मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

मुल्हेर (Mulher) किल्ल्याची ऊंची :  4290
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: बागलाण
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम
सह्याद्री पर्वताच्या उत्तरदक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणातून होते. उत्तरेकडून सुरू होणार्‍या या सह्याद्रीच्या रांगेला सेलबारी आणि डोलबारी रांग असे म्हणतात. सेलबारी रांगेवर मांगीतुंगी सुळके, न्हावीगड, तांबोळ्या असे गड आहेत. तर दुसर्‍या डोलबारी रांगेवर मुल्हेर, मोरागड, साल्हेर, हरगड, सालोटा हे गडकिल्ले आहेत. पश्चिमेकडील गुजरात मधील घनदाट जंगल असलेला डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण विभाग यांच्या सीमेवर हे किल्ले वसलेले आहेत.

बागुलगेड म्हणजेच बागलाण सुपीक, संपन्न आणि सधन असा प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील हा प्रदेश असल्याने येथील जनजीवनावर गुजराती आणि महाराष्ट्रीय अशा संमिश्र आचारविचारांचा प्रभाव पडलेला आहे. पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने बागायती शेती मोठ्या प्रमाणावर चालते. त्यामुळे लोकांची आर्थिक स्थिती ही फार चांगली आहे. मुल्हेरचा किल्ला हा नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी मुल्हेर नावाचे गाव आहे.

7 Photos available for this fort
MULHER
Mulher
Mulher
इतिहास :
हा किल्ला तसा प्राचीन आहे. पूर्वी किल्ल्यातच गाव वसलेले होते. मात्र कालांतराने गाव खाली उतरले आणि पायथ्यापासून सुमारे २ किमी अंतरावर वसले आहे. हे मुल्हेर गाव महाभारतकालीन आहे, याचे नाव होते. रत्नपूर या भागात मयूरध्वज नावाचा राजा होऊन गेला आणि गावाला मयूरपूर नाव पडले. तर किल्ल्याला मयूरगड हे नाव पडले. औरंगजेबाने किल्ला जिंकला तेव्हा याचे नाव औरंगगड असे ठेवण्यात आले.

पुराणात मुल्हेरचा उल्लेख येतो. मात्र खात्रीलायक माहिती चौदाव्या शतकाच्या पहिल्या दशकात मिळते. मुल्हेरचा किल्ला बागुल राजांनी बांधला. इ.स १३०८ ते १६१९ पर्यंत बागुलांनी येथे राज्य केले. या घराण्याच्या नावावरूनच परिसराला बागुलगेड व त्याचा अपभ्रंश बागलाण हे नाव पडले. बागुल राजे हे मुळचे कनोजचे या बागुल घराण्याच्या काळातच जगप्रसिद्ध मुल्हेरी मूठ बनवण्यात आली. या घराण्यात एकूण ११ राजे झाले. या राजांना बहिर्जी ही पदवी होती. विजयनगरमध्ये हिंदू सत्ता प्रस्थापित होण्यापूर्वी कितीतरी अगोदर बागलाण मध्ये हिंदूसत्ता प्रस्थापित होती.

अकबराने जेव्हा खानदेशाचे राज्य जिंकले तेव्हा प्रतापशहा बहिर्जी बागलाणचा राजा होता. त्याने मोगलांचे सार्वभौमत्व पत्करले पुढे शाहजहानशी या राजाने मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. जुलै १६३६ ला औरंगजेबाची दक्षिणेचा राज्यपाल म्हणून नेमणूक झाली. इ.स १६३८ मध्ये मोगलांनी बागलाणवर हल्ला केला आणि मुल्हेर किल्ला जिंकला व त्याचे नाव औरंगगड असे ठेवले. १५ फेब्रुवारी १६३८ रोजी वैभवशाली हिंदुंचे राज्य संपुष्टात येऊन तेथे मोगलांची सत्ता प्रस्थापित झाली. मुल्हेर ही बागलाणची परंपरागत राजधानी, किल्ल्यावर महंमद ताहिर याची नेमणूक प्रथम किल्लेदार म्हणून झाली या ताहिरने मुल्हेरजवळ ताहीर नावाचे गाव वसवले व त्याचे कालांतराने ताहिराबाद असे नामकरण झाले. इ.स १६६२ मध्ये मुल्हेर किल्ल्यामधील सैनिकांनी अपुर्‍या पगारासाठी बंड केले. दुसर्‍या सुरत लुटीनंतर शिवाजी महाराजांनी बागलाण मोहीम उघडली. यामध्ये त्यांनी साल्हेर, मुल्हेर व इतर किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले. मराठ्यांनी १६७१ मध्ये प्रथम मुल्हेरवर हल्ला केला. पण किल्लेदाराने तो थोपवून धरला. मग मराठ्यांनी त्याचा नाद सोडला. मात्र साल्हेरच्या लढाईनंतर फेब्रुवारी १६७२ मध्ये मराठ्यांनी मुल्हेरगड काबीज केला. त्यानंतर पुन्हा किल्ला मोगलांच्या हातात पडला.

पुढे इ.स १७५२ च्या भालकीच्या तहानुसार मुल्हेर सकट खानदेशमधील सर्व प्रदेश मराठ्यांच्या हाती आला. यानंतर त्रिंबक गोविंद मुल्हेरचा किल्लेदार झाला. पुढे १७६५ मध्ये किल्ल्यावर गुप्तधन मिळाल्याच्या नोंदी पेशवे दफ्तरात आहेत. अशा रीतीने १५ जुलै १८१८ रोजी हा किल्ला ब्रिटिशांच्या तावडीत सापडला.

पहाण्याची ठिकाणे :
मुल्हेरगडाचे प्रामुख्याने २ भाग पडतात. एक म्हणजे मुल्हेर माची आणि मुल्हेर बालेकिल्ला. गणेशमंदिरा पासून २ वाटा फुटतात. एक वाट वर चढत जाते व दुसर्‍या वाटेला येऊन मिळते. या वाटेने डावीकडे गेल्यावर १० मिनिटांतच सोमेश्वर मंदिर लागते. तर उजवीककडे जाणारी वाट आणि गणेशमंदिरा पासून निघणारी उजवीकडची वाट एकत्र येऊन मिळतात. याच वाटेने थोडे पुढे गेल्यावर एक पठार लागते. पठारापासून दोन वाटा लागतात वर जाणारी वाट मोती तलावापाशी जाते. या टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे. पठारापासून समोर जाणारी वाट राजवाड्यांच्या भग्न अवशेषांपाशी घेऊन जाते. येथेच एक गुप्त दरवाजादेखील आहे. राजवाड्यांच्या थोडे खाली आल्यावर रामलक्ष्मण मंदिर लागते. राजवाड्यांच्या वाटेने थोडे अंतर चालून गेल्यावर मुल्हेर व हरगड यांमधील खिंड लागते. सोमेश्वर मंदिराकडे जात असताना वाटेतच डावीकडे ३ मजली चंदनबाव लागते. सध्या येथे प्रचंड झाडी झुडूपे आहेत. सोमेश्वर मंदिर राहण्यासाठी उत्तम जागा आहे. मोती टाक्यांच्या उजवीकडे वर चढत जाणार्‍या वाटेने अर्धा तास चालल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या महाद्वारापाशी येऊन पोहोचतो. आत गेल्यावर डावीकडे गुहा आहेत, तर समोरच पाण्याचं टाकं आहे. मुल्हेरगडाचा बालेकिल्ला म्हणजे मोठे पठार आहे. बालेकिल्ल्यावर पोहोचल्यावर समोरच पाण्याची ९ - १० टाकी आहेत. राजवाड्याचे भग्नावशेष, भडंगनाथांचे मंदिर या सर्व गोष्टी आहेत. भडंगनाथांच्या मंदिराच्या वर असणार्‍या टेकडीवरून खाली उतरलो की मोरागडाकडे जाणारी वाट दिसते. समोरच असणारी मांगीतुंगीची शिखरे, न्हावीगड, तांबोळ्या, हनुमानगड लक्ष वेधून घेतात.
पोहोचण्याच्या वाटा :
मुल्हेर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा अस्तित्वात आहेत. या दोन्ही वाटा मुल्हेर गावातूनच जातात. मुल्हेर गाव ते किल्ल्याचा पायथा यात २ किमीचे अंतर आहे. गावातून २५ मिनिटे चालत पुढे गेल्यावर डावीकडे एक घर लागते, आणि समोरच वडाचे एक झाड दिसते. झाडापासून सरळ पुढे जावे. दहा मिनिटांतच धनगरवाडी लागते. धनगरवाडी वरून जाणारी वाट पकडावी. साधारण ४५ मिनिटांनी २ वाटा फुटतात एक वाट सरळ तर दुसरी उजवीकडे वळते.

१ सरळ वाट
सरळ जाणार्‍या वाटेने २० मिनिटांत मुल्हेर माचीवरील गणेश मंदिरापाशी पोहचतो. या वाटेने गडावर प्रवेश करताना ३ दरवाजे लागतात. ते सर्व ढासळलेल्या अवस्थेत आहेत. वाट साधी व सोपी आहे. या वाटेने गडावर पोहोचण्यास दीड तास लागतो.

२ उजवीकडची वाट
उजवीकडच्या वाटेने गेल्यावर दोन तासांनी आपण मुल्हेरमाची वरील गणेश मंदिरात पोहचतो. या वाटेनेही गडावर प्रवेश करताना ३ दरवाजे लागतात. ही वाट जरा दूरची आहे ही वाट हरगड व मुल्हेर किल्ला यांच्या खिंडीतून वर चढते. या खिंडीतून डावीकडे मुल्हेर, तर उजवीकडे हरगड लागतो. या वाटेने गडावर पोहचण्यास ३ तास लागतात.



राहाण्याची सोय :
मुल्हेरमाची वरील सोमेश्वर आणि गणेश मंदिरात आणि बालेकिल्ल्यावर असणार्‍या गुहेत राहता येते.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत:… करावी.
पाण्याची सोय :
गडावरील मोती टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे. मात्र हे पाणी फेब्रुवारी पर्यंतच उपलब्ध असते.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
मुल्हेर गावातूनच साधारण २ तास लागतात .खिंडीतल्या वाटेने ३ तास लागतात.
सूचना :
१) साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरागड, हरगड हे आसपासचे किल्ले ३ दिवसात पाहाता येतात.
२) साल्हेर, सालोटा, मोरागड, हरगड यांची माहिती साईटवर दिलेली आहे.
जिल्हा Nasik
 आड (Aad)  अचला (Achala)  अहिवंत (Ahivant)  अजमेरा (Ajmera)
 अलंग (Alang)  अंजनेरी (Anjaneri)  अंकाई(अणकाई) (Ankai)  औंढा (अवंध) (Aundha)
 बहुला (Bahula)  भास्करगड (बसगड) (Bhaskargad)  भिलाई (Bhilai Fort)  बिष्टा (Bishta)
 चांदवड (Chandwad)  चौल्हेर (Chaulher)  देहेरगड (भोरगड) (Dehergad (Bhorgad))  डेरमाळ (Dermal)
 धोडप (Dhodap)  डुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera))  दुंधा किल्ला (Dundha)  गडगडा (घरगड) (Gadgada (Ghargad))
 किल्ले गाळणा (Galna)  गोरखगड(मनमाड) (Gorakhgad(Manmad))  हरगड (Hargad)  हरिहर (Harihar)
 हातगड (Hatgad)  इंद्राई (Indrai)  जवळ्या (Jawlya)  कांचन (Kanchan)
 कण्हेरगड (Kanhergad(Nashik))  कंक्राळा (Kankrala)  कर्‍हा (Karha)  कात्रा (Katra)
 कावनई (Kavnai)  खैराई किल्ला (Khairai)  कुलंग (Kulang)  मदनगड (Madangad)
 मालेगावचा किल्ला (Malegaon Fort)  मांगी - तुंगी (Mangi-Tungi)  मणिकपूंज (Manikpunj)  मार्कंड्या (Markandeya)
 मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka))  मोरागड (Moragad)  मोरधन (Mordhan)  मुल्हेर (Mulher)
 नस्तनपूरची गढी (Nastanpur)  न्हावीगड (Nhavigad)  पर्वतगड (Parvatgad)  पिंपळा (Pimpla)
 पिसोळ किल्ला (Pisol)  प्रेमगिरी (Premgiri)  राजदेहेर (ढेरी) (Rajdeher)  राजधेर (Rajdher)
 रामशेज (Ramshej)  रांजणगिरी (Ranjangiri)  रवळ्या (Rawlya)  साल्हेर (Salher)
 सालोटा (Salota)  सप्तश्रुंगी (Saptashrungi)  सोनगड (Songad)  सोनगिरी (नाशिक) (Songir (Nashik))
 टंकाई (टणकाई) (Tankai)  त्रिंबकगड (ब्रम्हगिरी) (Trimbakgad)  त्रिंगलवाडी (Tringalwadi)  वाघेरा किल्ला (Waghera)