्रवेशव्दाराची उंची २५ फ़ूट आहे. आतल्या बाजूला पाहारेकर्‍यांसाठी देवड्य़ा आहेत. प्रवेशव्दराच्या आतल्या बाजूला प्रशस्त चौक आहे. या ठिकाणी चौकात प्रकाश यावा या करीता भिंतीत कमानदार झरोके ठेवलेले आहेत. प्रवेशव्दाराच्या छतावर आतल्या बाजूने असलेल्या घुमटावर चुन्याचा गिलावा देऊन त्यावर नक्षीकाम केलेले आहे. प्रवेशव्दाराच्या छतावर चढून जाण्यासाठी जीना आहे. जीन्यात प्रकाश यावा यासाठी झरोके ठेवलेले आहेत. प्रवेशव्दाराच्या छतावरुन संपूर्ण किल्ला व आजूबाजूचा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. प्रवेशव्दारातून किल्ल्यावर बाहेर पडण्यासाठी उत्तरेकडे १२ फ़ूट उंच कमान असलेला दरवाजा आहे.

प्रवेशव्दारातून गडावर प्रवेश केल्यावर समोर एक दुमजली उध्वस्त इमारत दिसते. त्या इमारतीच्या रोखाने चालत गेल्यावर रुंद पायर्‍या लागतात. या पायर्‍या चढून इमारतीकडे न जाता डाव्या बाजूला गेल्यास दोन कोठारे दिसतात. या कोठारांच्या छतावर दोन फ़ूट व्यासाची दोन गोलाकार छिद्र केलेली आहेत. कोठारात प्रवेश करण्यासाठी खालच्या बाजूला ३ फ़ूट उंचीचे प्रवेशव्दार आहे. कोठार पाहून उध्वस्त दुमजली इमारतीपाशी यावे . या इमारतीच्या अवशेषां वरुन ठिकाणी महाल असावा. या महालाच्या भिंतींमध्ये दिवे लावण्यासाठी केलेले कमानदार कोनाडे दिसतात. महालाच्या डाव्या बाजूला चौकोनी बांधीव तलाव आहे. पावसाळ्याचे पाणी साठविण्यासाठी या तलावाचा उपयोग होत असावा. सध्या हा तलाव कोरडाच आहे. तलाव पाहून महालाच्या पिछाडीला गेल्यावर महालाच्या भिंतीच्या मागच्या बाजूला छोटा रंगमंच दिसतो. या रंगमंचावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. रंगमंचा समोर मोकळी जागा आहे. या जागेच्या टोकाला रंगमंचाच्या समोर एक उंच जागा बनवलेली आहे. याठिकाणी बसून महत्वाच्या व्यक्ती कार्यक्रम पाहात असाव्यात. या उंचावरील जागेपासून रंगमंचा समोरील मोकळ्या जागे पर्यंत एका\खाली एक असलेले तीन कारंजे आहेत. सध्या कारंजे नसले तरी त्यासाठी बनवलेले चौकोनी, अष्टकोने खड्डे. त्यातून पाणी खेळवण्यासाठी असलेले तांब्याचे पाईप्स पाहायला मिळतात.

महाल आणि तलावाच्या मध्ये असलेल्या पायर्‍यांनी किल्ल्याच्या उत्तर टो्कावर असलेल्या बुरुजाकडे चालत जातांना तलावा जवळ एक कमान दिसते. याठिकाणी एखादी वास्तू असावी. बुरुज भक्कम बांधणीचा आहे. बुरुजात प्रवेश केल्यावर खाली उतरण्यासाठी जीना आहे. जीना उतरल्यावर आपण प्रशस्त दालनात येतो. याला डाव्या बाजूला ५ फ़ूट उंच कमान्दार खिडकी आहे. समोरच्या बाजूला समोरच्या बाजूला कमान आहे. तर डाव्या बाजूला बाहेर पडण्यासाठी दरवाजा आहे. हा बुरुज दूमजली असून खालच्या मजल्यावर उतरण्यासाठी पहिल्या मजल्याच्या जमिनीवर एक २ X २ फ़ूट आकाराचा चौकोन कोरलेला आहे. त्यात उतरुन सर्पिलाकार पायर्‍यांनी खाली उतरावे लागते. खालच्या दालनाची रचना उजवीकडील प्रवेशव्दार सोडले तर वरच्या दालनासारखीच आहे. या बुरुजाच्या बरोबर खाली कातळात कोरलेली ५ पाण्याची टाकी आहेत. ती पाहाण्यासाठी बुरुजातून बाहेर पडून पूर्वेला असलेल्या प्रवेशव्दाराकडे जावे. या प्रवेशव्दाराच्या बाजूला बुरुज आहेत. प्रवेशव्दाराची कमान शाबूत आहे. प्रवेशव्दारातून खाली उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. या पायर्‍यांनी खाली उतरताना उजव्या बाजूला कातळात एक ३ X २ फ़ूट आकाराची चौकोनी खोली कोरलेली आहे. शेवटच्या पायर्‍या तुटलेल्या आहेत. या पायर्‍यांनी खाली उतरलेल्यावर दगडी भिंत बांधून केलेली मोकळी जागा दिसते. उजव्या बाजूला एकापुढे एक पाण्याची प्रशस्त टाकी आहेत. यातीत ३ क्रमांकाचे टाके खांब टाके असून त्याच्या बरोब्बर वरच्या बाजूला दुमजली बुरुज आहे. या बुरुजाचे अचंबीत करणारे बांधकाम या टाक्या जवळून पाहाता येते.

टाकी पाहून आल्या मार्गाने उत्तरेकडील पश्चिमाभिमुख प्रवेशव्दारातून गदावर प्रवेश करुन गडफ़ेरी मारत दक्षिणेकडील प्रवेशव्दाराकडे येतांना काही ठिकाणी तुरळक तटबंदी पाहायला मिळते. गडावरुन वांबोरी घाट दिसतो.
पोहोचण्याच्या वाटा :
किल्ल्याच्या पायथ्याचे मांजरसुभा हे गाव नगर पासून २० किलोमीटर अंतरावर आहे. नगर - औरंगाबाद महामार्गावर नगर पासून १० किलोमीटर अंतरावर वांबोरी गावाला जाणारा फ़ाटा आहे. या भागात प्रसिध्द असलेले गोरक्षनाथ मंदिराचा डोंगर मांजरसुभा किल्ल्या जवळ आहे. त्यामुळे वांबोरी फ़ाट्यावर मोठी सिमेंटची कमान उभारुन त्यावर "श्री चैतन्य गोरक्षनाथ ट्रस्ट, आदर्श गाव, मांजरसुभा” असे लिहिलेले आहे. या फ़ाट्यावरुन ७ किलोमीटर अंतरावर मांजरसुभा गावाला जाणारा फ़ाटा आहे. या फ़ाट्या वरही सिमेंटची कमान उभारलेली आहे. मांजरसुभा गावाच्या फ़ाट्या पर्यंत जाण्यासाठी नगर मधील माळीवाडा एसटी स्थानकातून वांबोरीला दर पाऊण तासाने एसटी बसेस आहेत. मांजरसुभा फ़ाट्यावरुन मांजरसुभा गाव १.२ किलोमीटर अंतरावर आहे. गावाच्या मागे किल्ला आहे. मांजरसुभा फ़ाट्यवरुन १५ मिनिटात किल्ल्याच्या पायथ्याशी चालत जाता येते. खाजगी वहानाने थेट किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत जाता येते.

राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाणाची सोय नाही.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर आणि गावात जेवणाची सोय नाही.

पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पायथ्या पासून गडमाथ्यावर पोहोचण्यास १५ मिनिटे लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
जुलै ते मार्च
डोंगररांग: Gorakshanath Range
 मांजरसुभा (Manjarsubha Fort)