मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka)) किल्ल्याची ऊंची :  3900
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: सातमाळ
जिल्हा : नाशिक श्रेणी : कठीण
नाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्चिम जाणार्‍या सातमाळ डोंगररांगेत १८ किल्ले आहेत. त्यापैकी मोहनदरी गावाच्या मागे असलेला मोहनदर उर्फ़ शिडका हा काहीसा अपरिचित किल्ला आहे. अहिवंतगडा पासुन ५ किमी आणि सप्तशृंगी गडापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला त्यावरील खिडकी सारख्या दिसणार्‍या नेढ्यामुळे आपले चटकन लक्ष वेधुन घेतो. या नेढ्य़ाबद्दल या भागात एक दंतकथा प्रचलीत आहे. महिषासुर या राक्षसाने आणि त्याच्या दोन भावांनी वणी परीसरात उच्छाद मांडलेला. सप्तशृंगी देवीने महिषासुराच्या दोनही भावांचा वध केला. महिषासुर रेड्याच्या रुपात पळायला लागला. मोहनदरचा डोंगर ओलांडुन तो पलिकडे गेला. त्याच्या मागोमाग जाणार्‍या देवीने डोंगराला लाथ मारल्यामुळे नेढ तयार झाल. अजुन एका दंतकथेप्रमाणे देवीने मारलेल्या बाणामुळे नेढ तयार झाल.

लाव्हा रसापासून सह्याद्रीची निर्मिती होतांना काही ठिसुळ भागही निर्माण झाले. वार्‍या आणि पावसामुळे अशा भागांची झीज होऊन कातळकड्याला आरपार भोक पडत. त्याला नेढ अस म्हटल जात. दगडांच्या मधला ठिसुळ भाग ज्या प्रमाणात असेल तेवढा नेढ्याचा आकार असतो.

मोहनदर किल्ल्यावरील नेढ ही प्रत्यक्षात खुप सुंदर आहे. प्रस्तरारोहणाच तंत्र आणि साहित्य (४० फ़ुट रोप, हार्नेस इत्यादी) वापरुन १२ ते १५ फ़ुट प्रस्तर चढुन नेढ्यातून पलिकडे जाता येत. प्रस्तर चढण्यसाठी व्यवस्थित नैसर्गिक खाचा आहेत. नेढ्यात चढण्याचा थरार, तिथला घोंगावणारा वारा आणि हा काहीसा अपरिचित असलेला किल्ला पाहाण्यासाठी एकदा मोहनदर किल्ल्याला भेट द्यायला हरकत नाही.

खाजगी वाहानाने अचला, अहिवंत आणि मोहनदर हे तीन किल्ले दोन दिवसात व्यवस्थित पाहून होतात. पहिल्या दिवशी अचला,अहीवंत पाहून दरेगावातील मारुती मंदिरात किंवा मोहनदरी गावातील आश्रमशाळेच्या व्हरांड्यात मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी मोहनदर किल्ला पाहाता येईल.
8 Photos available for this fort
Mohandar(Shidaka)
Mohandar(Shidaka)
Mohandar(Shidaka)
पहाण्याची ठिकाणे :
गडाच्या पूर्व टोकावरून आपला गडावर प्रवेश होतो. तिथे उध्वस्त तटबंदींचे अवशेष पाहायला मिळतात. गडावर प्रवेश करुन पश्चिम टोकाकडे चालत जातांना वाटेत पठारावर एक मोठ टाक पाहायला मिळत त्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. पुढे पश्चिम टोकाकडे चालत गेल्यावर तुटलेला कडा आहे. समोर खालच्या बाजूस नेढ आहे. त्यावर भगवा झेंडा लावलेला आहे. पश्चिम टोकाकडून परत प्रवेशव्दार पर्यंत येऊन पूर्व टोकाकडे जातांना वाटेत दोन बुजलेली टाक पाहायला मिळतात. त्यापुढे चालत गेल्यावर वरच्या भागात दोन सुकलेली पाण्याची टाकी आहेत. ही टाकी पाहून छोटा टप्पा चढताना घराची काही जोती दिसतात. तेथुन वर गेल्यावर पाण्याने भरलेली तीन टाकी आहेत. पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. ही टाकी पाहून गडाच्या पूर्व टोकापर्यंत जाऊन परत प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गड प्रदक्षिणा पूर्ण होते. गड व त्याच्या बाजूच्या डोंगरामधील घळीत एका बुरुजाच आणि तटबंदीच बांधकाम पाहायला मिळत.

गडावरून पश्चिमेला अहिवंतगड, पूर्वेला कण्हेरा, दक्षिणेला सप्तशृंगी, मार्कंड्या, रावळ्या-जावळ्या धोडप ही रांग पाहायला मिळते. उत्तरेला अभोणे गाव व बाजूच चणकापूर धरण पाहायला मिळते.

नांदुरी गावातून मोहनदरी गावाकडे जाण्यासाठी वळतो त्याठिकाणी ५ फ़ूट उंचीच्या ६ वीरगळी पाहायला मिळतात. तसेच नांदुरी अभोणा रस्त्यावर मोहनदरीला जाण्यासाठी फ़ाटा आहे तेथेही ४ वीरगळ आणि एक सर्प शिल्प पाहायला मिळते.
पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई किंवा पुणे मार्गे नाशिक गाठाव. नाशिक सापुतारा रस्त्यावर वणीच्या पुढे नांदुरी गाव आहे. नांदुरी गावातून अभोण्याला जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर नांदुरी पासून ३.५ किमीवर मोहनदरी गावात जाणारा फ़ाटा आहे. मोहनदरी गावात शासकीय आश्रमशाळा आहे. गडावर जाणार्‍या सर्व वाटा या आश्रम शाळेपासुनच सुरु होतात.

मोहनदर किल्ला पूर्व पश्चिम पसरलेला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी ३ मार्ग आहेत.

१) मोहनदरी गावातून नेढ्यापर्यंत किल्ला चढुन जायचे. पुढे प्रस्तरारोहणाच तंत्र (सोबत ४० फ़ुटी रोप आणि हार्नेस असणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाच आहे.) वापरुन या अवाढव्य नेढ्यातून पलिकडे जाता येत. नेढ्यातून उतरल्यावर आपण मोहनदर गावाच्या विरुध्द बाजुस जातो. तेथुन डोंगर उजव्या बाजूला आणि दरी डाव्या बाजूला ठेवत गडावर जाणारी पायवाट आहे. या मार्गाने मोहनदरी गावातून गडावर जाण्यासाठी दिड तास लागतो.

२) मोहनदरी गावातून नेढ्यापर्यंत किल्ला चढुन जायचा. नेढ्यापासून डोंगर उजव्या बाजुला आणि दरी डाव्या बाजूला ठेऊन पश्चिम टोकाकडे चालत जायचे. पश्चिम टोकाच्या खिंडीतून वळसा घातल्यावर आपण मोहनदर गावाच्या विरुध्द बाजुस जातो. तेथुन डोंगर उजव्या बाजूला आणि दरी डाव्या बाजूला ठेवत किल्ल्यावर जाता येत. हि वाट फ़ारशी वापरात नसल्यामुळे या वाटेवर घसारा (स्क्री) आणि घाणेरीची काटेरी झुडूपे मोठ्या प्रमाणावर आहेत. या मार्गाने गडावर जाण्यासाठी दोन तास लागतात.

३) मोहनदरी गावातून नेढ्याच्या दिशेने न जाता मळलेल्या पायवाटेने किल्ल्याच्या पूर्व टोकाकडे चालत गेल्यावर आपण किल्ल्याचा डोंगर आणि बाजूचा डोंगर यामधिल घळीत (नळीत) पोहोचतो. या नळीतून वर चढत गेल्यावर किल्ल्याच्या पूर्व टोकावरून आपला गडावर प्रवेश होतो. या मार्गाने गडावर जाण्यासाठी दिड तास लागतो.
राहाण्याची सोय :
मोहनदरी गावातील आश्रमशाळेच्या व्हरांड्यात राहाण्याची सोय होते.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय ५ किमी वरील नांदुरीत होते.
पाण्याची सोय :
गडावरील टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
मोहनदरी गावातून दिड ते दोन तास लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
नोव्हेंबर ते मार्च
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: M
 माचणूर (Machnur)  मदनगड (Madangad)  मढचा किल्ला(वर्सोवा किल्ला) (Madh Fort (Varsova Fort))  माढा गढी/किल्ला (Madha Fort)
 मधुमकरंदगड (Madhu makarandgad)  महादेवगड (Mahadevgad)  माहीमचा किल्ला (Mahim Fort)  माहीम किल्ला (केळवेमाहीम) (Mahim Fort ( Kelve - Mahim))
 महिमानगड (Mahimangad)  महिमतगड (Mahimatgad)  महिपालगड (Mahipalgad)  महिपतगड (Mahipatgad)
 माहुली (Mahuli)  माहूर (Mahurgad)  मलंगगड (Malanggad)  मालेगावचा किल्ला (Malegaon Fort)
 मल्हारगड (सोनोरी) (Malhargad)  मंडणगड (Mandangad)  मानगड (Mangad)  मंगळगड (Mangalgad)
 मंगळवेढा (Mangalwedha)  मांगी - तुंगी (Mangi-Tungi)  माणिकदूर्ग (Manikdurg)  माणिकगड (Manikgad)
 मणिकपूंज (Manikpunj)  मांजरसुभा (Manjarsubha Fort)  मनोहर-मनसंतोष गड (Manohar-Mansantoshgad)  मार्कंड्या (Markandeya)
 मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir))  मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka))  मोहनगड (Mohangad)  मोहोळ गढी/किल्ला (Mohol Fort)
 मोरागड (Moragad)  मोरधन (Mordhan)  मोरगिरी (Morgiri)  मोटी दमण किल्ला (Moti Daman Fort)
 मृगगड (Mrugagad)  मुडागड (Mudagad)  मुल्हेर (Mulher)